सध्या छत्रपती संभाजी महाराजांवरील गाजत असलेल्या ‘छावा’ चित्रपटाचा खास शो महायुती सरकारच्या वतीने विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व आमदारांसाठी आयोजित केला असताना शिंदे गटाचा एकही आमदार चित्रपटगृहाकडे फिरकला नाही. ही बातमी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याला कळताच त्याने शोधपत्रकारितेशी इमान राखून या बहिष्कारनाट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. माझी परवानगी आणि आशीर्वाद घेऊन तो ही शोधपत्रकारितेची मोहीम फत्ते करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांच्या निवासस्थानी गेला. चिलखत घातलेल्या शिंदेंच्या शरीररक्षकांनी त्याची झडती घेऊन त्याला घरात प्रवेश करण्याची संधी दिली.
नेहमी ‘ये, ये पोक्या’ म्हणत हसतमुखाने त्याचं स्वागत करणार्या शिंदेंनी त्याला पाहताच आपल्या हातातील पुस्तक लपवत त्याला कळणार नाही अशा तर्हेने सिंहासनाच्या बाजूला फेकून दिलं. त्यामुळे पोक्याची उत्सुकता अधिकच वाढली. कसलं तरी चावट पुस्तक असावं असं समजून पोक्याने क्षणार्धात त्या पुस्तकावर झडप घातली आणि पुस्तक एका झटक्यात हातात घेतलं.
पुस्तकाचं शीर्षक होतं ‘शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील गद्दारांचे चरित्र’. शीर्षक वाचून तो थक्कच झाला. त्याने न घाबरता शिंदे साहेबांना जाब विचारला, साहेब ही गद्दारांची चरित्रं वाचण्याची अवदसा आपल्याला कशी काय आठवली? आणि या पुस्तकाचा शोध तुम्हाला कसा काय लागला? माझ्या माहितीत या नावाचं पुस्तक मला कधीच आढळलं नाही. त्यानंतर त्या दोघांची झालेली ही बातचीत.
– तीन वर्षांपूर्वी मी माझ्या सहकारी आमदारांबरोबर भाजपाच्या आवतणावरून सुरतला गेलो होतो ना, तिथे एका रद्दीच्या दुकानात सापडलंय ते.
– अहो साहेब, शिवछत्रपतींच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची चरित्र वाचायची सोडून ही असली गद्दारांची चरित्रं कशासाठी वाचता?
– खूप चांगली माहिती आहे त्यात. माझ्या ज्ञानात भर पडली त्या पुस्तकामुळे. ते मी आधीच वाचलं असतं तर मी अस्सल शिवसेना तीन वर्षांपूर्वी नव्हे, तर त्याआधीच सोडली असती. पण शेवटी वेळ यावी लागते. किती छान आणि उद्बोधक माहिती आहे या पुस्तकात. आणि गद्दारीचे प्रकार तरी किती! खरोखरच खूप कौतुक करावंसं वाटतं त्या काळातील गद्दारांचं. गद्दारी कशी आणि किती पद्धतीने करावी याची शिकवणही या चरित्रात आहे. प्रत्येक गद्दाराचा वेगवेगळा स्वभावधर्म असतो. कोणी पैसे, धनदौलत, मोठी जहागिरी मिळवण्यासाठी गद्दारी करतो, तर कोणी धन्यावर मात करण्यासाठी. कोणी वरिष्ठ नेत्याला ब्लॅकमेल करण्यासाठी, तर कोणी आपल्या नेत्याच्या वरचं स्थान पटकावण्यासाठी. मी म्हणतो, गद्दारी करण्याने जर आपल्याला कोट्यवधी, अब्जावधी रुपये मिळत असतील तर असा चान्स आपण का सोडावा? माझंच उदाहरण घे. साधा रिक्षाचालक होतो मी. गद्दारी करून महाराष्ट्राच्या सीएम पदापर्यंत पोचलो ना! गद्दारीचं मोठं फळ मिळतंच मिळतं. या महाराष्ट्राच्या मायभगिनींना न्याय मिळवून दिलाय मी.
– पण त्यामुळे राज्याची तिजोरी रिकामी होत चाललीय त्याचं काय?
– ते आताचे मुख्यमंत्री बघून घेतील. माझ्या लाडक्या बहिणींवर त्यांनी योजना बंद करून अन्याय केला ना, तर मी माझ्या गावाला जाऊन अपमानाचा बदला घेईन.
– तुमच्या या असल्या पळपुटेपणाला मुख्यमंत्री फडणवीस अजिबात भीक घालत नाहीत. त्या कराडच्या आधी तुमच्या हकालपट्टीचा फास आवळत आणलाय त्यांनी.
– मी त्यांनाच काय कोणालाच भीत नाही. तुला म्हणून सांगतो, गद्दारी या विषयावर पीएचडी करून डॉक्टरेट मिळवण्याचा संकल्प मी येत्या गुढीपाडव्याला सोडणाराय आणि त्यानंतर ३० दिवसांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बुलेट ट्रेनपेक्षा फास्ट गतीने तो पूर्ण करणाराय. त्याआधी आजपर्यंत महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे तर जगात कोणी कोणी आपल्या वरिष्ठ राजकीय नेत्यांशी गद्दारी केली याचे तपशील बँकॉक आणि फॉकलंडच्या लायब्ररीत जाऊन मिळवणार आणि प्रबंध पूर्ण करून माझे मायबाप मोदीसाहेब यांचे धाडसी, जिवलग, पराक्रमी मित्र डोनाल्डसाहेब ट्रम्प यांच्या हस्ते अमेरिकेत त्या प्रबंधाचं ग्रंथरुपाने प्रकाशनही करणार.
– च्यामारी, लय भारी.
– अरे, त्यानंतर तू बघतच रहा. त्या गिनीज बुकातही असल्या अनोख्या विषयावर डीपली संशोधन केल्याबद्दल नाव जाईल माझं. आहेस कुठे तू? त्यानंतर सांगणाराय मी, तुमचं मुख्यमंत्रीपद तुमच्यापाशीच ठेवा. सार्या जगात नाव गाजतंय माझं. आता मला असल्या फुटकळ पदाची हाव नाही.
– पण हा प्रबंधाच्या प्रकाशनाचा सोहळा करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त कसा काय साधणार तुम्ही?
– तुला ते थुंबा प्रक्षेपण केंद्र माहीत आहे का उपग्रह सोडण्याचं? तिथून उपग्रहात बसून बुलेट ट्रेनच्या शंभरपट वेगाने अमेरिकेत जास्तीत जास्त चाळीस सेकंदांत पोहोचेन मी. तिथे ‘मी गद्दारी कशी केली’ या विषयावरील माझं अभ्यासपूर्ण भाषण चिनी भाषेसह जगातील सर्व भाषांमध्ये प्रक्षेपित केलं जाईल.
– बाप रे! विश्वासच बसत नाही असं काही तुमच्या बाबतीत घडेल म्हणून.
– नाहीच बसणार. खरा धक्का तर पुढेच आहे. आदरणीय आणि फादरणीय डोनाल्ड ट्रम्प ‘किंग ऑफ गद्दार’ हा किताब माझ्या गळ्यात चाळीस फुग्यांची माळ घालून मला बहाल करतील. तो प्रसंग आणि हा सत्कार अमेरिकेच्या क्रॅक चॅनलवरून पाहू शकशील तू. तो पाहिल्यावर डोळे उघडतील त्या फडणवीसांचे. त्यांना शरम वाटेल की किती जागतिक कीर्तीचा माणूस गमावून बसलोय मी.
– त्यानंतर काय प्लॅन आहेत तुमचे?
– आत्मचरित्र लिहिण्याचा प्लॅन आहे माझा. त्याचं नाव असेल ‘आम्ही गद्दार गद्दार!’ माझ्या प्रबंधाची कीर्ती जगभरात पोचल्यामुळे माझ्या आत्मचरित्राचेही जगातल्या सर्व भाषांमध्ये अनुवाद होतील. इतिहासात माझ्या नावाची नोंद होईल. आता चल फूट तू!