• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चहापन्हाची जंगल सफारी!

- ऋषिराज शेलार (गावच्या गोष्टी)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 15, 2025
in भाष्य
0

मोहंमद नरुद्दीन हुकलक तथा चहापन्हा नौरंगजेब खाजी भुलताण सवेरे सवेरे उठून बांग वगैरे देववून ताजेतवाने झालेले. प्रथम त्यांनी गरम पाण्यात एक किलोलीटर याप्रमाणे उंटीणीचं पवित्र मूत्र घालून युनानी पद्धतीचा काढा घशाखाली घातला. उंटाच्या लिदीने अंगाला लेपण करून छान स्नान उरकले. हमाममधून बाहेर येताच जनान्यामध्ये रोजच्या शिरस्त्याप्रमाणे पोशाख घेऊन खोजा उभा. तोच खानसामा धावत पळत तिथे येतो आणि तबकातील मुघल जामा हिसकावून घेतो.
‘बेमुर्वत, बेहया, बेडूक ये क्या कर रहे हो तुम?’ नरुद्दीन आवडीचा जामा परिधान करून उंडारायला निघणार तो जामा हिसकवला गेल्याने चिडतो.
‘माफ़ी असावी हुजूर! पण आपणांस आज वढजरा येथे शहजादे मिर्झा डंबाणी यांच्या येथील जंगली जानवरांच्या भेटीस जावयाचे आहे, त्यामुळे… ‘ खानसामा विनम्रतेने भुलताणला दिवसाच्या दिनक्रमाची आठवण करवून देतो.
‘या खुदा! आम्ही हे विसरलो कसे? शहजादे आम्हांस बोलावतात आणि आम्ही जावयाचे नाही? पण त्यासाठी नवा जामानिमा आणलाय की कसे?’ नरुद्दीनला उत्साहाचे भरते येते. आज केवळ उंडारायलाच जायचे नाही तर मिनी पिकनिक कम जंगल सफारी घडणार म्हटल्यावर आनंद होणारच ना?
‘हुजूर आजचा पेहराव हटके असणार आहे,’ खानसामा सांगतो.
‘क्या पर्शियन जामा, रोमन जवाहिर लाये हो? या खलीफा के…’ नरुद्दीन बेफाम उत्साहाने विचारतो.
खानसामा टाळ्या पिटतो. त्याबरोबर मुदपाकखान्यातून एक दासी लाजत मुरडत एक तबक घेऊन येते. ते चहापन्हा पुढे आणलं जातं. नरुद्दीन त्यावरील मलमलचं तलम कापड बघूनच हरखून जातो. अधाश्यासारखा पुढे होत घाईने ते कापड खेचतो तर काय? खाली दोराला लावलेला झाडपाला थोडक्यात वल्कले आहेत.
‘या परवरदिगार क्या लाये हो तुम यह? क्या हमें नागा अखाडे का साधु समज बैठे हो? जो नंगा घूमे?’ नरुद्दीन जवळपास किंचाळतो.
‘जी नहीं हुजूर! निसर्गात जावयाचे म्हणजे त्याच्याशी तादात्म्य पावलं, एकरूप झालं तर एक प्रकारची दिव्यानुभूती मिळते. त्यासाठीच शहजादे डंबाणी यांनी ही भेट प्रस्तावित केलीय आणि आपल्याला खास आमंत्रण दिलंय!’ खानसामा शांतचित्ताने माहिती देतो.
‘सुभानअल्लाह! बहोत खूब! हम और पूरी सल्तनत उनकी मेहमान नवाजी के लिए उनकी शुक्रगुजार हैं। लेकिन हम ये पत्ते नहीं पहन सकते!’ बोलता बोलता नरुद्दीन आधीच्या तबकावरील जामा उचलतो आणि परिधान करतो. काही दासी जवाहिर, मोती गुंफून बनवलेली शिरस्त्राण घेऊन येतात. त्यातील एक पसंत करून नरुद्दीन डोक्यात घालतो.
वेशभूषा, केशभूषा पार पडल्यावर नौरंगजेब तथा नरुद्दीनची स्वारी लवाजम्यासह महालाबाहेर येते. नरुद्दीन टाळी पिटतो. माहूत पळत पुढे येतो. कुर्निसात घालून उभा राहतो.
‘शंकरपाळ्या, छप्पन्नझुरळ्या हाथी किधर है? क्या तेरे कंधोपर हम सँवार हो जाए?’ अंमळ संतापाने नरुद्दीन बोलतो.
‘हुजूर! हाथी-घोड़े सब दीवानजी ने वढजरा भेज दिए है। यहाँ सिर्फ एक कुत्ता, एक बिल्ली और दीवार पर एक छिपकली इतनेही जानवर महलमें बाकी है।’ माहूत खालमानेने उत्तर देतो.
डोक्याला हात लावून नरुद्दीन मटकन खाली बसतो, ‘आता रे! आम्ही कसं जायचं? रोज रोज कागजपर साइन करके जीव शिनलाय हमारा!’
नरुद्दीनचा रडवेला चेहरा पहार्‍यावरच्या तुकडीला बघवत नाही. त्यातील एकजण धीर करून पुढे येतो, ‘चहापन्हा भुलताण! एक तोड आहे माझ्याकडे!’
‘बोल जल्दी! हमें तुरंत निकलना होगा!’ नरुद्दीन घाईने विचारतो.
‘माझ्याकडे एक खेचर आहे. खोगीर, लगाम लावल्यावर सेम घोडाच दिसतो. तो आणू का?’ तो विवक्षित शिपाई.
‘ला जल्द ला! गधा भी होगा तो भी चलेगा।’ नरुद्दीन अगदी घायकुतीला येतो. तसा तो शिपाई धावत जाऊन एक गबरु गाढव ओढत आणतो. त्याला झापडबंद करून लगाम, खोगीर वगैरे लावून तयार करतो. त्याबरोबर उतावीळ नरुद्दीन त्यावर मांड टाकतो आणि टाच देऊन वढजराच्या दिशेला निघतो.
पण हाय! गावच्या बाहेर उकिरडा बघताच गाढव लायकीवर येतं नि नरुद्दीनसह उकिरड्यावर लोळण घेतं. मागून येणारी सैन्याची शिबंदी घाईने नरुद्दीनला उचलून बाजूला करते. अंग झटकत नरुद्दीन बाजूस येतो.
‘कहाँ है वो वजीर? उसे हमने हुक्म दिया था। रस्त्याच्या दुतर्फा हिरवं शेडनेट लावण्याच्या! जिससे हमें कोई न देख पाए। और ऐसी आफत दुबारा न आए। इसीलिए..!’ नरुद्दीन डाफरतो. तशी ती तुकडी पुढे होत त्याला गाढवावर बसवून वढजर्‍याला धाडतात.
मजल दरमजल करत नरुद्दीन वढजर्‍याला पोहोचतो. तिथे शहजादे मिर्झा डंबाणी त्याचं तहेदिल से स्वागत करतो. नरुद्दीन उगाच त्याला मिठीत घेऊ बघतो. पण डंबाणीच्या आकारमानामुळे त्याचा हात आपरा येतो. तो नाद टाकत त्याला वाकून नमस्कार करतो. पण मागून कुणाचा अवचित धक्का लागल्याने नरुद्दीनचे हात थेट डंबाणीच्या पायाला लागतात. तशा टाळ्या पडतात. त्याने जरा खजील होत नरुद्दीन बाजूला उभा होतो.
‘चालावं चहापन्हा! पूर्ण जंगल आपल्याला बघायला एकवटलं आहे,’ डंबाणी हिरमुसलेल्या नरुद्दीनला आठव करून देतो.
‘पण आमचे रंगसाज आहेत कुठे?’ नरुद्दीनचा निराळा हट्ट!
‘रंगसाज?’ डंबाणी विचारता होतो.
‘हां हमारा पेंटींग बनाने वाले… ओ..!’ नरुद्दीन फुरफुरत्या नाकाने काही सांगू बघतो.
‘त्याची गरज पडणार नाही, हुजूर! खास गम्प दरबारी शोभतील असे निष्णात कॅमेरामन आलेत. तुम्ही फक्त प्राण्याला हात दावा,’ एक खास उडत्या तबकड्या घेतलेली तुकडी पुढे येते. चारी दिशांनी खटखट करत उजेड वाजू लागतो. तसा नरुद्दीन यात्रेत उनाडक्या करत फिरणार्‍या मुलासारखा फिरू लागतो.
प्रथम तो जातो, हत्तीणींच्या जलक्रीडेत मग्न कळपाकडे. नरुद्दीन चारदोन कॅमेर्‍यासह येतोय बघून एक हत्तीण कपाळावर आठ्या आणत संताप व्यक्त करतेच, ‘मुडदा मेला, लाज कोळून प्याला! बायाबापड्यांना आंघुळ बी करून देयचा नाही. अशे कोणी फोटू काढीत असतं का?’ चित्कारत ती सोंडेने नरुद्दीनवर पाणी उडवते. डंबाणीची टीम लागलीच ‘हाथीने नरुद्दीन हुकलक को करवाया जलाभिषेक!’
टॅगने स्टोरी बनवते. ते बघून हत्तीण कपाळावर सोंड मारून घेते.
पुढे त्याला मोकळ्यात चिपांझी दिसतो. बिचारा! कितीवेळ डोकं खाजवत बघतो. आपल्याइतकंच वानरवंशीय बेढब जनावर दुसरं आहे तर…? ह्या विचारानेच त्याला टेन्शन येतं! उद्या इथे येणार्‍या पब्लिकने माझी केळी ह्या नरुद्दीनलाच दिली तर…? ते ‘चिपांझी संकट में हैं!’चा नारा देत बाकीच्या चिपांझी समुदायाला एकजूट करायला पळतं.
पुढे त्याला ओरांग उटाण दिसतो. त्याला बघून नरुद्दीन दुरूनच उडी मारून दाखवतो, तसा ओरांग चकित होऊन बघतो. शेपटीने फांदीला पीळ देत तो झाडावर लोंबकळून नरुद्दीनकडे एकवार बघतो. पण त्याच्या येण्याच्या भीतीने झाडावर जाऊन बसतो. नरुद्दीन त्याला हात दाखवून पुढे निघतो.
माना वर करून झेब्रा कळपाच्या दिशेने येणार्‍या नरुद्दीनला बघून कळपाला सावध करतो, ‘मिट्रो, यह खतरा दुगना बढ गया है! ये नरुद्दीन आएगा तो हमारे पास लेकिन हम में से किसी एक को खरीद कर हममें ही फूट डाल देगा! इससे सावधान रहिए।…’ त्याच्या बोलण्यानं झेब्रा कळप सावध होऊन दूर जातो. नरुद्दीन केवळ हात हलवत उभा राहतो.
कुठलाही प्राणी जवळ येत नाही हे बघून नरुद्दीन झर्‍याच्या काठी जाऊन बसतो. झर्‍यात असलेल्या मगरीचं अवचित लक्ष त्याच्याकडे जातं. तशी ती काठावर जाऊ बघणार्‍या पिलाची शेपूट खेचत बोलते, ‘ए बावळट! वर बघ वर! आपल्या स्टोर्‍या रचून विकणारा सोंगाड्या आलाय. चुकून तू वर गेलास तर तो त्यावर पण एक पोवाडा रचून भाटांना गायला सांगेल. आपल्या कुळाची चेष्टा लावलीय येड्यानं!’ तिच्या दरडावण्यानं पिलू आत पाण्यात जातं. कुणीच आपल्याशी का बोलत नाही? ह्या चिंतेने नरुद्दीन मगरीचे अश्रू ढाळू लागतो. पण कुणीही लक्ष देत नाही हे बघून प्राणी महालाच्या आत जातो. तावदानाला खेटून बसतो. तो एक सिंहीण तावातावाने डरकाळ्या फोडत येते. ‘ये वेड्या! त्या काचांवर पडदे ओढ! डोळ्यांवर काच चमकते ना? सकाळपासून आमच्या हेंची कटकट! त्यात काच चमकून डोकं उठलंय पार! घे तो पडदा!’ म्हणत ती काच पंज्याने फोडू बघते.
अगदी अगदी कुणीच बोलत नाही आणि सल्तनतचा चहापन्हा असल्याची यादही कुणी ठेवत नाही! जा बाबा! डंबाणीनं काय घोर अपमान केलाय हा? त्याला जाब विचारण्यासाठी नरुद्दीन घाईने निघतो. पण ह्या जानवर महालात ते जनावर मिळणार कुठे?
डोकं खाजवत तो एक दार उघडतो, तर तिथे ऑपरेशन चालू असल्याचं दिसतं. भूल दिलेली असूनही खाटेवरला विव्हळणारा जीव मोठ्याने ओरडतो. ‘याला बाहेर काढा. मी मेलो तरी बेहत्तर! पण हे बेणं आत राहिलं तर उद्या माझ्या ऑपरेशनचं क्रेडिट हे ढापिल. वर अख्ख्या जनावर क्लबमध्ये माझ्यावर छी:थू होईल. बघा, याची नाटकं त्या सोंगाड्याने ठीक केली म्हणून! हाकला याला!’
अखेर सगळ्याच प्राण्यांकडून अवहेलना झाल्यावर नरुद्दीन द थ्रेट बाकड्यावर बसून डंबाणीला निरोपाचा फोन लावू बघतो. तोच भिंतीवर लोंबकळणार्‍या सफेद सापाचं त्याच्याकडे लक्ष जातं! तो तशाच अवस्थेत त्याला मुजरा घालतो. ‘चहापन्हा, तुमच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. फक्त मला एकच जाणून घ्यायचं आहे, माझ्या दातांपेक्षा तुमच्या जिभेत इतकं जहर कसं?’

Previous Post

तामीळींसारखा भाषाभिमान महाराष्ट्र कधी दाखवणार?

Next Post

संधीचा चेंडू त्यांच्या दिशेने वळलाच नाही…

Next Post

संधीचा चेंडू त्यांच्या दिशेने वळलाच नाही...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.