ग्रहस्थिती : हर्षल मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, मंगळ मिथुन राशीत, शुक्र, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, शनि कुंभ राशीत, रवी, बुध, प्लूटो मकर राशीत. दिनविशेष : १६ फेब्रुवारी संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९.४४ वा., १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे), २० फेब्रुवारी कालाष्टमी आणि श्री गजानन महाराज प्रकटदिन.
– – –
मेष : सामाजिक कामात सहभागी व्हाल, धार्मिक कार्यातून मन:शांती मिळेल. घरासाठी पैसे खर्च होतील. नोकरीत उत्साह वाढेल. व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल. तरुणांना यश मिळेल. घरात शुभवार्ता कानी पडतील. सामाजिक कार्यात दानधर्म होईल. कलाकार, लेखक, पत्रकारांसाठी उत्तम काळ. नव्या नोकरीची संधी चालून येईल. नातेवाईकांची मदत होईल. भावंडांशी मतभेद होतील. कुटुंबाच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्या. मित्रमंडळींसोबत मौजमजा कराल.
वृषभ : नोकरीत जबाबदारीने काम करा. नव्या कल्पना पुढे जातील. नियोजन करून पुढे जा. आर्थिक व्यवहारात खबरदारी घ्या. मालमत्तेचा विषय मार्गी लागेल. व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. प्रवासात त्रासाचे प्रसंग उद्भवतील. घरात सासू-सुनांमध्ये भांड्याला भांडे लागू शकते. कुटुंबाबरोबर असताना मन आनंदी ठेवा. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. व्यवहारात आपले म्हणणे पुढे रेटू नका. घरात एखादा छोटेखानी कार्यक्रम होईल. मौजमजेपासून दूर राहा. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर पडतील.
मिथुन : व्यवसायात काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारींकडे, ज्येष्ठांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. तरुणांना करियरमध्ये नव्या संधी सापडतील. नोकरदारांना अधिक कष्ट घ्यावे लागतील. थकीत येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. कुणाला सल्ले देण्याचा भानगडीत पडू नका. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट व्यावसायिकांची आमदनी वाढेल. कुटुंबियांसोबत पर्यटन घडेल. एखादी महागडी वस्तू घरासाठी खरेदी कराल. नोकरी-व्यवसायात अधिक मेहनत घ्या. नियोजनपूर्वक खर्च करा.
कर्क : निराशा वाढेल. त्याकडे लक्ष देऊ नका. मन:शांती ठेवा. घरात अधिक काम करावे लागेल. सहलीचे नियोजन होईल. अध्यात्मासाठी अधिकचा वेळ द्याल. दानधर्म कराल. व्यवसायात यश मिळेल. व्यवसायाचा विदेशात विस्तार करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. जुना आजार डोके वर काढेल. घरातल्या मंडळींशी वाद टाळा. तरुणांना यशदायी काळ. नवीन गुंतवणूक फायदा देईल. नोकरीत वाद टाळा. खेळाडूंना चांगला काळ. स्पर्धेत यश मिळेल. जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात पोटाच्या तक्रारी निर्माण होतील.
सिंह : तरुणांना नवीन नोकरीतून करियरला आकार देता येईल. नोकरीत वाढीव काम करावे लागेल. वेळेचे गणित बिघडेल. नवीन ओळखीतून व्यवसायाची संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न उपयुक्त राहील. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळाल्याने आर्थिक बाजू चांगली राहील. सरकारी कामात नियम पाळा. प्रेमप्रकरणात वाद टाळा. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होतील. योगा, ध्यान यासाठी वेळ द्या. नातेवाईकांसाठी भरपूर वेळ खर्च करावा लागेल. पत्नीशी जुळवून घ्या. मित्रांशी आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. वाणीवर नियंत्रण ठेवा.
कन्या : काम पुढे नेण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. घरासाठी वेळ खर्च होईल. सकारात्मक विचारातून यश मिळेल. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल, वेळेचे आणि आर्थिक नियोजन उपयुक्त ठरेल. व्यवसायात भरभराट होईल. धार्मिक यात्रेचे आयोजन होईल. तरुणांना नव्या संधी मिळतील. कलाकारांच्या गुणांना वाव मिळेल. अभिनेते, गायक, संगीतकार, वादकांचा सन्मान होईल. बांधकाम व्यावसायिक, ब्रोकर, वित्तीय सल्लागार यांच्यासाठी अच्छे दिनचा अनुभव येईल. आप्तेष्टांशी बोलताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी व्यक्त होणे टाळा. महिलांचा उत्साह वाढेल. मनस्वास्थ्य सांभाळा. मुलांकडे लक्ष द्या. भागीदारीत काळजी घ्या.
तूळ : कमी बोलून शहाणे राहा. नोकरीत कामाची तारीफ होईल, उत्साह वाढेल. मित्रमंडळींना सल्ले देऊ नका. तरुणांना नशिबाची साथ मिळेल. पत्नीसाठी महागडी वस्तू खरेदी कराल. व्यवसायात यश मिळेल. घरातल्या चर्चेत हो ला हो म्हणणे कठीण होईल. मुलांच्या बाबतीत चांगली बातमी कळेल. संशोधक, प्राध्यापकांसाठी सर्वोत्तम काळ. ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच पुढे जा. गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. किरकोळ वादाकडे लक्ष देऊ नका.
वृश्चिक : मनावरील दडपण वाढवून घेऊ नका. नोकरीत वरिष्ठांची चांगली साथ मिळेल, कामे झटपट पुढे जातील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. व्यवसायात यश मिळवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. लेखक, प्रकाशक, कलाकारांना उत्तम यश मिळेल. सरकारी कामात शिस्त पाळा. कोणत्याही कामात अति आत्मविश्वास दाखवू नका. दांपत्यजीवनात आनंद देणारे दिवस. देवदर्शनासाठी जाल. सढळ हाताने दानधर्म होईल. अभियांत्रिकी व्यवसायात नव्या संधी येतील. चांगले अर्थार्जन होईल. घरात आणि बाहेर परिस्थितीचे भान ठेवा. नवे नियोजन करण्यासाठी चांगला काळ आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. अहंकारी वृत्ती घात करेल.
धनु : उत्साहवर्धक घटना घडतील. नवीन कामाच्या संधी येतील, आर्थिक बाजू भक्कम होईल. नोकरीत चुका होतील, काम काळजीपूर्वक करा. आत्मविश्वास वाढणार्या घटना घडतील. मतांशी ठाम राहण्यात हयगय नको. तरुणांनी धाडसी वृत्ती टाळावी. व्यवसायात त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण अचानक वाढेल. घरात मालमत्तेच्या संदर्भातील चर्चेत आपलेच म्हणणे पुढे नेऊ नका. लेखक, संगीतकारांना मानसन्मान मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. सॉफ्टवेअर क्षेत्रात यश मिळेल. घरासाठी वेळ द्यावा लागेल. अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. उधार-उसनवारी देणे टाळा.
मकर : नवीन वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. आमदनी पाहूनच खर्च करा. व्यवसायात दूरच्या प्रवासाचे नियोजन कराल. मित्रांसोबत वेळ घालवाल. घरात किरकोळ वाद घालत बसू नका. वास्तूखरेदी योग जुळून येतील. व्यवसायात जुनी येणी वसूल होतील. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. सौंदर्य प्रसाधक, सजावटकार यांची चलती होईल. आयटी क्षेत्रात उलाढाल वाढेल. शिक्षणक्षेत्रात नवीन संधी चालून येतील. लेखक, प्रकाशकांना आनंददायक बातमी मिळेल. पत्नीशी वाद टाळा.
कुंभ : व्यावसायिकांना स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. बंधूवर्गाशी सामोपचाराने घ्या. गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. मुलांना यशप्राप्तीसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील. कायद्याची चौकट मोडू नका. नोकरीत कामाचा ताण वाढून आरोग्याचे गणित बिघडेल. रस्त्यावरून जाताना अरेरावी नको. सहलीत साहस अंगाशी येऊ शकते. छंदातून आनंद मिळेल. सरकारी कामे पूर्ण करताना सबूर. भागीदारीत किरकोळ वाद टाळा. घरात छोटेखानी समारंभात नातेवाईक, मित्रांच्या गाठीभेटी होतील.
मीन : नोकरी-व्यवसायात अधिक काम करावे लागेल. वरिष्ठांची मने सांभाळा. वायफळ खर्च करू नका. आरोग्य सांभाळा. खाण्यापिण्यात अतिरेक टाळा. व्यावसायिकांना दगदगीचा काळ. मन:शांती टिकवून ठेवा. मुलांसोबत अधिक वेळ व्यतीत कराल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळून उत्साह वाढेल. नव्या ओळखीतून चांगले लाभ होतील. महिलांना आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरू शकतात. तरुणांना कल्पनाशक्तीच्या जोरावर यश मिळवणे शक्य होणार आहे.