आप्पांच्या जाण्याने या वर्षीच्या निवडणुकीत एक वेगळाच रंग भरला गेला होता. तशीही यावेळची निवडणूक आप्पांना जड जाणार असे सगळ्यांचेच ठाम मत होते; कारण राज्यात यावेळी जवळजवळ १५ वर्षांनी विरोधी पक्षाचे सरकार बसले होते. प्रत्येक निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची बनवलेली होती. ‘२५ वर्षांची आप्पांची सत्ता उलथवायचीच’ या एकाच ध्येयाने विरोधी पक्षाने गावातल्या प्रत्येक लहान मोठ्या गटामागे ताकद उभी केली होती. सर्व विरोधकांनी एकत्र येत यावेळी चांगलाच नेट लावला होता. शांतारामविषयी गावात एक सहानुभूतीची लाट अजूनही टिकून होती आणि त्याचाच फायदा राजारामला होणार हे निश्चित होते.
– – –
वडगाव तसे कायम गजबजलेले गाव. पंचक्रोशीत सगळ्यात धनवान म्हणून आणि आजूबाजूच्या दहा गावांतील सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून देखील प्रसिद्ध असे हे गाव. आज मात्र सारे गाव शांत शांत होते, रस्त्याच्या कडेकडेने जमलेले पुरुषांचे घोळके आणि बंद दुकानांच्या पायर्यावर बसलेल्या बायका याच काय ते गाव जिवंत असल्याची साक्ष देत होत्या; बाकी संपूर्ण गावावर जणू एखादे मातम पसरले असल्यासारखे वातावरण होते. अर्थात त्याला कारण देखील तसेच होते… गावचे सरपंच आणि संपूर्ण तालुक्याच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणारे अप्पासाहेब देशमुख आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निजधामी पोचले होते. बातमी बाहेर आली आणि उघडलेली दुकाने बंद झाली, बंद असलेली उघडली गेली नाहीत. संपूर्ण बाजारपेठ क्षणात शांत झाली. गावाबाहेर पडलेल्यांना अर्ध्या रस्त्यातून माघारी बोलावण्यात आले. सगळा गाव आज अप्पासाहेबांच्या टुमदार बंगल्याच्या आवारात जमा झाला होता. अशा प्रसंगात आपली हजेरी दिसणे हे प्रत्येकासाठी आवश्यक वाटावे असे कार्य होते. गर्दीत जमलेली प्रत्येक व्यक्ती काही आदरानेच आली होती असे नाही. कोणी आदराने, कोणी भीतीने, कोणी लालसेने तर कोणी मनातला आनंद मनात लपवत हजर झाले होते आणि जमलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, ’दोन महिन्यांवर आलेल्या निवडणुकांचे आता काय होणार?’
गेली २५ वर्षे अप्पासाहेब गावावर आणि तालुक्यावर एकहाती राज्य करत होते. ‘आव्हान’ असे कधी आयुष्यात त्यांना अनुभवायलाच लागले नाही. आणि जिथे ‘आव्हान’ उभे राहील असे वाटायचे, ते कारणच आप्पा समूळ नष्ट करून टाकायचे. शांताराम दुगडाचा खून अजूनही तालुका विसरला नव्हता. बावीस वर्षे झाली त्या घटनेला, पण आजही शांतारामचा खून एक कोडे बनून राहिला होता. गावात सहकारी तत्त्वावर उभ्या झालेल्या बँकेच्या कर्जवितरणात घोटाळा झाल्याचा आवाज सगळ्यात आधी उठवणारा म्हणजे शांताराम दुगड. पोल्ट्रीतल्या कोंबड्या मेल्या नाहीत, तर चोरून विकल्या गेल्या आहेत असा आरोप लावणारा शांताराम दुगड. जिल्हाधिकार्यापासून ते सहकार मंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडे न्यायाची मागणी नेणारा शांताराम दुगड आणि अमावस्येच्या एका रात्री स्वत:च्या शेताच्या बांधावर चार तुकड्यात सापडलेलाही शांताराम दुगडच!
शांताराम दरोडेखोरांच्या हल्ल्यात मारला गेल्याच्या बातम्या झाडून सगळ्या वर्तमानपत्रात छापून आल्या. शांतारामच्या न्यायप्रियतेचे, प्रामाणिकपणाचे आणि अन्यायाविरुद्ध दंड थोपटण्याचे कौतुक करत अप्पासाहेबांच्याच हस्ते गावात बस स्टँडवर ‘कै. शांताराम दुगड वाचनालय’ उभे राहिले आणि त्या उभ्या राहिलेल्या वाचनालयाखाली आप्पासाहेबांच्या प्रत्येक विरोधकाचे धाडस देखील गाडले गेले. त्या दिवसापासून ते आजपर्यंत आप्पांच्या शब्द हा गावासाठी शेवटचा शब्द बनला. गावाच्या विकासासोबत आप्पांचाही विकास ओघाने होतच गेला. तालुक्याच्या राजकारणात देखील आप्पांच्या शब्दाला वजन आले. कोणत्याही पक्षाच्या वळचणीला आप्पांनी कधी स्वत:ला बांधून घेतले नाही, पण सोयीचे राजकारण मात्र प्रत्येक वेळी केले. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, नवीन मुख्यमंत्र्याला काही ना काही कारणाने आप्पांनी गावात आणले नाही, असे आजवर कधी झाले नाही. आप्पांच्याच छायेत आज देशमुखांची पुढची पिढी देखील तयार झाली होती. किरण देशमुख हा आप्पांच्या मुलगा आज उपसरपंच तर पुतण्या राजेश हा ग्रामसेवक बनला होता. राजेशची बायको तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील निवडून आली होती. अशा वातावरणात ‘आता आप्पांच्या खरा वारसदार कोण?’ या चर्चेला ऊत आला नसता तरच नवल..
आप्पांच्या जाण्याने या वर्षीच्या निवडणुकीत एक वेगळाच रंग भरला गेला होता. तशीही यावेळची निवडणूक आप्पांना जड जाणार असे सगळ्यांचेच ठाम मत होते; कारण राज्यात यावेळी जवळजवळ १५ वर्षांनी विरोधी पक्षाचे सरकार बसले होते.
प्रत्येक निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची बनवलेली होती. ‘२५ वर्षांची आप्पांची सत्ता उलथवायचीच’ या एकाच ध्येयाने विरोधी पक्षाने गावातल्या प्रत्येक लहान मोठ्या गटामागे ताकद उभी केली होती. सर्व विरोधकांनी एकत्र येत यावेळी चांगलाच नेट लावला होता. पोपट पवार, आबा राणे अशा ज्येष्ठ पक्षनेत्यांबरोबरच, सुदाम पवार, तेजा राक्षे अशी तरूण मंडळी देखील दंड थोपटत एकत्र आली होती. मुख्य म्हणजे विरोधी गटाने यावेळी सरपंचपदासाठी शांतारामचा मुलगा राजाराम दुगड याला आप्पांच्या गटासमोर उभे केले होते. शांतारामविषयी गावात एक सहानुभूतीची लाट अजूनही टिकून होती आणि त्याचाच फायदा राजारामला होणार हे निश्चित होते.
शांतिदूत पक्षाच्या कार्यालयात विरोधकांची तातडीची बैठक भरली होती. तेजा राक्षेने सगळ्यांना फोन करून घाईघाईने बैठकीला बोलावले होते आणि आता तोच गायब होता. हा हिरा गेला कुठे अशी चर्चा चालू असतानाच तेजाचे आगमन झाले.
‘माफी माफी मंडळी… यायला उशीर झाला. काम खूप महत्त्वाचे आणि खाजगी असल्याने फोनवर बोलता आले नाही. इथेच बोलावले मग सगळ्यांना..’
‘अरे, पण अशी अर्जन्सी तर काय होती? त्या आबाची राख अजून गरम असंल आणि अशात ही मीटिंग कशाला? उगा गावाच्या नजरेत येतं ना..’
‘आबा, अहो कामच तसे होते म्हणून बोलवायला लागले सगळ्यांना. बजाबांनी आप्पांच्या बंगल्यावरची बातमी आणलीये… आप्पाच्या घरात सरपंचपदावरून धुसपूस चालू झालीये म्हणे..’ तेजाचे वाक्य संपले आणि कार्यालयात एकदम शांतता पसरली. काय बोलावे हेच कोणाला समजेना.
‘आप्पाचे घर राजकारणात होते पण त्यांनी घरात कधी राजकारण शिरू दिले नाही. अन आज आप्पाला मरून दोन दिवस नाही झाले तर…’ आबा पडत्या आवाजात म्हणाले.
‘जे होतंय ते आपल्या फायद्याचेच आहे आबा. दोघात फूट पडली तर आप्पांच्या माणसांची ताकद आपसूकच दोन गटात वाटली जाणार. जुने-जाणते कोणाचीच बाजू न घेता स्वस्थ बसणार. सगळ्या परिस्थितीत फायदा आपलाच असणार आहे ना?’
‘बरोबरे तुझे तेजा, अरे पण आपल्या असे किती लोक निवडून येतील असे वाटतंय तुला? आपण जोर तर लावलाय खरा, पण स्वत:च्या किंवा गटाच्या ताकदीवर निवडून येतील असे किती लोक आहेत असे वाटते तुला? मी अन पोपटराव तर दरवर्षीप्रमाणे आमच्या जागा राखू. राजारामला पण संधी मिळेल असे वाटते. तुझे अन सुदामाचे अजून तळ्यात मळ्यांत आहे. महिलांच्या राखीव सीटवर अजून धड उमेदवार सापडेना आपल्याला. त्यात आप्पाच्या जाण्याने त्याच्या घराला सहानुभूती मिळेल ती वेगळीच. बेणं जाताना पण आपली वाट लावून गेलंय!’
‘हे बघा आबा, तुम्ही उगाच हातपाय गाळू नका. अहो तुम्ही वडीलधारे असे गळपटले तर इतरांचे काय? मी काय सांगतो ते ऐका, मी व्यवस्थित माहिती काढली आहे. किरण उपसरपंच आहे आणि आप्पांच्या मुलगा पण; त्यामुळे सरपंचपदासाठी त्यालाच उभे करायचा विचार चालू आहे. शेवटी सरपंच पण जनताच निवडणार आहे. तर ‘आप्पांनी आपल्याला सरपंच बनवण्याचा शब्द दिला होता’ असा त्यांच्या पुतण्याचा, राजेशचा दावा आहे. राजेशला त्यांच्या गटातल्या पाच, सहा लोकांनी समर्थन देखील दिले आहे आणि त्याचा दावा खरा असल्याचे देखील ठामपणे सांगितले आहे.’
‘हम्म! कोणाच्या मागे कोण उभे आहे, हे एकदा स्पष्ट होऊ दे! मग पुढची पावले उचलता येतील,’ पोपटराव शांतपणे म्हणाले आणि बैठकीतला प्रत्येकजण डोक्यात वेगवेगळ्या विचारांचे भुंगे घेत बाहेर पडला.
– – –
‘राजाराम तुझे मत काय आहे?’
‘हे पहा आबा, मला राजकारणातले काही कळत नाही. तुम्ही थोरा मोठ्यांनी भर घातली आणि बापाची शपथ घातली म्हणून मी या लढाईत उतरलो आहे. माझे स्वत:चे असे काय मत असणार? आणि मला कळतंय काय त्यातलं? तुम्ही सगळे ठरवाल तसे होईल.’
‘असे नाही राजारामा. हे बघ, ज्याचा खून अप्पासाहेबांनी केला; अशी सगळ्या गावाची खात्री आहे त्या शांताराम दुगडाचा मुलगा म्हणून आम्ही तुला त्याच्याविरुद्ध रिंगणात उतरवले. आता त्याचाच पुतण्या आपल्या गटात यायचे म्हणतोय. तुझ्या मनाला पटणार आहे का हे? शेवटी गावाला चांगले दिवस यावे अन सत्ता सर्वत्र वाटली जावी हेच आपले खरे ध्येय आहे. पण तुला दुखावून असे काही करायची आमची इच्छा नाही!’
‘असे कसे म्हणता पोपटकाका? तुम्ही थोरले, तुम्ही ठरवाल ते योग्य-अयोग्य विचार करूनच ठरवाल. आप्पा तर आता गेले. ते होते तेव्हा पण माझ्या मनात त्यांच्याविषयी राग नव्हता, राग आला असता तरी काही करायची हिंमत होती.’
‘तेजा.. तू बोल आता.’
‘मंडळी, काल नामदेवला पाठवून आप्पांच्या पुतण्याने राजेशने माझ्याकडे एक प्रस्ताव मांडला आहे. राजेश त्यांच्या गटातले सात लोक घेऊन आपल्याकडे यायला तयार आहे. मात्र राजेशसकट त्या आठही लोकांना तिकीट द्यावे लागेल. राजेश धरून बरोबरचे सहा लोक गेल्या दोन खेपेपासून सलग निवडून येत आहेत. ते यावेळी पण सहज जिंकणार हे नक्की आहे. त्यातून आपला पाठिंबा आणि आपल्या हक्काच्या मतदारांची मते पण त्यांना मिळाली, तर मग तर त्यांना ब्रम्हदेव पण हरवू शकत नाही. आपल्याकडे आरक्षित महिलासाठी उमेदवार मिळता मिळत नाहीये; तिथे राजेशच्या गटातल्या रेखा गायकवाडला उभे करता येईल. मी, आबा आणि पोपटतात्या आणि सुदामा हे तर निवडून येणार म्हणजे येणारच. जर यावेळी ताणून जोर लावला, तर आपली १२ ते १३ सीटं तर हमखास येणार म्हणजे येणारच! यावेळचा सरपंच राजारामला होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही!’
बैठकीत बराच वेळ शांतता होती. शेवटी पोपटरावांनी मुद्द्याला हा घातला.
‘पण येणारे सगळे आपल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत का?’
‘हो काका. जाहीरपणे आपल्या गटात प्रवेश करून, सदस्यत्व घेऊन, आपल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. राजेश तर म्हणतोय, ’तुम्ही लोकं फक्त त्या किरणला गाडायला मला मदत करा. महिन्याभरात त्याच्याकडून निवडून आलेले पण इथे आणतो फोडून. पुढची पंचवीस काय, पन्नास वर्ष दुगडांच्या पॅनलला गावात कोणी विरोधी उरणार नाही!’
‘मंडळी, राजेश तसा भला माणूस आहे. आप्पासाठी जीव टाकायला मागे-पुढे कधी त्याने पाहिले नाही. असा माणूस स्वत:हून आपल्याकडे येत असेल, सगळे नियम-अटी मान्य करत असेल, तर मला तर यात मोडता घालण्यासारखे काही वाटत नाही. राजेशला ग्रामपंचायतीची रेषा अन रेषा माहिती आहे. इथले कायदे, नियम तो व्यवस्थित जाणून आहे. आपल्याला त्याचा या निवडणुकीत भरपूर फायदा होईल!’
सर्वांनीच आबांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि राजेशसाठी दुगड गटाचे दरवाजे मोकळे झाले. दोनच दिवसांत राजेश आणि त्याच्या सहकार्यांनी नव्या गटात प्रवेश केला आणि राजाराम व त्याच्या गटाच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले. राजेशच्या या निर्णयाने गावातले वातावरण चांगलेच तापले होते. कधी नाही ते गावात उघड उघड तीन गट दिसायला लागले होते. आप्पांशी एकनिष्ठ असा गट राजेशच्या वर्तनाने अत्यंत चिडला होता. ’जो स्वत:च्या कुटुंबाचा झाला नाही, तो गावाचा काय होणार?’ या आप्पांच्या गटाने चालू केलेल्या प्रचाराने तर या लोकांची डोकी अजून भडकवली होती. दुसरा गट राजारामसाठी सॉफ्ट
कॉर्नर बाळगून होता. राजाराम निवडून आलाच पाहिजे आणि शांतारामच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे अशी त्यांची ठाम भावना होती. आप्पांच्या एकछत्री अमलाला देखील कंटाळलेले अनेक गावकरी या गटात सामील होते. तिसरा गट मात्र अजूनही कोणाकडे झुकावे या प्रश्नात अडकला होता. काहींना राजारामच्या नव्या नेतृत्वाची भुरळ पडली होती, काहींना किरणमध्ये आप्पांची छबी दिसत होती, तर काहींना ‘गावाचा विकास’ हा मुद्दा महत्त्वाचा वाटत होता. हा तिसरा गट आप्पा आणि दुगड दोन्ही गटांसाठी निर्णायक ठरणार होता असे वाटत होते.
ऐन तिकीटवाटपाच्या वेळी किरणने सैन्यात लढताना शहीद झालेल्या अर्जुन कोळीच्या बायकोला रखमाला अन स्वत:च्या आईला देखील रिंगणात उतरवले अन निवडणुकीत खरा रंग भरला. ह्या दोन्ही सीट डोळे झाकून येणार हे सांगायला पोराटोरांची देखील गरज नव्हती. किरणच्या या निर्णयाने दुगड गटात एकच खळबळ माजली. सरपंचपदासाठी देखील किरणने आईसाहेबांना उभे केले तर मग सगळा खेळच संपणार होता. त्यात दुगड गटाचे नक्की सभासद निवडून येतील किती याचा देखील ठोस अंदाज येत नव्हता. आता सगळी भिस्त राजेश आणि त्याच्या सहकार्यांवर होती. आईसाहेब उभ्या राहिल्या आणि राजेशच्या मनात चलबिचल सुरू झाली. किरणविरुद्ध दंड थोपटायला त्याला सहज जमले होते, पण लहानपणापासून जिच्या अंगाखांद्यावर खेळलो, त्या आईविरुद्ध कसे लढायचे? त्याची ही चलबिचल आबा आणि पोपटरावांनी बरोबर ओळखली होती. त्यांनी संध्याकाळी राजेशला बोलावून घेतले आणि थेट त्याच्या काळजाला हात घातला.
‘राजेश, तुझी अडचण आम्ही समजू शकतो. आम्ही शेवटी बोलून चालून बाहेरची माणसं. पण आजवर ज्यांच्याशी एकनिष्ठ राहिलास, तेच तुझा अधिकार नाकारत असतील; तर तुला तो लढूनच मिळवावा लागणार. आईसाहेबांना देखील निवडणुकीत उतरायची इच्छा नव्हती, पण शेवटी पोरावरच्या मायेने विजय मिळवला. गावातले वातावरण मिनिटामिनिटाला बदलते आहे. आज तुझ्या जिवावर आम्ही सगळ्यांनी येवढी मोठी उडी मारली आहे. दोन्ही पक्षांनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. आप्पाची जिरवायची हाच इरादा यावेळी सगळ्यांनी नक्की केला होता. आता तो सत्यात उतरायची वेळ जवळ आलीये. आता अशा मोक्याच्या क्षणी मागे हटू नकोस! आम्ही विरोधी गटातले असलो, तरी तेव्हाही आप्पाचा वारसदार आम्ही तुझ्यातच बघत आलोय. अगदी गावातल्या प्रत्येकाला हेच वाटते. आप्पाचा वारसा कोण चालवू शकेल तर तो फक्त राजेश!’
राजेश बराच वेळ शांत बसून होता, पण त्याच्या चेहर्यावरची खळबळ स्पष्ट दिसत होती. शेवटी काही एक निश्चयाने तो ताडकन उभा राहिला. ‘आबा, पोपटकाका मला एकच सांगा, तुमच्यासाठी महत्त्वाचे काय आहे? राजाराम दुगडाचे निवडून येऊन सरपंच होणे का आप्पांच्या गटाला धूळ चारणे?’
दोघेही म्हातारे काही क्षण एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिले. ‘राजाराम सरपंच झाला की, आप्पाच्या गटाला धूळ चारलीच म्हणायची की आपण,’ पोपटराव बोलले.
‘फक्त सहानुभूतीवर राजाराम निवडून येईल असे तुम्हाला वाटते? ते पण आता आप्पा वारल्यानंतर?’ राजेशचा प्रश्न बोचरा होता, पण खरा होता. आप्पांच्या जाण्याने आप्पा विरुद्ध शांताराम दुगडाचा मुलगा हा कलगीतुराच संपुष्टात आला होता. राजारामसाठी म्हणून एकटवू शकणारे मतदार आता आप्पांच्या निधनानंतर पांगायला लागले होते हे देखील खरे होते.
‘तुझ्या डोक्यात तरी काय आहे राजेश?’
‘तुमच्या दोघांच्या निवडून येण्याबद्दल कोणताच वाद नाही. तुमच्या जागा पक्क्या आहेत. माझ्याबरोबर आलेल्यांना ‘गद्दार’ म्हणून झोडपलं गेलंय. त्याचा परिणाम कदाचित एकदोन जागांवर होणार हे नक्की. राजाराम आणि तेजा राक्षेच्या जागांवरच आपल्याला भीती आहे. तालुक्यात बारमध्ये झालेल्या भांडणाच्या बातमीने तेजाचे नाव खराब झालंय अन राजारामच्या मागे आता पहिल्याएवढी मते असतील का? ही शंका आहे.’
‘मग तुझे मत काय आहे?’
‘राजारामच्या चेहर्याची तर आपल्याला गरज आहेच. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तो यशस्वी झाला, तर सगळेच प्रश्न सुटतील.’
‘कोणता प्लॅन?’
‘तेजाला मागे ठेवायचे, अन त्याच्या जागेवर राजारामला उभे करायचे. राजारामच्या जागेवर माझी बायको प्रतिभा उभी राहील. गावची मते एकहाती फिरवायची अन आईसाहेबांच्या सहानुभूतीच्या लाटेला थोपवण्याची ताकद फक्त माझ्या बायकोत आहे. माझ्यात देखील नाही!’
रात्री उशिरापर्यंत कार्यालयात चर्चा सुरू होती. कधी स्वर तापत होते, तर कधी कुजबूज होत होती. शेवटी रात्री एकच्या सुमाराला चर्चा शांत झाली. हो-ना हो-ना करता करता शेवटी सर्वांनी राजेशच्या प्रस्तावाला मान्यता दिली. एकदा का सरपंच आपल्या गटाचा बसला की तेजाच्या मित्राला ग्रामपंचायतीचे बांधकामाचे ३० टक्के ठेके दिले जातील असा शब्द त्याला देण्यात आला आणि त्याचाही चेहरा फुलला. तरुणाईचा जोष दाखवायचाच आहे, तर पोपटरावांच्या जागी यावेळी त्यांच्या मुलाला उभे करावे, असे प्रतिभाने सुचवले आणि ते देखील एकमताने मान्य झाले. आता प्रतीक्षा होती, ती मतदानाची आणि निकालांची!
– – –
पक्षकार्यालयात नुसती धामधूम उडाली होती. गुलालाने रंगलेला नाही असा एक चेहरा सापडणे मुष्किल होते. राजेशच्या बुद्धिचातुर्याने आज आप्पासाहेबांच्या गटाची २५ वर्षाची सत्ता उलथवून टाकण्यात विरोधकांना यश आले होते. प्रत्येकाच्या चेहर्यावर राजेशविषयीचे कौतुक स्पष्ट वाचता येत होते. सरपंचपदासाठी सर्वसंमतीने प्रतिभाचे नाव निश्चित करण्यात आले आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. राजेशने चार शब्द बोलावे अशी विनंती झाली आणि तो उभा राहिला.
‘मित्रांनो, आज काय बोलावे हे सुचत नाहीये. आप्पासाहेब गेले आणि माझ्या आयुष्यातच नाही, तर गावच्या संपूर्ण राजकारणाचे वारे फिरले. तशी देखील ही निवडणूक आप्पांना जड जाणार याचा अंदाज मला आलेला होताच. गावात आप्पांच्या एकछत्री अंमलाविरुद्ध आणि घराणेशाहीविरुद्ध एक सुप्त लाट होती आणि ती मतदानाच्या रूपाने अक्राळविक्राळ पूर आणून सगळे उद्ध्वस्त करणार याची देखील मला खात्री होती. विरोधकांची ’आप्पाची जिरवायची हाच इरादा’ हे वाक्य कुठेतरी सलत होते… बोचत होते.’ बोलता बोलता राजेशने सगळ्यांवर नजर फिरवली. प्रत्येकाच्या नजरेत उत्सुकता दाटलेली होती. ‘मग विचार केला की, ही लाट यावेळी आप्पांच्या गटाला बुडवणार हे नक्की! मी काय किंवा किरण काय कोणीही या लाटेविरुद्ध दंड थोपटू शकणार नाही. अशा अडचणीच्या वेळी सत्तेत यायचे तर फार सावधपणे फासे टाकावे लागणार होते. सत्ता मिळाली, तरी विरोधक शिरजोर राहणार हे देखील नक्की होते. सत्तेची खुर्ची मिळवायची तर फार मोठा जुगार खेळावा लागणार होता, सर्वस्व पणाला लावावे लागणार होते. मग विचार केला, आयुष्यातला एवढा मोठा जुगार खेळणारच आहोत तर, सत्तेबरोबरच विरोधकांची खुर्ची देखील मिळवली तर काय धमाल होईल? तेही त्यांच्याच पैशाने आणि त्यांच्याच प्रचाराने. ‘आप्पांच्या चार पावलं पुढे आप्पांची पिढी निघाली’ असे कौतुक ऐकायला कोणाला आवडणार नाही? बरोबर ना रे दादा?’ दारातून हार घेऊन आत येत असलेल्या किरणकडे पाहत राजेशने आपले वाक्य पूर्ण केले आणि अचानक उडालेल्या गदारोळात छातीतली कळ दाबत खाली कोसळलेल्या पोपटरावांना सावरायचे भान देखील कोणाला राहिले नाही…