आनंदीचं सगळं कुटुंबच अचानक गावाला जाणार होतं. त्यावरूनही काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात भांडणं झाली होती, असंही इन्स्पेक्टर उत्कर्षा यांच्या कानावर आलं. घरातल्या बहुतेकांचा गावाला जाण्याला विरोध होता, पण आनंदीचा बाप प्रकाश हा मात्र त्यासाठी आग्रही होता, त्यावरून त्याने छाया आणि आनंदीलाही मारझोड केली होती, हेही समजलं, तेव्हा इन्स्पेक्टर उत्कर्षा यांना काळजी वाटू लागली. गावाला जाण्यामागे काहीतरी गडबड आहे, हे त्यांना जाणवलं आणि त्यांनी या घरावर लक्ष ठेवण्यासाठीची व्यवस्था केली.
– – –
“ताई, उद्यापासून मी मिनीला शिकवायला नाही येणार,“ असं आनंदीने जाहीर केलं, तेव्हा मेघना दिवेकरला आश्चर्याचा धक्का बसला.
“का गं?“ तिनं न राहवून विचारलं. आधी बराच वेळ आनंदी कारण सांगायला तयारच नव्हती, पण खोदून खोदून विचारल्यावर ती थोडी बोलती झाली.
“आम्ही गावाला राहायला जाणार आहोत काही दिवस,“ तिने सांगितलं.
“गावाला? मग ठीक आहे ना! थोडे दिवस सुटी घे, मग परत ये. आम्ही आहोतच इथे. मधल्या सुटीचे पैसे कापणार नाही मी. तुझे क्लासचे महिन्याचे सगळे पैसे देईन,“ मेघनाने तिला आश्वासन दिलं, तरी आनंदी काही ऐकायला तयार नव्हती. आनंदी नावाप्रमाणेच अतिशय गुणी आणि हसरी होती. सगळ्यांना आपलंसं करून घेणारी. मेघनाच्या सोसायटीजवळच्याच एका सर्वसाधारण वस्तीमध्ये राहायची. एकदा दुकानात तिची आनंदीशी ओळख झाली आणि तिची हुशारी तिच्या चटकन लक्षात आली. त्या दिवशी वाणसामानाच्या भल्यामोठ्या यादीची सगळी मिळून रक्कम किती झाली, हे तिने चटकन मेघनाला सांगितलं होतं. दुकानदाराची चूकही दाखवून दिली होती, त्यामुळे मेघनावर तिचा भलताच प्रभाव पडला होता.
आनंदी सतरा-अठरा वर्षांची होती. बारावीला शिकत होती. खरं तर दहावीपासून तिचं शिक्षण बंद करायचा निर्णय आईवडिलांनी घेतला होता, पण तिनं शिकत राहावं, यासाठी तिचा पुढचा शिक्षणाचा खर्च द्यायची तयारी मेघनाने दाखवली. त्यासाठी आपल्या मुलीला, म्हणजे मिनीला शिकवायला येशील का, अशी विचारणाही तिच्याकडे केली. आधी एवढ्या मोठ्या सोसायटीत जायचं, त्यातून चांगल्या घरातल्या मुलीला गणित शिकवायचं, या विचारानेच आनंदी दडपून गेली होती. मात्र, मेघनाने तिला धीर दिला. तू हे करू शकशील, असा आत्मविश्वास दिला आणि आनंदी तिच्याकडे नियमितपणे येऊ लागली, त्याला आता एक वर्ष झालं होतं. या काळात मिनीचं गणितही सुधारलं होतं. तिची आणि आनंदीताईची छान गट्टी झाली होती. त्यामुळे आनंदीताईचा क्लास बंद होणार, हे समजल्यावर मिनीनेही थयथयाट केला.
गावाला कशासाठी जाणार आहे, हे मात्र आनंदीने शेवटपर्यंत सांगितलं नाही. मेघनाने तिला दोन तीनदा विचारून, समजावून पाहिलं, पण आनंदीचा निर्णय ठाम होता. गावाला जाऊन आपण लवकर परत येणार नाही, हे मात्र ती वारंवार सांगत होती. ते सांगताना ती उत्साहात नाही, तर थोडी काळजीत आणि दडपणाखालीही होती, हे मात्र मेघनाला नेमकं जाणवलं होतं.
त्याच आठवड्याच्या शनिवारी मेघनाच्या कॉलेजच्या बॅचचं गेट टुगेदर होतं. अनेक वर्षांनी सगळे मित्रमैत्रिणी भेटणार होते. चेष्टामस्करी, कॉलेजच्या आठवणी यांना ऊत आला होता. गप्पा रंगल्या होत्या. मेघनाची एक मैत्रीण उत्कर्षा वाकणकर ही आता पोलीस इन्स्पेक्टर झाली होती. आपापल्या कुटुंबाची, मुलांची माहिती देताना मेघनाने बोलण्याच्या ओघात आनंदीबद्दल आणि तिच्या अचानक गावाला जाण्याविषयी सांगितलं आणि इस्पेक्टर उत्कर्षाचे कान टवकारले गेले. त्या दिवशी ती जास्त काही बोलली नाही, पण दुसर्याच दिवशी सकाळी तिचा मेघनाला फोन आला.
“इस्पेक्टर उत्कर्षा बोलतेय,“ तिनं सांगायच्या आधीच मेघनाने तिचा आवाज ओळखला होता. मैत्रीण इन्स्पेक्टर झाल्याचा आणि तिथे कर्तृत्व सिद्ध करत असल्याचा मेघनाला सार्थ अभिमान होता. तिने आत्ता कशासाठी फोन केला असेल, याबद्दल मात्र काहीच कल्पना नव्हती. शेवटी उत्कर्षानेच कारण सांगितलं.
“तुझ्याकडे येणारी ती मुलगी अचानक गावाला जायचं म्हणतेय, थोडी काळजीत वाटत होती असं म्हणालीस, तिच्याबद्दल थोडं सांग ना!“ उत्कर्षाने तिला विचारलं. मेघनाला आश्चर्य वाटलं, पण तिच्याकडे असलेली सगळी माहिती तिने देऊन टाकली. आनंदी ही जवळच राहते असं सांगून तिचा पत्ताही दिला.
इन्स्पेक्टर उत्कर्षा पोलीस खात्यात मुरलेली होती. कुणाच्याही वागण्यात असा अचानक बदल होणं, हे धोक्याचं लक्षण असतं, हे तिला चांगलंच माहीत होतं. तिने आनंदीबद्दल आणखी माहिती गोळा करायचं ठरवलं. आनंदी त्या वस्तीत एका छोट्या घरात राहत होती. घरी आई, वडील, एक मधली बहीण आणि छोटा चार वर्षांचा भाऊ, असं हे पाचजणांचं कुटुंब. आई मोलमजुरी करायची, तिनेच कष्ट करून, पैसे साठवून आनंदीला शिकवलं होतं. आनंदीला पुढे शिक्षणासाठी मेघनाचा आधार मिळाला होता आणि मिनीला तिच्या हुशारीचा. मात्र, आता ही साखळी तुटणार होती.
आनंदीचा बाप कुचकामी असल्याचं इन्स्पेक्टर उत्कर्षाच्या लक्षात आलं. त्याला दारूचं व्यसन होतं आणि कुठल्या कुठल्या बुवा महाराजांच्या नादाला लागण्याचीही सवय होती. अधूनमधून तो कुठेतरी गायब होत असे, आल्यावर त्यांच्या घरात भांडणं ऐकू येत. आनंदीची आई छाया ही सगळ्या घराचा डोलारा कसाबसा सांभाळत होती.
आनंदीचं सगळं कुटुंबच अचानक गावाला जाणार होतं. त्यावरूनही काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात भांडणं झाली होती, असंही इन्स्पेक्टर उत्कर्षाच्या कानावर आलं. घरातल्या बहुतेकांचा गावाला जाण्याला विरोध होता, पण आनंदीचा बाप प्रकाश मात्र त्यासाठी आग्रही होता. त्यावरून त्याने छाया आणि आनंदीलाही मारझोड केली होती, हेही समजलं, तेव्हा इन्स्पेक्टर उत्कर्षाला काळजी वाटू लागली. गावाला जाण्यामागे काहीतरी गडबड आहे, हे त्यांना जाणवलं आणि त्यांनी या घरावर लक्ष ठेवण्याची व्यवस्था केली.
जेमतेम दोन दिवस गेले असतील-नसतील, तेव्हाच अचानक एके सकाळी या घराला कुलूप दिसून आलं. घरातले सगळे अचानक गावाला निघून गेलेत, हे समजायला उशीर लागला नाही. इन्स्पेक्टर उत्कर्षा यांनी त्यांच्या पथकातल्या पोलीस कर्मचार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कुटुंब नक्की कुठल्या गावाला निघून गेलंय, हे कळायला काही मार्ग नव्हता. त्यासाठीचा शोध आता सुरू झाला.
प्रकाश शहरातून कुटुंबाला खानदेशातल्या एका छोट्या गावात घेऊन आला होता.
“आपण इथे कशाला आलोय, बा?“ आनंदीची धाकटी बहीण पूजा हिनं विचारलं. बापाला असे प्रश्न विचारल्यावर राग येतो, याची आनंदीला कल्पना होती, त्यामुळे तिनं पूजाला गप्प केलं. पूजा म्हटलं तर थोडी मोठी होती, म्हटलं तर अजूनही लहान. आनंदी मात्र समंजस होती. तिला वयाच्या मानाने बर्याच गोष्टी कळायला लागल्या होत्या आणि जबाबदारीचं भानही आलं होतं. तिने आई छायाशी बोलायचा प्रयत्न केला होता, पण आई दरवेळी विषय टाळत होती. विचित्र काहीतरी घडणार असल्याचं सावट अख्ख्या घरावर दिसत होतं.
प्रकाश रोज सकाळी छायाला बाहेर कुठेतरी घेऊन जायचा. दोघं सकाळी जे जायचे, ते एकदम संध्याकाळीच उगवायचे. इथे गावात दोघे काही काम करत नव्हते, हे आनंदीलाही कळलं होतं, पण ते कुठे जायचे, याबद्दल काही पत्ता नव्हता. मुलांना घराबाहेर पडायची परवानगी नव्हती. आनंदी मात्र घरातल्या काही वस्तू, किराणा आणायच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडायची. अशीच एकदा ती बाजारात गेलेली असताना एका तिशीतल्या बाईशी तिची ओळख झाली. त्या बाईनं उर्मिला अशी स्वतःची ओळख करून दिली. त्याच गावात नव्यानेच ती राहायला आली होती. आनंदी तिच्याकडे पहिल्याच भेटीत आकर्षित झाली. उर्मिला बोलायला एकदम गमतीशीर होती. आनंदीची हुशारीही तिच्या लक्षात आली होती.
“इथे समोरच्याच घरात राहते मी. बाजारात आलीस की येत जा मला भेटायला,“ असंही तिने सांगून टाकलं. आनंदीला छान वाटलं. ती आता काही कामानिमित्त बाहेर पडली की उर्मिलाला भेटू लागली. तिच्यापाशी मन मोकळं करू लागली. कधीकधी तिला भेटायचं म्हणूनच घरातून बाहेर पडू लागली. उर्मिलाशी बोलताना तिला छान वाटायचं. मनावरचं दडपण दूर व्हायचं. हळूहळू दोघींची चांगली गट्टी झाली.
“काय गं आनंदी, तुला एक विचारू का?“ एके दिवशी उर्मिलानं तिच्याबरोबर चहा घेता घेता तिला प्रश्न विचारला. आनंदीनं मानेनं होकार दिला.
“पहिल्यापासनं इथेच राहता होय तुम्ही? ह्या गावात?“
आनंदी एकदम गप्प झाली. काय उत्तर द्यावं, तिला कळेना.
“सांगावंसं वाटत नसेल, तर नको सांगूस. मी पुन्हा नाही विचारणार. असं होतं, कधीकधी. परक्या माणसाला सांगावंसं नाही वाटत.“ उर्मिला तिच्याकडे डोळ्याच्या एका कोपर्यातून बघत बघत म्हणाली.
“तसं नाही गं दीदी! तू परकी नाहीस माझ्यासाठी,“ आनंदी म्हणाली आणि तिला एकदम रडूच फुटलं. बराच वेळ ती रडतच राहिली. उर्मिलाने तिला रडू दिलं. मग एकदम आनंदी बोलायला लागली आणि मनाविरुद्ध कसं गावात यावं लागलं, हे तिनं सांगून टाकलं. उर्मिला हे सगळं का विचारत होती, हे मात्र तिला कळलं नाही. उर्मिलाने शांतपणे सगळं ऐकून घेतलं, तिची समजूत काढली आणि मग तिला काहीतरी खायला देऊनच घरी पाठवून दिलं.
दुसरा दिवस उजाडला, तो एका वेगळ्याच भीतीचं सावट घेऊन. प्रकाशनं आज सकाळी घरातल्या सगळ्यांना लवकर उठवलं होतं. पहाटे चार वाजताच सगळे उठून बाहेर जाण्यासाठी तयार होते. पहाटेच्या अंधारात घराला कुलूप घालून पाचही जण बाहेर पडले. घराबाहेर पडण्याआधी छायाने धाकट्या राजूला ओवाळलं. त्याची दृष्ट काढली. त्याला छातीशी घट्ट कवटाळलं आणि त्याचा मुका घेतला. त्याला जवळ घेऊन ती काही वेळ रडत राहिली. आज त्याच्यावर तिला एवढं प्रेम कसं आलंय, हे काही आनंदीला आणि पूजाला कळलं नाही. मात्र, आई किंवा बाबांना विचारून ते काही सांगणार नाहीत, हेही आनंदीला माहीत होतं.
सगळे बाहेर पडले, तर बाहेर एक टेम्पो त्यांना नेण्यासाठी आला होता. त्यात बसून सगळे कुठेतरी रवाना झाले. आनंदीला वाटेत डोळा लागला. जाग आली, तेव्हा ते गावाबाहेर, एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झोपडीवजा जागेजवळ आले होते. प्रकाश त्या सगळ्यांना आत घेऊन गेला. गूढ, अंधारी, भीतीदायक अशी ती झोपडी होती. आत गेल्यावर आनंदीला दिसलं, की तिथे एक महाराज बसले होते. दाढी, अंगात मळका अंगरखा, खाली धोतर, असा वेश. यज्ञासारखं काहीतरी मांडलेलं होतं. शेजारीच एक धारदार कुर्हाड आणि मोठा लाकडी ओंडकाही होता. ओंडक्याला आधीच थोडं रक्त लागलेलं होतं. कुर्हाडीचा दांडाही तसाच मळका दिसत होता. आनंदीला आणि पूजाला ते बघून घाबरायला झालं.
तिथे गेल्यावर छाया पुन्हा तिच्या धाकट्याला जवळ घेऊन धाय मोकलून रडायला लागली. त्या महाराजानं त्यांना समोर बसायला लावलं आणि राजूच्या डोक्याला टिळा लावला. आता आनंदीला हळूहळू सगळा अंदाज येऊ लागला. ती घाबरून गेली. भावाचं काहीतरी बरंवाईट होणार, हे तिच्या लक्षात आलं आणि तिनं सगळा जोर एकवटून आईबाबांशी भांडायला सुरुवात केली. राजूला आपल्या दिशेनं खेचायला लागली. महाराजानं त्याच्या दोन माणसांना आज्ञा केली, “हिला इथून बाहेर काढा.“ दोन्ही माणसं सरसावली, त्याचवेळी अचानक गोंधळ उडाला. कुणीतरी त्या झोपडीत घुसलं होतं. आनंदीनं मान वर करून बघितलं, तर ती उर्मिलाताई होती.
“ताई, तू इथे?“ तिनं आश्चर्यानं विचारलं, पण उर्मिलानं तिच्याकडे लक्ष न देता बरोबरच्या माणसांना सूचना केली, “जाधव, शिंदे, त्याला धरा. आधी त्या मुलाला बाजूला करा. ह्या दोघांना आत घ्या.“ पटापट हालचाली झाल्या आणि काही क्षणांत आरडाओरडा, झटापट होऊन तो महाराज, त्याचे दोन्ही साथीदार यांना अटक झाली.
“ताई, हे काय आहे?“ आनंदीनं विचारलं.
“हा माणूस बदमाश आहे. गरीब कुटुंबांना फसवून मुलांचे बळी देऊन त्यांना एकदम भरपूर पैसे मिळण्याचं आमिष दाखवतो तो. आज तुझ्या भावालाही…“ बोलता बोलता ती थांबली आणि आनंदीला हुंदका फुटला. तिला एकूणच सगळा प्रकार लक्षात आला.
“आणि मी उर्मिलाताई नाही. मी इन्स्पेक्टर उत्कर्षा. तुझ्या भावाला वाचवण्यासाठीच हे रूप घेतलं होतं. तू हळूहळू का होईना, सगळी माहिती दिलीस, पोलिसांना मदत केलीस, त्यामुळे तुझा भाऊ वाचला. तू धाडसी आहेस!“ इन्स्पेक्टर उत्कर्षाने तिची पाठ थोपटली आणि आनंदीने तिच्या भावाला घट्ट जवळ घेतलं.