ग्रहस्थिती : गुरू, हर्षल मेष राशीत, बुध, राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, मंगळ, प्लूटो मकर राशीमध्ये, रवि, शुक्र, शनि कुंभ राशीमध्ये, केतू कन्या राशीमध्ये. विशेष दिवस : १७ मार्च दुर्गाष्टमी, २० मार्च आमालिका एकादशी.
मेष : नोकरीत लाभदायक स्थिती निर्माण होईल. अनपेक्षित प्रमोशन मिळेल. करियरला दिशा मिळेल. सरकारी कामे फटाफट पूर्ण होतील. व्यावसायिकांनी व्यवहार करताना खबरदारी घ्यावी. अन्यथा कडाक्याचे वाद होतील. महिलांबरोबर संवाद करताना पुरुषांनी काळजी घ्यावी. योग्य नियोजन आणि कष्टाच्या बळावर खेळाडूंना चांगले यश मिळेल. विज्ञानाशी निगडीत व्यवसाय करणार्या मंडळींना चांगले आर्थिक लाभ होतील. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या.
वृषभ : व्यावसायिकांना यशदायक काळ. नवीन ऑर्डर मिळाल्याने आर्थिक बाजू चांगली राहील. अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. जुनी आर्थिक कटकट कायमची मिटेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. मात्र चुका करणे टाळा. नवीन मैत्री करताना काळजी घ्या. फसवणूक होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. मित्रांबरोबर जेवढ्यास तेवढेच वागणे ठेवा, अन्यथा अडचणीत याल.
मिथुन : तरुणांना विदेशात उच्चशिक्षणाची संधी चालून येईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जुना आजार पुन्हा डोके वर काढू शकतो. सरकारी नियमात राहूनच काम करा. अन्यथा नुकसान होईल. आयटी क्षेत्रात कामानिमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. संशोधक, शिक्षकांना नव्या संकल्पना सुचतील, त्यामधून चांगले अर्थार्जन होईल. व्यावसायिकांना घवघवीत यश मिळेल. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. तरुणांना नव्या कल्पना सुचतील, उत्साहाच्या भरात दोन कामे अधिकची पूर्ण होतील.
कर्क : घरातील ज्येष्ठांशी वागताना बोलताना काळजी घ्या. लॉटरी, सट्टा यांच्या मोहापासून दूरच राहा. अन्यथा मोठा आर्थिक घाटा होईल. रियल इस्टेट क्षेत्रात लाभ मिळेल. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. दाम्पत्यजीवनात कटकटीच्या प्रसंगाचा सामना करावा लागेल. विदेशातील व्यवसायातून चांगला लाभ मिळेल. तरुणांचा भाग्योदय करणारा काळ आहे. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ आहे. मालमत्तेचे प्रश्न वाटाघाटीतून मार्गी लागतील. नवा व्यवसाय सुरू करण्याचे चक्र मार्गी लागेल. आर्थिक आवक बेताची राहील, खर्च बेतानेच करा.
सिंह : पत्नीचे सहकार्य मिळेल. घरात वातावरण उत्तम राहील. संमिश्र अनुभव येतील. मुलांच्या वागण्याबोलण्याने वादांना निमंत्रण मिळेल. त्यांच्यावर लक्ष ठेवा. खर्च वाढल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आठवड्याचे सुरुवातीचे दोन दिवस कंटाळवाणे जातील. शुभघटना कानावर पडतील. नवीन नोकरी-व्यवसायाबाबतची बोलणी मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठ खूष राहतील. प्रमोशन, पगारवाढीतून त्याचे बक्षीस मिळेल. इंजिनीयर्सना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. ध्यानधारणेत मन रमवा. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
कन्या : कुठेही व्यक्त होताना खबरदारी घ्या. कामानिमित्ताने प्रवासाचा बेत आखला असेल तर चोरीचा धोका संभवतो. काळजी घ्या. नोकरीत उत्तम स्थिती राहील. वरिष्ठ खूष होतील आणि बक्षीस देतील. खर्च अचानक वाढेल. वाहन चालवताना वेग अपघाताला निमंत्रण देईल. आर्थिक व्यवहारात चूक अडचणीत आणू शकते. अचानक धनलाभाची शक्यता आहे, एखाद्या ठिकाणी नवीन गुंतवणूक करण्याचा मोह होईल. पण थोडे सावध पाऊल उचललेले बरे ठरेल.
तूळ : नोकरीत यशोशिखर सर कराल. घरात तुमचे मत मान्य होईल. जुन्या मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. मौजमजेवर पैसे खर्च होतील. मात्र, मित्रांच्या जास्त प्रेमात पडू नका, वाद होतील. संस्मरणीय घटनांमुळे आठवडा चांगला जाईल. कोर्टातील दावे मार्गी लागतील. सामाजिक मानसन्मान लाभतील. कलाकारांसाठी उत्तम काळ. गुंतवणुकीचा विचार पुढे ढकला. प्रेमप्रकरणात जपून राहा. जुना आजार डोके वर काढू शकतो. घरात शुभकार्य घडेल. नवीन व्यक्तीवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका.
वृश्चिक : मनासारख्या घटना घडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. नवीन वास्तू घेण्याचे नियोजन वेग पकडेल. तरुणांना यशदायक काळ. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. व्यवसायवृद्धीचा विचार यशस्वी होईल. आर्थिक बाजू सांभाळताना काळजी घ्या. व्यवसायात अविचाराने निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी चालून येतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. जपून बोला. धावपळ करावी लागेल.
धनु : नोकरी-व्यवसायात सावध भूमिका घ्या. अल्प यशामुळे हुरळून जाऊ नका. नोकरदारांना संधी चालून येतील. घरात वागताना बोलताना काळजी घ्या, टोकाची भूमिका घेणे टाळा. मन प्रसन्न करणारे अनुभव येतील. तरुणांना स्पर्धात्मक यश मिळेल. मुलांची शिक्षणक्षेत्रात प्रगती होईल. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करा. घरातल्या ज्येष्ठांच्या काळजी घ्या. आध्यात्मिक क्षेत्रासाठी वेळ द्याल, मानसिक समाधान मिळेल. मित्रमंडळींबरोबर सहलीला जाल.
मकर : मनासारख्या घटना घडतील. व्यावसायिक क्षेत्रात जपून पावले टाका. नोकरीत अडचणीचे प्रसंग येतील. टेन्शन घेऊ नका. एकाग्रता ठेवा. अति आत्मविश्वास दाखवू नका. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संगीतकार, कलाकारांना संधी चालून येतील, आर्थिक बाजू भक्कम होईल. खेळाडूंना स्पर्धेत यश मिळेल. सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मित्रांशी वाद टाळा. ज्येष्ठांचा सल्ला माना. उधार उसनवारी नको. खर्चाला कात्री लावा.
कुंभ : सुखाचा काळ अनुभवाल. मनातल्या इच्छा मार्गी लागतील. भाग्योदय होईल. नोकरीत यशदायी काळ अनुभवाल. घरात छोटे समारंभ घडतील, मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी घडतील. नव्या व्यवसायाचे नियोजन मार्गी लागेल. कामातला हुरूप वाढेल.व्यावसायिकांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. व्यवसायाचे नियोजन करताना काळजी घेऊन पावले टाका, चांगला फायदा होईल. व्यवहार पारदर्शी ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात चांगले अनुभव येतील. सहलीचे प्लॅन यशस्वी होतील. मानसिक त्रास देणार्या घटनांकडे दुर्लक्ष करा.
मीन : आनंददायक बातम्या कानावर पडतील. सामाजिक क्षेत्रात मान मिळतील. व्यावसायिकांना काळजी घेऊन काम पूर्ण करावे लागेल. छोट्या-मोठ्या कारणामुळे घरात वाद घडू शकतात. सार्वजनिक ठिकाणी जपून व्यक्त व्हा. प्रवासात चोरीची शक्यता आहे. नोकरदारांना दगदग सहन करावी लागेल. कलाकार, संगीत सर्जकांसाठी चांगला काळ आहे. नव्या संधी चालून येतील. व्यावसायिक बुद्धिचातुर्याच्या जोरावर काम पूर्ण करतील. गर्दीच्या ठिकाणी वादाचे प्रसंग नकोत. विदेशात शिक्षण घेण्याचा विषय मार्गी लागेल. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाल.