अशी आहे ग्रहस्थिती
रवि -बुध-राहू मेष राशीत, केतू-तुळेत, शनि-प्लूटो मकरेत, शुक्र -मंगळ-नेपच्युन कुंभेत, गुरु-मीनेत, चंद्र -कन्येत, त्यानंतर तूळ, वृश्चिक आणि सप्ताहाच्या अखेरीस धनु राशीत. दिनविशेष – १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती, १७ एप्रिल रोजी इस्टर संडे, १९ एप्रिल रोजी अंगारकी चतुर्थी.
मेष – या आठवड्यात लग्नेश आणि धनेश शुक्र लाभात आहे. त्यामुळे आर्थिक समस्येचा अंत होईल. मनासारखी कामे होतील. उच्चपदस्थ आणि गुरुतुल्य व्यक्तींचा सहवास घडेल. राजकीय, सरकारी सेवकांना आगामी काळ उत्तम जाईल. मोठी जबाबदारी खांद्यावर येईल. संततीकडून चांगले काम घडेल. भागीदारातून चांगला लाभ होईल. वैवाहिक आयुष्यात चांगले अनुभव येतील.
वृषभ – व्यावसायिक निर्णय फायद्याचे ठरतील. लग्नेश शुक्र, सप्तमेश मंगळ यांची युती दशमात असल्याने भागीदारांकडून उत्तम सहकार्य मिळेल. कोर्ट-कचेरीच्या दाव्यांमध्ये यश लाभेल. सरकारी-राजकीय क्षेत्रात पतप्रतिष्ठा मिळेल. शनि महाराजांच्या कृपेमुळे नावलौकिकात भर पडेल. विवाहेच्छुंसाठी चांगला आठवडा आहे. १५ आणि १६ हे दिवस विशेष संस्मरणीय राहतील. अनपेक्षित गुड न्यूज कानावर पडेल.
मिथुन – तर्कबुद्धीच्या जोरावर नव्या संधी चालून येतील. राशिस्वामी बुध लाभात, सोबत उच्चीचा रवि, गुरुचे राश्यांतर, लाभात राश्यांतर करून आलेला राहू त्यामुळे घेतलेले निर्णय फायदेशीर राहतील. दशमातील गुरूमुळे आर्थिक, कौटुंबिक, घर, नोकरीच्या संदर्भातील सर्व अडचणी दूर होतील. कर्जाचे प्रश्न झटपट सुटतील. परदेश दौरा पार पडेल. नोकरीनिमित्ताने प्रवास होतील. बदली, प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल. अपेक्षित कार्य मनाप्रमाणे पार पडेल. १५ आणि १६ तारखेला कौटुंबिक कार्यक्रमातून आनंद मिळेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
कर्क – पितृसौख्याच्या माध्यमातून लाभ होतील. भाग्यात राश्यांतर करून आलेल्या गुरूमुळे धार्मिक कार्यात भाग घ्याल. दशमस्थानातील उच्चीच्या रवीमुळे अधिकारप्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रातील मंडळींसाठी काळ उत्तम राहील. शेतकर्यांना चांगले आर्थिक पाठबळ मिळेल. विरोधकांवर मात कराल. कामासाठी प्रवास करावा लागेल. आध्यात्माची गोडी निर्माण होईल. कोणाशीही संवाद करताना परिस्थिती आणि विषयाला धरून बोला, चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊ नका.
सिंह – शिक्षणक्षेत्रात काम करणार्यांना अधिकार मिळतील. राशिस्वामी रवीचे आगमन, भ्रमण भाग्यातून होणार आहे. संशोधक, शास्त्रज्ञांचा गौरव होईल. हातून पुण्यकर्म घडेल. वडिलांकडून चांगली मदत मिळेल. सरकारी, राजकीय क्षेत्रातील मंडळींनी जवळच्या व्यक्तींकडून फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. तुमचे नाव पुढे करून गैरफायदा घेतला जाऊ शकतो. निंदानालस्तीला तोंड द्यावे लागू शकते. महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कन्या – १५ आणि १६ तारखांना अनपेक्षितपणे मनासारखी घटना घडेल. त्यामुळे मन आनंदी राहील. राश्यांतर करून आलेल्या राहू-केतुमुळे आर्थिक फटका बसू शकतो. कर्ज, उधार उसनवारी घेण्याचे टाळा. दाताच्या समस्या जाणवतील. दत्तक मंडळींना आर्थिक लाभ होतील. गायन, संभाषण, संगीत, नाटक, क्षेत्रातील मंडळींना केतू लाभदायक राहील. सप्तमात राश्यांतर झालेला गुरु विवाहेच्छुंसाठी वरदान ठरेल. गुरुबल उत्तम राहील.
तूळ – व्यवहार करताना कागदपत्रांची छाननी करा. खबरदारी घ्या. राश्यांतर करून आलेला केतू, योगकारक शनि नेपच्यूनसोबत आहे. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळा. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. पैशाची कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर ऊठबस होईल. महत्वाचे लोक संपर्कात येतील. विमा कंपनी, मार्केटिंग क्षेत्रातील मंडळींसाठी काळ चांगला राहील. तडकाफडकी निर्णय नको. पती-पत्नीत विवाद फार ताणू नका. प्रेम प्रकरणात यश मिळेल.
वृश्चिक – थोडी खट्टी थोडी मीठी असे अनुभव या आठवड्यात येतील. सुखस्थानात शुक्र-मंगळ. संततीबाबत शुभ वार्ता कानावर पडेल. नोकरदारांना महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी चालून येईल. शत्रूवर विजय मिळवाल. महिलांना फायदा मिळेल. वैद्यकीय व्यावसायिकांना लाभ होतील. वकिलांना महत्वाच्या केसमध्ये विजय मिळेल. १६ ते १८ हे दिवस मानसिक अस्थिरतेचे आहेत, जपून राहा. आर्थिक बाजू भक्कम होईल.
धनू – राशिस्वामी गुरु चतुर्थात हंस योगात, त्यामुळे सुखसमृद्धीचा अनुभव येईल. नवीन वास्तूचा प्रश्न मार्ग लागेल. धार्मिक कार्य पार पडेल. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील मंडळींसाठी उत्तम काळ आहे. बंधुबाबत कटू अनुभव येतील. मामा-मामीबरोबर वादाची शक्यता आहे. गर्विष्ठपणा बाजूला ठेवून काम करा. भाग्येश रवी पंचमात असल्याने पतप्रतिष्ठा मिळेल. संततीबाबत शुभवार्ता कानी पडेल. व्यवसायात चांगले लाभ होतील.
मकर – घरात वादाचे प्रसंग घडतील. राश्यांतर करून आलेले रवि-राहू-केतू आणि गुरु यांच्यामुळे साडेसातीची धार थोडी तीव्र होईल. सुखस्थानात राहूचे आगमन झाल्यामुळे १६ ते १८ या तारखांना मानसिक अस्थिरता राहील. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. गुरूमुळे शुभकार्यात लाभ होतील. विवाहेच्छुंसाठी शुभकाळ. संभ्रम टाळा. भुुलभुलय्याच्या मोहात पडू नका. आई-वडिलांना कष्ट देऊ नका.
कुंभ – आनंददायी काळ. योगकारक शुक्राचे लग्नातील भ्रमण खेळाडू, कलावंत, गायक, कवी यांच्यासाठी उत्तम आहे. प्रवासात नवीन ओळखी होतील. घरात चर्चा करताना दोन पावले मागे घ्या. लेखकांना चांगले यश मिळेल. १९ आणि २० या तारखा विशेष लाभदायी राहणार आहेत.
मीन – शुभ फळे मिळण्यासाठी काळ अनुकूल आहे. शिक्षण, विवाह, व्यवसायवृद्धी, धार्मिक कार्य, यामध्ये चांगले अनुभव येतील. नोकरीच्या ठिकाणी परिवर्तन घडेल. बदलीचे पत्र देखील हातात पडू शकते. कामाच्या निमित्ताने विदेशात जावे लागू शकते. प्रवासात महत्वाच्या वस्तू सांभाळा. व्ययातल्या मंगळामुळे आरोग्याच्या समस्या डोके वर काढू शकतात. उन्हाची तीव्रता वाढते आहे, त्यामुळे धावपळ करणे टाळा.