पद्माकर काशिनाथ शिवलकर उर्फ ‘पॅडी’ यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झालं. त्याआधी शिवलकर यांचे मुंबई आणि टाटा संघातील सहकारी मिलिंद रेगे यांचं निधन झालं. १५ दिवसांत मुंबई क्रिकेटने ७०च्या दशकातील फिरकी दुक्कल (जोडगोळी) गमावली. मुंबई क्रिकेटच्या आणि प्रभादेवी परिसरातील दोन जबरदस्त विकेट एकापाठोपाठ पडल्या. शिवलकरांचा आर्मर भल्याभल्याची दांडी उडवत असे हे दृश्य तर मी कधीही विसरू शकत नाही. अनेक रणजी, इराणी, दुलीप तसेच टाइम्स शिल्ड आणि कांगा लीग सामने पॅडी शिवलकरांनी आपल्या मुंबई, पश्चिम विभाग, टाटा तसेच शिवाजी पार्क जिमखान्याला एकहाती जिंकून दिल्याच्या असंख्य आठवणी मनात तरळून गेल्या. क्रिकेट मैदानातील आमचं आयुष्य शिवाजी पार्क जिमखान्याने समृद्ध केलं अन् त्यात मोठी भूमिका बजावली शिवलकरांच्या डावखुर्या जादुई फिरकीने… ‘पॅडीची कमाल अन् मुंबईची धमाल’ असे मथळे कैकदा दिले असतील. मुंबईच्या या अफलातून फिरकीपटूला मात्र कधीच कसोटीपटूचा टिळा लागला नाही, याचं वैषम्य कायम वाटत राहिलं.
प्रभादेवीत सारी जिंदगी घालवलेल्या फिरकीच्या या किमयागाराची नाळ शिवाजी पार्क जिमखान्याशी जोडली जाणं उचितच होतं, कारण मुंबईच नव्हे तर ‘भारतीय क्रिकेटची पंढरी’ अशी शिवाजी पार्कचा महिमा असलेल्या काळातच शिवलकरांची जडणघडण झाली. पण विलक्षण योगायोग असा की त्यांना प्रथम संधी लाभली ती सीसीआयमुळे! १९६१-६२च्या हंगामात २१ वर्षीय पॅडीला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी लाभली ती बॉबी सिम्पसन, टॉम ग्रेव्हनी, एव्हर्टन वीक्स, रिची बेनॉ, रमण सुब्बा रो यांच्यासारख्या नामचीन, दादा खेळाडूशी सामना करण्याची आणि २१ वर्षीय पॅडीने नामवंत इंटरनॅशनल संघातील थोडेथोडके नाहीत तर तब्बल पाच मोहरे टिपले. त्याला सिलोनच्या पाहुण्या संघाविरुद्धही सामना खेळायला मिळाला, सिलोनचा निम्मा संघदेखील त्याने गारद केला. पण पदार्पणाच्या लढतीत निम्मा संघ गारद करणार्या पॅडीला मुंबई रणजी संघात प्रवेश करण्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागली. इथे त्याला संधी मिळाली तब्बल चार वर्षांनी, ६५-६६च्या मोसमात, ती चंदू बोर्डेच्या महाराष्ट्र संघाविरुद्ध. कसोटीपटू बापू नाडकर्णी संघात होते आणि तरणाबांड एकनाथ सोलकरही मैदानं गाजवत होता. इंडियन स्कूलबॉइज संघाचा कर्णधार सोलकर पॅडीप्रमाणेच डावखुरा मंदगती गोलंदाज, शिवाय अव्वल क्षेत्ररक्षक आणि भरवशाचा फलंदाज असा त्याचा दबदबा होता. मुंबई संघाला तिहेरी डावखुरं फिरकी त्रिकूट एकसाथ मैदानात उतरवणं संघाचा समतोल साधण्यासाठी अंमळ अडचणीचं ठरलं असतं, त्यामुळे पॅडीला मुंबई चमूतील आपली जागा कायम करण्यासाठी संघर्ष करावा लागला (संघर्षमय जीवन जगण्यातच त्यांची हयात गेली असं म्हटलं तर वावगं होणार नाही).
सत्तरच्या दशकात मात्र पॅडीचा दबदबा कायम राहिला. मुंबईचं रणजी स्पर्धेत वादातीत वर्चस्व होतं ६०च्या संपूर्ण दशकात. या दशकाच्या अखेरीस ६७-६८च्या मोसमात पॅडी मुंबईकडून प्रथमच रणजीच्या अंतिम फेरीत खेळला तो मद्रासविरुद्ध ब्रेबर्न स्टेडियमवर! अंतिम सामन्यात त्याने २८ + ६४ ृ ९२ षटकं टाकली (हल्ली संघाचा डाव ९० षटकाच्या आतच आटोपतो) आणि पाच विकेट्स काढल्या; परंतु स्टार खेळाडू मुंबई संघात परतल्यामुळे पॅडीला राखीव खेळाडूत बसावं लागलं, निदान फायनलसाठी तरी. पण १९७०-७१ सालात परिवर्तन घडलं. अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली जाणार्या वेस्ट इंडिज दौर्यासाठी भारताच्या १६ जणांच्या चमूत अजित वाडेकरसहित सुनील गावस्कर, अशोक मंकड, दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर या पाच मुंबईकरांची निवड झाली आणि सुधीर नाईकच्या मुंबई संघात रामनाथ पारकर, अजित नाईक, महेश संपत या नवोदितांची निवड झाली. भारतीय संघातील सोलकरच्या निवडीमुळे पॅडीचा मुंबई चमूतील प्रवेश सुकर झाला. पारकर, नाईक, पॅडी आणि मिलिंद रेगे या वरळी-प्रभादेवीकर चौकडीने या संधीचं सोनं करण्याची किमया करून दाखवली. अंतिम सामन्यात मुंब्ोईची गाठ पडली चंदू बोर्डे यांच्या तगड्या महाराष्ट्र संघाशी. सलग १२ वेळा रणजी करंडक आपल्याकडेच राखणार्या मुंबईला तेराव्यांदा रणजी करंडक आपल्याकडे राखता येणार नाही, असा महाराष्ट्राच्या पुणेकर पाठीराख्यांचा होरा होता कारण मुंबईचे पाच खंदे शिलेदार वेस्ट इंडिज दौर्यावर होते. चंदू बोर्डे, चेतन चौहान, मधु गुप्ते, हेमंत कानिटकर, अन्वर शेख, सदा मोहोळ, निकी सालढणा, विठ्ठल जोशी (चायनामन स्पेशालिस्ट) यांचा अनुभवी महाराष्ट्र संघ सुधीर नाईकच्या नौजवान खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला हरवणार आणि १९४०-४१ नंतर प्रथमच रणजी करंडक पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कचेरीत आणणार, असे आडाखे बांधले जात होते, पण ते सारे फोल ठरले. छोट्या चणीच्या रामनाथ पारकरने ३ बाद १२वरून अजित नाईकच्या साथीने शतकी भागी रचून मुंबईचा कोसळता डोलारा बर्यापैकी सावरला. सामना महाराष्ट्र संघाच्या बाजूने झुकतोय असं वाटत असताना पद्माकर शिवलकर, अतुल मेहता या नवव्या जोडीने ६८ धावांची मौलिक भागीदारी करून मुंबईला पावणेतीनशेचा टप्पा गाठून देताना प्रत्येकी ३७ धावा केल्या… ३७ ही पॅडीची कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या! चायनामन विठ्ठल जोशीची बळींची पाटी पहिल्या डावात कोरीच राहिली. मुंबईने मात्र महाराष्ट्राला २३० धावांत गुंडाळून पहिल्या डावात ५७ धावांची आघाडी घेतली. रामनाथ पारकरने चंदू बोर्डे यांचा अप्रतिम कॅच पकडला तो अजूनही माझ्या लक्षात आहे. आमची समस्त चाळकरी मित्रमंडळी ब्रेबर्नच्या नॉर्थ स्टॅन्डमधून मॅचचा आनंद लुटत होतो. अजित नाईकने पारकरकरवी बोर्डे (४८) यांचा अडसर दूर केल्यावर महाराष्ट्राचा डाव घसरला. शिवलकर यांनी विठ्ठल जोशीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल पकडून महाराष्ट्र संघाला २३०वर रोखलं, त्यांनी दोन बळी मिळवले. पहिल्या डावात ५७ धावांची आघाडी घेणार्या मुंबईला दुसर्या डावात १९६पर्यंतच मजल मारता आली.
विजय भोसले आणि डावखुरा महेश संपत यांची अर्धशतके तसेच मिलिंद रेगेच्या अनमोल ३३ धावांमुळे मुंबईने महाराष्ट्रसमोर विजयासाठी २५३चं आव्हान ठेवलं. पण अब्दुल इस्माईलने चेतन चौहान, मधू गुप्ते, स्वरूप काबाडी या तिघांना झटपट बाद केल्यावर पॅडीने सूत्रे हाती घेत कानिटकर-बोर्डे जोडी फोडून मुंबईला ब्रेकथ्रू मिळवून दिला… कर्णधार चंदू बोर्डे यांनी सारा अनुभव पणाला लावत डाव सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण पॅडीने बोर्डेसारखा किंमती मोहरा टिपला. मिलिंद रेगेने अफलातून झेल पकडून बोर्डे (५१) यांना माघारी पाठवलं आणि कर्णधार माघारी परतल्यामुळे महाराष्ट्राचा डाव २०५ धावांतच आटोपला. पॅडीचं गोलंदाजीचं पृथ:करण होतं २९.४-८-५६-६. अन् मुंबईने मोठ्या रुबाबात सलग १३व्यंदा रणजी करंडक आपल्याकडेच राखला. पॅडीची डावखुरी फिरकी तर घातक ठरलीच, पण शिवलकर- मेहता यांची ६८ धावांची भागीदारी अनमोल ठरली आणि पॅडीच्या रणजी कारकीर्दीला जबरदस्त चालना मिळाली. मुंबईचा हुकमी एक्का अशी त्याची ख्याती या सामन्यापासून देशभर पसरली. माझ्यासाठी हा सामना आणि मुंबईचे तेरावं विजेतेपद संस्मरणीय ठरलं. मुंबईच्या या विजयाची सुवर्णजयंती २०२१मध्ये झाली. आज मिलिंद रेगे आणि पद्माकर शिवलकर हे मुंबईच्या विजयाचे शिल्पकार आपल्यात नाहीत याचं वैषम्य वाटतं.
मुंबईकडून पॅडी शिवलकर आठ रणजी फायनल्स खेळले अन् त्यातील सर्वात संस्मरणीय फायनल म्हणजे मुंबई वि. मद्रास (आता तामिळनाडू) यांच्यातील चेपॉकच्या ऐतिहासिक स्टेडियमवरील सामना. मद्रासमध्ये एप्रिलच्या कडक उन्हात १८-२० एप्रिल १९७३ दरम्यान खेळला गेलेला रणजी करंडकाचा अंतिम सामना केवळ दोन दिवस आणि एक चेंडूत आटोपलेला ही रणजी स्पर्धेच्या इतिहासातील एक अविस्मरणीय अंतिम झुंज. या झुंजीचा निर्विवाद नायक आहे पद्माकर काशीनाथ शिवलकर! मुंबईकडे सुनील गावस्कर, रामनाथ पारकर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, अशोक मंकड, सुधीर नाईक, एकनाथ सोलकर असे तालेवार खेळाडू अन् त्यांना साथ देण्यासाठी पद्माकर शिवलकर, अब्दुल इस्माईल, छोट्या चणीचा दक्ष यष्टीरक्षक शरद हजारे, अजित नाईक आणि राकेश टंडन. यजमान मद्रासने मुंबईला सलग १५व्या रणजी जेतेपदापासून रोखण्यासाठी वेंकटराघवन आणि वामन कुमार या फिरकी जोडगोळीसाठी भिंगरी खेळपट्टी बनवली. जेणेकरून मुंबईचा डाव कोसळून यजमान बाजी मारतील असे हे सारे डावपेच आणि आडाखे. एप्रिलच्या घामटा काढणार्या रणरणत्या उन्हात मुंबईचे खेळाडू विनाशर्ट सराव करत असतानाची छायाचित्रं एका क्रीडासाप्ताहिकात प्रकाशित झाल्याचे आठवतेय. मुंबई विद्यापीठाच्या आमची युनिव्हर्सिटी परीक्षा सुरू होती. आमचा पेपर होता हिस्टरी ऑफ एशियन सिव्हिलायझेशन. पेपर दुपारी ३-६ या वेळेत आणि तिकडे रणजी फायनलचा मुंबई-मद्रास मुकाबला सुरू होता. रेडिओवर सामन्याचे धावते समालोचन ऐकण्यात मी दंग (पॉकेट ट्रांझिस्टर होता माझ्याकडे मुठीत मावणारा). टी टाइमची वेळ जवळ आलेली आणि मुंबईची अवस्था ५ बाद १०७. सगळे रथी-महारथी आऊट होऊन तंबूत परतलेले. सगळी कुमार-वेंकट यांच्या फिरकीची कमाल. जड अंत:करणाने पॉकेट ट्रांझिस्टर वर्गाबाहेर व्हरांड्यात ठेवून वर्गात येऊन बसलो. पर्यवेक्षकाने प्रश्नपत्रिका दिली. डोळयांसमोर अंधारी आल्यासारखं झालं. कारण मुंबईचा निम्मा संघ गारद. काहीच सुचेना. पाठच्या बेंचवरील स्टुडन्ट (कॉपी करण्यासाठी) लाथा मारून हैराण करतेय. अर्धा तास गेला. उत्तरपत्रिका ब्लँक. मनात विचार आला, हे वर्ष फुकट जाणार. पण थोड्या वेळाने सर्व काही आठवलं आणि कसाबसा पेपर पुरा करून वर्गाबाहेर पडलो. परीक्षा संपली, पण मनात विचार मुंबईचं काय झालं असेल याचाच. मुंबईचा संघ १५१ धावात गडगडला होता.
मद्रासचा डाव सुरू झाला. त्यांची बिनीची जोडी जेमतेम सहा धावांतच माघारी धाडण्यात मुंबईला यश लाभलं. पण मायकल दळवी आणि अब्दुल जब्बार यांनी टिचून खेळ करत मद्रासला अर्धशतकी मजल गाठून दिली. वाडेकरने पॅडी शिवलकर, एक्की सोलकरच्या फिरकीसाठी आक्रमक क्षेत्रव्यूह रचला. पॅडीच्या फिरकीच्या जाळ्यात मग मद्रासी फलंदाज अलगद टिपले गेले अन् २ बाद ६२वरून मद्रासचा सारा संघ ८० धावांतच कोलमडला. पाच जण तर खातं न खोलताच माघारी परतले. गावस्कर, वाडेकर, रामनाथ पारकर यांनी झेल पकडण्यात कुचराई केली नाही, शरद हजारेच्या सफाईदार यष्टीरक्षणाची साथ मिळाल्यामुळे पॅडीने मद्रास फलंदाजीचं वस्त्रहरण केलं. १७.५-१०-१६-८ हे त्याचं पृथ:करणच विलक्षण बोलकं आहे.
पहिल्या डावात मुंबईला ७१ धावांची घसघशीत आघाडी मिळाली, पण दुसर्या डावातही मुंबई संघ ११३पर्यंतच पोहचू शकला. पारकर (२३), सुधीर आणि अजित नाईक प्रत्येकी (२८), अशोक मंकड (१६) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. चष्मिष्ट कल्याणसुंदरमच्या हॅटट्रिकमुळे मुंबईचा डाव ११३वरच आटोपला आणि मद्रासला मुंबईच्या रणजीतील मक्तेदारीला शह देण्यासाठी चौथ्या डावात १८५ धावांचे आव्हान मिळालं. पण दुसर्या डावात मद्रासची पार दैना उडाली. पॅडी शिवलकर -एक्की सोलकर यांच्या फिरकीपुढे मद्रासचा डाव दुसर्या दिवसअखेर ९ बाद ६१ असा घसरला. डावखुर्या अब्दुल जब्बारने प्रतिकार करत २९ धावा केल्या, पण इतर दहा तामिळी फलंदाज झटपट तंबूत परतले; त्यापैकी चौघाना भोपळाही फोडता आला नाही. तिसर्या दिवशी शिवलकरचा केवळ एकच चेंडू पुरेसा ठरला त्याने १८ धावांत मद्रासचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता, तर बाकीच्या पाच जणाना सोलकरने माघारी धाडले… सुनील गावस्करने दुसर्या डावात चार झेल टिपले अन सामन्यात अर्धा डझन झेल पकडले. या सामन्यात १३ ‘भोपळेबहाद्दर’ होते, त्यात मद्रासचे आठ तर मुंबईचे पाच.. रणजी करंडकाच्या फायनलमध्ये पहिल्या दिवशी १२, दुसर्या दिवशी २७ आणि तिसर्या दिवशी एक विकेट पडली. चेपॉकची
ही आखाडा खेळपट्टी बनवण्यात आली होती वेंकट-कुमार या तामिळी फिरकी जोडगोळीसाठी; पण त्यांचे डावपेच बुमरँग झाले. पॅडी शिवलकर सामन्यात ३३-१८-३४-१३ हे विश्लेषण तर न विसरण्याजोगेच. एकहाती सामना फिरवण्याची जादू पॅडीच्या बोटात होती, त्याचं हे उत्तम उदाहरण. ‘दोन दिवस आणि एक चेंडू’ असंच या सामन्याचं वर्णन करता येईल. ही वॉज सिम्पली अनप्लेबल.
आपल्या प्रदीर्घ प्रथमश्रेणी क्रिकेट कारकीर्दीत शिवलकर यांनी १२४ सामन्यात ५८९ मोहरे टिपले ते १९.७४च्या माफक सरासरीने. रणजी स्पर्धेत त्यांच्या खतरनाक स्पेल्समुळे मुंबईने प्रतिस्पर्धी संघावर लिलया विजय मिळवले… इराणी चषकाच्या दहा सामन्यांत ५१ बळी मिळवले. आपल्या दोन तपांच्या कारकीर्दीत सामन्यात दहा अथवा अधिक बळी गारद करण्याचा पराक्रम त्यांनी तब्बल १३ वेळा केली! पॅडी शिवलकर, रमाकांत देसाई या दोन बुजुर्ग गोलंदाजानी प्रतिस्पर्धी संघांना नेस्तनाबूत केल्यामुळे शिवाजी पार्क जिमखान्याने अ गटातील विजेतेपद हासील केलं. या दोघांच्या प्रभावी मार्यासमोर नामचिन फलंदाजाची भंबेरी उडाल्याचे चित्र ६०/७०च्या दशकात वारंवार दिसून येत असे.
मुंबई क्रिकेटसाठी केवळ फिरकीपटूव्यतिरिक्त निवड समिती सदस्य, अध्यक्ष अशी भूमिका बजावणार्या शिवलकर यांनी राष्ट्रीय ज्युनियर निवड समितीचे अध्यक्षपदही भूषवलं ते १९९४-९५ मध्ये… शिवाजी पार्क जिमखाना अकॅडमीसाठी शिवलकर, प्रवीण अमरे, संदेश कवळे या तिघांनी मिळून बरेच परिश्रम घेतले यामुळे मुंबई क्रिकेटला बरेच गुणी खेळाडू गवसले.
२०१७मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पद्माकर शिवलकर, राजींदर गोएल यांचा बंगलोर येथे सी. के. नायडू पुरस्कार देऊन गौरव केला. २५ लाखांचा धनादेश, मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असतं. कारकीर्द संपल्यावर, पाऊणशे वयोमान झाल्यावर बीसीसीआयला हे सुचलं. पैसा मानमरातब यापेक्षा शिवलकर यांना उशिरा का होईना, कसोटी कॅप दिली असती तर त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं असतं. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वर्षानुवर्ष घाम गाळून विक्रमी कामगिरी करणार्या महान खेळाडूला कसोटी सामन्यापासून वंचित ठेवणं हे योग्य नाही. बीसीसीआयने इनाम देऊन त्यांना उपकृत केलं एवढंच.
शिवलकर गायकही होते, त्यांना गाण्याची आवड होती. शिवाजी पार्क जिमखान्यात त्यांच्या गाण्याचा कार्यक्रमही झाला. शांताराम नांदगांवकर यांनी लिहिलेलं ‘हा चेंडू दैवगतीचा फिरतसे असा, उसळून कोणाचे जीवन उधळी दे कुणास यश उधळून.’ या गाण्याची रेकॉर्ड निघाली ती फारशी गाजली नाही. गाता गळा असलेले शिवलकर ऑर्केस्ट्रामध्ये गात राहिले. सुयोग्य संधीचा चेंडू त्यांच्या बाजूने कधी वळलाच नाही. निवड समितीने तो विरुद्ध दिशेला वळवण्यातच कायम धन्यता मानली.