कोविडकाळातल्या गुढीपाडव्याची गोष्ट, श्रीखंडाच्या चक्क्यासाठी दही विरजताना मुद्दाम जास्त दूध घेतले. नंतर नेमके काय करायचे, जास्त बनेल ते श्रीखंड कोणाला द्यायचे वगैरे डोक्यात काहीच नव्हते. टाळेबंदीमुळे कोणाचे जाणेयेणे तर शक्य नव्हतेच. पांढराशुभ्र मलाईदार चक्का बनल्यावर सर्वात आधी आठवण आली राजेंद्र महाराजांची. मनोमन वाटले की याची चव महाराजांना मिळायला हवी. पुण्यात असते महाराज तर गोष्ट वेगळी होती, श्रीखंड सहज पोचवता आले असते; मात्र बडोद्याला कसे काय बरं पोहोचवावे? मग एकदम आठवले की दोन तीन वर्षांपूर्वी एका दसर्याला हिरेश जर्मनीला असणार होता, बाकी थोड्याफार खाऊबरोबर मी त्याला आठवलेंची श्रीखंडवडी दिलेली, म्हटलं नाही श्रीखंड, तर या वडीने तोंड गोड कर!! तर तो स्वत:बरोबर वड्या घेऊनच गेला होता. पण महाराजांना कुरीअर करायचे ठरवले नी वड्या बनवायच्या तयारीला लागलो!! महाराजांसाठी व तिथल्या इतरांसाठी बनवायच्या वड्या म्हणून मन आनंदले होते!!
लहानपणापासूनच ह्या आंबटगोड वड्यांचे मला विशेष आकर्षण, नुसती चवच नाही पण त्यांचे रंगरूप, पोत… सगळेच कसे खासच. बनवायला तशा सोप्याच म्हणाव्या लागतील या वड्या. म्हशीच्या पूर्ण स्निग्धांश असलेल्या दुधाचे दही विरजावे, विरजणही फार आंबट नको बरं, नाहीतर दही जास्त आंबट होते. ताजे तयार दही मलमलच्या स्वच्छ कापडात बांधून चक्का बनवून घ्यावा. दह्यातले पाणी निघून जायला सात-आठ तास तरी लागतातच. रात्री झोपताना दही बांधले की सकाळी चक्का मस्त तयार झालेला असतो. हा तयार चक्का व साखर वजनानी सारखी घेऊन एकत्र करायचे. वेळ असेल तर थोड मुरू द्यायचं नी मग मिश्रण मध्यम आचेवर आळवायला घ्यायचे. सुरुवातीला जरा पातळ होते व मग हळुहळू घट्ट व्हायला लागते मिश्रण!! यात आवडीनुसार केशर, वेलदोड्याची पूड, थोडा खायचा रंग वगैरे घालायचे. काही वेळाने मिश्रण भांड्याच्या कडा सोडू लागले की गॅस बंद करायचा. भांडे गॅसवरून खाली उतरवायचे आणि खूप घोटायचे. कोमटसर झाल्यावर त्यात थोडी पिठीसाखर टाकून मिश्रण पुन्हा घोटायचे. मग बनलेला गोळा पोळपाटावर लाटून किंवा तूप लावलेल्या ताटात थापून वड्या कापायच्या.
प्रमाण व प्राथमिक कृती तर श्रीखंडासारखीच आहे, चवही साधारण तशीच लागते या वड्यांची मग का करायची ही पुढची खटपट? मुख्य म्हणजे टिकाऊपणा वाढतो. चिकटपणा जाऊन खुटखुटीतपणा येतो! कशामुळे घडते ही किमया तर मिश्रणाने सोसलेल्या चटक्यांमुळे!!
मूळचा मोहासक्तीचा पडदा दूर व्हायला आपल्यालाही असेच चटके सोसावे लागतात नाही का? किंवा मी म्हणीन की जर आयुष्यात येणारे अनेक अनुभवांचे चटके सोसून जर काही अंशी का होईना, अनासक्ती येणार असेल तर ते चटके नक्कीच सोसावेत!! सोन्यालाही उष्णतेत तावून सुलाखून निघाल्याशिवाय सुवर्णझळाळी लाभत नाही, तिथे तुमची आमची काय कथा? मात्र या चटक्यांचा योग्य परिणाम व्हायला म्हणजे वडी पडायला चक्क्यातल्या साखरेचे नेमके प्रमाणही फार आवश्यक ठरते बरं. अनासक्तीचे रूपांतर शुष्कपणात व्हायचे टाळायचे असेल तर मनातला गोडवा, समाधान सगळेच टिकवून ठेवावे लागते नाही का? प्राप्तस्थितीचे चटके खाताना अंतरंगीच्या या गोडव्याला टिकवायचे व खुलवायचे काम करते ते नामस्मरण! इष्टाच्या नामस्मरणाची गोडी लागली की नकळत समृद्ध बनते आयुष्य! एकदा का हे अनुभवांचे चटके सोसायची व मनातली गोडी कायम राखायची सवय लागली की आपला पुढचा प्रवास सुकर होतो, अगदी देशापरदेशात सहज जाणार्या श्रीखंडवड्यांसारखाच!
स्वामी विवेकानंद जेव्हा सर्वप्रथम अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना का कमी हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या? पैशाची चणचण, उपेक्षा अश्या नानाविध नकारात्मक गोष्टींचा सामना करतानाही वेदांत जगापर्यंत पोहोचवण्याची मनोमन असलेली कळकळ काही कमी झाली नाही. हे सगळे जरी मला वैयक्तिकरित्या त्रासदायक ठरत असले तरी एकदा का जगापुढे ही वेदांतविद्या आली की सर्वांचेच कल्याण होईल ही उदात्त भावना नक्कीच मनात घर करून असणार!! नंतर घडला तो निव्वळ इतिहासच!! संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वधर्मांनी एकत्र येणे आणि त्यामागचा वेदांतविचार, एक नवी दृष्टीच दिली स्वामीजींनी जगाला! संकुचित साच्यात न अडकता, विश्वबंधुत्वाचा पुरस्कार आणि अंगिकार करणारे स्वामीजी म्हणूनच आजही केवळ भारतात नाही तर परदेशांतही वंद्य आहेत. त्यांनी दिलेले तत्वज्ञान चिरकाल टिकणारे आहेच, पण त्यामागची श्री गुरूंविषयीच्या अपार प्रेमाच्या, नामस्मरणाची गोडी आणि पडलेले अतोनात कष्टही, त्यावर केलेली मात, सगळेच प्रेरणादायी आहेत. तुम्हाआम्हाला भवसागराचा फेरा ओलांडून पुढे जायला हा मनातला गोडवा तर जपायचा आहेच पण मिळणारे चटकेही स्वीकारायचे आहेत, अगदी त्या श्रीखंडवडीसारखेच!!