• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रवासी बॅगेसोबत व्यवसाय-प्रवास

- संदेश कामेरकर (धंदा म्हणजे काय रे भाऊ!)

संदेश कामेरकर by संदेश कामेरकर
March 3, 2022
in धंदा म्हणजे काय रे भाऊ!
0

प्रवासी बॅग हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. प्रत्येक घरात माणशी एक तरी बॅग असतेच. गाठोड्यापासून सुरु झालेला हा प्रवास पुढे, पेटारे, संदुक, मेणे, ट्रंका, पेट्या, अवजड सुटकेसेस अशी मजल दर मजल करत सुयोग लखोटे आज वजनाने हलक्या आणि चाकं असलेल्या टुरिस्ट बॅगवर येऊन पोहोचला आहे. रेटिना आणि फिंगर प्रिंट स्कॅन असलेले ‘स्मार्ट लगेज’ या प्रवासातील त्याचे पुढचे स्टेशन आहे.
– – –

‘बाबा, मला अजून पैसे हवे आहेत’… सरकारी नोकरीचं स्वप्न घेऊन, परीक्षेसाठी एमपीएससी पंढरीत म्हणजे पुण्यात, नित्यनेमाने वारी करणार्‍या हजारो मुलांपैकी एक मुलगा वडिलांशी बोलत होता. पदवी पूर्ण झाल्यावर गावची शेती सोडून, डेप्युटी कलेक्टर बनायचा निश्चय करून पुण्यात आल्याला चार वर्ष उलटली होती. चार वेळा परीक्षेत अपेक्षित यश मिळालं नाही, पण बनेन तर सरकारी बाबूच ही त्याची प्रतिज्ञा होती. त्यासाठीच मुलगा आता वडिलांकडे रक्कम मागत होता. हातात काहीच उरलं नाही तेव्हा वडिलोपार्जित जमीन विकून वडिलांनी मुलाला पैसे पाठवले. आता हा मुलगा पाच लाख विद्यार्थ्यांमधून पहिल्या ५००मध्ये येणार का, त्याला नोकरी लागणार का, हे सांगता येणं कठीण आहे… पाच लाखांतून पाचशे… म्हणजे उरलेल्या चार लाख ९९ हजार ५०० घरांमध्ये हाच प्रसंग घडणार, असेच पैसे उभे केले जाणार आणि तरीही त्यातून निष्पन्न काहीच झालेलं नसणार… आता अशाच दुसर्‍या प्रसंगाचा विचार करू… असाच संवाद आणखी एका मुलाच्या घरी सुरू आहे, फरक इतकाच आहे की हा मुलगा वडिलांकडे व्यवसाय सुरू करायला पैसे मागतोय!… तर काय होईल?
या प्रश्नाचं उत्तर मनात राखून ठेवा, नंतर त्याकडे येऊ… सध्या कहाणी पुढे नेऊ, व्यवसायासाठी एक मुलगा वडिलांकडे पैसे मागतो आहे, त्या मुलाचं नाव आहे सुयोग लखोटे.
ट्रेकिंगची आवड असलेला उनाड मुलगा, अशी सुयोगची शाळेत असताना ओळख होती. कॉलेजला गेल्यावर हिंडण्याफिरण्यासोबत मित्रांचा भला मोठा गोतावळा जमा झाला, अंगात रग होती, अरेला कारे करायची वृत्ती होती. एका नेत्याच्या विचारांनी प्रेरित होऊन तो त्याच्या पक्षाकडे ओढला गेला, तिथं जबाबदारीचं एक पदही मिळालं, त्यामुळे अभ्यासाकडे थोडं दुर्लक्षच झालं; मग काय अकरावीला दांडीच गुल झाली, त्याच काळात नाशिक शहरातील मुख्य चौकात भल्या मोठ्या फ्लेक्सवर युवा नेता म्हणून सुयोगचा फोटो झळकला. योगायोगाने वडिलांच्या एका मित्राने तो पहिला आणि ‘तुमचा मुलगा करतो काय?’ हा सवाल त्यांनी सुयोगच्या वडिलांना केला. मग काय, घरात अधिवेशन बोलावलं गेलं, एकतर्फी वादळी चर्चा झाली आणि आजपासून राजकीय काम बंद असा ठराव बहुमताने पास केला गेला. तरूण वयच ते, असं सांगून गोष्टी लगेच पटतात का? पण वडिलांचा धाक असल्यामुळे थोडे दिवस सुयोगने पक्षकार्य पडद्याआडून केलं. अभ्यासात मन रमत नव्हतं, कशीबशी बारावीची परीक्षा पास केली. पोरगा हाताबाहेर जाऊ नये याची बाबांना काळजी वाटत होती, अल्लडपणा कमी होऊन त्याला जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी बाबांनी एका मित्राजवळ मुलाच्या नोकरीसाठी शब्द टाकला. पण हे सांगणं थोडं वेगळं होतं. ‘तुला काय राबवायचे असेल तसं राबवून घे, पगार वगैरे पण देऊ नकोस’. आजच्या पिढीत कोणताही त्रास न होता मुलाला मोठं पॅकेज मिळावं यासाठी शब्द टाकणारे वडील जागोजागी दिसतात, त्या तुलनेत हे वडील, लोखंडाला पोलाद बनवताना ते तावून सुलाखून निघायला हवं या विचाराचे दिसतात.
आयुष्यातील या पहिल्या वहिल्या नोकरीबद्दल सुयोग म्हणाला, कंपनी काय असते, काम कसं करावं, हेच मला माहित नव्हतं. त्यात आमचे जनरल मॅनेजर साहेब वडिलांचे मित्र होते. म्हणजे मी जरा जरी कामात टंगळमंगळ केली,तरी लगेच वडिलांना रिपोर्ट जाईल याची भीती मनात होती. मी साहेबांसमोर जाऊन उभा राहिलो आणि त्यांना विचारलं, ‘मी काय काम करू?’ ते म्हणाले, ’काय करशील बुवा? तुला काय काम करायला आवडेल?’ मी म्हटलं, ‘सर, तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे, तुम्ही म्हणालात, झाडू मार तर मी झाडू मारेन, हे टेबल पूस तर मी टेबल पुसेन.’ यावर त्यांनी मला प्रश्न केला, ‘तुला डोकं लावण्याचे काम द्यायचं की अंगमेहनतीचं, हे आपण नंतर ठरवू. त्याआधी दोन दिवस कंपनीचे ऑब्झर्वेशन कर. कुठे, कसं, काय काम चालतं हे आधी बघून घे.’ या कंपनीत ट्रॅव्हल बॅग बनवताना लागणारे हॅण्डल, ट्रॉली, व्हील असे सुट्टे भाग तयार व्हायचे. मी काम कसं चालतं हे बघत होतो. दोन दिवसांनी साहेबांनी काही प्रश्न विचारले आणि इनवर्ड- आऊटवर्डचं काम दिलं. कंपनीत कोणकोणते विभाग आहेत, तिथे कोणते साहेब बसतात, रोज काय रॉ मटेरियल येतं आणि त्याचा काय माल तयार होऊन बाहेर जातो याची नोंदवही तयार करण्याचं हे काम होतं. ज्याला कामाची आवड आहे त्याला इथे खूप गोष्टी शिकायला मिळतात. कामाला आलेला नवीन मुलगा खाणीतील कोळसा आहे की हिरा, हे इथे कळतं. कोळसा असला तर आयुष्यभर एकाच प्रकारचे काम करत, सतत मेहनत उगाळत बसतो आणि हिरा निघाला तर त्याला योग्य ते काम देऊन त्यावर पैलू पाडले जातात. सुयोगच्या बाबतीत दुसरी शक्यता खरी ठरली. गेले दोन महिने रोज सामानाची नोंद करताना प्रत्येक रॉ मटेरियलचे दर त्याला तोंडपाठ झाले होते. एक दिवस त्याला एका मटेरियलचे रेट अचानक वाढलेले दिसले. जी वस्तू ५० पैसे किमतीला येत होती, तिची किंमत अचानक ७५ पैसे लिहिलेली दिसली. कोणत्याही वस्तूनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा घाऊक संख्येत आणि घाऊक दरात येतो, त्यामुळे पंचवीस पैसे ही तफावत दिसताना कमी दिसत असली, तरी त्या फरकाने कंपनीला काही हजार ते काही लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. ही तफावत सुयोगने साहेबांच्या नजरेला आणून दिली. त्यांनी तपासणी केली तर व्हेंडरने या बिलात गडबड केली आहे असं लक्षात आलं. सुयोगच्या चौकस बुद्धीमुळे कंपनीचं होणारं नुकसान टळलं, त्या व्हेंडरची गच्छंती झाली. आणि सुयोगला पर्चेस डिपार्टमेंटमधे बढती मिळाली.
सुयोगने सांगितलं, ‘बॅगला लागणारे काही मटेरियल आम्ही कंपनीत बनवायचो, तर इतर मटेरियलसाठी सबव्हेंडर नेमले होते. त्यांच्याकडून सामान बनवून घेणे, त्या कामाची गुणवत्ता तपासून घेणं, याचं संपूर्ण नियोजन काही दिवसात माझ्याकडे आलं. कंपनीत अनेक बदल घडत होते, नवीन ट्रॉली डेव्हलपमेंट सुरू होती, त्यासाठी एसओपी बनवल्या, व्हिज्युअल मॅनेजमेंट केलं गेलं, नवीन मोल्डिंग मशीन आणल्या. कंपनीतील हिशोब ‘टॅली’ सॉफ्टवेअरवर आला, त्याचं स्पेशल ट्रेनिंग देण्यात आलं. आता जॉबवर्कसोबत आकड्यांशीही गट्टी जमली. कंपनीतील सर्व विभागांच्या कामात माझा सहभाग वाढायला लागला होता. कामाच्या व्यापात नोकरीला लागून पाच वर्षं कधी उलटून गेली हे कळलं देखील नाही… आता एक नवीन चॅलेंज त्याची वाट पाहत होतं.
सुयोग ज्या आरके इलेक्ट्रिकल्स कंपनीत काम करत होता, तिचं मुख्यालय नागपूर येथे होतं. त्याच मालकाची अजून एक कंपनी होती, जिचं नाव होतं, राज वुडवर्क्सही कंपनी गोदरेज तसेच इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांना फर्निचर बनवून देण्याचे काम करत असे. भारत सरकारच्या, ‘सर्व शिक्षा अभियान’ उपक्रमांतर्गत जागतिक बँकेचा एक प्रोजेक्ट होता, ज्यात टाटा, बिर्ला, गोदरेज अशा नामवंत कंपन्यांनी टेंडर भरलं होतं. या टेंडरमधील प्रत्येक शाळेत १३ संगणक टेबल बनविण्याचे काम या कंपनीला सब पार्टी करून मिळालं होतं. कंपनीने टेबलचं सामान वेगवेगळ्या शाळांत पोहोचवलं खरं, पण त्या टेबलची जोडणी कोण करून देणार, असा प्रश्न निर्माण झाला. मग हे काम करायला त्यांनी अजून एक टेंडर काढलं. या नवीन व्यापाची जबाबदारी सुयोगच्या साहेबांवर आली. या कामासाठी मी तुम्हाला आमच्या कंपनीतील सर्वात हुशार, उत्साही माणूस देतो, असं त्यांनी मालकांना कळवलं, आणि सुयोगला महाराष्ट्रातील खेडोपाडी असलेल्या शाळांसाठी काम करण्याचा आऊटडोअर जॉब मिळाला. संगणक टेबलला लागणारे १३ लाकडी साचे शाळेत नेऊन त्यांची जोडणी करण्यासाठी चार माणसे आणि एक लहान कार, अशी एका टीमची रचना होती. अशा ५० टीम सुयोगने तयार केल्या. या टीमने चांदा ते बांदा अशी महाराष्ट्रभर मुशाफिरी करून १० हजार शाळांमध्ये हे काम पूर्ण केलं. शाळा, कॉलेजमधील सवंगडी आणि गड-किल्ले संवर्धनाचे काम करणार्‍या अनेक मित्रांची या कामात मदत झाली. या कामातून सुयोगने जवळ जवळ २०० मराठी तरुणांना रोजगाराचे एक नवीन दालन खुलं करून दिलं.
दीड वर्ष चाललेला हा प्रोजेक्ट संपवून सुयोग मूळ कंपनीत परतला. त्याला काही गोष्टी बदललेल्या दिसल्या. कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. इथे थांबून आपली प्रगती होणार नाही याची खात्री पटताच, सुयोगने नवीन नोकरी शोधायचं ठरवलं. आधीचा आठ वर्षाचा अनुभव गाठीशी होता, बॅगनिर्मिती क्षेत्रामधील असा कोणताही विभाग नाही, ज्याची त्याला माहिती नव्हती. लवकरच त्याने ‘सुमीत इंडस्ट्रीज’ या कंपनीत पर्चेस डिपार्टमेंटसाठी नवीन इनिंग्जला सुरुवात केली. पगारही डबल मिळाला. ‘सुमीत इंडस्ट्रीज’ एका अमेरिकन बॅगच्या ब्रँडची आशिया खंडातील सर्वात मोठी व्हेंडर होती. जुन्या कंपनीच्या तुलनेत ही कंपनी ५० पट मोठी होती. तिथे फक्त पार्ट बनत असत, इथे अख्खी बॅग तयार होत असे.
नोकरीत रुळत असतानाच सुयोगला एका मोठ्या कौटुंबिक समस्येला तोंड द्यावं लागलं. सुयोग सांगतो, माझा प्रेमविवाह आहे. स्वतःची जबाबदारी स्वतः उचलावी अशी घरची शिकवण आहे. तो शिरस्ता पाळत, मी लग्न झाल्यावर वेगळा झालो, कंपनीतून कर्ज घेऊन संसार थाटला. घराचा हप्ता, इतर खर्च जाऊन काही फार बचत होत नव्हती. या आर्थिक ओढाताणीचा बायकोच्या प्रकृतीवर परिणाम झाला. ही गोष्ट मला अनेक दिवस आतून खात होती. मग ठरवलं, यापुढे पैसे कमवायचे, संपूर्ण फोकस आर्थिक स्थिती सुधारण्याकडे ठेवायचा. काही दिवसात कंपनीला सांगितलं, पगार वाढवा. त्यांना वाटलं की मी पोकळ धमक्या देतोय. त्यांनी नकार दिला, तशी पगारवाढीसाठी मी कारकीर्दीमधील तिसरी नोकरी धरली. या नोकरीत आर्थिक स्थैर्य आलं, पण आयुष्यभर नोकरी केली तरीही आपली स्वप्ने पूर्ण होणार नाहीत याचीही जाणीव झाली. आता मी व्यवसायासाठी चांगल्या संधीच्या शोधात होतो. पण भांडवलाचे काय, हा विचार असायचाच.
२०१७ साली बाबा कंपनीतून निवृत्त झाले. त्यांनतर साधारण सहा सात महिन्यांनी मला माहिती मिळाली की त्यांची कंपनी कामकाज विस्तार करते आहे. त्यांच्यासाठी बॅग बनविणारे अनेक व्हेंडर आधीपासून काम करतच होते. आता त्यांनी प्रोडक्शन वाढविण्यासाठी आणखी नवे व्हेंडर शोधायला सुरुवात केली होती. ही बातमी ऐकल्यावर माझं विचारचक्र पुन्हा सुरू झालं. इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी घेतल्यावर, नोकरी सोडून बॅगनिर्मितीच्या क्षेत्रात आपण उतरू शकतो, व्हेंडर बनू शकतो याची मला खात्री वाटत होती. काम कसं केलं जातं, हे मला माहित होतं. आता प्रश्न होता भांडवलाचा. हाच तो लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेला, मुलाने वडिलांकडून सर्व जमापुंजी मागण्याचा प्रसंग. नोकरीची पूर्वापार परंपरा असलेल्या घरात, धंदा-व्यवसाय हा विषय अगदी साध्या बोलण्यात देखील नकारात्मक असतो; इथे तर वडिलांच्या आयुष्याची संध्याकाळच काळोखात रूपांतरित होण्याची शक्यता होती. नोकरीत स्थिरावलेला मुलगा अचानक धंदा सुरू करायचा म्हणतोय हे कसं अव्यावहारिक आहे, असं वडिलांना त्यांच्या अनेक मित्रांनी, नातेवाईकांनी सांगितलं. तेव्हा सुयोगचा लहान भाऊ शिक्षण घेत होता, बाबा रिटायर्ड, सुयोगचाही नवीन संसार सुरू झालेला; धंदा बुडाला तर कोणाकडे हात पसरायचे? हे विचार बाबांच्या मनात घोळत होते. याबाबत बोलणं व्हायचं तेव्हा, ‘तुला हे नक्की जमेल ना?’ ‘आपले पैसे बुडणार तर नाहीत ना?’ असे अनेक प्रश्न ते सुयोगला विचारायचे. तो सांगायचा, ‘एकदा माझ्यावर विश्वास ठेवून तर बघा, मी तुम्हाला निराश करणार नाही, तुमच्या आणि माझ्या नोकरीचा याच क्षेत्रातील अनुभव आपल्याला बुडू देणार नाही.’ अखेर महिनाभरानंतर बाबांनी सुयोगला भांडवल देण्यास होकार दिला. पैसे हातात ठेवताना ते म्हणाले, ‘हे बघ सुयोग, जर काही कमी जास्त झालं तर तुला त्यातून बाहेर काढायला माझ्याकडे पैसे नसतील हं.’ हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं, तो म्हणाला, ‘बाबा, तशी वेळच येणार नाही!’
दुसर्‍या दिवशी सुयोग आणि बाबा बॅग कंपनीत बोलणी करण्यासाठी गेले. बाबांनी इमाने इतबारे अडतीस वर्षं नोकरी केली याचं कौतुक करणारे अनेक साहेब कंपनीत होते. सुयोगच्या या क्षेत्रातील दहा वर्षांचा अनुभव आणि बाबांचा कंपनीतील ऋणानुबंध या जोरावर पहिली ऑर्डर मिळाली. या नवीन पर्वाबद्दल बोलताना सुयोग म्हणाला, ‘मला स्वतःबद्दल खात्री होती. रीतसर नोटीस देऊन आधी मी नोकरीचा राजीनामा दिला. श्री गजानन इंडस्ट्रीज या नावाने पहिल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. लेबर वर्कच्या कामात सर्वात मोठी गरज असते ती कुशल मनुष्यबळाची. नशिबाने यासाठी मला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. कारण मी आधीच्या कंपनीत काम करत असताना हाताखाली अनेक मुलं होती. पदाचा बडेजाव करून त्यांना कमी लेखणे, एखाद्याचा चारचौघांसमोर पाणउतारा करणे असे प्रकार कधीच केले नाहीत आणि मलाच सगळं कळतं असा पवित्रा घेणे हे माझ्या स्वभावात कधीच नव्हतं. या मुलांना माझ्या कामाची पद्धत माहीत होती. त्यामुळे मी व्यवसाय सुरू करतोय हे ऐकल्यावर त्यातील अनेक मुलं स्वतःहूनच माझ्याकडे आली. असे अनुभवी व कुशल कामगार पहिल्याच दिवसापासून पाठीशी असल्यामुळे कोणाला काहीही शिकवावं लागलं नाही. कंपनीची सुरुवातही नव्हती, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवून, भरवशाची नोकरी सोडून आलेले कारागीर आजही सोबत आहेत. प्रोडक्शनची बाजू सांभाळणारा अर्जुन पारधी, डोळ्यात तेल घालून गुणवत्ता पाहणारा अर्जुन फरकाडे, पर्चेस विभाग पाहणारा प्रवीण चौधरी, प्रशासकीय बाजू सांभाळणारा सुयश पवार अशा अनेक सहकार्‍यांचा कंपनीच्या यशात मोठा वाटा आहे.’
‘आजवर दुसर्‍यांसाठी काम करून पाहिलं होतं, आता स्वत:च्या कंपनीसाठी सोळा तास काम करू लागलो. लहान भाऊ सिद्धार्थ याने शिक्षण पूर्ण करून कंपनीत महत्त्वाची जबाबदारी उचलली. बाबा देखील जमेल तशी मदत करत होते. आमचं हे काम लेबर जॉबमधे मोडतं. बॅग शिवण्यासाठी लागणार्‍या सुईधाग्याव्यातिरिक्त सर्व सामान कंपनी आम्हाला देते. ड्रिलिंगपासून पॅकिंगपर्यंत ए टू झेड काम आमच्याकडे होतं. बॅग तयार करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेला लाइन असं म्हणतात. तीन महिन्यातच आमची गुणवत्ता आणि वेळ पाळण्याची वृत्ती पाहून कंपनीने आम्हाला तीन लाइनचे काम दिले.
मराठी मुलांना काम येत नाही, जमत नाही असं काहीजण म्हणतात. परंतु हे संपूर्ण सत्य नाही, स्वतःची कंपनी चालवताना माझी काही निरीक्षणं आहेत. आमच्याकडे आठ ते आठ अशी बारा तासांची शिफ्ट असते, त्यात एका लाइनवर मराठी मुलांना जॉब पूर्ण करायला जर नऊ तास लागतात, तर तेच पूर्ण काम करायला दुसर्‍या लाइनवर परप्रांतीय मुलांना बारा तास लागतात. स्किलच्या बाबतीत आपल्या मुलांचा हात कुणी धरू शकत नाही, फक्त अल्लडपणा त्यांच्या प्रगतीच्या आड येतो.
सुयोग म्हणाला, हे काम सुरू असताना कंपनीने बॅगच्या आतील कापड बनविण्याची संधी काही व्हेंडरना द्यायचं ठरवलं. लेबर वर्क तर आम्ही करतच होतो. आता खरंखुरं मॅन्युफॅक्चरिंग करण्याची वेगळी संधी मिळत होती. त्यासाठी पुन्हा पैशाची जमवाजमव करावी लागली. गजानन इंडस्ट्रीज चालवताना दोन वर्षं मिळणार्‍या प्रॉफिटमधून पैसे घरी नेले नव्हते. तो नफा श्री गुरू माउली या नवीन कंपनीत गुंतवला. नवीन व्यवसायासाठी नवीन मशिनरी विकत घेतली. बायको सौ. मौशमी नोकरी करून घराच्या खर्चाची एक बाजू उचलत होती. घरातील आर्थिक ओढाताणीची झळ तिने मला बसू दिली नाही. आता ती या कंपनीची पूर्ण वेळ आर्थिक व्यवस्थापक आहे.’
ज्या मुलांनी सुरुवातीला साथ दिली, त्यापैकी कुणी स्टोअर्सला होतं, कुणी शिक्षण घेत काम करत होतं, तर कुणी क्वालिटी चेकर होतं. जसजशी कंपनी मोठी होत गेली तसतशी, या जागेवर चार हजारात काम करणारी मुलं आज मॅनेजर, प्रोडक्शन हेड, क्वालिटी हेड बनून २५ ते ३० हजार रुपये पगार घेत आहेत, हे सांगताना सुयोगला अभिमान वाटतो. तो म्हणतो, मी ज्यांच्यासाठी बॅग बनवतो ती कंपनी या क्षेत्रातील आशिया खंडातील नामांकित कंपनी आहे. दहा कामगारांपासून सुरू केलेला हा व्यवसाय उण्यापुर्‍या चारच वर्षांत दोनशेपेक्षा जास्त मुलांना रोजगार मिळवून देतो आहे.
या टप्प्यावर असं वाटत होतं की केलेल्या मेहनतीचं चीज झालं. अर्धवट सोडून दिलेलं शिक्षण आईच्या सांगण्याने पूर्ण केलं. आईवडिलांचे संस्कार पाय जमिनीवर ठेवत होते. राहणीमानात काही विशेष फरक पडला नव्हता. गरजेपुरते सोडले तर चार वर्षे प्रॉफिटचे पैसेही घरी नेले नव्हते. व्यवसायवाढीसाठी आवश्यक पावलं उचलत असताना २५ मार्च २०२० रोजी कोरोना विषाणूमुळे पहिला लॉकडाऊन सुरू झाला. जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी सर्व कामकाज ठप्प झालं. या महामारीचा सर्वात जास्त फटका टुरिझम इंडस्ट्रीला बसला. सुयोग सांगतो, लोक बाहेर फिरायला जाणार नसतील तर टूरिस्ट बॅग विकत घेणार कोण? आमचं नवीन काम बंद झालं आणि आधी केलेल्या कामाचे पैसे देखील अडकले, बँकेच्या खात्यात केवळ दोन लाख रुपये जमा होते. आजूबाजूच्या परिसरातील सर्व मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद झाले होते.
लॉकडाऊन कधी उठतो याची वाट पाहत काम बंद करून घरी बसणं हाच पर्याय होता. पण मला माझ्या या अडीचशे माणसांच्या कुटुंबाच्या चरितार्थाचा प्रश्न अस्वस्थ करत होता. मीटिंग बोलावली, हाताखालच्या लोकांना आधी विश्वासात घेतलं. बाहेर काय परिस्थिती आहे आणि आपण काय करू शकतो याबाबत चर्चा केली. कामगार म्हणाले, ‘साहेब फॅक्टरी बंद करू नका, हवं तर सहा महिने पगार देऊ नका, फक्त घरात लागेल तेवढं रेशन आम्हाला द्या.’ सर्वांशी चर्चा केल्यानंतर मी पीपीई किट बनविण्याचा निर्णय घेतला. काम सुरू केलं. पहिल्यांदा नाशिक पोलिसांसाठी त्यांचा लोगो छापून दोन हजार किट बनवले. या काळात पुणे शहरात मी रोज पाचशे पीपीई किट पाठवत होतो. पहिल्या कोविड लाटेत तीन लाख मास्क विकले. याच धावपळीत मला कोरोना झाला, लोकांनी जे भोगले ते माझ्याही वाटेला आले. आई वडिलांच्या पुण्याईने जिवंत परत आलो. काही दिवसांनी कोरोनाने दगावलेल्या मृतांसाठी डेड बॉडी कवरची नवीन ऑर्डर आली. पण यातून पैसे कमावावेत, असं वाटत नव्हतं. त्यामुळे कच्च्या मालासकट कव्हरमधून मिळालेला सर्व पैसा एका सामजिक संस्थेला दिला. लॉकडाऊन उठल्यानंतर गाडी आता पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. वर्षाला दहा लाखापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज चांगली उलाढाल करतोय.’ प्रवासी बॅग हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. प्रत्येक घरात माणशी एक तरी बॅग असतेच. गाठोड्यापासून सुरु झालेला हा प्रवास पुढे, पेटारे, संदुक, मेणे, ट्रंका, पेट्या, अवजड सुटकेसेस अशी मजल दर मजल करत आज वजनाने हलक्या आणि चाकं असलेल्या टुरिस्ट बॅगवर येऊन पोहोचला आहे. रेटिना आणि फिंगर प्रिंट स्कॅन असलेले ‘स्मार्ट लगेज’ या प्रवासातील पुढचे स्टेशन आहे. तब्बल चार हजारांहून अधिक प्रकार व डिझाईन असलेल्या या प्रवासी बॅग्ज एक हजारांपासून ते लाख रुपयांपर्यंत किंमतीला बाजारात उपलब्ध आहेत. बॅगनिर्मिती क्षेत्रात १२ कंपन्यांचे वर्चस्व असले, तरी दोनच प्रमुख कंपन्यांचा मार्वेâटमध्ये दबदबा आहे. इतर कंपन्यांना अजूनही ग्राहकांच्या मनात स्थान मिळवता आलं नाही. आज वाढत्या पर्यटनामुळे प्रवासी बॅग्जची मोठी मागणी आहे. बॅग उत्पादक कंपन्यांना या मागणीची पूर्तता करण्यासाठी सब व्हेंडरची आवश्यकता भासणार आहे. या क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होणार आहे. सब व्हेंडर म्हणून काम करताना आपण बनविलेली वस्तू मार्वेâटिंग करून विकण्याचे दडपण नसते आणि कंपनीने हमी दिल्यामुळे पैसे बुडण्याच्या धोका देखील नसतो. ही या व्यवसायाची जमेची बाजू आहे. एका नोकरीतून केवळ पगारवाढ इतकाच हेतू ठेवून दुसर्‍या नोकरीत जाण्यापेक्षा मिळालेल्या अनुभवाचा फायदा स्वतःच्या व्यवसाय उभारणीसाठी करू शकतो, हे आपल्याला सुयोगचा प्रवास वाचून कळतं…
आता पुन्हा एकदा करोना वाढतोय, व्यवसायाच्या मुळावर उठू पाहतोय. उद्या धंद्याचं काय होईल हे कोणालाही माहीत नाही. पण सुयोग आता कोणत्याही परिस्थतीत डगमगणार नाही. कोविडकाळात केलेला संघर्ष आठवून सुयोगचं मराठी कामगार बांधवांना एकच सांगणं आहे, काळ कठीण असला तरी लढणं सोडू नका.

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

शेअर कसे निवडावे?

Related Posts

धंदा म्हणजे काय रे भाऊ!

मुंढेबाईंचा बहुगुणी बटवा

October 5, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

स्वच्छ ताजे मासे, साफ करून घरपोच!!

September 21, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

जुनाट लाँड्री व्यवसायावर नावीन्याची कडक इस्त्री!

August 24, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

करिअरची गवसली वाट

July 27, 2023
Next Post

शेअर कसे निवडावे?

फुलते फळते आहे आमची देवराई!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.