नवरा आणि कुत्रा यांच्यात काय फरक आहे?
– शीतल राणे, मिरा रोड
शेपटीचा… कुत्र्याला शेपूट असते नवर्याला नसते… पण दोघेही बायकोपुढे शेपूट हलवतात आणि मालकापुढे शेपूट पायात घालतात.
तुम्ही रंगमंचावर अधिक अभिनय करता की घरात?
– सोनल काटकर, बिबवेवाडी
का? आमच्या घरी आग लावायचीय का? (मी रंगमंचावर अभिनय करतो, पण लोकांना तो रियलिस्टिक वाटतो. घरी मी रियलिस्टिक वागतो पण घरच्यांना तो अभिनय वाटतो… (काही कळलं? दिलं की नाही पवार स्टाईल उत्तर?… आता पवार कोण ते विचारू नका!)
बायको ही नवर्याची अर्धांगी तर नवरा हा बायकोचा कोण?
– अभय होंबळकर, येडुर, ता. चिकोडी
बायकोचा बैल, सांगकाम्या, रिकामटेकडा, खायला खार भुईला भार, निर्लज्ज सदासुखी… (यातलं तुम्हाला काही लागू होत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा).
ज्याच्यामागेही लोक ज्याच्याविषयी चांगलं बोलतात, असा कोणी माणूस असेल का हो जगात?
– वैदेही चिपळूणकर, गुहागर
माझ्याविषयी माझ्यामागे लोक नेहमी चांगलेच बोलतात (असं तुम्हाला वाटत नाही का वैदेही ताई?… नसेल वाटत तर हा तुमचा प्रामाणिकपणा म्हणावा, की आत्मविश्वास?)
एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर चार वर्षं फिरली, म्हणून तिने त्याच्याशीच लग्न करावं ही अपेक्षा बरोबर आहे का?
– विनय पोकळे, पाचवड
हे प्रकरण तुमचं स्वत:चं आहे की दुसर्याच्या फाटक्यात पाय घालताय?… काहीतरी भरीव प्रश्न विचारा विनयजी, किती पोकळे प्रश्न विचारता.
पैसा काय येतो जातो, रंगभूमीची सेवा हातून घडली पाहिजे, असं एखादं विधान तुम्ही का करत नाही जाहीर समारंभांमध्ये?
– शिवाजी पाडळे, रहिमतपूर
मला जाहीर समारंभामध्ये भाषण करण्यापेक्षा एकांतात लिखाण करायला आवडतं (लेखक आहे ना मी). पत्रसुद्धा एकांतात लिहायला आवडतं. जाहीरपणे टिव टिव करायला नाही आवडत (ट्विटरवर नाही ना मी).
सिनेमा काही संस्कारवर्ग नाही, असं सांगणारे लोक सिनेमा त्याच विधानाचा व्यत्यास कसा विसरतात? सिनेमा हा कुसंस्कारवर्ग पण असता कामा नये, याबद्दल ते का आग्रही नसतात?
– मेघना पटवर्धन, प्रभात रोड, पुणे
मग सल्लू टायगर, मल्लिका, लियोनी यांनी काय अभिनय करायचा? त्यांच्या चाहत्यांनी काय फक्त ‘भक्त प्रल्हाद’ चित्रपट पाहायचा? ज्यांना जे येतं ते ते करतात. त्यांना जे येत नाही त्यांनी ते करावं हा आग्रह आपण काय करायचा? एकीकडे लैंगिक शिक्षण द्या म्हणायचं… ते शिकवणार्या चित्रपटांना विरोध करायचा. हे दुटप्पी वागणं झालं ना पटवर्धन काकू?
हल्ली सगळे मराठी सिनेमे इंग्लंडमध्येच का घडताना दिसतात? मराठी माणसांना फुकट स्थायिक करून घेतायत का ब्रिटिश लोक?
– विराज सणस, अंधेरी
बनतं तिथे विकत नाही… हे मराठी सिनेमावाल्यांना कळलं असावं. म्हणून ते इथे विकण्यासाठी लंडनमध्ये सिनेमा बनवत असावेत. त्याला प्रोत्साहन द्या ब्रिटिश लोकांसारखं. नावं ठेवू नका मराठी माणसांसारखी.
मी माझ्या फ्रेंडलिस्टीतल्या सगळ्या सुंदर स्त्रियांना ‘ताई, जेवन झालं का?’ असं न चुकता विचारतो रोज… पण त्यांच्यातली एकही मला कधीही माझं जेवण झालं का, असं विचारत नाही, असं का?
– ओमकार कावळे, शिरसी
एकतर ताई म्हणता! त्यानंतर जेवलात का, यापुढे तुमची ‘गाडी जात नाही. त्यावरून ‘गडी’ उपाशी आहे हे ताया ओळखत असतील… कशाला जेवणाबद्दल विचारतील!
मुलगी शिकल्यावर प्रगती होते, मुलगा शिकल्यावर काय होते?
– संग्राम पाटील, सांगली
मुलगा शिकला की त्याचं एखाद्या मुलीबरोबर लग्न होतं. नंतर त्या मुलीची प्रगती होते.
शाळेत आवडलेली मुलगी मोठेपणी दिसल्यावर बरं झालं तेव्हा हिला विचारून बसलो नाही ते, असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत?
– हारून शेख, भिवंडी
शाळेत मुलीच नव्हत्या ओ. (पचका झाला ना? शाळेच्या पहिल्या दिवशी ही फक्त मुलांची शाळा आहे हे कळल्यावर माझाही असाच पचका झाला होता).