गेल्या उन्हाळ्यातली गोष्ट. तसं पाहिलं तर यंदा अधूनमधून आलेल्या पावसाने फार काही उन्हाळा जाणवला नाही म्हणा. तरी मार्च-एप्रिलमध्ये वातावरण थोडं वेगळं होतं. अशाच एका दुपारी, चहा करायला नेहमीपेक्षा उशीर झाला नी दूध तापवायला गेलो तर ते फाटलं. सकाळी एक लिटर तापवलेल्या दुधातलं जेमतेम कप दोन कप दूध वापरलं असेल, राहिलेलं बरंच होतं की. एकदम ओतून द्यायलाही सवयीनुसार जमेना! मग पटकन लहानपणीचा हमखास उपाय आठवला आणि अजून एक कप्पा उलगडला की मनातल्या भांडाराचा. पूर्वी प्रâीज नसताना बरेचदा काही ना काही कारणाने दूध फाटायचे आणि वारंवार बनायचा घरगुती कलाकंद. मुद्दाम दूध फाडून वगैरे करायचा हा प्रकार असू शकतो किंवा मिठाईच्या दुकानात कलाकंद मिळतो हे तेव्हा नवल होते. कालांतराने घरच्या कलाकंदाचे प्रमाण घटले, मात्र दुकानांत साध्या कलाकंदाबरोबर नानाविध चवी, रंगांचेपण कलाकंद दिसायला लागले. चॉकलेटच्या, आंब्याच्या व इतर अनेक स्वादांतील कलाकंद बर्फीने अनेकांची अनेकदा तोंड गोड केली असतील नाही का?
मला आजवर सर्वात जास्त आवडलेला कलाकंद विचाराल तर अमळनेरचा! पांढरा शुभ्र, विनाकारण सुक्यामेव्याचा मारा नसलेला व सुयोग्य गोडीचा, मुलायम, तोंडात पडताक्षणी विरघळणारा तो कलाकंद विलक्षण असतो!!
कृती बघायला गेलो तर झटपट कलाकंदाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पनीर, खवा, मिल्कमेड एवढंच काय दुधाच्या भुकटीपासूनही कलाकंद बनवायच्या विविध पाककृती सापडतात. मात्र मूळ किंवा पारंपरिक पाककृतीने बनविलेल्या कलाकंदाची मजाच निराळी. एक लिटर पूर्ण स्निग्धांश असलेलं म्हशीचं दाट दूध तापवायला ठेवायचं. पहिली उकळी आली की आच कमी करून दुधात लिंबाचा रस मिसळायला सुरुवात करायची. साधारण दीड ते दोन चमचे रसाने फाटतं दूध. त्यातलं पाणी वेगळं करून राहिलेला चोथा थंड पाण्याने दोन-तीनदा स्वच्छ धुवायचा, लिंबाची आंबट चव निघून जायला हवी. मग तो चोथा साधारण अर्धा पाऊण तास मलमलच्या स्वच्छ कापडात बांधून त्यातलं पाणी निघून जाऊ द्यायचं. तोवर जाड बुडाच्या पसरट कढईत आधीसारखंच घट्ट दूध घेऊन आटवायला ठेवायचं. दूध नेहमी मोठ्या आचेवर आटवायचं मंडळी, नाहीतर रंग पालटतो. आटून दूध साधारण अर्धं झालं की त्यात आधी बनवलेलं पनीर नीट कुस्करून मिसळायचं. सगळं छान मिळून यायला सुरुवात झाली की त्यात साधारण एक वाटी साखर आवडीनुसार वेलदोड्याची पूड किंवा इसेन्स टाकायचा. मिश्रण घट्ट झालं की वड्या थापायच्या. छान गार झालं की वड्या कापता येतात. अर्थात तशा मऊसरच असतात या वड्या!! पण चव व पोत… अहाहा… निव्वळ सुख!!
मूळ एकच असलेल्या दुधाच्या दोन निरनिराळ्या प्रक्रिया करून बनलेला मऊ मुलायम बर्फीचा हा प्रकार दोन भिन्न गोष्टी, दृष्टिकोन किंवा मतं सहज एकत्र राहू शकतात हे तर शिकवतोच, पण मुळात आपण सगळे एकाच स्त्रोतातून निर्मिलेलो आहोत याची जाणीव ठेवण्याची संधी पण देतो. फाटलेल्या दुधासारखेच कधीतरी आपले किंवा आजुबाजूच्यांचे विचार विस्कटू शकतात, एकसंधतेबरोबरच सारासाराचे पाणी वेगळे होते, पण दुसर्या आटवलेल्या, परिस्थितीचे जास्त चटके खालेल्यांनी जर साथ दिली नं, तर खरोखर आयुष्याची गोड घडी पुन्हा बसते, या कलाकंदाच्या वडीसारखीच.
अडचणी, प्रारब्धभोग कोणालाच चुकले नाहीयेत, पण सुपातल्यांनी जात्यातल्याला हिणवू नये म्हणतात ना तसे आहे, दैवगतीपुढे पर्याय नसतो. मात्र आपल्याकडे सर्वार्थाने सुबत्ता असताना त्याचा वापर इतरांसाठी करण्याची सुबुद्धी वापरली ना तर आपल्याही वेळी आपोआप दैव साथ देतेच की. अगदी हिशोब केल्यासारखी आधीचीच व्यक्ती सामोरी येईल असे नाही पण कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीचा हात मिळतो हे निश्चित.
माणूसपणाच्या या वाटचालीला समृद्ध करणारी अनेक उदाहरणं बघायला मिळतात. परिस्थितीने भरकटलेल्यांना, गांजलेल्यांना सामावून घेणारी, मनात दयेचा, करुणेचा सागर असणारी माझी माय सारदाई सुद्धा त्यातलीच एक की. लहानपणी दुष्काळग्रस्तांना गरम खिचडीचे चटके बसू नयेत म्हणून वारा घालणारी असो वा पोटापाण्याची सोय म्हणून चोरीमारी करणार्या अमजदलाही पुत्रप्रेम देणारं तिचं रूप असो, फार दिलासा देतं मनाला. आजवरच्या माझ्या संचिताचे फळ म्हणून माझ्या या अनेक लेकरांना मीठ-मिरचीची ददात नको पडायला असे मनोमन प्रार्थणारी ही संघजननी व तिचा तो वारसा समर्थपणे पुढे चालवणारे अनेक साधूसंन्यासी व गृहीभक्त, किती वर्णावी ती थोरवी व किती चाखावी त्या अवीट व निरपेक्ष प्रेमाची गोडी? एकाच अंतिम ध्येयाकडे चालणारी व त्याच सूत्राने बांधलेली ही भक्त भगवंताचीच नाना रूपं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा या प्रवासाची गोडी द्विगुणित होते. एकाने पेटलेल्या दुसर्या ज्योतीसारखा हा चैतन्याचा अखंड प्रवाह निनादत राहीलच, मात्र तुम्ही आम्ही त्याचा एक हिस्सा आहोत ही जाणीव ठेवली की प्रत्येक टप्पा सुसह्य, समृद्ध तर बनेलच, पण कोणतीच कटुता न उरता, एकसंधतेबरोबरच मनाचा गोडवाही कायम राहील… कलाकंदासारखाच!!