शिवसेना आणि कम्युनिस्ट लालभाई यांच्यातील वैर आणि संघर्ष सर्वज्ञात आहे… शिवसेनाप्रमुखांनी व्यंगचित्रांतून ज्या प्रमुख नेत्यांवर प्रखर रेषाप्रहार केले, त्यांत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचाही समावेश होता… मात्र कम्युनिस्ट पक्षाविषयी बाळासाहेबांचे मत आणि धोरण काहीही असले तरी त्यांना कॉ. डांगे यांच्या विद्वत्तेविषयी कमालीचा आदर होता. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे वैशिष्ट्य होते. त्यांनी सडकून टीका केली, फटकारे ओढले, पण कोणाला शत्रू मानलं नाही. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाशी ज्यांचा परिचय नव्हता, त्यांनाच १९८५ साली शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनात कॉ. डांगे यांचं व्याख्यान कसं काय होतं, असा प्रश्न पडला असेल… डांगे शिवसेनेच्या अगदी प्रारंभिक काळापासून शिवसेनेच्या व्यासपीठावर यायचे, मार्गदर्शन करायचे. १९६८च्या या मुखपृष्ठावर अशाच एका वर्गाची गंमत आहे. त्यात डांगे यांना स्त्रीवेषात झळकवलं आहे आणि शिवसैनिक डांगेंना सांगतायत, तुम्ही वर्ग घ्या, पण धडा मात्र आम्हीच शिकवू! असं हे शिवसेनाप्रमुखांचं डांगे यांच्याबरोबरचं मजेशीर, लोभस नातं!