प्रिय पुरुषोत्तम बेर्डे…
तुमचा दूरदर्शनच्या आठवणींना उजळा देणारा मार्मिकमधील लेख फारच मस्त. कोल्हापूरहून मुंबईत सातवीत असताना एका सुट्टीत आलो तेव्हा दूरदर्शनवर सिनेमे व छायागीत बघायला मिळते. मुंबईच्या लोकांना हा एक हेव्याचा विषय होता. तेव्हा कोल्हापूरला दूरदर्शन दिसत नसे. पण या दूरदर्शनच्या पडद्यामागचं जग इतकं भन्नाट होतं याची कल्पनासुद्धा नव्हती.तुम्ही खरंच खूप छान काळ बघितलात. किती ऊर्जा मिळाली नकळत तुम्हाला त्या माध्यमातून. आजचे तुम्ही सर्वच ज्या ‘काल’चे प्रॉडक्ट आहात तो काळ सुंदर चितारलाय. यातली सगळीच नावं आम्हाला तेव्हापासून सेलिब्रीटी होती आणि आहेत. जडणघडणीचा ब्लॅक अँड व्हाईट काळ कसा बहुरंगी होता हे खुसखुशीत शैलीत मांडलेत. म्हणून हे तुमचंच नाही फक्त दूरदर्शनचंच नाही तर एका घडत्या पिढीचंच चित्रण झालंय…
– अभिराम भडकमकर
नवी दृष्टी देणारा लेख
धोपेश्वर पावणार का, हा राजा पटवर्धन यांचा मार्मिकतेने विषय मांडणारा लेख भावला. रत्नागिरी व रायगड जिल्हातिल लोकसंख्येची तुलना. चेंबूर, कॅलिफोर्निया, अमेरिका येथील रिफायनरीचा संदर्भ कोकणी वाचकाला सकारात्मक ऊर्जा देतो. कातळशिल्पाकडे कसे पहावे, हे सांगणारा लेख सजग करतो. मधु मंगेश कर्णिक यांचे जैतापूरची बत्ती हे पुस्तक नवी दृष्टी देते असे वाटते तशीच दृष्टी हा लेख देतो आहे. पटवर्धन सरांचे ‘जैतापूरचे अणुवैभव’ हे पुस्तकही बरेच काही सांगून जाणारे आहे. कोकणी माणसांनी वाचन करून गाववाल्यांपर्यंत पोहचवावित. आजही गाववाले मुंबैच्या आपल्या नातेवाईकांना मानतात. अशी पत्रके गावोगाव जावीत. महाड, माणगाव व रोहा तालुक्यांत बर्याच खेड्यांत गावपण जपणारी तरूण मंडळी गावातच सुखी जीवन जगताहेत.कारण कारखानदारी. नोकरी सांभाळून शेतीही पाहताहेत. प्रत्येक मराठी विशेषतः कोकणी माणसाने मार्मिक व लोकराज्य वाचून अवघे शहाणे करावे जन. सरपंच, सदस्य, तरूणांनी प्रबोधनासाठी वाचन संस्कृती वाढवावी. गाव तेथे दैनिक ही कोकण मराठी साहित्य परिषदेची चळवळ उचलून धरावी.
– अ. वि. जंगम, महाड. जि. रायगड.
प्रकल्पांना विरोध होतोच
विकासाभिमुख प्रकल्पाला देशात अनेक ठिकाणी विरोध होतच असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सरदार सरोवराला म्हणजेच नर्मदा प्रकल्पाला मेधा पाटकर यांनी केलेला विरोध. तसाच विरोध जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पालाही झाला आणि आता तो धोपेश्वर रिफायनरीला देखील होतोय. राजा पटवर्धन यांच्या लेखातून हे उत्तम प्रकारे आले आहे.
– किशोर पटवर्धन, सांगली
स्फूर्तीदायक जीवनपटाची ओळख
‘धंदा म्हणजे काय रे भाऊ’ या लेखमालेतील ‘मुर्गी का फंडा’ अप्रतिम लेख जमला आहे. दिलीप पाथरे यांचे संपूर्ण आयुष्य हे असंख्य तरुणांसाठी स्फूर्तीदायक आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आहे. त्यांनी केलेले अपार कष्ट, संसाराचा गाडा पुढे रेटण्यासाठी केलेले अनेक उद्योग, तुला आलेली अनेक संकटे, पैशांची चणचण, स्वतःचा पत्ताही देता येणार नाही अशी राहण्याची दशा, चित्रपटातीलच शोभेल असे लेखात उमटलेले आत्मचरित्र वाचून हा मराठी उद्योजक माझा मित्र असल्याचा अभिमान द्विगुणित झाला. मस्त मस्त आणि मस्त शब्दांकन, फारच छान.
– विकी गोरक्ष, मुंबई
फारच कौतुकास्पद वाटचाल
दिलीप पाथरे यांची पूर्वीची एकंदरीत परिस्थिती, वडिलांचा व्यवसाय, त्यांचे नंतरचे आजारपण, त्यामुळे लहान वयात अंगावर आलेली घरची जबाबदारी, पण रक्तात व्यवसायाचे बीज वडिलांनी रुजवले असल्यामुळे तुम्ही केलेली छोटीमोठी धडपड, नशिबी आलेले यश अपयश पचवून जिद्द न सोडता जीवनात संघर्ष करणे, नोकरी करताना, पोल्ट्री फार्म व्यवसायाची मुहूर्तमेढ, आपल्या देवतुल्य सासर्यांनी वेळेवर व आपल्या कर्तृत्वावर विश्वास दाखवून केलेली मदत, हळूहळू वाढलेला व्यवसाय मुलगा कुणाल याने हुशारीने वेगवेगळे प्रयोग करत यशाचे शिखर गाठून करत इतर शेतकर्यांही रोजगार उपलब्ध करून सामाजिक ऋण फेडत फेडत पाथरे कुटुंबीयांनी आजपर्यंत केलेली कौटुंबिक व व्यवसायिक वाटचाल फारच कौतुकास्पद आहे.
– अनिल इनामदार