जोशींची मुलांची चित्रे, मुखपृष्ठे, चित्रे छान असत. मुखपृष्ठांची त्यांची वेगळी आकर्षक शैली होती. संपादकांना त्यांची एक विक्षिप्त अट असे. ते म्हणत, आत पॅक केलेले हे तुमचे मुखपृष्ठ. याचे मानधन रोख देणे व घरी जाऊन चित्र पाहणे. चित्र सुंदर आहे. संपादक बुचकळ्यात पडे, पण घरी चित्र पाहिल्यावर खुष होई. ते शिवाजी पार्कात रहात. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी त्यांचा प्रशस्त फ्लॅट होता. हिरॉईन तुमच्या घरी. अशा काहीशा स्पर्धेत ऐश्वर्या रॉय त्यांच्या घरी येऊन गेली होती. तिचे कॅरिकेचर त्यांनी तिला भेट दिले.
– – –
६०/७० ते अदमासे दोन हजार सालापर्यंत व्यंगचित्रकारांच्या नामावलीतील ही एक नामवंत वल्ली. मध्यम उंचीचे, निळ्या डोळ्यांचे गोरेपान श्याम जोशी म्हणजे बहुप्रसवा गृहस्थ होते. अॅक्रिलिक पेंटिंग्जपासून तर व्यंगचित्रे, मुखपृष्ठे, मुलांची मासिके इ. तसेच अनेक साहित्य संमेलनामध्ये टेबल खुर्ची मांडून आल्या गेल्याचे रेखाटने माफक मानधन घेऊन करणारे जोशी ते हेच.
अगदी सुरुवातीला त्यांनी वसंतकुमार सराफांच्या ‘वसुधा’ मासिकासाठी व्यंगचित्रे काढली. तेथे खमके नाटककार विजय तेंडुलकर सहसंपादक होते. ट्रामसाठी पैसे नसल्याने डोंबिवलीवरून अनेकदा जोशी व्यंगचित्रांची पिशवी घेऊन गिरगावात येत. दोन ते तीन रुपये एका चित्राला कधीतरी मिळायचे. त्यात विजय तेंडुलकर साक्षेपी. त्यांच्या चाळणीतून दहाबारा व्यंगचित्रांपैकी एखाददुसरे हाती लागे. त्या काळातच त्यांनी स्कूल ऑफ आर्टचे शिक्षणही पूर्ण केले. नंतर अंतरकरांच्या हंस, मोहिनी, जत्रा, आवाज, माणूस, किशोर, श्यामसुंदरसोबत मासिके व साप्ताहिकांसाठी चित्रमाला केल्या. पण ‘महाराष्ट्र टाइम्स’मधल्या कांदेपोहे या दर आठवड्याला प्रसिद्ध होणार्या सदराने चार चांद लावले. लोक त्यांना कांदेपोहेवाले जोशी म्हणून ओळखू लागले. ‘लोकप्रभा’तील ‘तट्टाणी’ हे सदरही गाजले. त्यावर पुस्तकही निघाले.
नाशिकच्या देशदूतसाठी त्यांनी अनेक वर्षे चित्रे रेखाटली. अॅक्रेलिक पेंटिंगची प्रदर्शनेही मुंबईत, नाशिकला भरविली होती. त्या काळातच माझी त्यांची नाशिकला पहिली भेट झाली. गप्पाटप्पा जेवणं झाली. सहसा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. वासंती वहिनी असत. एकदा एका उडप्याच्या हॉटेलमध्ये आम्ही इडली सांबारची ऑर्डर दिली. वेटर बराच उंच होता. ऑर्डर घेण्यासाठी तो जोशींपुढे वाकला, म्हणजे टेबलावर चक्क झुकला. जोशींनी पाय वर घेऊन खुर्चीतच स्वत:ची उंची अॅडजेस्ट केली. कारण जोशीसाहेब ठेंगणे होते. खुर्चीत बसून त्याचा चेहरा पाहू शकत नव्हते. त्यांनी बौद्धिक उंचीची मदत घेऊन संवाद साधला.
यथाकाल चहा आला. त्या काळात छोट्या पातेलीत स्टीलचा ग्लास उपडा चहात बुडविलेला असे. हा खास उडपी चहा. सर्वांना असाच दिला जाई. स्पेशल चहा मिळत नसे. अशाने चहा चांगला कढत राही. चहा अंमळ गोड होता.जोशींनी चहाच्या छोट्या पातेल्यात थोडे गार पाणी ओतले. आम्हाला स्पष्टीकरण देताना म्हणाले, मला थंड व कमी साखरेचा चहा लागतो… ते ऐकून आम्ही आमचा चहा तात्काळ संपवला. कारण प्रयोगशीलता दरवेळी अंतरावर ठेवावी हे उत्तम.
मुंबईकर असल्याने अनेक संपादकांना सहजी भेटणे त्यांना शक्य असे. सज्जन संपादक व हेकट, हट्टी संपादक तसेच बुडवे संपादक भरपूर होते. जोशींची मुलांची चित्रे, मुखपृष्ठे, चित्रे छान असत. मुखपृष्ठांची त्यांची वेगळी आकर्षक शैली होती. संपादकांना त्यांची एक विक्षिप्त अट असे. ते म्हणत, आत पॅक केलेले हे तुमचे मुखपृष्ठ. याचे मानधन रोख देणे व घरी जाऊन चित्र पाहणे. चित्र सुंदर आहे. संपादक बुचकळ्यात पडे, पण घरी चित्र पाहिल्यावर खूष होई.
ते शिवाजी पार्कात रहात. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी त्यांचा प्रशस्त फ्लॅट होता. हिरॉईन तुमच्या घरी, अशा काहीशा स्पर्धेत ऐश्वर्या राय त्यांच्या घरी येऊन गेली होती. तिचे कॅरिकेचर त्यांनी तिला भेट दिले. उघडून की पॅक करून हे मला ठाऊक नाही. जोशींच्या मिसेस वासंती लांबसडक केस असलेल्या. एक मुलगा, एक सुंदर मुलगी एवढाच प्रपंच.
एकदा त्यांच्या घरी जायचा प्रसंग आला. फ्लॅट बराच मोठा होता. हॉलमध्ये सजवलेल्या रॅकवर अत्यंत देखणे असे देवीचे शिल्प होते. बेडरूममध्ये पलंग नव्हते. विचारले तर ते उत्तरले, ‘रात्री जमिनीवर गाद्या घालायच्या, सकाळी काढून ठेवायच्या. पलंगाने दिवसभर जागा अडते.’ पलंग नसले की हवे तसे घरभर वावरता येते. चित्रही मी येथेच काढतो. मी त्या काळात तीस पस्तीस अंकांना मुखपृष्ठे, चित्रमाला द्यायचो. त्यांनी विचारले, मानधन कसे घेता? मी जुजबी पैसे घेत असे. ते म्हणाले, मानधन वाढवा. तुमची चित्रे अप्रतिम असतात. तुम्ही संपादकांना हवे आहात हे नक्की. अंक कमी झाले तरी मानधन वाढीव मिळेल, कष्ट कमी पडतील. तसेच झाले. अंक कमी झाले नाहीत, मात्र मानधन भरपूर वाढले.
एकदा पुण्यात सारसबागेजवळ ते वासंती वहिनींबरोबर फिरत होते. वाटेत एक मित्र भेटला. नकळत चालत चालत वासंती वैनी पुढे निघून गेल्या. जोशी गमते होते. मित्राला म्हणाले, ती लांबसडक केसांची तरूणी काय सुंदर आहे बघ. जा व तिची स्तुती कर. तो मित्रही पुण्याचाच. स्कूटरवर पुढे झाला आणि म्हणाला, झकास! काय सुंदर केस आहेत हो तुमचे? वासंती वहिनी चमकल्या. काेण हा माणूस, काय बडबड करतो! त्या संतापून म्हणाल्या, तुमची एवढी हिंमत? त्याची घाबरगुंडी उडाली. सॉरी सॉरी म्हणू लागला. तोवर जोशी तिथे पोहोचले. बायकोला म्हणाले एवढी चिडतेस कशाला?.. अगं हा माझा मित्र बेहेरे! मित्राला कल्पना नव्हती की शाम जोशींच्या या पत्नी आहेत. बिचारा जाम ओशाळला व हळूच सटकला.
त्या काळी मोबाइल नव्हते. पत्र हाच मोठा रिलीफ असे. प्रत्येक जण ‘अगं काही पत्र आलं का’ हा प्रश्न हमखास विचारत. मिसेस जोशी बाहेरून आल्या की हा प्रश्न नक्की विचारत. घरकामात अडकल्याचे नाटक करत जोशी म्हणत ‘तिथे टेबलवर बघ’. त्या उत्सुकतेने टेबलावरची पत्र पाहात. अर्थात ती सगळी जुनी रचून ठेवलेली असायची.
त्यांच्या मुलीचे लग्न ठरविणे, स्थळे पाहणे चालू होते. जोशींची मुलगी खरोखरच सुंदर होती. लग्न ठरले तर हुंडा, देण्याघेण्याच्या (उभयपक्षी) याद्या करायची पद्धत आहे. जोशींना मुलींसाठी एक स्थळ पटले. रीतीरिवाजाप्रमाणे वराकडच्यांनी एक लांबलचक यादी जोशींना सोपविली. त्यात साड्या, दागिने, जेवणावळी, मानपान, मंगल कार्यालय, वराचे कपडे वगैरे टिच्चून लांबलचक यादी होती. तो खर्च अर्थातच मुलीच्या बापाने करायचा असतो. जोशींनी शांतपणे वाचली व म्हणाले, यात एक ‘वाटी’ लिहायची राहिलीय. वराकडची मंडळी चमकली. एकाने विचारले, वाटी कशाला? जोशी म्हणाले, वर गच्चीवर जायचं आणि तेथून या वाटीत उडी खायची. म्हणजे तुमची यादी पूर्ण होईल, कसं? मंडळी जीव घेऊन सटकली.
लहान मुलांसाठी त्यांनी खूप गोजिरी चित्रे, पुस्तके काढली. त्या काळात त्यांनी मुंबईला एक संपूर्ण हॉटेलच व्यंगचित्रांनी डेकोरेट केले होते. त्यांच्या दिवाळी अंकातील चित्रमालासुद्धा आगळ्या वेगळ्या असत. त्यांचे अतिशय सुंदर, आनंदी असे चौकोनी कुटुंब होते. नियतीला ते पाहवले नाही. तरुण मुलगा छोट्या मोठ्या आजाराचे निमित्त होऊन वारला. तो धक्का श्यामरावांच्या जिव्हारी बसला. मुलीचे लग्न झाले होते. त्याबद्दल ते मला म्हणाले होते, आमच्या डायनिंग टेबलाशी चार खुर्च्या मुलगा, मी, पत्नी एकत्रच जेवण करायचो. जेवताना माझ्या डाव्या हाताला मुलगी तर उजव्या हाताला मुलगा बसे. मुलगी लग्न होऊन गेल्यावर कितीतरी दिवस मी डाव्या हाताच्या खुर्चीकडे पाहिलेच नाही. तडकू, भडकू, स्पष्टवक्तेपणा ही खोटी आभूषणं. कलावंत मनाचा माणूस किती हळवा असावा. मुलाचे दु:ख त्यांना पचवता आले नाही. बहुधा ब्रेन ट्यूमरची व्याधी त्यांना जडली. कळल्यावर मी त्यांना फोनही केला. पण त्यांचे बोलणे व मेमरी डिस्टर्ब झालेली होती. काळाने त्यांचा पत्त्यांचा बंगला उधळून लावला होता. अगदी अलीकडे असेच झाले. दोन तीन वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापलेल्या कार्टुनिस्ट कंबाईन्सने वसंत सरवटे आणि शि. द. फडणीस यांचा जीवनगौरव देऊन सन्मान केला होता. राज ठाकरेंनीही पुढाकार घेतला होता. प्रत्येकी पन्नास हजारांची थैली उभयतांना देण्यात आली. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे सरवटे येऊ शकले नव्हते. म्हणूनच संध्याकाळी मी त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचलो आणि भेटायला येऊ का म्हणून मोबाईलवर विचारले.
अत्यंत क्षीण आवाजात ते उत्तरले, मी खूप आजारी आहे. मला तुम्ही पाहू शकणार नाही. थोडं बरं वाटलं की मीच बोलावून घेईन. रागावू नका, गैरसमज करून घेऊ नका. मी पाणावल्या डोळ्यांनी मागे फिरलो. मध्यंतरी मी ‘मार्मिक’साठी वसंतराव कानेटकरांवर लेख लिहिला होता. केवढी आभाळाएवढी माणसे ही. पण शरीर थकले की दयनीय होतात आणि अनेकांना दया दाखवलेली अजिबात आवडत नाही. शेवटच्या आजारात वसंतरावांना हॉस्पिटलाइझ करायचे ठरले. त्यांना अंदाज आला होता. पत्नी सौ. सिंधुताईंना म्हणाले, ‘मला माझ्या अभ्यासिकेत घेऊन चल. आत गेल्यावर एकेक वस्तू त्यांचे लिहायचे टेबल, आवडती वेगवेगळी पेनं, कपाटातील पुस्तके, त्यांच्या पुस्तकांची वेगळी मांडणी, आयुष्यभर जपलेल्या विकत व भेट मिळालेल्या वस्तू डोळे भरून पाहून घेत थरथरते हात जोडत म्हणाले, नमस्कार मित्रांनो, इतकी वर्षे आपण एकत्रच काढली. आता हा शेवटचा निरोप.. पुन्हा भेट होणे नाही.
खरेच लेखक व कलाकारांचा केवढा पसारा असतो. एक अजायबखानाच म्हणा ना. त्या पसार्यातच त्याने केवढे मोठे विश्व घडविलेले असते, निर्माण केलेले असते. आणि त्यातल्या एकाही वस्तूला घरच्यांना हात लावायची मुभा नसते. मात्र ती व्यक्ती पायउतार होताच त्या वस्तू व वास्तू दोघेही रद्दीवाल्याची निर्जीवपणे वाट पाहत बसतात. अत्यंत कर्तृत्ववान गुणी, मोठे विद्वान, कलावंत वयातीत झाल्याने आधीच अनेक जागी भंगलेले असतात. एकेकाळचा त्यांचा महापराक्रम, त्या शौर्यकथा ऐकायला कुणालाच वेळ नसतो. अगदी मृत्यूसुद्धा त्यांच्या बाबतीत चालढकल करतो. एका खट्याळ शाम जोशींची कथा मोठ्या अवघड वळणावर आलेली दिसते… अस्तू!