ग्रहस्थिती : मंगळ मिथुनेत, प्लूटो मकर राशीत, केतू तुळेत, बुध, गुरु रवी आणि नेपच्युन हे मीनेत, राहू, हर्षल आणि शुक्र मेष राशीत, शनि कुंभेत. विशेष दिवस : १६ एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी, १७ एप्रिल सोमप्रदोष, १९ एप्रिल अमावस्या सकाळी ११.२३ सुरू, २० एप्रिल सकाळी ९.४२ समाप्त.
मेष – तरुणवर्गासाठी उत्तम काळ आहे. यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. शिक्षणक्षेत्रात नव्या संधींचा लाभ घ्या, भविष्यात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कोर्ट कचेरीचे दावे काहीसे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी बदल स्वीकारा. शत्रूचे डावपेच निष्फळ ठरतील. व्यवसायाचा वेग मंदावेल. शिक्षक, कलाकार, संगीत क्षेत्रातील कलाकार यांच्यासाठी उत्तम काळ आहे. संततीकडून चांगले काम होईल.
वृषभ – कोणतेही काम अपेक्षेप्रमाणे न झाल्याने मन अस्वस्थ होईल. ताण तणाव न घेता मन आनंदी ठेवले तर चांगला फायदा होईल. कुटुंबात छोट्यामोठ्या कुरबुरी होतील, त्यात ज्येष्ठांनी लक्ष घातल्याने वाद वाढणार नाहीत. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. उकाड्याची तीव्रता वाढत आहे, प्रकृतीची काळजी घ्या. घरात शुभघटना घडेल. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यात घाई करू नका, थांबून निर्णय घ्या. फायदा होईल. जुने येणे वसूल होईल.
मिथुन – संततीसाठी व शेतकरी, अभियंते, पत्रकारांसाठी चांगला काळ आहे. कलाकारांचा मान-सन्मान होईल. नोकरीत वादाचे प्रसंग व बदली होऊ शकते. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. व्यवसायात आर्थिक व्यवहारात लक्ष न ठेवल्यास मोठी फसगत होऊ शकते. अमावस्येला वेगात वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देऊ नका. सामाजिक कार्यात मन रमेल. धार्मिक यात्रा घडेल.
कर्क – अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील. अचानक नवीन काम हातात पडून चांगला आर्थिक लाभ होईल. शुभघटनांच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीत बदल होईल. व्यवसायात स्थिती बरी राहील.पैशाचे नियोजन काळजीपूर्वक करा. शुभग्रहांची साथ मिळेल. वाहनखरेदी कराल. घरच्यासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी होईल. नव्या मित्रांकडून भविष्यात चांगला फायदा मिळेल. घरातील आनंदी वातावरणामुळे मन:स्वास्थ्य उत्तम राहील.
सिंह – नोकरीत अचानक मोठी जबाबदारी येऊन पडेल, ती उत्तम प्रकारे पार पाडल्याने वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. शेअर, जुगारातून पैसे मिळतील. पण फार आहारी जाऊ नका. पत्नीशी वाद होण्याची शक्यता असल्याने सजग राहा आणि मौन पाळा. अचानक एखादा खर्च आला तरी उधार-उसनवारी टाळा. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात आर्थिक बाजू कमकुवत होऊ शकते.
कन्या – कुटुंबात खुशीचे वातावरण राहील. भाग्योदय घडवून आणणारा कालखंड. शास्त्रज्ञ, संशोधकांना चांगला काळ. सामाजिक कार्यात दानधर्म कराल. भावंडांशी सबुरीने घ्या, जपून बोला, समस्या टाळा. घरात शुभकार्ये घडतील. बँकेची कर्जप्रकरणे मार्गी लागतील. खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागू शकतो. मनोरंजन, सहल, धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च होतील. नोकरीच्या ठिकाणी उत्तम अनुभव येतील.
तूळ – मनासारखे काम झाले नाही म्हणून मन:स्वास्थ्य खराब करून घेऊ नका. मन उदासही होऊ देऊ नका. या आठवड्यात थोडी खुशी आणि थोडे गम देणारे अनुभव येतील. विवाहेच्छुकांचे लग्न जमेल. प्रेम प्रकरणात कुरबुरीचे प्रसंग निर्माण होतील. त्यामुळे होशियार रहो. कुणाशी भागीदारी केली असेल तर काही प्रमाणात त्रासाची शक्यता आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. शत्रूवर नजर ठेवा, त्रास होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल.
वृश्चिक – नोकरी-व्यवसायात अधिकार वाढतील. त्यामुळे ताण वाढेल. प्रगतीचा आलेख चढता राहील. शिक्षणात नव्या संधी मिळतील. उच्चशिक्षणाचे प्रयत्न मार्गी लागतील. नोकरीतून विदेशात जाण्याच्या प्रयत्नांत असाल तर त्याबाबत यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. कोरोना वाढतोय, स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष द्या. चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याच्या मोहात पडू नका. पती-पत्नीत कटुता निर्माण होईल. गुंतवणुकीतून चांगले लाभ होतील.
धनु – या आठवड्यात कुठल्याशा विषयावर निराशा आली असेल तर ती दूर होईल. युवावर्गासाठी आनंददायी घटना घडेल. नोकरीत नव्या संधी चालून येतील. चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. त्यामुळे घरात आनंद राहील. कामानिमित्ताने अचानक विदेशात जावे लागेल. आर्थिक लाभ वाढेल. नात्यामध्ये पैशाची देवाणघेवाण नकोच, उगाच वादाला निमंत्रण मिळू शकते.
मकर – कामानिमित्ताने धावपळ होईल. आजच्या काळात ही धावपळ टाळताही येणार नाही. पण त्याचा आरोग्यावर परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या. व्यवसायात नोकरवर्गाकडून त्रास होऊ शकतात. हातातली कामे मार्गी लावा. कलाकार, संगीत क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ आहे. त्यांना मनासारखे काम मिळेल. त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल. नव्या व्यवसायाच्या प्रयत्नांत घाई करू नका. संततीकडे लक्ष द्या.
कुंभ – संगत चांगली ठेवा. व्यसनापासून लांब राहा. घरात कुरबुरीचे प्रसंग झाले तरी शांत राहा. काहींना अचानक आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. पण त्यातून ते सुखरूप बाहेरही पडतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत जादा कामाचा ताण येईल. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कामासाठी प्रवास होईल. दागिन्यांची खरेदी होईल. खाणे-पिणे मापात ठेवा. अन्यथा नसती आफत येईल.
मीन – संमिश्र घटनांचा अनुभव देणारा काळ रहाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ राहणार आहे. शिक्षक, प्राध्यापक यांना चांगली संधी मिळेल. सरकारी कर्मचार्यांसाठी चांगला काळ आहे. अति आत्मविश्वासाने कोणतेही काम करणे टाळा. एखाद वेळेस निर्णय चुकू शकतो. बँकेचे कर्ज प्रकरण मार्गी लागेल. प्रॉपर्टीचे व्यवहार लगेच करू नका, फसगत होऊ शकते. मनोरंजनावर पैसे खर्च होतील.