काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना राष्ट्रीय राजकारणात आजकाल फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. चित्रपटसृष्टीत शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने किती व्यवसाय केला, यावर त्या सिनेमाशी संबंधित लोक दखलपात्र आहेत का, हे ठरते. देशात सध्या सुरू असलेल्या मोदीशाहीत राजकारणाचाही असाच उठवळ सिनेमा झालेला आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची झालेली पीछेहाट आणि चार राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश यांच्या बळावर आता राहुल गांधी यांना म्हणूनच क्षुल्लक लेखले जात आहे. काँग्रेस पक्ष रसातळाला गेला असतानाही देशात २० टक्के मतं मिळवतो आणि सर्वशक्तिमान भाजपाची टक्केवारी काँग्रेसच्या दुपटीच्या आसपास असते, याचा हल्ली सगळ्यांना विसर पडू लागलेला आहे.
तरीही राहुल गांधी यांचे राजकीय महत्त्व कमी झालेले आहे, हे नाकारण्याचे कारण नाही. मात्र, राहुल वेळोवेळी भाजपला शिंगावर घेतात, त्या पक्षाच्या क्रूर आणि हिंस्त्र ट्रोलसेनेला (यात खुद्द पंतप्रधानांपासून ते ज्यांना ट्विटरवर फॉलो करतात असे गुन्हेगारी स्वरूपाच्या अफवा पसरवणारे, विद्वेष पसरवणारे दिवटे आणि भाजपचे अधिकृत आणि अनधिकृत प्रवक्ते वगैरेंचा समावेश आहे) जुमानत नाहीत, हेही अमान्य करता येणार नाही. भाजपच्या आणि मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक चुकीच्या निर्णयांवर सर्वात आधी बोलणारे राहुलच होते आणि त्यांनी दिलेले इशारे वेळोवेळी खरे झाले आहेत. कोविडकाळात त्यांनी सांगितलेल्या सगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी भाजपच्या केंद्र सरकारला झक्कत करावी लागली होती, पण त्याचे श्रेय राहुल यांना देण्याइतका मनाच्या मोठेपणाची नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कोत्या वृत्तीच्या नेत्यामध्ये नाही.
याच राहुल यांनी नुकतेच एक भाकीत केले आहे. श्रीलंकेत आज जी भयंकर आर्थिक परिस्थिती आहे ती भारतात आणखी काही महिन्यांमध्ये येईल, असे राहुल म्हणतात. त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड पाहता पंतप्रधान आणि त्यांच्या तोंडपुंज्या चमच्यांनी या वक्तव्याची खिल्ली उडवली किंवा ते दुर्लक्षून मारले तरी शहाण्या माणसांना त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यात श्रीलंकेचा उल्लेख आहे, तो अधिक महत्त्वाचा. कारण पंतप्रधानांची तोंडाळ प्रचारसेना, जिच्यात पगारी ट्रोलांपेक्षा बिनपगारी बाजारबुणग्यांचीच भरती अधिक आहे, ती हल्ली व्हॉट्सअपवर पंतप्रधानांच्या आर्थिक कुशलतेचे पोवाडे गाणार्या पोस्टींचे पो टाकत फिरते आहे. श्रीलंका, पाकिस्तान यांची वाताहत होत असताना भारतात ‘तेवढी’ महागाई नाही, हे मोदींच्या कुशल नेतृत्त्वाचे फलित आहे, असा शोध या गणंगांना लागलेला आहे.
यात दोन असत्ये आहेत.
एक ढळढळीत असत्य म्हणजे मोदींचा अर्थशास्त्राशी काही संबंध आहे.
त्यांचा एकंदरीतच उच्चशिक्षणाशी काही संबंध नाही, हे वेळोवेळी त्यांनी भाषणांमध्ये करून घेतलेली फजिती आणि वैज्ञानिकतेच्या नावाखाली मांडलेल्या छद्मवैज्ञानिक कल्पनांमधून स्पष्ट झालेलं आहे. नोटबंदी आणि जीएसटीची अर्धवट अंमलबजावणी ही त्यांच्या आडदांड आर्थिक निरक्षरतेची साक्ष द्यायला पुरेशी उदाहरणे आहेत. सर्वसामान्य नागरिकांना यातना होतात, तेव्हा प्रापंचिक व्यापतापांपासून पळ काढलेल्या मोदी यांना आसुरी आनंद मिळतो, हे त्यांनी नोटबंदीच्या काळात परदेशांमध्ये जाऊन काढलेल्या घृणास्पद उद्गारांवरून दिसून आलेले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे जगणे सुकर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या सर्व गुंतवणुकींचे व्याजदर कमी करणे आणि उद्योगपतींवर कमी व्याजदराच्या कर्जांची खैरात करून त्यांना बँका बुडवून पळून जायला मुक्तद्वार देणे यातून त्यांनी देशाची काय प्रकारची चौकीदारी केली, हे सुज्ञांना व्यवस्थित माहिती आहे.
मोदींनी बटीक केलेल्या रिझर्व्ह बँकेच्या शक्तिहीन प्रमुखांनी आणि अर्थ खात्याचा बट्ट्याबोळ करणार्या निर्मलाक्कांनी अगदी कालपरवापर्यंत देशात महागाई आहे, हेच मान्य केले नव्हते. आता ते मान्य करूनही तिला चाप लावण्याचे उपाय योजण्याची आणि केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’सारख्या अनावश्यक खर्चबाजीला कात्री लावण्याची हिंमत रिझर्व्ह बँकेमध्ये नाही. निर्मलाक्कांकडून आशा करण्यासारखी परिस्थिती कधीच नव्हती. मधल्या काळात कोविडवर आणि आता रशिया-युक्रेन संघर्षावर महागाईचे खापर फोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. पण त्यात काहीही दम नाही, हे कोविडपूर्वीच अर्थव्यवस्थेची काय वाट लागली होती, त्यातून स्पष्ट होते आणि आताही रशिया-युक्रेन संघर्षाआधीच महागाई शिगेला पोहोचायला प्रारंभ झाला होता, हेही स्पष्ट आहे.
श्रीलंकेत झालेली आर्थिक वाताहत ही महिंदा राजपक्षे आणि मंडळींनी घेतलेल्या आत्मघातकी निर्णयांमुळे ओढवली आहे. पाकिस्तानच्या वाताहतीची कारणे त्या देशाच्या अमेरिकावलंबित्वातून निर्माण होतात. पण या देशांचे बारा वाजले म्हणजे आपण सुस्थितीत आहोत, अशी कल्पना करून घेणे म्हणजे शुद्ध आत्मवंचनाच आहे. आपल्याकडे आपल्या थोर सत्ताधीशांच्या अर्थनिरक्षरतेचे फटके आपण भोगणारच आहोत. श्रीलंका आणि पाकिस्तान जात्यात असतील तर आपण सुपात आहोत. सुपातल्यांनी जात्यातल्यांना हसण्याइतका मूर्खपणा दुसरा नाही.
राहुल गांधी यांची भविष्यवाणी खोटी ठरावी, अशीच सगळ्या देशवासियांची इच्छा असेल. पण आजवरचा अनुभव पाहता ती खरी ठरण्याची शक्यताच अधिक आहे. महागाईचा आगडोंब उसळलेला असताना हिजाब, हलाल, अजान, मुस्लिमांवर बहिष्कार असल्या मुद्दाम चेतवलेल्या निरर्थक, विद्वेषपूर्ण गोष्टींमध्ये अडकून पडणार्यांना त्यांच्या लायकीप्रमाणेच राज्यकर्ते मिळाले आहेत, असे खेदाने म्हणावे लागेल.