□ सत्ताधार्यांवर निधीची खैरात; लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवत ५५ हजार कोटींची घोषणा.
■ आणि यांचे नेते लोकांवर टीका करतात रेवड्या वाटणारे म्हणून… ते मतांसाठी लोकांना तरी वाटतात, हे आपल्यातच वाटून खातायत…
□ गुन्हे नोंदवण्यात घाई, नंतर चालढकल का? – विशेष न्यायालयाने ईडीला फटकारले.
■ ईडीला फटकारून काय फायदा? मालक सांगेल त्याचं धोतर फाडायचं, पोटरी पकडायची हेच घरच्या श्वानाचं काम असतं…
□ दाऊदशी संबंध जोडलेले नवाब मलिक सत्ताधारी बाकावर.
■ काही दिवसांनी दाऊदही पवित्र बनून याच बाकांवर बसलेला पाहायला मिळेल… है तो मुमकिन है…
□ पीकविम्याचे ५२ रुपये नेण्यासाठी शेतकर्यांनी आणली तिजोरी; मिंधे सरकारचे थोबाड फुटले.
■ काही थोबाड फुटत नाही… त्यासाठी मुळात काही लाज असावी लागते.
□ धर्माच्या नावाने मते मागायची का? – उद्धव ठाकरेंच्या पत्रावर मौन बाळगणार्या निवडणूक आयोगाला शिवसेनेचा थेट सवाल.
■ धर्माच्या, जातीच्या, पोटजातीच्या, शहीद जवानांच्या- कोणाच्याही नावावर मतं मागण्याचा अधिकार फक्त एका पक्षाकडे राखीव आहे, हे निवडणूक आयोग अधिकृत उत्तरात कसं देणार लिहून? त्यांचीही अडचण समजून घ्या.
□ हायकोर्टाच्या नव्या संकुलाचे स्वप्न अजूनही लटकलेलेच!
■ झटपट वेगाने न्याय व्हायला लागला तर सत्ताधार्यांसाठी किती अडचणीचं ठरेल ते.
□ काम अपूर्ण असतानाच ‘आरे’मध्ये सिमेंटच्या रस्त्याला तडे; ‘सामना’मधील वृत्तानंतर लगेच दुरुस्तीला सुरुवात.
■ पूर्ण होण्याच्या आत दुरुस्तीला गेलेला रस्ता म्हणून गिनीज बुकात नोंद होते काय, पाहा.
□ बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा सांगता, मग शिवसेना का सोडली? – उलट तपासणीत आमदार दिलीप लांडे गडबडले.
■ का सोडली ते सगळ्यांना माहिती आहे… उगाच वारसा सांगणं बंद करा.
□ साक्षीदार हजर करण्याच्या कामी टाळाटाळ खपवून घेणार नाही – भाजप नेत्यांविरोधातील खटल्यात न्यायालयाने सरकारी पक्षाला झापले.
■ भाजपच्या नेत्यांविरोधात मुळात खटले दाखल करण्याची हिंमत कोणी केली, याचा तपास केला पाहिजे.
□ ललित पाटीलला संरक्षण देणार्या मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे – आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक.
■ धंगेकरांनी रामराज्य, शिवरायांचं स्वराज्य वगैरे कल्पना फारच सिरियसली घेतलेल्या दिसतायत… ते फक्त लोकांना सांगण्यासाठी असतं हो!
□ ठाणे पालिकेची ‘मराठी पाट्या’ मोहीम केवळ फार्स.
■ मुळात त्या पाट्यांवर फक्त देवनागरी लिपीत नाव लिहिलं जाणार असताना त्यांना ‘मराठी पाट्या’ म्हणणं थांबवायला हवं… खरी फसवणूक तिथून सुरू होते.
□ शेतकर्यांच्या प्रश्नावर खोके सरकारचा पळ; आरोग्य खात्यातील बेफिकिरीवर हायकोर्टाकडून कडक ताशेरे.
■ सुरत-गुवाहाटीला फिरायला पाठवा महाशक्तीसकट सगळ्यांना. राज्याचा कारभार जरा बरा चालेल.
□ महुआ मोईत्रा यांना बाजू मांडण्याची संधीच दिली नाही; महिला मार्शल्सनी सभागृहाबाहेर फरफटत नेले.
■ सुप्रीम कोर्टात कान पिळले गेले की पुन्हा आणून प्रस्थापना करावी लागेल त्यांची सन्मानाने- तेव्हाही निलाजरेपणाने दात विचकतील सत्ताधारी.
□ किचनमध्ये महागाईचा भडका उडणार.
■ कितीही महाग गॅस घेऊ, हजार रुपये किलो भाजी झाली तरी मत यांनाच देऊ, ही खुमखुमी जिरेपर्यंत काही फरक नाही पडणार या भडक्याने.
□ हिंगोलीच्या शेतकर्यांचा अन्नत्याग; रस्त्यावर दूध ओतून मिंधे सरकारचा निषेध.
■ आपला जीव सांभाळा भावांनो, यांच्याकडून दयाबुद्धीची अपेक्षा ठेवाल तर फुकट जीव गमावून बसाल.
□ महामार्ग केला, सोयीसुविधांची ‘समृद्धी’ कधी येणार? शिवसेना आमदारांनी मिंधे सरकारला धारेवर धरले.
■ ते आणि काय असतं, हा प्रश्न सरकारने विचारला नाही का?
□ ड्रग्जमाफियांसोबत हातमिळवणी करणार्या पोलिसाला बडतर्फ करणार – गृहमंत्री फडणवीस.
■ आणि मंत्र्यांचं काय करणार?
□ मेडिकल कॉलेजसाठी जवानासह १००जणांच्या जमिनी हडपल्या – मंत्री अब्दुल सत्तार यांचा प्रताप.
■ प्रखर हिंदुत्वासाठी महाशक्तीला सामील झालेल्या आणि मुस्लिमांची अॅलर्जी असूनही तिने सामावून घेतलेल्या अशा सुपुत्रांवर असे आरोप का बरं करावे?
□ महाराष्ट्रात दररोज ४० नवजात बालकांचा मृत्यू – सत्ताधारी आमदारानेच काढले वाभाडे.
■ जो आला तो गेला, हा सृष्टीचा नियम आहे, कोणी आधी जातो, कोणी नंतर जातो, सगळी प्रभुची माया आहे… असं सांगणारा कोणी सोंगेश्वर बुवा अजून अवतरित नाही का झाला?