दुपारच्या शपथविधीची बातमी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने मला त्या दिवशी सकाळीच कळवली, त्यावेळी माझा विश्वासच बसत नव्हता. काही वेळातच पोक्या घरी आला. म्हणाला, टोक्या, या सगळ्या झेंगटात सर्वात मोठी गोची झालीय ती दाढीवाल्यांची आणि बोबडकांदा किरीटाची. किरीटाची मुलाखत मी तुला शपथविधीनंतर एका तासाच्या आत पाठवतो. तीच ही मुलाखत.
– नमस्कार. आता कसं हलकं हलकं वाटतंय ना. फुग्यातली सगळी हवाच गेली ना तुमच्या.
– होय रे पोक्या. आता त्या ईडीच्या ऑफिसात तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटेल. शिंदे आणि पवार राहिले बाजूला, लोकांनी मलाच टार्गेट केलंय. मिम्स काय, कार्टून काय, ट्वीट काय, इन्स्टाग्राम काय, जीव नकोसा केलाय लोकांनी. माझी सगळी मेहनत फुकट गेली होऽऽ. मैं मरी गयोऽऽ ए तुमने क्या किया मोदीजीऽऽ.
– कसं काय भाड में जाईल सगळं? कधीतरी उपयोगी पडेल ना. ब्लॅकमेल करायला वेळप्रसंगी असे पुरावे उपयोगी पडतात.
– काही नाही उपयोगी पडत. आता या दहा पोती पुराव्यांना पुरावं की जाळावं एवढाच प्रश्न आहे माझ्यासमोर.
– हिंदू आहात ना, मग पुरायच्या गोष्टी कसल्या करता? त्यापेक्षा एका कार्टूनबहाद्दराने पुराव्यांच्या कागदांच्या होड्या करून पावसाच्या तुंबलेल्या पाण्यात सोडायचा उपाय सुचवलाय ना. तोच करा. कागदी होड्यांचे प्रकार मी शिकवीन तुम्हाला. आरामात एकेक बनवून सोडत बसा. वेळही जाईल आणि ईडीत चकरा मारण्याचा ताप नाही.
– ती ईडी बिडी जाऊ द्या खड्ड्यात. पण मला उजळ माथ्यानं फिरायचीही सोय राहिली नाही आता. राष्ट्रवादीच्या नव्या नऊ मंत्र्यांपैकी सात तर माझा चेहरा पाहिला की फिदीफिदी हसतात. त्यांच्याविरुद्ध मी ईडीत तक्रार करून पुरावेही सादर केले होते. त्याच्या झेरॉक्स आहेत माझ्याकडे. आता माझीच वाट लावतील ते.
– नाही लावणार. आता तुम्ही सगळेच मोदीमय, शहामय झालायत ना! मग आता कसला भेदभाव. आणि सगळे पुरावे कुठे खरे होते! खोटेच होते ना!
– कोण म्हणतो खोटे होते! एकेकाला तुरुंगात सडायला नाही पाठवला असता तर किरीट हे नाव सांगितलं नसतं!
– विसरा आता ते. ज्या अर्थी मोदीसाहेबांनी वर्षभर मंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिंद्यांच्या आशाळभूत गद्दार सेवकांना झुलवत ठेवून अजितदादांच्या चेल्यांना एका क्षणात मंत्री बनवून टाकलं, यावरून तुमच्या पुराव्यांना त्यांनी काय किंमत दिली ते कळतं. जितके भ्रष्टाचारी भाजपात येतील तेवढे भाजपाला हवेच आहेत. म्हणून तर ईडीने येड्या बनवलेल्या गिर्हाईकांचा मुकादम म्हणून तुमची नेमणूक केली. तुम्ही तर स्वत:ला सीआयएचे बाप समजलात.
– पोक्याजी, यात माझी काहीही चूक नाही. मला वरून
ऑर्डरच अशा होत्या की इतर पक्षांतले भ्रष्टाचारी शोधा आणि त्यांना ईडीची आणि नंतर तुरुंगाची हवा खायला लावण्यासाठी जिवाचं रान करा. भ्रष्टाचारी नसलेल्यांनाही भ्रष्टाचारी बनवण्यासाठी खोटे पुरावे गोळा करा. त्यांच्यापुढे भाजपाचा पर्याय ठेवा. भाजप की तुरुंगवास हे त्यांना सतत डोळ्यांसमोर दिसत राहिले पाहिजे. मग मी माझी सारी शक्ती, बुद्धी आणि चालूगिरी पणाला लावून जास्तीतजास्त भ्रष्ट आमदार, खासदार, नगरसेवक भाजपात आणले.
– अजितदादांबद्दल तुम्हाला काय वाटतं?
– खूप डेंजर माणूस आहे तो. तो मुख्यमंत्री झाला तर मेलो आम्ही सगळे. एकेकाचा काटा काढील. त्यांची नजरच बघा. कशी आजूबाजूला भिरभिरत असते ती. मी ते पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले म्हणून त्यांचे अभिनंदन करून हस्तांदोलन केलं तर त्यांनी माझा हात इतक्या जोरात दाबला की विव्हळलो मी. जाम फटकळ माणूस आहे.
– पण तुमच्यासारखा कारस्थानी नाही ना?
– ते मी काय सांगू. आमच्या पक्षाची सर्वच खालच्या वरच्या लेव्हलवर कारस्थानं चालूच असतात. पक्षवाढीसाठी करावी लागतात ती. आमच्या नेत्यांनी शून्यातून पक्ष निर्माण केला.
– आणि आता शून्याकडेच त्यांची वाटचाल सुरू आहे.
– म्हणून तर घेतलं ना अजितरावांना.
– म्हणजे त्यांच्या जीवावर तुम्ही तुमचा पक्ष मोठा करणार.
– मी नाही करणार. ते करणार. मोदीजी आणि शहाजी.
– मग दाढीवाल्यांचं आणि चाळीस खोकेवाल्यांचं काय करणार?
– बहुतेक बॅक टू पॅव्हेलियन. संघात अकरा खेळाडू असतात. बारावा पाणी आणण्यासाठी असतो. एकाला करतील पाणक्या.
– मग आता तुम्हाला फारसं काम उरलेलंच नाही पक्षात.
– नाही कसं? दाढीवाल्यांचे आमदार कधी पळतील याचा नेम नाही. अजित महाराजांचे मंत्री कधी अपात्र ठरतील याचा अंदाज सांगता येत नाही. म्हणून काँग्रेससारख्या पक्षातील आमदार फोडण्याचं कंत्राट कुणाला द्यावं यावर वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय सुरू आहे. ते जर मला मिळालं तर पुन्हा ईडीची शिडी चढण्याची कसरत आली. माझ्या मते आणखी काही मासे नक्की गळाला लागतील.
– म्हणजे प्राणीसंग्रहालयच होणार तुमच्या पक्षाचं.
– हो ना. पक्षाला पण काय व्हरायटी आलीय. सौंदर्यसुद्धा ओसंडून वाहतंय आमच्या नेत्यांमध्ये. नंतर एकदा आमच्या सत्तेतील मंत्र्यांचा आणि आमदारांचा मॉकड्रीलचा भव्य कार्यक्रम आम्ही करणार आहोत. तेव्हा तुम्हाला एकेकाचे पैलू पाहायला मिळतीलच. तामीळनाडू झक मारतो त्यापुढे. सत्तेत कसं चैतन्य पाहिजे. तो राहुल खरंच भाग्यवान. आमच्या नशिबात ते नाही. पोलीस स्टेशनात प्रयत्न केले होते आम्ही जोरदार, पण सगळंच फसफस्ालं. फाफडा नरम पडला. मला ढोकळ्यासकट आमचे सर्व गुजराती खाद्यपदार्थ टोस्टर आणि हीटरमध्ये घालून कुरकुरीत करून खायला देणार आहे लवकरच.
– मग ते सणसणीत आवाज काढतील. तुमच्यावर खूप राग आहे ना त्यांचा. तुम्ही आत्ताच जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून क्षमा मागा त्यांची. खूप भडक डोक्याचे आहेत. त्यांना नेहमी कुलरचं गार गार पाणी मिळेल याची जातीनं व्यवस्था करा.
– दॅट्स माय प्लेझर. अशीच गरम डोक्याची माणसं मला आवडतात, असंही सांगेन त्यांना. काळजी वाटते ती फक्त आमच्या देवेंद्रजींची. पक्षासाठी काय त्याग केलाय या माणसाने. त्यांना दिल्लीत धरून बांधून नेलं तरी म्हणतील, मी पुन्हा येईन!