‘कोल्हापुरी चप्पल बनवणारा कारागीर हा कलाकारच आहे, त्याच्या कलेला आज लोकाश्रयाची गरज आहे. आजच्या जीवनपद्धतीशी जुळणारी कोल्हापुरी थाटाची पादत्राणे आम्ही बनवून देतो. ती एकदा वापरून या कलाकारांच्या कलेला सन्मान द्या…’ सांगत आहेत कोल्हापुरी चपला बनवणार्या कारागीरांना ऑनलाईन मार्केट उपलब्ध करून देणारी शॉपकॉप ही वेबसाईट असणारे राहुल कांबळे.
– – –
कोल्हापुरी चपला घालून पुणे मॅरेथॉनमधे धावणार्या तरुणाने गेल्या वर्षी लक्ष वेधून घेतले. पायताण बनवणारा कारागीर जगला पाहिजे, असा फलक हातात घेऊन या तरुणाने फिनिश लाईन गाठली. कोल्हापुरी फेटा, पैरण, धोतर आणि कोल्हापुरी चप्पल घातलेला तो तरूण सांगत होता, ‘कोल्हापुरी चप्पल बनवणारा कारागीर हा कलाकारच आहे, त्याच्या कलेला आज लोकाश्रयाची गरज आहे. आजच्या जीवनपद्धतीशी जुळणारी कोल्हापुरी थाटाची पादत्राणे आम्ही बनवून देतो. ती एकदा वापरून या कलाकारांच्या कलेला सन्मान द्या…’ या बोलण्याने विचार करण्यास प्रवृत्त केलं आणि राहुल कांबळे यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. कोल्हापुरी चपला बनवणार्या कारागीरांना ऑनलाईन मार्केट उपलब्ध करून देणारी शॉपकॉप ही वेबसाईट आणि फ्रँचाईजी असणारे राहुल व्यवसाय प्रवासाबद्दल म्हणाले, ‘मी राहुल कांबळे, जन्म २९ सप्टेंबर १९९१, कोल्हापूरजवळच भाटणवाडी हे माझं गाव. माझे आजोबा शेतीकाम करायचे, घरात दोन वेळेस अन्न मिळायची भ्रांत होती, तरीही चिकाटीने शिक्षण घेऊन वडील शिक्षक झाले. गेल्या वर्षी शिक्षण विभागात वडील केंद्रप्रमुख म्हणून निवृत्त झाले, तर आई गृहिणी. आजी-आजोबा, आई-वडील, माझ्या दोन बहिणी आणि मी असं माझं कुटुंब. पाचवीपर्यंत शिक्षण कोल्हापूरला झाल्यावर मी नवोदय केंद्रीय विद्यालय परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसोबत माझी निवड झाली. नवोदयला निवडले जातात ते सगळे हुशार विद्यार्थी असतात असं मानलं जायचं. नवोदयला शिक्षण, भोजन आणि निवास पूर्णपणे मोफत असतं. दहावीपर्यंत नवोदयला राहिलो त्यानंतर विवेकानंद कॉलेजला बारावी सायन्स पूर्ण केलं. सीईटीनंतर मुंबईच्या प्रतिष्ठित व्हीजेटीआय कॉलेजला प्रवेश मिळत होता, पण पुन्हा घरापासून लांब राहावं लागणार होतं. त्याला घरचे आणि मी दोन्हीही फार तयार नव्हतो. त्यामुळे २००९ला मी कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे इलेक्ट्रॉनिक्स शाखेत प्रवेश घेतला आणि आयुष्य बदललं. इंजिनियरिंग कॉलेजला येईपर्यंत माझा समज होता की केवळ नवोदयचे विद्यार्थीच हुशार असतात. पण कॉलेजात इतक्या हुशार विद्यार्थ्यांना बघितलं, भेटलो, तेव्हा तो भ्रम तुटला आणि माझा आत्मविश्वास कमी होऊ लागला. तरीही अभ्यास करत होतो, पण गुण कमी होत होत दुसर्या वर्षी नापास झालो.
पुढचं वर्ष सुरू होईपर्यंत एक वर्ष हातात होतं. कॉलेजचा असा नियम होता की नापास विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी बसता येत नसे. नवोदयचा हुशार विद्यार्थी आणि आता इंजिनिअर झालो तरी नोकरी मिळणार नाही असं वाटून निराश झालो होतो. पुढचा अभ्यास जमेल का, की दुसरं काही करावं अशा विचारात असताना पुण्यात नोकरीला असणार्या, मित्राला भेटायला गेलो. दिवसभर पायी हिंडत पुणे पालथं घालायचो, विशेषतः पुणेरी बाजारात फिरणं मला आवडायला लागलं. विक्रेते-ग्राहक सगळ्यांचीच मराठी भाषा कोल्हापूरपेक्षा वेगळी, पुणेरी मराठीत घासाघीस ऐकायला मजा यायची.
एकदा तुळशी बागेत फिरत असताना तिथे कोल्हापुरी चपलांची दुकानं दिसली. मी उत्सुकतेने जाऊन चपला बघितल्या, त्या कोल्हापुरी दिसत असल्या तरी मेकिंग मटेरियल अस्सल कोल्हापुरी चपलेचं नव्हतं. शिवाय किंमत अव्वाच्या सव्वा होती. मी लहान असल्यापासून वडिलांना कोल्हापुरी चपला वापरताना पाहिलं होतं. कोल्हापूरमधे काही ठराविक गावांतच अस्सल कोल्हापुरी चपला बनवून देणारे कारागीर आहेत, त्यांच्याकडून वडील चपला बनवून घेत. त्यामुळे या चपलांची घडण, आकार, वजन आणि किंमत या सगळ्याशी माझा परिचय होता. पुण्यातल्या बाजारात त्या दिवशी बघितलेल्या चपला कोल्हापुरी नाहीत, हे लक्षात आल्यावर वाटलं, इथे तिप्पट पैसे देऊनही लोकांना अस्सल कोल्हापुरी चपला मिळत नाहीत. गावाकडल्याच कुणीतरी येऊन इथे दुकानं टाकलं पाहिजे. चपला बनवणारा, विकणारा आणि घेणारा तिघांना अस्सल कोल्हापुरी चपला दिल्या-घेतल्याचं समाधान होईल. पण करणार कोण? आपणच करूया का, असा विचार आला. कुणाशी बोलायचं, कारागीर कुठले, दुकानं कसं हवं या विचारातच रात्री झोपलो, त्या दिवशी स्वप्नात सगळीकडे कोल्हापुरी चपलाच दिसत होत्या. मित्रासोबत बोलताना आम्ही ठरवलं की कोल्हापूरला जाऊन रिसर्च करायचा. त्यानुसार मी गारगोटी, कापशी, भोगावती, मडेलगे या गावांमध्ये कोल्हापुरी चपला बनवणार्या कारागीरांना भेटलो. लेदर कसं ओळखायचं, लेदरचे प्रकार, चप्पल कशी बनवायची, अशी माहिती दिली; त्याच्या नोट्स मी बनवून ठेवल्या होत्या.
कॉलेज सुरू झालं तेव्हा अभ्यासात बुडून गेलो आणि कोल्हापुरी चपलांच्या व्यवसायाचा तात्पुरता विसर पडला. २०१५ला इंजिनियरिंग पूर्ण झालं. प्लेसमेंटसाठी मी पात्र नव्हतो, त्यामुळे चांगली नोकरी मिळणार नाही असं वाटलं. मग एखादा धंदा सुरू करण्याचा पर्याय समोर होता. व्यवसायाच्या खाचाखोचा मुळापासून समजून घेण्यासाठी एमबीए करायचं ठरवलं. इंग्लंडच्या कॉव्हेट्री युनिव्हर्सिटीमधे अप्लाय केला. तिथे सिलेक्शन झालं. लोन आणि सर्व फॉर्मलिटी पूर्ण होईपर्यंत काही महिन्यांचा अवधी होता, तेवढ्या काळासाठी पुण्यात येऊन राहिलो. इंग्रजी भाषेवर कमांड यावी म्हणून इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावला, बोलण्यात फ्ल्युएन्सी यावी, म्हणून रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या कॉल सेंटरला जॉब केला. कॉल सेंटरच्या
जॉबने मला बरंच शिकवलं. काही वेळेस कॉल उचलल्यावर ग्राहक उद्धट बोलायचे, क्वचित कधी अर्वाच्य बोलायचे, काही वेळेस चांगला अनुभवही यायचा. पण कॉलवर चांगलं बोलणारी माणसं आठवड्यातून फार तर दोन-तीन वेळा भेटायची, इतर वेळी अपमान ठरलेला. तेव्हा वाटलं बिझिनेस करायचा तर मार्केटिंग आलं पाहिजे, लोकांशी बोलता आलं पाहिजे, इथे तर कॉल उचलल्यावर पाचव्या सेकंदाला फोन ठेवला जातो, मग हे जमणार कसं? या अनुभवानंतर वाटू लागलं की आपण व्यवसाय उभारणीत लक्ष देऊ, विक्री हा काही आपला प्रांत नाही. एमबीए करताना या गोष्टी आपल्याला शिकता येईल अशीही एक आशा होती. एमबीएसाठीच लोन आणि इतर फॉर्मालिटी पूर्ण झाल्या, हे सगळं होईपर्यंत मी साहेबाच्या देशात जाईन याची कुणालाच खात्री नव्हती, पोरगं हातपाय मारतोय, करू दे प्रयत्न, असं तोवर सगळ्यांनाच वाटतं होतं, पण जेव्हा खरोखर लोन सँक्शन झालं, जायची वेळ आली तेव्हा वडील म्हणाले, ‘तुला कुठला व्यवसाय करायचा ते सांग, मी भांडवलाचे पैसे देतो, इंग्लंडहून आल्यावर व्यवसाय सुरू करणार तो आताच कर.’ त्यांचा आग्रह बघून ठरवलं की इथेच थांबून व्यवसाय सुरू करू. आणि माझी इंग्लंडवारी रद्द झाली. वडिलांनी ताबडतोब मला दोन लाख रुपये दिले.
भांडवलाची रक्कम हातात आल्यावर २०१२ साली तयार केलेल्या कोल्हापुरी चपलांच्या नोट्स बाहेर काढल्या. व्यवसायासाठी लागणारा रिसर्च आणि भांडवल दोन्ही हातात आहे म्हटल्यावर उत्साह वाढला आणि मी जोमात कामाला सुरुवात केली. सगळ्यात आधी, २०१२ला भेटलेल्या सर्व कारागीरांना पुन्हा जाऊन भेटलो आणि नव्या व्यवसायाची सुरुवात करत असल्याचं सांगितलं, त्यांनी तयार केलेल्या चपलांचा योग्य भाव मिळवून देईन, अशी हमी दिली. खरी वस्तू विकायची, खरी किंमत घ्यायची, या तत्वावर अजूनही बर्याच कारागीरांशी बोललो.
कोल्हापुरात येणार्या भाविक आणि पर्यटकांना कोल्हापुरी चप्पल विकत घ्यायची असते, तेव्हा ते छत्रपती शिवाजी चौक (चप्पल बाजार रोड) ठिकाणी जातात. या ठिकाणी दुकान भाड्याने घेऊन व्यवसाय करायला जास्त भांडवल लागलं असतं, शिवाय तेथील दुकानदारांचे जुने ग्राहक ठरलेले असतात. मार्केट नसलेल्या ठिकाणी दुकान टाकणं व्यवसायदृष्ट्या योग्य नव्हतं, म्हणून ऑनलाइन स्टोअर सुरू करणं मला सुलभ वाटतं होतं. यात एक महत्वाचा फायदा म्हणजे ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन मार्केटची पोहोच अधिक होती. एखाद्या शहरातल्या प्रसिद्ध दुकानाची प्रसिद्धी दुसर्या शहरात होण्यात वर्षे निघून जातात. ऑनलाईन मात्र परदेशातही चुटकीसरशी पोहोचू शकते. आजच्या तुलनेत २०१६ला ऑनलाईन मार्केटमध्ये कमी लोक होते. पण हळूहळू ऑनलाईन मार्केट हेच शॉपिंगचं मुख्य साधन होणार, असा माझा अंदाज होता. त्यामुळे ऑनलाईन स्टोअर सुरू करण्याचं पक्क झालं. नाव काय ठेवायचं याची मित्रांसोबत चर्चा केली. कोल्हापुरी चप्पल विकणार आहोत तर नावातून खरेदी आणि कोल्हापूर या दोन्ही गोष्टी हायलाईट व्हायला हव्या, असं सगळ्यांचं मत पडलं. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतल फ्युजन असलेलं नाव कॅची वाटतं, म्हणून ‘शॉप-कॉप’ हे नाव नक्की केलं. शॉपिंगमधला शॉप आणि कोल्हापूरचा व्यावसायिक जगतातील शॉर्ट फॉर्म- कॉप असं फ्युजन असलेलं ठेकेबद्ध नाव ठरलं. जाणकार मित्राकडून वेबसाईट बनवून घेतली. कोल्हापुरी वेशात असलेल्या आजोबांचं चित्र हा लोगो तयार केला. माझं मुख्य प्रॉडक्ट होतं कोल्हापुरी चप्पल- पण, त्यासोबत माफक प्रमाणात कोल्हापुरी मसाले, घोंगड्या, इमिटेशन ज्वेलरी हे देखील वेबसाईटवर ठेवलं. जेणेकरून कोल्हापुरी मसाल्याचा शोध घेणार्या व्यक्तीलाही वेबसाईटवर आल्यावर कोल्हापुरी चप्पल दिसेल.
कॉल सेंटरच्या अनुभवाने सुरुवातीला मला माझ्या कामाची बोलून जाहिरात करणं अवघड वाटायचं, पण व्यवसायात जाहिरात, मार्केटिंग तर आवश्यक असते. हा प्रश्न वेबसाईटमुळे बर्याच प्रमाणात सोडवला गेला. कोर्या करकरीत कोल्हापुरी चपलांचे फोटो, वर्णन आणि त्या तयार होतानाचे व्हिडिओ अपलोड केल्याने, बोलून मार्केटिंग करण्याची आवश्यकता उरली नाही. हळूहळू ग्राहकांचे काय प्रश्न असू शकतात यावर विचार करून, त्याविषयी कसं बोलायचं याची तयारी केली. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचा इतिहास, मेकिंग प्रोसेस, मेंटेनन्स आणि भविष्यातील योजना माहीत असतील, तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता हे मी अनुभवातून शिकलो.
माणसानं जे शोध लावले त्यातला पादत्राणाचा शोध देखील महत्त्वाचा शोध आहे. पायाला बोचणार्या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकवण्यासाठी आदिमानव पायाला पाला किंवा झाडाची साल बांधायचा. पुढे मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन तो ते चामडे पायाला बांधू लागला. त्यात स्थित्यंतर होतं होतं, १३व्या शतकात कोल्हापुरी चप्पल उदयास आली. जाड चामडे वापरून ही चप्पल बनवली जाई. दोन किलो ते पाच किलोपर्यंत वजन असलेल्या या चपला राजे-महाराजे वापरत असतं. ‘काप्दासी पायताण’ या नावाने ती ओळखली जात असे.
पांडुरंग पाखरे यांनी या चपलेला कोल्हापुरातून मुंबईत आणले. १९२० सालात सौदागर परिवाराने नवीन डिझाईन तयार करून तिचा आकार पहिल्यापेक्षा पातळ केला आणि तीच अधिकृत कोल्हापुरी चप्पल म्हणून घोषित करण्यात आले. या नवीन कोल्हापुरी चपलेला मुंबईतील प्रसिद्ध जे जे अँड सन्स या चप्पल दुकानात मोठा प्रतिसाद मिळाला. वाढत्या मागणीमुळे सौदागर परिवाराला आणखी काम मिळालं. काम वाढल्याने ते आजूबाजूच्या लोकांनासुद्धा कोल्हापुरी चपला तयार करायला शिकवू लागले. आजही या चपलेच्या निर्मितीसाठी म्हैस, शेळी, बैल या प्राणांच्या कातडीचा वापर केला जातो. हे चामडं केस काढून साफ करून, दोन ते तीन महिने पाण्यात भिजवून ठेवले जाते, त्या पाण्यात बाभूळ, अशोक, साग यांची लाकडेही टाकली जातात, जी चामड्याची दुर्गंधी शोषून घेतात. यानंतर ते चामडे पादत्राणे बनवण्यासाठी तयार होते. पायाच्या मापाच्या हिशोबाने चामडं कापून घेतलं जातं व त्याला तेलात भिजवले जातं, जेणेकरून चपलेला पाण्याने अपाय होणार नाही. नंतर टाच व चपलेचा तळवा (सोल) हे जोडून घेतले जातात व चपलेला डिझाइनप्रमाणे आकार दिला जातो. दोन पट्टे, अंगठेदार असे अनेक प्रकार यात असतात. सुरुवातीला कोल्हापुरी केवळ पांढर्या धाग्यात शिवली जात होती, पण आता ती वेगवेगळ्या रंगबिरंगी धाग्यात शिवली जाते. नाजूक वेणीची नक्षी असलेली कापशी चप्पल असते, त्यात खास कापशी, आमदार कापशी, सेनापती कापशी, असे प्रकार आहेत. बटण आणि तीन बेल्ट असलेली कुरुंदवाड चप्पल साध्या तरीही रुबाबदार रचनेने लक्ष वेधते. उन्हाळ्यात ही चप्पल पायांना गारवा देते. हिचे हलके रंग डोळ्यांना त्रास देत नाहीत आणि वजनाला हलकी असल्याने ही चप्पल पायांनासुद्धा आरामदायी ठरते.
पारंपारिक कोल्हापुरी चपला सपाट असतात. मध्यभागी एक पट्टी आणि एक अंगठा असतो. पृष्ठभाग चामड्याचा असून तळ लाकडाचा असतो. घसरू नये म्हणून तळावर रबराचे आच्छादन असते. कोल्हापुरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने घाम शोषून घेते आणि पायाला थंडपणा जाणवतो. कर्रकर्र वाजणारी चप्पल म्हणजे कोल्हापुरी असं आजही समजलं जातं, तो आवाज येतो तो विंचू हे फळ किंवा बिया चप्पल बनवताना त्यात टाकल्याने. कर्रकर्र वाजणार्या आणि न वाजणार्या दोन्ही प्रकारांना ग्राहकांची पसंती आहे. एक कोल्हापुरी चप्पल तयार होण्यासाठी चामडे कमावण्यापासून चप्पल तयार होण्यापर्यंत साधारण १२ टप्पे असतात. त्यामुळे कारखान्यात बनवलेल्या चपलांच्या तुलनेत हँडमेड कोल्हापुरी चपलांची किंमत अधिक असते. चामड्यावर रासायनिक प्रक्रिया केल्याने चप्पल घालणार्या व्यक्तीच्या पायाला अॅलर्जी होऊ शकते, म्हणून हँडमेड चपलांची मागणी वाढली आहे. शिलाई केलेल्या या चपला अधिक टिकतात. योग्य काळजी घेतल्यास ५० वर्षे टिकलेल्या कोल्हापुरी चपलांची उदाहरणे आहेत. या चपलांमध्ये स्त्री पुरुष दोघांसाठी उत्तम पर्याय आमच्याकडे आहेत. साडी, शालू, जीन्स, धोतर, शेरवानी या सगळ्या पोषाखांसोबत कोल्हापुरी चप्पल दिमाखदार लुक देते. कोल्हापुरी जोड मराठमोळ्या विवाहसोहळ्याची शान वाढवतात.
आमच्या शॉपकॉप वेबसाईट आणि इंस्टा फेसबुक पेजवर सिंगल चप्पल जोड, कपल चप्पल, कॉर्पोरेट फेस्टिव्ह इव्हेंटसाठी, ग्रूपसाठी, मिरवणूक किंवा लग्नाच्या वर्हाडासाठी चप्पल अशा ऑर्डर्स येऊ लागल्या आहेत. बॉलिवुडमध्ये सिनेमा प्रमोशनच्या वेळी दर वेळी नवीन पेहेराव लागतो, ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोल्हापुरी जोड घालण्याचा ट्रेण्ड आहे. तानाजी सिनेमाच्या काही प्रमोशनसाठी सैफ अली खानने आमची कोल्हापुरी चप्पल घातली होती. रणवीर सिंग-दीपिकाच्या विवाहाच्या वेळी रणवीरने आमची कोल्हापुरी चप्पल मागवली होती. या मोठमोठ्या कलाकारांच्या फॅशन डिझायनरचे कॉल यायचे, तेव्हा वाटायचं कुणी आपली फिरकी तर नसेल घेत? पण वरचेवर असे कॉल्स येऊ लागले तेव्हा खात्री पटली की आपलं कोल्हापूर पायताण फिल्म इंडस्ट्रीमध्ये कर्रकर्र वाजतंय. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री सविता मालपेकर, प्राजक्ता गायकवाड, हृता दुर्गुळे हे सगळे आता शॉपकॉपच्या कोल्हापुरी चपला आवर्जून वापरतात.
राजे महाराजांचे पादत्राण अशी ओळख असणारी ही चप्पल कोल्हापूरच्या खासदार संभाजी राजांनी घालावी असं माझ्या मनात होतं. राजांना मी शॉपकॉपबद्दल सांगितलं आणि त्यांच्या इतमामाला साजेशी आमची नवीन राजावाडी डिझाईन घालून अभिप्राय द्यावा अशी विनंती केली. राजावाडी डिझाईनमध्ये मूळ कोल्हापुरी चपलेची बांधणी तशीच ठेवून आत स्पंज टाकला, त्यामुळे दिसायला अस्सल कोल्हापुरी आणि पाय टाकल्यावर तळपायाला अगदी मऊ गादीसारखी लागणारी अशी ती चप्पल तयार झाली. राजांना ती चप्पल आवडली, आजही दर चार-सहा महिन्यांनी राजे नव्या डिझाइनच्या चपला खास ऑर्डर देऊन बनवून घेतात आणि इतरांनाही सांगतात.
आपलं जीवनमान आरामदायी झालं तसं राहाणीमानही बदललं, वहाणांसारखे कडक व जड पादत्राण पायांना झेपेनासे झाले, त्यावर राजावाडी कोल्हापुरी चप्पल हा एक सुरेख लाँग टर्म पर्याय आहे. दर काही महिन्यांनी आम्ही नवीन आकर्षक आणि आरामदायी डिझाईन मार्केटमधे आणतो आहोत. ग्राहकांना अजून कुठली रचना हवी, त्यांचा वापर कसा आहे यानुसार कस्टमाइज्ड चपलाही आम्ही तयार करून देतो. यासाठी सध्या मुंबईला लालबागला आणि बदलापूर येथे आमची दोन दुकाने आहेत. एकदा तुमच्या पायाचं माप घेतलं की तुम्हाला हवी तशी कोल्हापुरी चप्पल खास तुमच्या पावलांसाठी बनवली जाते. एकदा आमच्याकडून कस्टमाइज्ड हँडमेड चप्पल बनवून घेतलेली व्यक्ती पुन्हा दुकानातल्या मशीनमेड कोल्हापुरी चपला घालणार नाही. पावलांना असली नकली फरक लगेच जाणवतो. आज माझ्याकडे जवळजवळ ८० डिझाइन तयार आहेत, सातशे रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांच्या कस्टमाइज्ड चपलांपर्यंत मोठी रेंज ग्राहकांना निवडीसाठी उपलब्ध आहे.
चप्पल घेताना खरं चामडं कसं ओळखावं, चपलेची निगा कशी राखावी हे आम्ही सांगतोच, पण तरीही कधी विसर पडला, तर पटकन हाताशी असणारं आमचं यूट्यूब चॅनल, इंस्टा फेसबुक पेजवर अपलोड होणारे रील्स, व्हिडिओ तुमच्या मदतीला आहेत. आपलं प्रॉडक्ट पारंपारिक असलं तरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आधुनिक मार्गांचा अवलंब करतो. म्हणूनच ‘कनेक्टिंग भारत विथ इंडिया’ ही टॅगलाईन सार्थ ठरवत केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर भारतभरात, नव्हे जगभरात आम्ही कोल्हापुरी चपलांची डिलिव्हरी करतो. हे सगळं मला महत्वाचं वाटतं, कारण आजवर चार भिंतीत असणारा, चपलेचं काम करतो म्हणून शरमून मागेच थांबणारा, माझा कोल्हापुरी चपलेचा कलाकार मानाने जगासमोर येतोय. कुठून कुठून लोक येऊन या चपलेची माहिती घेतात तेव्हा त्या कलाकाराला आणि त्याच्या कुटुंबालाही आपल्या कारागिरीचा अभिमान वाटतो. त्याला कलाकाराचा दर्जा मिळायला थोडा उशीर झाला असला तरी आता त्यांना त्यांची ओळख मिळते आहे. या कलेकडेही लक्ष वेधले जावे, लोकाश्रय मिळावा म्हणून गेल्या वर्षी लोकमत मॅरेथॉनमधे मी कोल्हापुरी चपला घालून धावलो.
कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना, रिसर्च आणि माफक भांडवल या बळावर राहुल कांबळे यांनी कोल्हापुरी चपलेच्या प्रस्थापित व्यवसायाला, ऑनलाइन आणि कस्टमायझेशन हे वेगळे आयाम दिले. त्यांच्या या सफल प्रयत्नाने एक व्यवसाय तर उभा राहिला आहेच, त्याचबरोबर कला आणि कलाकार यांना सन्मानपूर्वक ओळख मिळाली आहे. आपल्या आजूबाजूलाही पुनरुज्जीवनाच्या प्रतिक्षेत असणार्या कला आणि कलाकार आहेत. या कला म्हणजे त्या त्या समाजाची संस्कृतीची ओळख असतात. मराठी तरुणांनी जर या लोप पावत असलेल्या कलांना तंत्र आणि यंत्राची जोड दिली, तर त्यातून व्यवसाय निर्मितीसोबतच कलाही जपली जाईल.