कार्यक्रम एकदाचा संपला आणि त्या सुंदर ललनानी माझ्याभोवती गराडा घातला आणि ‘सोनारजी, तुम्ही सुंदर बोलता, काय सुंदर चित्रं काढता, एवढ्या सुंदर बायका तुम्हाला कुठे भेटल्या? काय सुंदर कार्यक्रम झाला. असा कार्यक्रम याआधी आम्ही एन्जॉय केला नाही,’ असं काहीबाही म्हणू लागल्या. मी उचकून म्हणालो, अहो पण मला कुणीही मनसोक्त हसताना दिसलं नाही. एक पोक्त बाई पुढे येऊन म्हणाल्या, सोनार साहेब, खी खी करून तोंड वेंगाडून हसायला आम्ही पुरुष नाही… आम्ही चित्रे व विनोद मनसोक्त एन्जॉय करत होतो. हसत होतोच, मात्र गालातल्या गालात…
– – –
एकीकडे दिवाळी अंकांतून मदमस्त व्यंगचित्रे रेखाटत असताना ‘तिरक्या रेषा, हसरे बाण’ हा माझा हा व्यंगचित्र प्रात्यक्षिके व विनोदांनी भरलेला एकपात्री प्रयोगही छान जोरात चालू होता. त्याआधी व्यावसायिक स्तरावर असा कार्यक्रम झालेला नव्हता. कोल्हापूर ते नागपूर, मुंबई ते सोलापूर, पुणे ते सांगली… थोडक्यात महाराष्ट्रभर लोकांना मनमुक्त हसवीत होता. मिनिटा-मिनिटाला पंचेस. मिनिटात व्यंगचित्र रेखाटले जाई. प्रेक्षकांपैकी एखाद्याचे काही मिनिटांत कॅरिकेचर किंवा प्रेक्षकांनी मारलेल्या वेड्यावाकड्या रेषेवर काढले गेलेले अतिशय खुसखुशीत कार्टून श्रोत्यांना अचंबित करी.
अनेक कॉलेजेसमध्ये याचे रिपीट कार्यक्रम झाले. कारण काय, तर अनेक कॉलेजांत गॅदरिंगमध्ये गुंडागर्दी होई. ८०-९०चे ते दशक- मोबाइल्स नव्हते, टीव्ही प्रगत नव्हता. अनावर दौडणार्या बाइक्स आणि तोंडावर फडके लावून स्कुटी हाकणार्या मुली नव्हत्या. मुलींना चोरून चिठ्ठ्या-चपाट्या देण्याचे ते दिवस. कितीही श्रेष्ठ-ज्येष्ठ लेखक वा वक्ता आला तर मुले त्यांची भंबेरी उडवीत. अशा ठिकाणी मला बोलावीत आणि प्रिन्सिपॉल, स्टाफ निर्धास्त होई. स्टेजवर आल्यावर समोरच्या मुलामुलींना मी सांगे, ‘तुमचे प्रिन्सिपॉल म्हणालेत, आमची काही मुले खोड्याळ आहेत. त्या मुलांना मी चॅलेंज देतो. स्टेजवर येऊन ईझलवरील पेपरवर अशी रेष मारा अगदी कशीही, ज्यावर मला चित्र काढता येणार नाही!’
मग काय… मुलींवर भाप मारणारे हूड तरूण बोर्डवर रेष मारायला येत. समोरचा क्राऊड पाहून त्यांचा हात थरथरे. तिथे मी पंच टाकी, बघा बघा, कागदावर साधी रेष मारायची तरी याचा हात थरथरतोय, पण पोरीवर ‘लाइन’ मारायला सांगा… यावर प्रचंड हास्यस्फोट होई. पोरगा ओशाळून कशीबशी रेष मारून सटके. त्या रेषेतून मी मिनिटांत सुंदर तरुणी रेखाटी. प्रचंड टाळी मिळे. चारदोघांची अशी धुलाई केली की पुढचा कार्यक्रम खदखदून हसण्यात संपे.
एका कॉलेज कार्यक्रमात महाभारतावर पीएचडी केलेले विद्वान अध्यक्ष होते. त्यांच्या भाषणानंतर माझा कार्यक्रम होता. महाभारतावर त्यांनी आढ्यतेचा बाज सांभाळीत उत्तम पण रटाळ भाषण केले. तेही फिरकीबाज कॉलेजिअन्ससमोर. भाषणानंतर एका तरुणीने बोट वर केले आणि म्हणाली, सर, एक प्रश्न विचारू…. प्लिज १०० कौरवांची नावे सांगा ना…? पीएचडी सरांना घाम फुटला. खूप वेळ ते एकट्या दुर्योधनाच्या मागे लपून बसले. ज्यांना नावे हवीत त्यांनी माझ्याशी नंतर संपर्क साधावा असे म्हणत त्यांनी आवरते घेतले.
नॉन करप्ट व अत्यंत शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे अरविंद इनामदार हे पीटीसीचे (पोलीस ट्रेनिंग सेंटर नाशिक) प्राचार्य होते. तिथे कॅडेट्ससाठी ते अनेक व्याख्यान आयोजित करीत. काव्य, शास्त्र, विनोद यावर जास्त भर असे. हेतू असा की कॅडेट्सना पोलीस खाक्याबरोबर इतर क्षेत्राचेही ज्ञान असावे, त्यांनी ज्ञानी गुणी विद्वज्जनांपुढे विनम्र व्हावे. तिथे माझा कार्यक्रम पाचशे कॅडेट्ससमोर झाला, जे नंतर मोठे ऑफिसर्स झाले, पण मी हसविलेले विसरले नाही. नंतर अनेकांनी तसे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात करतानाच मी त्यांना बजावले, कडक प्राचार्यांना घाबरुन हसू दाबू नका, मनमोकळे हसा, टाळ्या वाजवा, कारण कार्यक्रम त्यांनीच ठेवला आहे. यावर पोरं खदखदून हसली. कार्यक्रमात बायको जमातीवर मी अनेक ‘पंच’ टाकले. समारोप भाषणात इनामदार म्हणाले, सोनार साहेबांच्या धाडसाचं खूप कौतुक वाटलं. आम्ही पोलीस इतरांसाठी वाघ असतो, पण बायकोपुढे शेळी होतो. सोनार साहेबांनी सौ. सोनारांच्या समोर त्यांच्या फिरक्या घेतल्या! यावर टाळ्या पडल्या. मी मध्येच उभं राहून म्हटले, माझ्याभोवती एवढे प्रचंड पोलीस प्रोटेक्शन असताना घाबरायचं कशाला? क्वचित आलेली संधी कधीच सोडायची नसते!’ यावर डबल टाळ्या पडल्या.
मुंबईला एकदा माझीही फजिती झाली. हिंदू कॉलनीत माझे व्यंगचित्रकार मित्र वसंतराव गवाणकर रहात. तेथील एक महिला मंडळ दरवर्षी स्नेहसंमेलनात मनोरंजनाचे कार्यक्रम घेई. वसंतरावांनी माझे नाव सुचविले व त्यांनी मला निमंत्रित केले. कार्यक्रम सुरू झाला. सहसा माझ्या पहिल्या एकदोन चित्रांतच मी बाजीगर होत असे. दोन, चार, सहा चित्रे काढली, विनोद केले; समोरच्या हायफाय भगिनी एकदाही हसल्या नाहीत. चौकार-षटकार ठोकणारा मी अस्वस्थ झालो. कार्यक्रम एकदाचा संपला. मी हुश्श करून खुर्चीवर बसलो आणि हा हा म्हणता त्या सुंदर ललनानी माझ्याभोवती गराडा घातला आणि ‘सोनारजी, तुम्ही सुंदर बोलता, काय सुंदर चित्रं काढता, एवढ्या सुंदर बायका तुम्हाला कुठे भेटल्या? काय सुंदर कार्यक्रम झाला. असा कार्यक्रम याआधी आम्ही एन्जॉय केला नाही,’ असं काहीबाही म्हणू लागल्या. मी उचकून म्हणालो, अहो पण मला कुणीही मनसोक्त हसताना दिसलं नाही. एक पोक्त बाई पुढे येऊन म्हणाल्या, सोनार साहेब, खी खी करून तोंड वेंगाडून हसायला आम्ही पुरुष नाही… आम्ही चित्रे व विनोद मनसोक्त एन्जॉय करत होतो. हसत होतोच, मात्र गालातल्या गालात…
जेवण वसंतराव गवाणकरांच्या घरी होते. जेवताना मी घडलेला किस्सा सांगितला. वसंतराव महामिस्किल. ते म्हणाले, तुमचे नशीब, कार्यक्रम पूर्ण तरी झाला. याआधी अनेक जण अर्धवट कार्यक्रम टाकून गायब झालेत. व. पु. काळे यांचा एक किस्सा सांगतो. वपुंचे कथाकथनाचे कार्यक्रम दोनतीनदा येथे झाले होते. महिला मंडळ एकदा म्हणाले, वपु यावेळी वेगळं काहीतरी ऐकवा गडे… वपु पाघळले, म्हणाले, मी बर्यापैकी गातो. चालेल ना? वा वा, चालेल ना! स्त्री मंडळ खुशीने म्हणालं. काय&क्रमाला वपु मलमली झब्बा, वर वेल्वेटचे जाकीट, शाल खांद्यावर घेऊन गायला बसले. दोन चार गाणी बर्यापैकी पार पडली. ते म्हणाले, आता गुळाच्या गणपतीतील पं. भीमसेनजींचे ‘इंद्रायणी काठी’ गातो. बायकांनी संमतीच्या टाळ्या वाजवल्या. गाणं तसं अवघड, पण वपुंनी पेललं. कडाडून टाळी पडली. वन्समोअरची मागणी झाली. ते खूप खुश झाले, पुन्हा ताना घेत त्यांनी दुसर्यांदा म्हटले. पुन्हा वन्समोअरची मागणी झाली. वपुंना शंका आली. खरंच का तुम्हाला गाणं इतकं आवडलं? त्यांनी विचारलं. पैठणीतल्या एका आजीबाईंनी त्यांना म्हटलं, वपुजी, जोवर तुम्ही चालीत गात नाही, तोवर आम्ही वन्समोअर देणार आहोत… चालू द्या… (हा किस्सा किती खरा, किती खोटा, हे गवाणकर, वपु व खट्याळ महिलाच जाणोत.)
कोल्हापूरचे डॉ. अविनाश जोशी, रवींद्र उबेरॉय, गोकुळचे अरूण नरके यांच्यामुळे ‘आम्ही रसिक मित्रमंडळा’तर्फे कोल्हापूरला चारपाच कार्यक्रम झाले. शिवाजी महाराजांचे देखणेपण, धडधाकट मर्दानीपण महाराष्ट्राला दाखवणारे चंद्रकांत मांढरे व भाऊ सूर्यकांत हे शेजारी शेजारीच राहात. दोघेही देखणे होते, अभिनय व प्रकृतीने दांडगे होते, मात्र अत्यंत सत्त्वशील, सहृदय होते. चंद्रकांतजी उत्तम चित्रकार होते. लँडस्केप्स अप्रतिम करीत. त्यांना भेटायला उत्सुक होतो. एका सकाळी दहाच्या दरम्यान त्यांची निसर्ग आर्ट गॅलरी पहायला रवींद्रजींबरोबर त्यांच्याकडे गेलो.
ते ऐसपैस वाड्यात राहात. चित्रगॅलरी आणि वाडा त्यांनी नंतर सरकारला अपूर्ण केला, जी आजही स्थित आहे. चंद्रकांतजी तेव्हा साठीचे असावेत. सौम्य चेहरा, धडधाकट बांधा, शुभ्र धोतर, त्यावर पांढरीशुभ्र बंडी, गळ्यात काळा दोरा, उजव्या मनगटात चांदीचे कडे. मी नमस्कार केला, ओळख दिली. ते मंदसे हसले. त्यांना नाव बहुदा माहित नसावे. ‘चला, वर माडीवरच जाऊ!’ त्यांच्या मागोमाग गेलो. छोट्यामोठ्या फ्रेम्समध्ये वॉटरकलरमध्ये केलेली प्रसन्न लँडस्केप, स्टम्प्स पावडरमध्ये केलेली दोन-चार पोर्टेट्स, जे कॅमेर्याचे फोटोग्राफ्स वाटावेत इतके बेमालूम. लँडस्केप पन्हाळ्याच्या आसपासची, निसर्गरम्य. एकेका लॅण्डस्केपची ते माहिती देत होते. कालच्या राजबिंड्या शिवाजी महाराजांना मी निरखीत होतो. दाराआडून क्षणभर त्यांच्या गोर्यापान पत्नी डोकावल्या. त्या क्षणभरातही त्यांचा घरंदाजपणा जाणवला. वाकून पायांना स्पर्श करीत मी म्हणालो, ‘दादासाहेब, रात्री माझा व्यंगचित्र प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम शाहू स्मारकात आहे. आपणास निमंत्रण द्यायला आलो आहे. आपण आलात तर खूप आनंद होईल!
‘आताशा मी कार्यक्रमांना जात नाही, पण पाहतो,’ असे म्हणत त्यांनी मला छातीशी घेऊन थोपटले. क्षणभर शिवाजी महाराजांचा मला भास झाला, कृतकृत्य वाटले…
सातला सुरू झालेला कार्यक्रम साडेआठ वाजता संपला. जाणकार रसिक श्रोत्यांपुढे कार्यक्रम करताना तो उत्तमच रंगतो. चंद्रकांतजी सपत्नीक पहिल्या रांगेत बसले होते. कार्यक्रम संपल्यावर मी खाली उतरलो. माझी पत्नी अनुराधाही तेथे आली. आम्ही दोघांनी त्यांना व बाईसाहेबांना वाकून नमस्कार केला. प्रसन्न चेहर्याने ते म्हणाले, ज्ञानेश, या व्यंगचित्र कलेची नवलाई मी प्रथमच पाहिली. मी थक्क झालो. चित्रांचे कौतुक करावे की तुमच्या विनोदी शैलीचे, समजत नाही.’
दादासाहेब, तुम्ही तर प्रत्यक्ष शिवाजी महाराज उभे केलेत. त्यांचे संवाद किती तोलामोलाने किती ताकदीने व सहजतेने ऐकवले.
‘अहो, ते लेखकाने लिहिलेले, आमची फक्त पोपटपंची!’ त्यांच्या बोलण्यातला सहजभाव विनम्रता जाणवली. त्यांचे लक्ष अनुराधेकडे गेले. मी ओळख करून दिली.
ते हसले व उद्गारले, ‘अच्छा, आता समजले, तुमच्या चित्रांतली तरुणी इतकी देखणी कशी…’ लाजलेल्या अनुलाबाईंनी हसत हळूच थोपटले.
…नाशिकच्या ताज हॉटेलात एका हाय फाय क्लबची कॉन्फरन्स होती. पुरुष मीटिंगमध्ये व्यग्र तर बायकांमुलांसाठी मनोरंजनाचे काय&क्रम होत होते. क्लबच्या काही सुंदर ललना माझ्या घरी आल्या. एकीने विचारले, ‘आपला कार्यक्रम हवा आहे याल का?’
‘येईन.. पण मी मानधन घेतो इतके इतके…’
‘सर, आनंदाने देऊ. गाडी पाठवतो!’
गाडी व ड्रायव्हर आहे माझ्याकडे, उद्या पाचला येतो. ठरल्यावेळी ताजला गेलो. एका हॉलमध्ये उंची साड्या, गळाभर दागिने ल्यायलेल्या तीस चाळीस बायका, त्यांची मुले दाटीवाटीने बसली होती. मुले असली की कार्यक्रमात त्यांच्याजोगी चित्रेही काढत असे. कार्यक्रम सुरू झाल्यावर हशाटाळ्यांचा गजर ऐकून सुटाबुटातली पुरुष मंडळीही गोळा झाली. सगळे खूश झाले. ‘चला सर, हॉलमध्ये बसू!’ एक सदस्य म्हणाले. चमचमणार्या झुंबरांच्या प्रशस्त, भव्य हॉलमध्ये बसलो. सगळे कार्यक्रमाची स्तुती करत होते. जरा वेळाने क्लबचे सेक्रेटरी एक पाकीट हातात घेऊन आले. माझ्या हातात देत व पुन्हा मागे घेत म्हणाले, सर क्लबतर्फे आम्ही आदिवासी पाड्यात शाळा चालवतो. आपले मानधन त्यांना डोनेट करावे ही विनंती! चालेल ना?
‘अरे वा! अवश्य देता येईल की, पण एक प्रश्न विचारू?’
‘विचारा ना सर!’
‘ताजमध्ये कॉन्फरन्स म्हणजे खर्च खूप आला असेल ना?… शिवाय तीन दिवस कॉन्फरन्स…’
‘हो ना सर, एका फॅमिलीला जवळपास ८० हजारावर!’
त्यावर मी म्हटले, ‘समजा शाळेसाठी आपण तीन दिवसांत एक ब्रेकफास्ट, लंच, किंवा डिनर न घेता डोनेट केले असते, तर माझ्या मानधनाच्या दहापट पैसे देऊ शकला असता… खरे की नाही? ते आपण केलेले दिसत नाही. मात्र पाहुण्यांचे मानधन शाळेसाठी तुम्हाला हवेय.. थिंक लॉजिकली… मंडळी भरपूर वरमली. चेहरे जमिनीवर पडता पडता राहिले.
माझ्या हातात पाकीट देत सेक्रेटरी म्हणाले, सर, आम्ही चुकलो क्षमा करा. आजच्या कॉन्फरन्समधला हा सगळ्यात मोठा लेसन आपण दिलात. थँक्स!
लासलगावी दरवर्षी व्याख्यानमाला भरायची. एके वर्षी माझा कार्यक्रम ठरला. स्टेजसमोर हजारबाराशे माणसे बसलेली. हॅलोजनच्या प्रकाशात परिसर लकाकत होता. मी श्रीगणेशा करून सुरवात केली न केली तोच लाइट गेली. असे बरेचदा घडे. आली का पंचाईत? दहापंधरा मिनिटं मिट्ट काळोखात गेली. तसं गाव छोटं, तेही अंधारलं होतं. अचानक उत्साही कार्यकर्त्यांनी वीस पंचवीस गॅसबत्त्या स्टेजवर आणल्या. त्या प्रकाशात कार्यक्रम छान रंगला. विशेष म्हणजे अंधारातले प्रेक्षक गायब झालेले नव्हते.
…पुण्याच्या केसरीवाड्यात एका गणपती उत्सवात कार्यक्रम ठरला. शैलेश टिळक यांनी निमंत्रित केले होते. लागूनच असलेल्या मोकळ्या मैदानात हजारेक लोक बसले होते. स्टेजच्या डाव्या हाताला बाप्पा बसले होते. त्यांनी माझे अनेक कार्यक्रम पाहिले होते, पण सौजन्यमूर्ती असल्याने सहन करीत होते. त्यांना नमस्कार करून कार्यक्रमाची नांदी केली. कार्यक्रम रंगला… हजारातला एकही माणूस दोन तास हलला नाही. नेहमीप्रमाणे टाळ्या व हास्याचा पाऊस पडला. कार्यक्रम संपला. स्टेजवरून उतरून खाली रिकाम्या जागी एका खुर्चीवर बसलो. आजूबाजूला अंधारलेले होते. इतक्यात अंधारातून एक व्यक्ती पुढे झाली म्हणाली, ‘वा! बढिया, बहोत खूब, मजा आला!’ मी चमकून पाहिले. प्रत्यक्ष नटसम्राट चित्तरंजन कोल्हटकर उभे होते. मी उठून वाकून नमस्कार केला.
‘ज्ञानेशजी, दीड दोन तास कसे गेले समजले नाही. एकटा माणूस, लायटिंग, साजसंगीताची साथ नाही, प्रॉम्पटर नाही. केवळ विलक्षण!’ असं म्हणत त्यांनी मिठीच मारली.
‘सर, आपला किती दबदबा, किती सुंदर अभिनय, संवादावरील हुकूमत… त्यापुढे माझा कार्यक्रम म्हणजे… मी नम्रपणे बोललो. ‘अरे भल्या माणसा, दीड तासांचे नाटक करायचे तर आमच्या मागे पाच पन्नास माणसं राबत असतात. त्यातून सतत धास्ती, नाटक लोकांना आवडेल का याची. मजा आया! कार्यक्रम खूपच विनोदी झाला.’
शेजारी शैलेश टिळक येऊन उभे होते. म्हणाले, ‘विनोद तर वेगळाच आहे. पुणेरी माणूस दीड तास एका जागी बसून नाक न फेंदारता खदाखदा हसत होता!’