(यडरव विद्यापीठाचा स्वागतकक्ष. कल्पनेहून सुंदर चेहर्याच्या दोन ललना तिथे स्वागताला संगणकामागे बसलेल्या. बाजूच्या भिंतीवर प्रत्येक मजल्यावर असलेल्या कक्षांची माहिती देणारा मोठा फलक. टळटळीत दुपारची वेळ असल्याने एखादा आगंतुक सोडल्यास इथे गर्दी नाही. इतक्यात ढगळ पॅन्ट शर्ट घातलेला, त्यात पॅन्ट बार्यासाठी दुमडून वर केलेली पण तशीच वर असलेला, विस्कटलेल्या केसांचा मगन सालकाडे आत येतो.)
मगन : राम राम बाई!
सुंदराबाई : नमस्ते सर! आपली काय…?
मगन : एक कोरी करकरीत, न वापरलेली अशी फर्स्टक्लास डिग्री द्या! (बोलता बोलता खिसे चाचपू लागतो.)
सुंदराबाई : अच्छा! तुम्हाला पदवी प्राप्त करायची आहे? कुठल्या विषयात तुम्हाला रुची आहे? म्हणजे त्यात तुम्ही प्रविष्ट होऊ…
मगन : आता आमचे बाबा म्हंत्या की विषयसुखात माणसानं पडायचं नाही. म्हंजे चौविस घंटे त्या गोष्टीचा विचार करायचा नाही, तेव्हा रुची…
सुंदराबाई : अहो मी विषय… म्हणजे सब्जेक्ट बद्दल विचारतेय. कला विज्ञान, वाणिज्य ह्यापैकी कुठल्याही विषयात तुम्ही पदवी मिळवू शकता, किंवा अभियांत्रिकी, वैद्यकीय…
मगन : हा बाकी लय अवघड वाटत्या. ते एकवेळ कलाबाई मगनराव सालकाडे शोभून दिसंल. तेच पॅक करा. किती झाले तुमचे? (परत खिसे चाचपू लागतो.)
सुंदराबाई : अहो पॅक करा काय? इथे मी किराणा मालाच्या दुकानात बसलेय का? तुम्हाला कुठल्या अभ्यासक्रमात पदवी हवी असेल तर आमच्या विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेऊन संबंधित विषयात तुम्हाला पदवीसाठी प्रविष्ट व्हावे लागेल. या पद्धतीने…
मगन : अत्याय? एवढे कुटाणे कश्याला पण?
सुंदराबाई : अहो, तुम्ही शिकलाच नाही. अभ्यास केलाच नाही तर तुम्हाला त्यातलं ज्ञान मिळेल कसं? त्यासाठी ते तीन वा चार वर्षाचे पदवी अभ्यासक्रम असतात.
मगन : कोण म्हंटलं मला ज्ञान मिळवायचंय म्हणून? अहो मी फक्त डिग्री मागू राहिलो. ती पण नवी कोरी!
सुंदराबाई : अहो, पदवी अशी मिळत नाही. त्यासाठी ठराविक वर्षांचा अभ्यासक्रम अभ्यासावा लागतो, त्यानंतर विद्यापीठ परीक्षा घेते. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यास पदवी मिळते.
मगन : हे म्हंजे असं झालं, तुम्हाला टमाटे इकत घेयचेय तर तुम्हाला सांगायचं, निंदायला, खुरपायला या. चारदोन येळा बारे द्या. खुड्याच्या येळी कॅरेट डोक्यावर घेऊन घामड निघेपर्यंत थका, अन मग टमाटे खा.
सुंदराबाई : अहो, दोन्हीत फरक आहे…
मगन : ह्या… कसला बोडक्याचा फरक आलाय? काही तरी गोष्टच इकताय ना? मंग कशाला म्हणायचं, पैशे दे तुझी तू बनव, अन् घेऊन जा. उद्या जर टूथपेश्टवाले म्हणले, बाबा दिले ना वीस रुपडे? तिथून टुब घे त्याच्यात हातानं, मशीननं नाहीतर उलथनीनं का भरीना, पण भर पेश्ट! फक्त ती बरोबर नाही भरली, तर पैशे बी देणार नाही. अन टूथपेश्ट बी देणार नाही. तसलंये तुमचं.
सुंदराबाई : तुमची उदाहरणे वेगळ्या विषयावरची आहे. पदवी शिकूनच मिळते, तुमचा आक्षेप अवाजवी शुल्क घेण्यावर आहे का?
मगन : हा आता वस्तू बनवायची म्हणल्यावर पैशे लागणारच, त्यावर मी कश्याला बोलू. तुम्ही घ्या की काय शुक्ल घेयचं ते!
सुंदराबाई : तुम्हाला मी कसं सांगू आता? (ती डोक्याला हात लावते. अचानक तिला कायतरी आठवतं.) तुम्हाला पदवी कश्यासाठी हवीय?
मगन : कसंये, माह्या घरचे माह्यासाठी स्थळं पाहूं राहिले. पण आजकाल पोरी धंदा-पाणी आणि डिग्री ईचारत्याय. मंग आता बापानं रस्त्याकडंचं टुकडं इकलंय, एक खोक्यामधी! त्या पैश्यातून बाप एक दुकान टाकून देऊ राह्यलाय, काही पैशे खर्चायला बापानं देयेल होते, मित्रानं डिग्रीचं दुकान म्हणून इथला पत्ता दिला, मंग आलो इथं.
सुंदराबाई : म्हणजे मित्रानं पदवी विकत आणि त्यातही इथे मिळते, असं सांगितलेलं तर…
मगन : त्यानं आसं नाही सांगितलं, मी बातमी बघितली ना? मोठ्या शेठच्या डिग्रीची अन झेरॉक्स शेठच्या डॉक्टर बनल्याची! टीव्हीवर!
सुंदराबाई : अहो, त्यांना त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामं केल्याबद्दल संबंधित विषयात पदवी बहाल केलीय, त्याला…
मगन : म्हणजे आमदार फोडल्याबद्दल दिलीय का?
सुंदराबाई : नाही तसं…
मगन : तसं असंल तर मीबी काल दुपारच्याला शेतातून जाणारं योग्याचं सायपन फोडलंय… नाही कळलं? पाईपलाईन! पाटावरून टाकेले तेनी! माझं न तेचं भांडणं झालं, केले एक घाव दोन तुकडे! बोला आता देताय का डिग्री?
सुंदराबाई : पुनः पुन्हा तेच काय? नाही म्हणते ना मी!
मगन : मग लग्न करा! डिग्री मागणार्या पोरीपेक्षा डिग्री न देणारी पोरगी परवडलं!
सुंदराबाई : तुम्ही या आता! (ती वैतागून)
मगन : एवढं का वैतागता? बघा एखादी सेकंड हँड असली तरी चालंल. मी शेठवानी घरात, कपाटात लपवून ठेवील, देता का बोला?