‘बसू या’ हा शब्दप्रयोग कसा अस्तित्वात आला?
– अशोक परब, सावरकर नगर, ठाणे
आदम आणि ईव्हला जेव्हा जेवणाचा शोध लागला. तेव्हा ईव्ह आदमला म्हणाली, अहो, जेवायला ‘बसू या’. तेव्हाच बसू या हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला. मला तरी असं वाटतंय… तुम्हाला वेगळं काही वाटत असेल तर कधीतरी ‘आपण बसूया’… बोलायला. (काही गोष्टींचं कुळ आणि मूळ शोधू नये. आपलीच पाळंमुळं बाहेर पडतात एवढं लक्षात ठेवा.)
नेता, मंत्री, नगरसेवक, खासदार सगळे विकले जातात. मग कार्यकर्ता का विकला जात नाही?
– लक्ष्मण पांढरे, यवतमाळ
कारण कार्यकर्त्याला कोणी विकत घेत नाही. जो कार्यकर्ता हाफ बिर्याणी आणि एक क्वार्टर दिली तरी सतरंज्यांच्या घड्या घालतो, त्याला विकत घेतलं तर विकत घेणार्यांना सतरंज्यांच्या घड्या घालाव्या लागतील. वाईट शब्दांत चांगली गोष्ट सांगायची तर, ज्यांना विष्ठा आवडते ते विकले जातात… ज्यांना निष्ठा आवडते ते विकले जात नाहीत. कारण निष्ठा विकत मिळत नाही (उत्तर फार सिरीयस वाटलं तर गंभीरपणे घेऊ नका).
लग्नानंतर काही स्त्रिया माहेरचेही नाव लावतात. पक्षांतर केलेले लोक दोन्ही पक्षांची नावे का लावत नाहीत?
– तुकाराम गव्हाणे, एदलाबाद
धाक दाखवून, मोह दाखवून ‘ठेवलेली बाई’ आपल्याला ‘ठेवणार्याचं’ नाव कधी लावते का? उलट लपवून ठेवते. (पक्षांतर केलेले आपल्याला ठेवून घेणार्याचं नाव आदरणीय साहेब म्हणून खुलेआम घेतात की… मग आडनाव कशाला लावायला पाहिजे? (तुम्ही उद्या म्हणाल, ठेवलेल्या लोकांनी, ठेवून घेणार्या लोकांचं नाव उखाण्यात घ्यायला पाहिजे. त्यांनी कितीही अति केलं तरी आपण अति अपेक्षा करू नये.)
संतोषराव, एकीकडे पैसा दुसरीकडे शहाणपण, तुम्ही काय निवडाल?
– विनीता सोनार, बुलडाणा
माझ्याकडे नाहीये तोच शहाणपणा निवडेन. शहाणपणा आला की पैसे कमावण्याचाही शहाणपणा येईल (असं काही बोललं की माझ्याकडे शहाणपणा आहे असं उगाच वाटायला लागतं) आणि मग पैसा निवडावासा वाटतो. उगाच मला कन्फ्युज केलंत विनिता ताई.. (माझं ठरलं की तुम्हाला कळवतो.. तोपर्यंत शहाणपणा आणि पैसा कोणाला देऊ नका प्लीज…)
खेडेगावातील लोक एकमेकांना ‘राम राम’ का म्हणतात?
– परशुराम लोहार, पळस्पे
मग काय लोकांनी ‘परशुराम.. परशुराम’ म्हणायचं का लोहार साहेब? (तशीच इच्छा असेल, तर त्यासाठी तुम्हाला देव बनावं लागेल आणि तुमच्यावर प्रेम करणारे तुमचे आंधळे भक्त (प्रेम आंधळ असतं या अर्थाने) तयार करावे लागतील… मग ते खेड्यातल्याच काय तर शहरातील लोकांनाही ‘जय परशुराम’ बोलायला भाग पाडतील. अडचण एकच आहे, एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. तसे एका मनात दोन राम राहणार नाहीत (असं आपलं मला वाटतं. तरी तुम्ही राम राम म्हणणार्यांना विचारून खात्री करून घ्या.)
शेजार्याच्या कोंबडीला थंडी वाजत होती म्हणून मी तिला गरम पाण्याने अंघोळ घालत होतो, तर तो कृतघ्न माणूस मला कोंबडीचोर म्हणतो हो!
– सुनील भदाणे, दिग्रस
शेजारी तुम्हाला कोंबडीचोर म्हणाला म्हणून तुम्ही त्याला गाढव-बीढव, डुक्कर-बिक्कर म्हणायला जाऊ नका… तुमचीच अंडीपिल्ली बाहेर निघतील. (विशेष सूचना : कोंबडीला थंडी वाजली म्हणून उद्या तिला गोधडीत घेऊ नका. नंतर लोक काय म्हणतील याची फक्त कल्पना करा… लोक असं का म्हणतात म्हणून नंतर मला विचारू नका…)
लग्नाआधी छान मैत्रीण असणारी प्रेयसी लग्नानंतर टिपिकल बायको का बनते?
– प्रवीण सांडभोर, कारंजा
(या प्रश्नाचं उत्तर गेली कित्येक वर्षं मी पण शोधतोय) मला सापडलेलं उत्तर असं आहे… लग्नाआधी प्रेयसी आपल्यावर डोळसपणे प्रेम करत असते. त्यामुळे तिला आपले सारे ‘गुण’ दिसलेले असतात. लग्नानंतर ती आपल्याला ‘आपले गुण’ उधळू देत नाही आणि प्रेमात आंधळे झाल्याने लग्नाआधी आपल्याला न दिसलेले प्रेयसीचे ‘हे गुण’ लग्नानंतर आपल्याला दिसू लागतात… तेच आपल्याला ‘बायकोचे गुण’ वाटतात… बस इतकंच.)
तुम्ही राजकारणात उतरून एखादा पक्ष काढलात तर त्याचं काय नाव ठेवाल?
– रसिका साठे, रेवस
नॅचरली गद्दार पार्टी (माझा कुणी पुतण्या-भाचा काय, त्याचा काका पण माझ्या पार्टीवर दावा सांगणार नाही). निशाणी काय असेल सांगण्याची गरज आहे का?