उमेद वाढवणारे सदर
‘मार्मिक’ वाचण्याचा योग दर आठवड्याला येतो, पण गेल्या दोन वर्षांत आज पहिल्यांदाच ‘मार्मिक’ला पत्र लिहिण्याचा योग आला आहे.
तसं तर जग नेहमीच बदलत असतं, पण गेल्या दोन वर्षांत आपल्या सगळ्यांचंच जगणं बदललं आहे. थोडा आशेचा किरण दिसून मार्ग उजळायला लागतो आणि फिरून नवा वेरियंट तो झाकोळून टाकतो. या परिस्थितीत सगळ्यात जास्त काही आपल्या प्रत्येकाला हवं असेल तर, ‘उमेद’. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय अथवा उच्च मध्यवर्गीय लोकांची दुःखे खूप बघितली. पण आता कुणीतरी माझं चांगलं सुरू आहे, मी करून बघितलं आणि ते आता आकाराला येतंय असं ऐकावंसं पहावंसं वाटतंय.
आणि ही उमेद मला, ‘धंदा म्हणजे काय रे भाऊ’ या नव्याने सुरू झालेल्या सदरात दिसत आहे. सुरुवातीला वाटलं मराठी माणूस काय व्यवसाय करेल? वडा पाव, चहाची टपरी, खानावळ? पण पहिल्याच लेखात लेखक संदेश कामेरकर यांनी षटकार मारला. ‘पानकर्णिका’मध्ये पानाचा व्यवसाय सुरू करणारी ऐश्वर्या हिचा पान लावतानाचा फोटो बघितला आणि चकितच झालो. एकतर व्यवसायात मराठी माणूस हेच आश्चर्य, त्यात तो व्यवसाय पानाचा आणि तो करणारा मराठी माणूस म्हणजे चक्क मराठी मुलगी, यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली. तिचा प्रवास वाचला. निश्चित वेगळा आहे. असेल अपवाद म्हणून तो विचार तिथेच थांबला. पुढचा लेख आला तो ‘मरण टाळणारा फ्लॅगमॅन’, त्यानंतर शेअर बाजार आणि आजच फेसबुकवर बघितलं की यापुढचा लेख, ‘प्रवासी बॅगेसोबत व्यवसायप्रवास’ असा आहे. चार इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात मराठी माणूस पाय रोवून आहे याचं खूप कौतुक वाटतंय.
लहान असल्यापासून आपल्या मुलांना व्यवसाय करा असं बाळकडू नसतं. समजा चुकून कधी उदाहरण दिलंच तर ते एकदम टाटा-बिर्ला-अंबानी यांचंच (मराठी आडनावे चवीपुरती देखील नाहीत म्हणून मराठी माणसासाठी धंदा अळणीच). किंवा मग आपल्या एका नातेवाईकाने कसा व्यवसायाचा प्रयत्न केला आणि तो कसा देशोधडीला लागला याच कथा. त्यामुळे व्यवसाय म्हणजे इदम् न मम् अशी थॉट प्रोसेस निर्माण होते. मी धंद्यात खूप यशस्वी होऊ शकेन का आणि मला धंद्यात आपटी खायची नाहीये, यातच आपण दोलायमान असतो. अशा परिस्थितीत, या दोन विचारांचा सुवर्णमध्य जगणारे लोक समोर आले की हुरूप येतो. मराठीपणाचा धागा दृढ होतो. ‘मराठी माणसाने व्यवसायात आल पाहिजे’ हे आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं सांगणं किती योग्य आहे, हे आज जागोजागी असलेले ‘अमराठी’ व्यवसाय बघून अधिक पटतं. संदेश कामेरकर यांची लेखनशैली लेखाला अतिशय रंजक बनवते. १० ओळींचा व्हॉट्सअॅप मेसेज वाचायचा जिथे कंटाळा येतो तिथे यांचा लेख एकदा सुरू केला की पूर्ण झाल्याशिवाय थांबू शकत नाही. लेखाची सुरुवात अगदी आपल्या बाजूला घडणार्या गोष्टीसारखी, मधला मसुदा दर्जेदार आणि शेवटाकडे येताना मराठी माणसाला दिलेली हलकीशी हाळी की जागा हो, सुरुवात कर, यांनी केलंय बघ… तू पण करू शकतोस. हे लेख आमच्या पाल्यांना व त्यांच्या मित्रमंडळींना वाचून दाखवले. कुणी सांगावं यांच्यातूनच पुढे मान्यवर उद्योजक बंधू/ भगिनी तयार होतील.
या संकल्पनेसाठी लेखकाचे अभिनंदन व आभार. या कल्पनेला ‘मार्मिक’सारखे योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले याबद्दल धन्यवाद. यापुढेही आपण मराठी माणसाच्या प्रवासात वाटाड्याची भूमिका निभावाल, अशा सदिच्छा आहेत.
– दिगंबर हजारे, करी रोड, मुंबई
अल्पवयातील प्रेमविवाहांची शिक्षा कुणाला देणार?
बालविवाह प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाली. त्या अनुषंगाने लिहिलेला ‘गौरी ते घोड नवरी’ हा राजा पटवर्धन यांचा लेख फारच गहन वाटला. आपला प्रत्येक मुद्दा मांडून तो पटवून देण्याची पद्धत, सोबत अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण हे लेख शेवटपर्यंत वाचण्यास भाग पाडते.
कुठलाही सामाजिक बदल रातोरात होत नसतो, मग त्या रुढी असोत की परंपरा. ती एक कायम चालणारी प्रक्रिया असते. एक कायदा करून ताबडतोब बदल घडत नसतात. म्हणूनच तर त्या कायद्याचा समाजावर होणारा चांगला-वाईट परिणाम अभ्यासून वेळोवेळी दुरुस्त्या कराव्या लागतात. मुला-मुलींचे लग्नाचे वय किती असावे यावर मत-मतांतरे आहेतच. कारण आपल्या विशाल देशातील स्थानिक प्रथा, वेगवेगळ्या सामाजिक परंपरा तसेच समाज प्रबोधन, शिक्षण, लोकांची शारीरिक ठेवण याचा प्रांतनिहाय वेगवेगळा प्रभाव पडत असतो.
सध्याच्या युगात तरुणाईत स्वैराचार थोडाफार वाढत चाललेला दिसतो. अनेकदा मुलांच्या करतूतीबाबत पालक अनभिज्ञच असतात. अशावेळी मुलांनी पळून विवाह केल्यास व ती नवीन वयोमर्यादेनुसार प्रौढ नसतील तर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार पालकांवर कारवाई करणे योग्य ठरेल काय? असा विवाह रोखल्याने मुलाने किंवा मुलीने काही टोकाची भूमिका घेतल्यास जबाबदार कोण? तशा बातम्या बर्याच वेळेस वाचनातही येतात.
आपले जीवनमान, खाण्या-पिण्याच्या सवयी यांत आमूलाग्र बदल झाले आहेत. तसेच गर्भावस्थेत डॉक्टरांनी दिलेला टोटल बेडरेस्टचा सल्ला १०० टक्के अंमलात आणल्याने वाढत्या वयानुसार प्रसूतीमधील गुंतागुंत वाढतच जाते. त्यामुळे या सार्याचा अभ्यास होऊन भविष्यात कायद्यात दुरूस्त्याही होऊ शकतील.
बालविवाह प्रतिबंध कायद्यासोबतच हुंडा प्रतिबंधक कायद्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता येईल ते बघणे गरजेचे आहे. त्याप्रमाणेच निवडणूकप्रचारासाठी जशी खर्चाची मर्यादा दिली जाते त्यासारखीच लग्नसमारंभासाठी खर्चाची ठराविक मर्यादा देऊन त्यापुढील खर्चासाठी लक्झरी टॅक्स लावणारा कायदा आणल्यास लग्न समारंभात खर्चाचे नवनवे उच्चांक करण्याची स्पर्धा थांबेल व मध्यमवर्गीयांची या स्पर्धेतून सुटका होईल.
– अशरफ हसन मुकरी, जैतापूर
कायदे म्हणजे फक्त चौकटी!
नुकताच राजा पटवर्धन यांनी लिहिलेला विवाहाच्या वयाबद्दलचा लेख वाचनात आला. पटवर्धनांचे वय व व्यासंग पाहता, त्यांचे लेखन उत्तम असणे स्वाभाविक आहे. मुद्दा येतो तो लेखाच्या विषयाचा. मुलीचे व मुलाचेही लग्नाचे वय किती असावे हा सध्या ऐरणीवरचा विषय आहे व पटवर्धनांनी यालाच हात घातलेला आहे.
कायदे काही असले तरी पूर्वापार सोयीस्कर पळवाटा काढण्याचे काम काही सामाजिक यंत्रणांनी सहेतुकपणे गेली हजारो वर्षे केलेले आहे. काही ठिकाणी विवाहासंदर्भातले कायदे धाब्यावर बसवलेलेही आपण पाहतो. कायदे करणार्या मंडळींच्या हेतूबाबतही काही वेळा शंका उपस्थित केली जाते. हे चालतच राहणार आहे. कायदे करणे म्हणजे फक्त एक चौकट तयार करणे, असे त्यामुळेच तर वाटते. सत्ता, धर्म, पैसा आणि गुंडगिरी हे कायदे गुंडाळून ठेवून स्वत:ची मनमानी राबवतात. हे विवाहाचे वय निश्चित करतांनाही दिसून येते.
यात पटवर्धनांनी जो धर्माचरणाच्या नावाखाली चाललेल्या गोष्टींचा उल्लेख केला आहे तो मला अधिक महत्वाचा वाटतो. हे अनेक शतके चालत आले आहे व आजही सत्ताधीश त्यालाच खतपाणी घालत असतील तर ते अयोग्यच आहे. या प्रकारच्या शोषणकर्त्यांचे उच्चाटन झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. कायदा केला तर तो कुणाचेही शोषण होणार नाही असा व सर्वसंमत असा असावा. पण एक नक्की की लोक त्यांना हवे तेच करतात व प्रसंगी ते कायदाही जुमानत नाहीत. एक तर ते स्वतःच्या मताने असे वागतात किंवा त्यांना असे वागायला भाग पाडणारी सामाजिक, धार्मिक वा राजकीय दहशत तरी यामागे असते. विवाहाचे वय निश्चित करताना म्हणूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व यापुढेही लागणार आहे, हे निश्चितच.
– देवीदास हरिश्चंद्र पाटील, रत्नागिरी
सरसकट एक नियम कसा लावणार?
मुलींच्या लग्नाच्या वयाचा विचार करताना आपल्या देशात सरसकट सगळ्या मुलींना एक नियम लावता येत नाही. जात, धर्म, आर्थिक परिस्थिती, शिक्षणाच्या, आरोग्याच्या सोयी-सुविधांची उपलब्धता अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. शहरी भागात या सोयीसुविधा उपलब्ध असल्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा विचार रुजला आहे. त्यामुळे लग्नाचं वयही वाढलं आहे. लग्नाच्या बाबतीत तिच्या मताचा विचार केला जातो. ग्रामीण भागात गावात शिक्षणाच्या सोयी नाहीत. आर्थिक परिस्थितीमुळे, सुरक्षिततेच्या काळजीमुळे मुलींना शिकायला लांब पाठवण्याची तयारी नसते. मुलींकडे एक ओझं म्हणून पाहिलं जातं. तिचं लग्न लौकरात लौकर उरकून जबाबदारीतून मुक्त व्हायची घाई पालकांना असते. लहान गावांमध्ये एक सामाजिक दबावही असतो.
हुंडाबंदीचा कायदा असूनही मुलीकडच्यांना लग्नाचा खर्च करावा लागतो. त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा ते लग्नासाठी साठवले जातात. यासंदर्भात समाजाची मानसिकता बदलण्याची जास्त गरज आहे.
सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारत जाते, तशी मुलांची संख्या कमी होत जाते. त्यासाठी आधी प्रत्येक व्यक्तीला रोजगार, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत.
– अंजली मुळे
थरार डोळ्यांपुढे उभा करणारा लेख
शूटआऊट या सदरातील घनश्याम भडेकर यांचा लेख फार सुंदर आहे. ते सारे थरार डोळ्यासमोर उभे राहतात. भडेकर, छायावृत्तकार म्हणून कार्यरत असताना भरलेली अनुभवांची पोतडी तुम्ही अशीच कागदावर रिती करा. लिहित रहा.
– अजित देशमुख, (निवृत्त) सहा. पोलीस आयुक्त
मन सुन्न करणारे अनुभव!
पत्रकार-छायाचित्रकारांचे जीवन ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या संज्ञेत मोडणारे असते. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची भयंकर काळरात्रच होती. त्यात हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे यांच्यासारखे जिगरबाज पोलीस अधिकारी शहीद झाले. या हल्ल्यात देशविदेशातील अनेक निरपराध नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. त्या रात्रीच्या थरारनाट्याच्या वेळी पत्रकार, छायाचित्रकार हेही पोलिसांप्रमाणेच आपले कर्तव्य व जबाबदार्या चोख बजावत होते. त्या रात्रीचे मन सुन्नं करणारे अनुभव घन:श्याम भडेकर यांनी साध्या आणि सोप्या भाषेत लिहिले आहेत. ते वाचून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. निर्भय छायाचित्रकार म्हणून गाजविलेली कारकीर्द यापुढेही जाणून घ्यायला आवडेल.
– दादा सावंत, नवीन टिळक नगर, चेंबूर, मुंबई