• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एटीएम कार्ड बदलले जाते तेव्हा…

- सुधीर साबळे (सायबर जाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 14, 2023
in पंचनामा
0

एटीएम कार्ड ही वस्तू आज प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाची वस्तू झाली आहे. तिची हाताळणी करताना योग्य काळजी घेणे आवश्यक असते. एक छोटी चूक महागात पडू शकते आणि एका क्षणात लाखो रुपयांचा चुना लावून जाऊ शकते. बँकेतून निवृत्त झालेल्या गंगाधर राव यांनी देखील अज्ञानातून अशीच एक छोटीशी चूक केली आणि ती त्यांचे हजारो रुपये घेऊन गेली.
गंगाधर राव मूळचे आंध्र प्रदेशमधले. पण त्यांची नोकरी महाराष्ट्रातल्या अनेक भागांत झाली होती. त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर सोलापूरमध्ये राहणे आवडत होते. मुलगा व्यवसायात होता, त्याचाही सगळा व्यावसायिक कारभार सोलापूरमधून चालायचा. राव यांचे मूळ घर हैद्राबादमध्ये होते. तेही सोलापूरपासून काही तासांच्या अंतरावर. त्यामुळे गंगाधर राव यांना सोलापुरात राहणे पसंत होते. बँकेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना दर महिन्याला येणार्‍या भरघोस पेन्शनमध्ये आरामात भागत होते, विशेष म्हणजे, मासिक खर्च करूनही वर बचत पण होत होती.
फेब्रुवारी महिन्यातील गोष्ट. एक तारखेला सकाळीच गंगाधर राव यांना खात्यात पेन्शन जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. बँकेचे एटीएम त्यांच्या फिरण्याच्या रूटवरच होते. चालून झाल्यावर घरी जाताना बँकेतून पैसे काढू या, असा विचार त्यांनी घरातून बाहेर पडतानाच केला होता. त्यांचे फिरणे साडेआठ वाजेपर्यंत आटोपले. नेहमीच्या कट्ट्यावर चहापान, समवयस्क मित्रमंडळींबरोबर गप्पा या दैनंदिन कार्यक्रमातच सकाळचे नऊ वाजले. आता ते घराच्या दिशेने निघाले. वाटेतल्या एटीएममध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या लक्षातही आले नाही की त्या एटीएमच्या बाहेर दोन तरुण मोटारसायकलवर बसून होते. ऊन्हं तापण्याच्या आत गंगाधर यांना चटकन् पैसे काढून घर गाठायचे होते. गंगाधर यांनी पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड मशीनमध्ये टाकले, समोरच्या बोर्डवर पिन नंबर टाकला. पण ‘नो कॅश’ असा मेसेज आला. पुढच्या एटीएममध्ये पाहू या, म्हणून ते डेबिट कार्ड परत येण्याची वाट पाहू लागले. पण, काही केल्या त्यांचे कार्ड बाहेर येत नव्हते. एटीएमच्या सुरक्षा रक्षकाला सांगून प्रयत्न करावा, म्हणून त्यांनी बाहेर येऊन त्याचा शोध घेतला. पण तो सुरक्षा रक्षकही कुठे दिसेना. अडकलेले डेबिट कार्ड कसे काढायचे, या विचाराने बिचारे गंगाधर राव त्रस्त झाले होते. इतक्यात बाहेर मोटरसायकलवर गप्पा मारत थांबलेली ती दोन मुले आतमध्ये आली. काय झाले काका, अशी विचारणा त्यांनी केली. गोंधळलेल्या गंगाधर रावांनी एटीएममध्ये डेबिट कार्ड अडकल्याचे त्यांना सांगितले.
ती मुलं म्हणाली, काका, तुमचा पिन नंबर टाका इथे. तुमचे कार्ड काढून देतो, त्यावर त्यांनी पुन्हा पिन नंबर टाकला आणि त्या दोन मुलांनी राव यांना त्यांचे अडकलेले कार्ड काढून दिले. मग ती मुलं म्हणाली, इथून काही अंतरावर दुसरं एटीएम आहे, तिथे जाऊन पैसे काढता येतील. चला, आम्ही येतो तुमच्याबरोबर. गंगाधर राव यांचा त्या देवदूतासारख्या मदतीला धावलेल्या मुलांवर विश्वास बसला होता. ते दोघे आणि गंगाधर राव दुसर्‍या एटीएम सेंटरवर गेले. तिथे देखील पैसे नव्हते. मग गंगाधर राव म्हणाले, मी नंतर बँकेत जाऊन पैसे काढतो. त्यांनी घरचा रस्ता पकडला. घराजवळ पोहचतात न पोहचतात तोच त्यांच्या मोबाईलवर बँकेतून २० हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. आपले डेबिट कार्ड तर आपल्याकडे आहे, पैसे कसे काढले गेले, याचा विचार करत असतानाच पुन्हा २० हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. हे असे काय होतंय, हे शोधण्यासाठी त्यांनी थेट बँक गाठली. दरम्यानच्या काळात, एका पेट्रोल पंपावरून ४० हजार रुपये स्वाइप झाल्याचा मेसेज आला.
गंगाधर रावांनी बँकेतल्या अधिकार्‍याला भेटून घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्याने तत्परता दाखवत राव यांचे कार्ड ब्लॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. पण, तोवर ८० हजार रुपयांचा फटका बसला होता. त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
पेट्रोल पंपावर हे कार्ड स्वाइप झाले होते, म्हणून तिथल्या सीसीटीव्हीच्या आधारे आपल्याला आरोपी सापडू शकतील, या शक्यतेने पोलिसांनी तपास सुरू केला. गंगाधर राव यांचे अडकलेले कार्ड काढून देताना त्या भामट्यांनी हातचलाखी करून त्यांचं कार्ड आपल्यापाशी ठेवलं होतं आणि बदलून दुसरंच कार्ड त्यांना दिलं होतं. एटीएमचा पिन नंबर तर खुद्द गंगाधर राव यांनीच त्यांना सांगितला होता. गंगाधर राव हे टेक्नोसॅव्ही नसल्यामुळे या सगळ्या प्रकाराला फसले होते.
दरम्यान, पोलिसांनी पेट्रोल पंपावर जाऊन कार्ड स्वाइप करून ४० हजार रुपयांचा व्यवहार झाल्या प्रकाराची माहिती घेण्यास सुरवात केली. तेव्हा पंप चालकाने पोलिसांना सांगितले, हा पंप महामार्गावर आहे. त्यामुळे अनेक ट्रक ड्राइव्हर मालकाने दिलेले पैसे इथे कार्ड स्वाइप करून काढून घेतात, आम्हाला त्यात एक टक्का मिळतो म्हणून आम्ही त्यांना ही सुविधा देतो. काही वेळापूर्वी दोन तरूण इथे आले होते, त्यांनी मला सांगितले की आम्ही चेन्नईला निघालो आहोत, आमचा ट्रक हायवेवर थांबला आहे, मी त्याचा क्लीनर आहे. ड्रायव्हर तुम्हाला ओळखतो. मी पण विश्वास ठेवून त्याला पैसे दिले.
पोलिसांनी पंपावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेतला तेव्हा ते गावाबाहेर राहणारे भामटे असल्याचे आढळले. ते झारखंडमधल्या जमतारा या गावातले होते. सायबर गुन्हेगारांचे गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे. एटीएमच्या आसपास असलेल्या सीसीटीव्हींनीही गुन्हेगारांची ओळख पक्की केली आणि त्यांच्या हातात बेड्या पडल्या. गंगाधर रावांचे पैसे परत मिळाले.

हे लक्षात ठेवा…

– बँकेत एटीएममध्ये कार्ड अडकण्याचा प्रकार झाला तर थेट बँकेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधा.
– जिथे सुरक्षारक्षक असेल तेथेच पैसे काढण्यास प्राधान्य द्या.
– पैसे काढताना आपल्या पाठीमागे कुणी उभे आहे का, याकडे लक्ष ठेवा.
– बोर्डवर पिन नंबर टाकताना सजग राहा.
– एटीएम मशीनच्या ठिकाणी सुरक्षारक्षक वगळता अन्य कोणाची मदत घेऊ नका. कार्डाचा वापर करण्याच्या बाबतीत नीट माहिती करून घ्या. आपला पिन नंबर अन्य कुणालाही, कोणत्याही कारणाने सांगू नका.
– काही कारणाने आपला पिन नंबर कुणाला सांगितला गेला किंवा कोणी तो पाहिला असेल, अशी शंका आली तर तो ताबडतोब बदलून टाका.

Previous Post

व्हेगन मिलेनियल्सचा ताप!

Next Post

हे वयच असं असतं…

Next Post

हे वयच असं असतं...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.