ग्रहस्थिती : गुरु, हर्षल मेष राशीमध्ये, केतू कन्या राशीत, शुक्र तूळ राशीत, रवि, मंगळ वृश्चिक राशीत, बुध धनु राशीमध्ये, प्लूटो मकर राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीत.
विशेष दिवस : १६ डिसेंबर विनायकी चतुर्थी, १८ डिसेंबर चंपाषष्टी, २० डिसेंबर दुर्गा-बुधाष्टमी.
मेष : नोकरी-व्यवसायात स्वभावाला मुरड घाला. चिडचिडेपणा नको. घरातील निर्णय योग्य सल्ल्याने घ्या. एखाद्या शुभघटनेमुळे घरात आनंदी वातावरण राहील. विवाहेच्छुकांचा ओळखीच्या माध्यमातून विवाह जमू शकेल. युवावर्गाला यश मिळेल. मनासारख्या घटना घडून आठवडा चांगला जाईल. विचारवंत, लेखक, पत्रकारांचा सन्मान होईल. सामाजिक कार्यात लौकिकात भर पडेल.
वृषभ : घरात व सार्वजनिक जीवनात कटू प्रसंग घडतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. घरात ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. कुटुंबात वाणीवर नियंत्रण ठेवा. नवीन वास्तू घेण्याचा विचार झटपट मार्गी लागू शकतो. व्यावसायिकांच्या कामाचा ओघ वाढेल. आवकही वाढू शकते. मित्रमंडळी, नातेवाईकांशी वागताना, बोलताना अतिचिकित्सा टाळा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : नोकरी-व्यवसायात यश मिळेल. नोकरदारांचे वरिष्ठ अधिकारी कौतुक करतील. व्यावसायिकांच्या कामाची व्याप्ती वाढेल. आर्थिक बाजू भक्कम करू शकाल. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. क्रीडापटूंना यश मिळेल, व्यसनी मित्रांपासून दूर राहा. लॉटरी, सट्ट्यापासून दूर राहा. त्यातून हमखास नुकसान होईल. मालमत्तेचे वाद विलंबाने मार्गी लागतील. मुलांकडून मन:स्ताप होईल.
कर्क : प्रेम आंधळे असते. काम मार्गी लागणार असेल तरच पुढे जा. आश्वासनात अडकू नका. सामाजिक कामात भरपूर वेळ खर्च होईल. व्यावसायिक क्षेत्रात बुद्धिकौशल्याच्या जोरावर परिस्थितीचा सामना करावा लागेल. येणे वसूल होईल, खिशात पैसे राहतील. महागडी वस्तू खरेदी कराल. नोकरीत पगारवाढ, बढतीचे योग जुळून आल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. सार्वजनिक ठिकाणी वाणीवर नियंत्रण ठेवा. कामात वाढ होईल. लक्षपूर्वक ते पुरे करा.
सिंह : नोकरी-व्यवसायात संयमी राहा. त्याचा कामावर परिणाम होऊ देऊ नका. फसव्या आश्वासनांपासून दूर राहा. काही ठिकाणी अंदाज चुकतील. अति आत्मविश्वास नको. युवकांना स्पर्धात्मक यश मिळेल. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, भविष्यात त्याचा आर्थिक फटका बसेल. अचानक आर्थिक लाभ होतील. मात्र आर्थिक व्यवहारात काळजी घ्या, चैनीवर पैसे खर्च करणे टाळा. सार्वजनिक जीवनात संस्मरणीय घटना घडतील. महिलांनी आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये.
कन्या : कोर्टकचेरीचे काम मार्गी लागण्यास वेळ लागेल. मनाची चलबिचल वाढेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहणार असले तरी खर्चाचे प्रमाण वाढल्याने चिडचड होईल. नोकरीत उत्तराला प्रत्युत्तर देऊ नका. वाद टाळा. मनासारख्या घटना घडणार असल्या तरी पावले जपूनच टाका. मित्रमंडळी, नातेवाईकांना सल्ला देणे नकोच. व्यावसायिकांनी सावधतेने पावले टाकावी. मामा, मावशीकडून आर्थिक लाभ होईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : मन घट्ट करा आणि मगच निर्णय घ्या. भावनेच्या भरातला निर्णय अडचणीचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा कंटाळा येईल. व्यावसायिकांना नव्या कल्पना सुचतील. त्या आस्ते कदम पुढे न्या. पतीपत्नीमधले वाद तुटेपर्यंत ताणू नका. नोकरीत विदेशात जाण्याचे योग जुळून येतील. थकलेली येणी येतील. नव्या ओळखी फायदेशीर ठरतील. संशोधकांना यश मिळेल. कोणाला उपदेश देणे टाळा. घरगुती समारंभात जुने मित्र, नातेवाईकांच्या भेटी होतील. आध्यात्मिक कार्याला वेळ द्याल. हातून दान धर्म होईल.
वृश्चिक : नातेवाईक, मित्रमंडळींसाठी वेळ राखून ठेवा, त्यांना आर्थिक मदतही करावी लागेल. सरकारी नियमांचे उल्लंघन करणे अंगाशी येऊ शकते. व्यवसायात जबाबदारी वाढून नवी ऑर्डर मिळेल, त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल. चित्रकार, कलाकार, शिल्पकारांना नव्या संधी चालून येतील. विशेष कलाकृती आकाराला येईल. सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मार्केटिंग, इंजीनिअरिंग क्षेत्रात चांगला काळ आहे. कागदपत्रे तपासूनच सही करा, अन्यथा फसवणूक होऊ शकते.
धनु : आत्मविश्वास वाढवणार्या घटना घडतील. शिक्षणक्षेत्रात यशदायी काळ आहे. घरात धार्मिक कार्य होईल. नोकरी, व्यवसायात अधिकचा वेळ द्यावा लागेल. संततीकडून चांगली बातमी कानावर येईल. महागडी वस्तू घेण्याच्या मोहात अडकून पडू नका. दांपत्यजीवनात आनंद मिळेल. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करा. नव्या वाहनांची खरेदी होऊ शकते. आध्यात्मिक क्षेत्रासाठी वेळ द्याल. बाहेरचे खाणे टाळा.
मकर : नवीन गुंतवणूक कराल, त्यातून चांगला फायदा होईल. व्यवसायात चांगला काळ आहे. नव्या संधीचा फायदा करून घ्या. नोकरीत कामात एकाग्रता ठेवा, छोटी चूक महागात पडू शकते. खेळाडूंचा सन्मान होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. घरातील ज्येष्ठांचा सल्ला ऐका. कोणत्याही कामात अति आत्मविश्वास दाखवू नका, फसगत होईल. शेअर ब्रोकर, इस्टेट एजेंट यांना लाभ मिळेल.
कुंभ : नोकरी-व्यवसायात वाढलेल्या कामाचा ताण येईल. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊन देऊ नका. पत्नीची साथ मिळेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. नोकरीत वरिष्ठ साथ देतील. कामातला जोश वाढेल. कामानिमित्त बाहेरगावी प्रवास कराल. बोलताना नम्रता ठेवा, कुणाचा गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. व्यवसायात काळजीपूर्वक पावले टाका. व्यवहारात पारदर्शीपणा ठेवा, हिशोबात गल्लत त्रासदायक ठरेल. नातेवाईकांबरोबर वाद होतील.
मीन : नोकरीत बुद्धिचातुर्याच्या जोरावर वरिष्ठांचे मन जिंकाल.सामाजिक क्षेत्रात नवे उपक्रम सुरु कराल. त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यावसायिक जे काम हाती घेतील, ते पूर्ण होईल. मनासारख्या घटना घडतील. घरात छोट्या-मोठ्या कारणामुळे घरात वादाचे प्रसंग घडू शकतात. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना काळजी घ्या. कलाकार, संगीत क्षेत्रातील मंडळी यांच्यासाठी चांगला काळ आहे, नव्या संधी चालून येतील.