ऑनलाइन व्यवहार करताना प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कधी कधी त्यामध्ये काही तांत्रिक अडचण आली तर त्यावर उपाय शोधण्यासाठी अधिकृत माध्यमाचा वापर करणे आवश्यक आहे. घाईमध्ये वेबसाइटवर ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक शोधताना आपली फसवणूक होऊ शकते, याचा कधीच विसर पडू देता कामा नये. इथे प्रशांतच्या बाबतीत झालेला प्रकार त्याने घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे झाला होता. त्यामुळे आपल्या बाबतीत जर कधी असे काही घडले तर सतर्क राहूनच पुढचे पाऊल टाकायला हवे, हे विसरता कामा नये.
पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी ऑनलाइन माध्यम उपलब्ध झाले आहे, त्यामध्ये पेटीएम, गुगलपे, फोनपे अशा अनेक प्रकारांचा समावेश आहे. खिशात पैसे ठेवण्यापेक्षा एक स्मार्टफोन ठेवला आणि त्यात या सुविधा ठेवल्या तर कोणत्याही ठिकाणी गेल्यावर व्यवहार करण्यासाठी ते अत्यंत सोयीस्कर ठरते. हे बरोबर आहे, पण, त्यामधूनही फसवणूक करण्याचा प्रकार घडू शकतो.
प्रशांत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी बीडजवळच्या एका ग्रामीण भागातून पुण्यात आला होता. आतापर्यंतचे आयुष्य गावाकडे गेल्यामुळे त्याला शहरातील हवा, इथले वातावरण सगळे नवे होते. पुण्यात यूपीएससीची तयारी करायची, चांगल्या प्रकारे परीक्षा द्यायची, त्यामध्ये यश मिळवायचे असे स्वप्न घेऊन तो इथे आला होता. त्याला इथे राहत असताना आवश्यक खर्च भागवण्यासाठी त्याचे वडील त्याच्या बँक खात्यावर पैसे पाठवत असत. बँकेत आलेले पैसे काढा, ते जवळ ठेवा, त्यामधून खर्च करा, हे सगळे टाळण्यासाठी प्रशांतने स्मार्टफोनवर पेटीएमची सुविधा सुरू केली होती. रूमचे भाडे, खानावळीचे पैसे देणे आणि अन्य किरकोळ खर्च करण्यासाठी त्याचा वापर करत होता.
एक दिवस अचानक प्रशांतच्या पेटीएममधून पैसे जाणे बंद झाले. हा प्रकार कसा झाला, म्हणून त्याने पेटीएमच्या ग्राहक सेवा केंद्राचा नंबर वेबसाइटचा शोधायला सुरुवात केली. तेव्हा, त्याला मोबाइलवर एक जाहिरात पॉपअप झाल्याचे दिसले. त्यामध्ये दिले होते की, पेटीएमबाबत तुमची कोणतीही तक्रार असेल तर पुढे दिलेल्या क्रमांकावर फोन करा. ते पाहिल्यावर प्रशांतने क्षणाचा विलंब न करता त्या नंबरवर फोन केला. समोरच्या व्यक्तीने प्रशांतला आपण विवेक खन्ना बोलत असून आपण कंपनीचा एक्झिक्युटिव्ह आहोत, तुमचा प्रॉब्लेम काय आहे, अशी विचारणा त्याच्याकडे केली. आपल्या खात्यामधून पैसे जात नसल्याचे प्रशांतने त्याला सांगितले. तेव्हा, थांबा तुमचे खाते तपासून सांगतो, असे म्हणत त्याने प्रशांतला सांगितले, तुमचे पेटीएम केवायसी पूर्ण झालेले नाही, त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम आला आहे. तुम्ही केवायसी पूर्ण केले की तुमची अडचण तत्काळ दूर होणार आहे. ते तुम्हाला फोनद्वारे पूर्ण करता येऊ शकते, आताची तुमची असणारी पाच हजार रुपयांची आर्थिक मर्यादा थेट २५ हजार रुपये होईल. त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच करावे लागणार आहे, ते म्हणजे एक अॅप तुम्हाला डाऊनलोड करावा लागेल. त्यामध्ये माहिती भरली की तुमचे केवायसीचे काम झालेच म्हणून समजा.
प्रशांतने त्यावर विश्वास ठेवून विवेकने पाठवलेले तो अॅप डाऊनलोड केला आणि त्या माध्यमातून त्याने स्वत:च्या नकळत आपल्या पेटीएमचा अॅक्सेस त्या तथाकथित प्रतिनिधीकडे दिला होता. इतकेच नाही तर आपल्या पॅन कार्ड, आधार कार्डवर असणारी माहिती त्याने त्यावर भरून सगळी प्रक्रिया पूर्ण केली. त्याला वाटले होते की आता आपले पेटीएम व्यवस्थित चालेल. पण कसले काय, प्रशांतच्या खात्यामध्ये असलेले २० हजार रुपयांची रक्कम एका झटक्यात गेली आणि त्याचे बँक खाते रिते झाले.
आपण तर हे पैसे खर्च केले नाहीत, ते कुठे गेले, कुणी काढले, म्हणून प्रशांतने थेट बँकेत धाव घेऊन त्यांच्याकडे याबाबतची तक्रार नोंदवली. बँकेच्या अधिकार्यांनी त्याच्या बँक खात्याची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रशांतने स्वत:च आपल्या बँक खात्यामधून पेटीएमच्या माध्यमातून दोन खात्यांमध्ये पैसे पाठवले आहेत. विशेष म्हणजे ती खाती नवी दिल्लीमधील आहेत. बँकेकडून येणारा ओटीपी पासवर्ड न देता आपल्या खात्यामधून पैसे कसे गेले? याबाबत प्रशांतने पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांना त्याने सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी तपास केला, तेव्हा प्रशांतला मिळालेला पेटीएमचा नंबरच फसवा असल्याचे समोर आले. फसवणूक करणार्याने प्रशांतचा विश्वास संपादन करत त्याला एक फसवे अॅप पाठवून त्यावर त्याला आर्थिक मर्यादा वाढवण्याचे खोटे आमिष दाखवत त्याला केवायसी करणे भाग पडले होते, त्यात प्रशांतने विश्वास ठेवून आपली सगळी माहिती म्हणजे बँक खाते, पॅन क्रमांक, आधार कार्डचा नंबर याची माहिती भरली होती. त्या कथित व्यक्तीने प्रशांतच्या पेटीएम अॅपमध्ये घुसून सेटिंग्जमध्ये बदल केला आणि त्याच्या खात्यात असणारे पैसे हे दिल्लीतल्या बँक खात्यामध्ये वळवले होते. या सगळ्या प्रकारात प्रशांतची चूक होती. आपल्या पेटीएममधून पैसे जात नाहीत ही गफलत दुरुस्त करण्यासाठी अधिकृत ठिकाणी जाऊन तक्रार नोंदवण्याऐवजी वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहक सेवा नंबरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिथे त्याचा घात झाला.
अशी घ्या काळजी…
– आपण जेव्हा वेबसाइटवर ग्राहक सेवा केंद्राचे क्रमांक शोधतो तेव्हा ते खरेच असतात असे समजून त्यावर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणे टाळायला हवे.
– हा नंबर कोणी दिला आहे, नंबरवरच्या माणसांना खरोखरच त्या अॅपबद्दल किंवा सेवेबद्दल माहिती आहे का, हे तपासले पाहिजे.
– अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही अॅप इन्स्टॉल करू नये. ते रिमोट अॅक्सेस अॅप असू शकते.
– आपल्या पेटीएमचा किंवा कोणत्याही पेमेंट सर्व्हिसचा अॅक्सेस इतर कोणालाही देऊ नये, त्यातूनही फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.
– पेमेंट अॅप ज्या बँक खात्याला जोडण्यात आलेले आहे, त्यात कमी पैसे ठेवा.
– आपल्या बँक खात्यामधून पैसे ट्रान्स्फर करण्याचे लिमिट कमी ठेवा.
– मोबाइलवर असणारे अॅप, मोबाइलचा स्क्रीन, आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणारे अॅप यांना पासवर्डची सुरक्षा ठेवा.
– बँकेतून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणारी माध्यमे वेगळी असतात. त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वॉलेट आणि मोड ऑफ पेमेन्ट यांची नेमकी माहिती प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.