अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू-मंगळ वृश्चिकेत, शुक्र (वक्री) धनूमध्ये, रवी, बुध (वक्री), शनी, प्लूटो मकरेत, गुरू-नेपच्युन कुंभेत, चंद्र-मिथुनेत, त्यानंतर कर्क राशीत, सप्ताहाच्या अखेरीस सिंहेत.
दिनविशेष – १७ जानेवारी रोजी शांकभरी पौर्णिमा, २१ जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी.
विशेष सूचना – या आठवड्यात सर्वच राशींमध्ये अर्ध कालसर्पयोग होत आहे, हा काळ अनुकूल नसल्यामुळे संमिश्र स्वरूपाचे अनुभव येतील.
मेष – अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे मार्गी लागण्यास आता मदत होईल. मंगळाचे १७ तारखेचे भाग्यातील राश्यांतर धनू राशीत होत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात कामाचा पसारा वाढणार आहे. उद्योग-व्यवसायाची घडी बसण्यास चांगली मदत मिळणार आहे. लाभात असणार्या गुरू महाराजांची चांगली साथ मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळवण्यासाठी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. तसे न केल्यास हातातोंडाशी आलेली संधी हुकू शकते. प्रत्येक पाऊल सांभाळून टाका. विद्यार्थीवर्गासाठी उत्तम काळ आहे. कोणत्याही प्रकारची लिखापढी, पुरावे, कागदपत्र यांच्याशी छेडछाड करू नका, अन्यथा गोत्यात याल.
वृषभ – कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, त्यामुळे काळजी घेण्यासारखा काळ आहे. शुक्र वक्री असून तो अष्टमात आहे. बिघडलेले नातेसंबध पूर्वपदावर येतील. रोमँटिक स्वभावाला साजीशी शुक्र-मंगळाची युती झाल्यामुळे आनंद आणि उत्साह दिसेल. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी चालून येतील. त्या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करण्यात हलगर्जी करू नका. रवी-बुध-शनी-प्लूटो युतीमुळे एखादे महत्वाचे काम चुकीने किंवा गैरसमजुतीने बिघडू शकते, काळजी घ्या. अचानक धनलाभाचे योग आहेत.
मिथुन – सावधान… येत्या आठवड्यात बर्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. बुध (वक्री) अष्टमात, रवी-बुध-शनी-प्लूटो एकत्र त्यामुळे हा आठवडा धाकधूक वाढवणारा राहणार आहे. मानसिक तयारी करा आणि खंबीर व्हा. १७ जानेवारीपासून सप्तमात येणारा मंगळ-शुक्र योग थोडासा रुमानी हो जाये अशी भावदशा निर्माण करेल. मालमत्ता, जागा यासंदर्भात कायदेशीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. जुनी सरकारी येणी थकीत असतील तर त्याबाबत एखादी नोटीस येऊ शकते. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. भाग्यातील गुरू परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक ताकद देईल.
कर्क – नव्या आठवड्याची सुरुवात खर्चाने होणार असली तरी त्याचा फारसा प्रभाव जाणवणार नाही. कुठून तरी अनपेक्षित लाभ पदरात पडतील. कनिष्ठ पदावरील मंडळींनी वरिष्ठांच्या वाटेत येण्याचे टाळावे. अन्यथा अकल्पित प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. उद्योग व्यवसाय करणार्या मंडळींनी सल्लामसलतीनंतरच भाष्य करावे. खात्री केल्याशिवाय कोणताही सल्ला देण्याचे प्रयत्न करू नका. प्रवासात नवीन ओळखी होतील.
सिंह – विरोधकांबरोबर दोन हात करण्याची संधी मिळेल. शनी-बुध प्लुटोसोबत असल्यामुळे न्यायालयात प्रलंबित विषय असेल तर तो पुढे ढकला. सरकारी टेंडरवर काम करणार्या व्यावसायिकांनी व्यवहार पारदर्शक ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा आर्थिक भुर्दंड पडू शकतो. कर्ज काढले असेल तर मनस्तापाचे प्रसंग ओढवू शकतात. महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांनी नातेसंबध-मैत्री जपावी. प्रेमप्रकरणात असाल तर आधी अंदाज घ्या आणि नंतरच पुढे जा.
कन्या – ज्या क्षेत्रात काम करता तिथे चमकणार आहात. वक्ते, समालोचक यांना चांगली प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचा काळ राहील. मात्र, त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा पोटाचे त्रास उद्भवू शकतात. वैवाहिक जोडीदारसोबाबत हेवेदावे टाळा. पौर्णिमा अनपेक्षित लाभाची राहील. चतुर्थातील शुक्र-मंगळ, पंचमातील शनी-रवी-बुध-प्लूटो यामुळे मित्रांमध्ये वितुष्ट येणार नाही याची काळजी घ्या. गैरसमज दूर करून घ्या, नाहीतर अब्रूचं खोबरं होईल.
तूळ – फिरतीचा प्रवास करणारे असाल तर प्रवासात कोणाच्या स्माइलवर भुलू नका. काही मंडळी स्वतःच्या कर्तबगारीवर भुलून प्रेमात पडतील. सुखस्थानात रवी-शनी-प्लूटो-बुध (वक्री) असल्यामुळे कौटुंबिक सौख्यात बाधा येणार नाही ना, याची दक्षता घ्या. व्यवसायात मंदी जाणवेल. मालमत्तेबाबतचे विषय योग्य पद्धतीने हाताळा. पंचमातील गुरू-नेपच्युन हे योग आणि बौद्धिक क्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी खूप लाभदायक. विद्यार्थीवर्गास चांगले यश मिळवून देणारा काळ राहणार आहे.
वृश्चिक – अंगारक योगातून सुटका झालेली असली तरी द्वितीयेतील मंगळाचे राश्यांतर रोखठोक बोलण्यामुळे एखाद्या कार्यात व्यत्यय निर्माण करू शकते. परिस्थितीचे गांभीर्य आणि वेळ काय आहे, ते पाहून वागा. अजून काही काळ मनावर संयम ठेवावा लागणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. गुरूकृपेमुळे चांगली व्यावसायिक उलाढाल होईल, पैसा खेळता राहील. पत्नीकडून लाभ मिळेल. रोमान्सभरल्या आठवड्याचा अनुभव येईल. त्यामुळे खुषीत राहाल.
धनू – नोकरीत अनेक दिवसांपासून पगारवाढीच्या प्रतीक्षेत असाल तर त्याची पूर्तता या आठवड्यात होईल. उत्पनात चांगली वाढ होईल. पैसे हातात आल्यामुळे नव्या खरेदीचा मोह होईल. एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. प्रेमात पडला असाल तर होकार मिळेल. गुरू-चंद्र नवपंचम योग, शुक्र-मंगळ-चंद्र दृष्टियोग यामुळे हा आठवडा अपेक्षापूर्ती करणारा राहील. डोळ्याला दुखापत होऊ शकते. सरकारी नोकरी करणार्या मंडळींनी कामात पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे.
मकर – साडेसातीचा काळ सुरू आहे, त्यामुळे आरोग्याच्या अडचणी निर्माण होतील. भूलथापांना बळी पडू नका. व्यसनाधीनतेपासून लांब राहा. आर्थिक स्थिती चांगली राहील पण पैशाचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्या. परदेश प्रवास करण्यासाठी आर्थिक नियोजनाची गरज आहे. या ना त्या कारणामुळे खिशाला कात्री लागू शकते. प्रलोभनांपासून लांब राहा. व्यभिचारी वृत्ती टाळा.
कुंभ – कोर्टकचेरीसंदर्भातील महत्वाचे निकाल लांबणीवर पडतील. कामाच्या ठिकाणी कागदपत्रांची बनवाबनवी करू नका. उगाचच फसाल. कुटुंबाकडून चांगले सहकार्य मिळेल. अनपेक्षित लाभ मिळतील. उंची वस्तूची खरेदी होईल. नव्या घराच्या प्रतीक्षेत असाल तर योग जुळून येतील. घरातल्या छोट्यामोठ्या कुरबुरींकडे दुर्लक्ष करा. विद्यार्थीवर्गाला अपेक्षापूर्तीचा काळ राहणार आहे.
मीन – नोकरदार-भागीदारी व्यवसाय करणार्या मंडळींसाठी लाभदायक आठवडा राहणार आहे. मात्र, नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी वाट पाहावी लागेल. वरिष्ठ अधिकारी मंडळींच्या मनाविरुद्ध काम करण्याचे धाडस करू नका. अन्यथा तीव्र रोषाचा सामना करावा लागू शकतो आणि दुधाची तहान ताकावर भागवावी लागेल. व्यावसायिकांनी व्यवहार चोख ठेवावे, थकीत कराचा भरणा करून टाकावा, अन्यथा सरकारी बाबू दारात उभे राहतील. पौर्णिमा विशेष स्मरणात राहील. एखादी धार्मिक सहल घडेल.