सर्वात कठीण मानल्या जाणार्या वज्र या शस्त्राची सुई किती टोकदार आणि अभेद्य असेल, तिककाच टोकदार ब्राह्मणी वर्चस्वाचा विरोध करणारं आचार्य अश्वघोषांचा वज्रसूची हा ग्रंथ जवळपास दोन हजार वर्षांनी प्रबोधनकारांपर्यंत पोचला होता. प्रबोधनकारांनी त्याचा मराठीत अनुवाद करताना या सुईचं टोक आणखी धारदार केलं. त्या अनुवादाचा हा संपादित भाग प्रबोधनकारांच्या शब्दांत.
– – –
जगद्गुरू जो मंजुघोष त्याचें कायावाचामनें स्तवन मी त्याचा शिष्य अश्वघोष शास्त्रांच्या आधारानें वज्रसूची नामक ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करितो. ज्यांत धर्म आणि अर्थ सांगितलेला आहे ते तुमचे वेद आणि स्मृत्या या चांगल्या व विश्वसनीय आहेत. त्यांत जेथें जेथें मतमतांतराचा झगडा असेल तेवढा भाग त्याज्य व अविश्वसनीय आहे, असें प्रथमत: खुशाल गृहीत धरून चाला. तरीसुद्धां चतुर्जातींत ब्राह्मण काय तो श्रेष्ठ, हें विधान त्या ग्रंथांवरून मुळींच सिद्ध होत नाहीं.
मला प्रथम हें सांगा कीं ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे तें काय? काय जीव म्हणजे ब्राह्मण्य, कां जात जन्म कुल देह ज्ञान आचार कर्म किंवा वेदज्ञान म्हणजे ब्राह्मण्य? जीव (जीवित) हेंच ब्राह्मण्य, असें जर तुमचें विधान असेल, तर त्या विधानाला वेदात तर कोठंच कांहीं आधार नाहीं. कारण वेदात स्पष्ट म्हटलें आहे कीं सूर्य चंद्र इंद्रादि देवता प्रथम ‘पशु’ होत्या; दुसर्या काहीं देवता प्रथम पशूच होत्या, नंतर त्या देव बनल्या, अहो फार काय पण, नीचापेक्षां नीच असे जे श्वपाक (कुत्र्याचें मांस खाणारे) ते सुद्धां देव झाले. या पुराव्यावरून जीव किंवा जीवित म्हणजे ब्राह्मण्य नव्हें, हें स्पष्ट सिद्ध होतें. तेंच तत्व आणखी महाभारतातील पुराव्यानेंहि अधिक स्पष्ट होतें. त्यांत एके ठिकाणी लिहिलें आहे की कालींजल टेकडीवरील सात शिकारी व दहा हरीण, मानस सरोवरावरील एक बदक (राजहंस), शरद्वीपांतील एक चक्खाक, हे सर्व कुरुक्षेत्रांत ब्राह्मण असे जन्माला आले आणि वेदविद्यापारंगत झाले. मनू देखील आपल्या धर्मशास्त्रांत(!) असें म्हणतो कीं, चतुर्वेद व त्यांचीं आंगे व उपांगे यांत प्रवीण असलेला जो कोणी ब्राह्मण शूद्रापासून दक्षिणा किंवा इतर दोन घेईल, त्याला १२ जन्म गाढवाचे, ६ जन्म डुकराचे आणि ७० जन्म कुत्र्याचे येतील. यावरून हे उघडच होत आहे कीं, जीवित हे कांहीं ब्राह्मण्य नव्हे अगर ब्राह्मण्याचा पुरावाहि नव्हे; नाहींतर हे असले विचित्र प्रकार का घडते?
आतां, तुमचें असे म्हणणे असेल की ब्राह्मण्य हे आईबापावर, जन्मावर किंवा जातीवर अवलंबून आहे. म्हणजे ब्राह्मण व्हायला ब्राह्मण आईबापांच्या पोटींच जन्म घेतला पाहिजे; तर स्मृतीमधील एका सर्वप्रसिद्ध श्लोकानें या तुमच्या म्हणण्याचा पोकळपणा तेव्हांच उघड होत आहे. या श्लोकांत म्हटलें आहे कीं, अचल मुनीचा जन्म हत्तीच्या पोटीं, केशपिंगलाचा घुबडाच्या पोटीं, अगस्ति मुनीचा अगस्त्याच्या फुलापोटी, कौशिक मुनीचा गवताच्या पोटी, कपिलाचा माकडाच्या पोटी, गौतम मुनीचा शालतरूवरील वेलीच्या पोटीं, द्रोणाचार्यांचा मडक्याचा पोटी, तैत्तिरी ऋषीचा कबुतराच्या पोटी, व्यास मुनीचा कोळणीच्या पोटी, कौशिकाचा शूद्रिणीच्या पोटीं, विश्वामित्राचा चांडाळणीच्या आणि वसिष्ठाचा जन्म वेश्येचा पोटीं; असे हे जन्म झालेले प्रसिद्ध आहेत. यांपैकी एकाचाही बाप अथवा आई ब्राह्मण नव्हती. तथापि या सर्व मंडळींना तुम्हीं ब्राह्मण्याच्या सदरांत ढकलून दिलें; यावरून असा निष्कर्ष निघतो कीं ब्राह्मण्य हे आईबाप, अगर ग्रंथातले आधार यावर अवलंबून नसून तें लोकमान्य उत्पत्तीचें एक चिन्ह आहे. यावर अजूनही तुमचें असें म्हणणें असेल कीं, ज्याचे आईबाप दोघे ब्राह्मण तो ब्राह्मण, तर मग (या व्याख्येप्रमाणे) शूद्राचें पोरसुद्धां ब्राह्मण होण्याचा संभव आहे. कसें तें स्पष्ट सांगायला माझी ना नाहीं; पण त्यामुळे तुम्हीं मात्र नाके फेंदारूं नका.
ब्राह्मण आईबापाच्या पोटीं जन्मलेला तो ब्राह्मण असेंच तुमचें म्हणणें ना? येथे एक मोठी शंका आहे. ‘ब्राह्मण आईबाप’ म्हणतांना अगदीं गाळीव शुद्ध आणि खरे खुरे ब्राह्मण आईबाप असाच तुम्ही अर्थ घेतां ना? मग महाराज, या व्याख्येप्रमाणें ब्राह्मणी अवलाद कधींच संपुष्टात आलेली आहे, हें नीट लक्षात ठेवा. ब्राह्मणांच्या बापजाद्यांचा इतिहास पाहिला तर त्यांच्या पत्न्यांनीं कुविचारानें शूद्रांशी व्यभिचार केल्याचा जो दाट संशय अस्तित्वात आहे, त्या संशयाच्या तडाख्यातून एकसुद्धां ब्राह्मण वंश सुटणार नाहीं. अर्थात् खरा बाप जर शूद्र तर नुसती आई ब्राह्मण आहे, एवढ्याच सबबीवर त्या पोराला ब्राह्मण म्हणतां येईल काय? मुळींच नाहीं. यावरून मी असे विधान काढतों कीं ब्राह्मण्य हें काहीं जन्मावर अवलंबून नसतें. या विधानाला मानव धर्मग्रंथाचाहि आधार आहे. तो ग्रंथ म्हणतो कीं जो ब्राह्मण मांस खाईल तो तात्काळ ब्राह्मण्यापासून च्युत होतो; जो ब्राह्मण मेण, मीठ व दूध विकतो तो तीन दिवसांत शूद्र होतो. या सर्व विवेचनावरून जन्माचा आणि ब्राह्मण्याचा काडीमात्र संबंध नाहीं, असें नाहीं कां तुम्हाला वाटत? ब्राह्मण्य जर जन्मावरच निश्चित होणारें असतें, तर तें नीच प्रकारच्या कर्माने एकाकीं पतित व भ्रष्ट कां होत होतें? आकाशांत उडणारा घोडा पृथ्वीवर उतरतांच एकदम डुक्कर बनल्याची कथा तुम्ही कधी ऐकिली आहे का? अशक्य?
बरें, ज्ञानामुळें ब्राह्मण होतो, अशी तुमची आतां जबानी आहे का? ही तर अगदींच चुकीची आहे. का? कारण ही विचारसरणी जर खरी धरली तर ज्ञानप्राप्तीच्या जोरावर पुष्कळ शूद्रसुद्धां ब्राह्मण होऊं शकतील. चतुर्वेद, व्युप्तत्तिशास्त्र, मीमांसा, सांख्य, वैशेषिक व ज्योतिष तत्वज्ञानांतले पंडिताग्रणी झालेले पुष्कळ शूद्र माझ्या माहितीचे आहेत; परंतु त्यांपैकी एकालाहि कधीं कोणी ब्राह्मण म्हटलेलें नाहीं. यावरून ब्राह्मण्य हें ज्ञानावर अवलंबून आहे, असे मुळींच सिद्ध होत नाहीं. आचारानें ब्राह्मण्य सिद्ध होतें, असें तुमचें म्हणणे आहे काय? हें विधान तर सपशेल खोटें आहे. कारण तें जर खरें असते, तर पुष्कळ शूद्र ब्राह्मण बनले असते. कर्मांवरून ब्राह्मण होतो असें तुम्ही म्हणतां काय? मी म्हणतो मुळींच नाही. वेदपठण केल्यानें एखादा मनुष्य ब्राह्मण बनतो, अशी आपली समजूत आहे काय? असेल तर ती अजिबात खोटी आहे. ऋक्, यजुस्, साम आणि अथर्व या चारी वेदांत रावण राक्षस पारंगत होतो, हें तर प्रसिद्धच आहे; आणि रावणाच्या वेळीं यच्चावत् सर्व राक्षस वेदाभ्यास करीत असत. परंतु त्यामुळें एखादा राक्षस ब्राह्मण झाला असें काहीं तुम्ही म्हणत नाहीं.
तर मग ब्राह्मण ब्राह्मण म्हणतात तो प्राणीं तरी कोण आहे? वेदपठण, संस्कार, आईबाप, कुल, कर्म यापैकी एकाच्याहि योगानें जर ब्राह्मण्य प्राप्त होत नाहीं, तर मग होतें तरी कशानें? मला असे वाटतें की, कुंदफुलांच्या बर्फवत् शुभ्र वर्णाप्रमाणें ब्राह्मण्य हा एक निष्कलंक गुण आहे. ज्याच्या योगानें पाप नष्ट होतें तें ब्राह्मण्य. त्यांत व्रत, तप, नियम, उपवास, दान, दम, शम आणि संयम इत्यादिकांचा अन्तर्भाव होतो. जो मनुष्य अविवेक अहंकार, संग, परिग्रह, राग आणि द्वेष यांपासून पूर्ण निवृत्त असतो तोच ब्राह्मण, असें वेदांत म्हटलेले आहे. शिवाय सर्व शास्त्रांतहि असे लिहिलें आहे कीं, सत्य, तप, इंद्रियनिग्रह आणि दया, हीं ज्याच्या ठिकाणी आढळतील तो ब्राह्मण; या सद्गुणांच्या विरुद्ध दुर्गुणांचा मनुष्य चांडाळ समजावा. ब्राह्मण्यांचें दुसरें लक्षण म्हणजे त्याचा जन्म, देव, किंवा पशु कोटींतून का होईना, त्याने अविवेकी स्त्रीसंभोगापासून अलिप्त असले पाहिजे. शुक्राचार्य याच्याहि पुढे जाऊन सांगतात कीं देवांना जातीची पर्वा नसते, अधमाधम गणलेल्या जातींत जन्म घेतलेल्या सज्जनाला ते ब्राह्मणच समजतात. या सर्वांवरून मी असा निष्कर्ष काढतो कीं जन्म, जीवित, शरीर मानव, ज्ञान, धर्माचार परिपालन, किंवा कर्म यांचा ब्राह्मण बनविण्याच्या कामी कवडीचाहि उपयोग होत नाही.
आणखी ऐका. मनूकृत धर्मशास्त्रांत असें सांगितलें आहे कीं ज्यानें शूद्रिणीचें स्तनपान केलें आहे, शूद्रणीनें ज्यावर नुसता आपला सुस्कारा टाकला असेल किंवा ज्याची आईच शुद्रीण असेल अशा ब्राह्मणब्रुवाला प्रायश्चित्तानेंसुद्धां ब्राह्मण जातींत परत येतां येत नाहीं. मानवधर्मशास्त्रांतल्या या असल्या दण्डकांचा विचार केला की ब्राह्मण्य म्हणजे एकाद्या ठरावीक जातीची अगर अवलादीची कधींच नष्ट न होणारी, अविनाश्य अमरपट्ट्याची निशाणी नव्हे; तर तें केवळ सद्गुणी जनाचें एक लक्षण आहे, असें स्पष्ट दिसतें. मनूच्या शास्त्रांत असेहि सांगितलें आहे कीं पुण्यशील आचरणाच्या जोरावर शेंकडों शूद्रांनी ब्राह्मण्य पटकविलें.
आत्मदमन करतो तो यति, तपश्चर्या करतो तो तपस्वी आणि ब्रह्मचर्य पाळतो तो ब्राह्मण, या व्याख्या सर्वश्रुतच आहेत. ज्याचा आयुष्यक्रम निष्कलंक आहे, ज्याची स्वभावप्रवृत्ति सदा आनंदी आहे, तोच खरा ब्राह्मण; कुळाचा यांत काहीहि संबंध नाहीं, हे स्पष्ट होत नाहीं काय? शुद्ध व सात्विक चारित्र्य हेंच सर्वांत श्रेष्ठ. केवळ वंशपरंपरा आदरास पात्र नाहीं, वंश मोठ्या राजाचा असला आणि सद्गुणांची वाण असली, तर तो सुद्धां निरूपयोगी व तिरस्करणीयच होय. अशा अर्थाचे पुष्कळ श्लोक मानवधर्मांत आहेत. या विवेचनावरून ब्राह्मण म्हणजे एकाद्या ठरावीक जातींत जन्माला आलेला प्राणी, हें विधान फोलकट आणि खोटें आहे.
ब्राह्मण (ब्रह्मदेवाला) तोंडांतून, क्षत्रिय बाहूपासून, वैश्य मांड्यांतून आणि शूद्र पायांतून निर्माण झाले, हें तुमचे विधानहि निराधार व फोलकट आहे. चार जातींच्या कल्पनेचें मतच मुळीं खोटें आणि खोडसाळ आहे. सगळ्या मनुष्यांची जात एक. सर्व माणसे एका ब्रह्मापासून निर्माण झालीं? मोठाच चमत्कार म्हणायचा! मग त्यांच्यांत या भिन्नभिन्न. एकमेकांशी फटकलेल्या चार कोंड्या कशा निर्माण झाल्या हो? माझ्यापासून माझ्या बायकोला चार मुलगे झाले, तर एकाच आईबापाचीं मुलें म्हणून तीं तत्वतः एकाच जातीची असली पाहिजेत, हे उघड आहे. प्राणीमात्रांच्या निरनिराळ्या जातींची भिन्नता, त्यांच्या शारीरिक इंद्रियादि रचनेच्या भिन्नतेवरून तेव्हांच समजतें, हे तुम्ही जाणतच आहांत. घोड्याचा पाय हत्तीच्या पायासारखा नसतो. वाघाची तंगडी आणि हरणाची तंगडी एकसारखी नसते. अगदीं निराळी असते. इतर सर्व प्राण्यांत हे शारीरिक व इंद्रीयविषयक भेद पुष्कळच आहेत. आणि भेदांच्या चिकित्सेवरून आपणास चटकन उमजतें कीं हे काहीं एकाच जातीचे प्राणी नव्हते. पण क्षत्रियाचा पाय ब्राह्मणाच्या पायापेक्षां किंवा क्षूद्राच्या तंगडीपेक्षां निराळा असतो. असें मात्र कोठें ऐकलें नाहीं किंवा पाहिलेहि नाहीं. सर्व माणसें एकसारखी एकजिनशी अवयवांचीच असतात अर्थात् ती सर्व एकाच जातीची असली पाहिजेत, हे उघड आहे.
चिकित्सेच्या याच तत्वांशीं ताडून पाहिला तर ब्राह्मण हा कांहीं क्षत्रियापेक्षां भिन्न दिसत नाहीं. अगदी एकाच खाणींतला एकाच जातीचा असतो. पण ब्राह्मण क्षत्रियादि माणसें मांस, त्वचा, रक्त, हाडें, आकार, मलमूत्र आणि जननपद्धति यांत कांहीं भिन्न दिसत नाहींत. सर्वांचें सर्व सारखेंच असतें. यावरून हें स्पष्ट सिद्धच होतें कीं ते एकाच जातीचे आहेत. बरें असें तरी म्हणतां का कीं ब्राह्मणाच्या सुखदु:खाच्या भावना क्षत्रियांच्या भावनांपेक्षां काहीं निराळ्या असतात? एक ज्या रीतीनें जगतो व ज्या कारणांनी मरतो. तीच रीत व कारणें दुसर्याला असतात कीं नाहीं? बौद्धिक सामर्थ्य, कर्मे किंवा त्या कर्मांचे उद्देश यांत कांहीं फरक असतो काय? त्यांची जन्मण्याची पद्धति आणि त्यांच्या आशा व भीतीचीं कारणें भिन्न असतात काय? तीळमात्र नाहीं. यावरून ते सर्व एकच असले पाहिजेत खास, हें निर्विवाद सिद्ध होते. औदुंबराच्या आणि फणसाच्या झाडाला फांद्या, खोड, सांधे, मूळ सर्व ठिकाण फळें बाजतात. पण फांदीवरचे फळ खोडावरच्या किंवा मुळांतल्या फळापेक्षां निराळें असतें कीं काय? फांदीच्या टोकाला उंबर आलें म्हणून तें ब्राह्मण उंबर आणि पायथ्याशीं मुळाला बाजलें म्हणून तर शूद्र उंबर म्हणणार? मुळींच नाहीं. तद्वतच एकाच शरीराच्या चार निरनिराळ्या भागापासून उत्पन्न झालेली माणसेंहि चार भिन्न वर्गाची कशी असू शकतील?
तुम्ही म्हणतां ब्राह्मण (ब्रह्मदेवांच्या) तोंडांतून उत्पन्न झाला. ठीक आहे. बरें, ब्राह्मणी कोठून पैदा झाली? तेथूनच? ब्राह्मणाप्रमाणे तोंडांतूनच ना? मग काय भाऊ-बहिणींच्या लग्नाचाच हा प्रसंग! खासा रोजगार! अशा तर्हेचा अगम्यगमनाचा व्यवहार जगांत राजरोस सुरू झाला की पापपुण्याच्या कल्पनांवर बोळाच फिरवला पाहिजे. ब्राह्मण तोंडांतून उत्पन्न झाला असें म्हणतांच वरील आपत्ति दत्त पुढे उभी राहते. तुमचे विधान अक्षरश: चूक आहे हेच याचें प्रत्यंतर. भिन्न भिन्न आचरण आणि व्यवसाय यामुळेंच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांच्यांत भिन्नता दिसते.
हेच वैशंपायन–युधिष्ठिर संवादावरून सिद्ध होत आहे. एके दिवशीं पंडुराजाचा मुलगा तत्कालीन विद्वानाग्रणि युधिष्ठिर यानें आदरपूर्वक हात जोडून वैशंपायन ऋषींना ‘आपण ब्राम्हण कोणाला म्हणता आणि ब्राह्मण्याच्या खुणा काय’ असें विचारलें. त्यावर वैशंपायनानें उत्तर दिलें कीं, `ब्राह्मणाची पहिली खूण म्हणजे तो फार सोशीक आणि सद्गुणी असतो. कुकर्म आणि अत्याचार त्याच्या हातून कधीं घडत नाहींत. तो मांसाहारी नसतो आणि सजीव प्राण्याला तो दुखवीत नाहीं. दुसरी खूण म्हणजे तो दुसर्याची रस्त्यावर सांपडलेली वस्तूसुद्धां मालकाच्या परवानगीवांचून केव्हांहि घेत नाहीं. तिसरी खूण म्हटली म्हणजे तो सर्व ऐहिक विकारांचे आणि आकांक्षांचे दमन करतो. लौकिक हितअहिताबद्दल तो पूर्ण विरक्त असतो. चवथी, त्याचा जन्म मनुष्यांत होवो, देवादिकांत होवो अगर पशुमध्ये होवो, तो मैथुनादि विकारांना बळी पडत नाही, पांचवी, सत्य, दया, इन्द्रियदमन, परोपकार आणि तपाचरण हे शुद्ध गुण त्याच्या ठायी असतात. ब्राह्मण्याचे हे पांच गुण ज्याच्या ठायीं असतात. त्याला मी ब्राह्मण समजतो आणि ज्याच्या दायीं त्यांचा अभाव तो शूद्र. कुळावर, जन्मावर अगर विशिष्ट क्रियाकर्मांवर ब्राह्मण्य अवलंबून नसते. वर सांगितलेलं पांच गुण एखाद्या चांडाळाच्या ठायीं असले तर तोही ब्राह्मण होतो, हे युधिष्ठिर राजा, पूर्वी आपल्या भूलोकावर फक्त एकच जात होती. पुढे आचार आणि धंदे यांच्या भिन्नत्वांमुळे चातुवर्ण्याची उत्पत्ति झाली. सर्व मानवांची उत्पत्ती स्त्रीपासून एकाच पद्धतीने होत असते. सर्वांच्या शारिरीक गरजा सारख्याच असतात. अंतरेन्द्रिये आणि बहिरोन्द्रियेहि सर्वांना सारखीच असतात. परंतु ज्याची वागणूक सर्रास चांगली असते तो ब्राह्मण आणि वाईट असते तो शूद्र नव्हे, त्याहूनहि अगदी नीच. उलटपक्षी जो शूद्र या गुणांनी युक्त असतो तो ब्राह्मण होय. `ही वैशंपायन ऋषींची वाक्यें आहेत.
हे मित्रा, अज्ञानांत लोळणार्या ब्राह्मणादि लोकांनी यांचा नीट अभ्यास करून शहाणे व्हावें आणि सन्मार्गाला लागावें, एवढ्याच करिता मी हे प्रवचन केले आहे. त्यांना पटले तर त्याकडे ते लक्ष पुरवितील, परंतु न पटून तिकडे कोणी दुर्लक्ष केलें तरी आम्हाला त्याचा विधिनिषेध नाहीं.