एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर रोहित शर्मा याच्या भवितव्याची चर्चा अग्रणी आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघबांधणी करताना नव्या पिढीचे शिलेदार सज्ज होत आहेत. या लक्ष्याकडे पाहताना रोहितचे नेतृत्त्व आणि सलामीवीर या भूमिका त्याला तारतील का, याचा उहापोह.
– – –
१९नोव्हेंबर २०२३ हा दिवस ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेतेपदाचा सुवर्णाध्याय लिहिणारा ठरला. तसे घडले नसते, तर रोहित शर्माच्या खात्यावर विश्वविजेत्या भारताचा संघनायक ही नोंद झाली असती. कपिल देव (१९८३) आणि महेंद्रसिंह धोनी (२०११) यांच्यानंतर रोहितचे नाव पुढील अनेक युगे अभिमानाने घेतले गेले असते. त्याच्या यशाचे पोवाडे रचले गेले असते. पण भारताची विजयी घोडदौड उपविजेतेपदापर्यंत मर्यादित राहिली. हा विश्वचषक संपल्यानंतर अनेक चर्चा घडू लागल्या. सहा महिन्यांवर आलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नव्या पिढीच्या शिलेदारांवर विश्वास व्यक्त करून पाहावे, या दृष्टीने प्रयोगही सुरू झाले. या सर्व काहुरात अग्रणी चर्चा आहे, ती म्हणजे रोहित शर्माचे भवितव्य काय? रोहितचे वय ३६ वर्षे. त्याची तंदुरुस्ती पाहता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये (एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०) त्याने थांबावे, असे प्रवाही वारे वाहात आहेत.
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहितने सलामीवीर ही भूमिका पार पाडताना काही वैशिष्ट्ये जपली. जोरदार आक्रमण करीत सीमापार हवाई हल्ले करायचे. पॉवरप्लेच्या पहिल्या १० षटकांतच प्रतिस्पर्धी गोलंदाजांची लय बिघडवून टाकायची. विश्वचषकाअंती त्याच्या नावापुढे दुसर्या क्रमांकाच्या ५९७ धावा (११ सामन्यांत) होत्या. त्याची सरासरी ५४.२७ आणि स्ट्राइक रेट १२५.९४ होता. यात एक शतक आणि तीन अर्धशतके होती. तसेच त्याच्या धावांमध्ये ६६ चौकार आणि ३१ षटकारांचा समावेश होता. म्हणजेच ४५० धावा या सीमापार फटक्यांतून साकारलेल्या. त्याच्या या फलंदाजीचे अतिशय कौतुक झाले. पण त्याहून प्रशंसा झाली, ती त्याच्या नेतृत्वगुणाची. खेळाडूंची उत्तम मोट बांधून त्याने संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. अंतिम सामना वगळल्यास प्रत्येक सामन्यात बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची त्याने कर्णधार म्हणून आखलेली रणनीती, केलेले बदल हे सर्वच यशस्वी ठरले. म्हणूनच रोहितच्या भवितव्याविषयी चर्चा करताना सद्यास्थितीत तो देशातील सर्वोत्तम कर्णधार आहे, हेच त्याला तारणारे ठरते.
रोहित २०१३पासून गेली १० वर्षे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करीत आहे. यापैकी पाच वेळा त्याने मुंबईला विजेतेपद जिंकून दिले आहे. ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावा काढणार्या फलंदाजांच्या यादीत त्याचा क्रमांक चौथा आहे. त्याच्या यशस्वी नेतृत्वाची चुणूक याच व्यासपीठावर मिळते. खेळाडू म्हणजे विचार केल्यास २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या संघात रोहितचा समावेश होता. इतकेच नव्हे, तर त्याचे योगदानही महत्त्वाचे होते. २०१३च्या चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघाचाही तो भाग होता. कसोटी पदार्पणासाठी त्याला बरेच झगडायला लागले. पण स्थिरावल्यानंतर त्याने पाय घट्ट रोवले. २०११च्या विश्वचषकासाठीच्या संभाव्य चमूत रोहितचे नाव होते. पण रवीचंद्रन अश्विन आणि पियुष चावला या दोघांनाही संघात स्थान दिल्यामुळे रोहित संघाबाहेर गेला. अन्यथा एकदिवसीय प्रकाराच्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू हासुद्धा टिळा त्याच्या माथी लागला असता. तसे रोहितच्या निसटलेल्या सुवर्णक्षणांच्या यादीत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदही येते. याच वर्षी ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून पराभवामुळे भारताचे कसोटी जगज्जेतेपद हुकले. पण कसोटी आणि एकदिवसीय प्रकारात संघाला उपविजेतेपदापर्यंत नेले, हे मुळीच नाकारता येत नाही. आता हेच नेतृत्वबळ भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत नेऊ शकेल, हा विश्वास दाखवतोय. म्हणूनच रोहितने आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात नेतृत्व करावे आणि या आवडत्या प्रकारात देशाला विश्वविजेतेपद जिंकून देत समाधानाने मर्यादित षटकांचे क्रिकेट थांबवावे, असा एक मतप्रवाह आहे.
नव्या पिढीचे नवे सूत्र
ट्वेन्टी-२० हा प्रकार खेळाडू, संघ असे कोणतेही ठोकताळे बिघडवू शकतो. २००७मध्ये जेव्हा भारताने विश्वविजेतेपद जिंकले, तेव्हा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण हे महारथी या संघात नव्हते. काही महिन्यांपूर्वी कॅरेबियन बेटांवरील एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ साखळीतच गारद झाला होता. ते अपयश या नव्या पिढीच्या शिलेदारांनी धोनीच्या नेतृत्वाखाली झाकोळून टाकले. गेल्या काही दिवसांत भारतीय ट्वेन्टी-२० संघ जे सूत्र जोपासून खेळतोय, ते पाहता नव्या पिढीलाच आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता दिसते आहे. ५० षटकांचा विश्वचषक संपताच तीन दिवसांतच सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अनुभवी शिलेदारांऐवजी नव्या खेळाडूंवर विश्वास व्यक्त करण्यात आला आणि तो सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारताने सार्थ ठरवत मालिका ४-१ अशी जिंकण्याची किमया साधली. बहुतांश हाच संघ आफ्रिकेत ट्वेन्टी-२० मालिका खेळेल.
ही नवलाई चालू वर्षात भारताने काही प्रथमच अवलंबली नाही. आयर्लंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतही हाच संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आणि लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली खेळला होता. यापैकी आयर्लंडविरुद्ध भारताने २-० असा विजय मिळवला, तर एशियाडचे सुवर्णपदकही पटकावले. यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान ही भारताची दुसरी फळी एका बाजूने सक्षमपणे घडवली जात होती. ते यशदायी ठरत असल्याची ग्वाहीसुद्धा कामगिरीतून मिळते आहे. त्यामुळेच ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी रोहितची सलामी आणि त्याचे नेतृत्व असण्याची आवश्यकता नसल्याची खात्री पटते.
ट्वेन्टी-२० कर्णधारपदासाठी दावेदार
आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताचे कर्णधारपद रोहितकडे नसले तरी काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी सर्वात पहिला पर्याय अष्टपैलू हार्दिक पंड्याचा असला तरी दुखापतीच्या ससेमिर्यामुळे तो खेळेल, याची शाश्वती देता येणार नाही. सूर्यकुमार आणि ऋतुराजने या वर्षभरात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. याशिवाय के. एल. राहुल, श्रेयस अय्यर हेसुद्धा कर्णधारपदासाठी चांगले पर्याय ठरू शकतात.
सलामीसाठीही स्पर्धा
रोहितचे ट्वेन्टी-२० प्रकारातील सलामीचे स्थानही सुरक्षित नाही. वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी करणार्या शुभमन गिलचे एक स्थान निश्चित असताना दुसर्या स्थानासाठी यशस्वी जैस्वाल, ऋतुराज, इशान किशन हे कडवी स्पर्धा करतात. पॉवरप्लेमध्ये हवाई फटकेबाजी करण्यात जैस्वाल पटाईत आहे. त्याने १२ डावांत ३३.६३च्या सरासरीने आणि १६३च्या स्ट्राइक रेटने एकूण ३७० धावा केल्या आहेत. यात ४४ चौकार आणि १९ चौकारांचा समावेश आहे. म्हणजेच त्याच्या २९० धावा या चौकार-षटकारांनी साकारल्या आहेत. त्यामुळे रोहितची खासियत तो लिलया सिद्ध करतो. ऋतुराज हा वेगळ्या धाटणीचा फलंदाज आहे. तो सुरुवात धिमी करतो; पण बराच काळ खेळपट्टीवर तग धरतो आणि स्थिरावल्यावर अधिक आक्रमक होतो. १७ डावांत त्याने ५०० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३५.७१ असून, स्ट्राइक रेट १४०चा आहे. तथापि, ईशानकडे परिस्थितीनुरूप खेळण्याचे उत्तम कसब आहे आणि तो या दोघांपेक्षा अधिक वर्षे भारतीय संघात आहे. यष्टीरक्षण ही जमेची बाजू असलेला ईशान सलामीपासून मधल्या फळीपर्यंत कोणत्याही स्थानावर सहजगत्या फलंदाजी करतो.
प्रयोग आणि निष्कर्ष
रोहितचे भवितव्य आताच घाईने ठरवण्याची आवश्यकता मुळीच नाही. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्ध दोन ट्वेन्टी-२० मालिका भारत खेळतोय. तसेच संपूर्ण ‘आयपीएल’ बाकी आहे. तोवर अनेक घटना घडतील. दुखापती हा तर खेळाडूंच्या जीवनाचा स्थायीभावच आहे. त्यामुळे पुढील सहा महिने हे प्रयोगांचे आणि निष्कर्षाचे असतील.