फडणवीस इतरांवर घराणेशाहीचा आरोप कसा करू शकतात? ते स्वतःच घराणेशाहीतून वर आले आहेत. घराण्याचा वारसा नसता तर ते निव्वळ स्वकर्तृत्वावर इतक्या लवकर मुख्यमंत्रीपदावर पोहोचले असते का? त्यांचे वडील गंगाधरराव हे जनसंघाचे नेते आणि एकेकाळचे भाजपाचे विधान परिषदेवरचे सुखवस्तू आमदार. देवेन्द्र यांच्या काकी शोभाताई या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या (डाळ घोटाळा प्रकरणात त्यांचे नाव नको त्या अर्थाने गाजले होते). थोडक्यात या घराण्यासमोर राजकीय पदे आणि सत्ता हात जोडून आधीपासूनच उभी होती. घराणेशाहीच्या जोरावरच देवेन्द्र फडणवीस एकविसाव्या वर्षीच नगरसेवक झाले.
– – –
१९६७ सालची महाराष्ट्र विधानसभेतील एक घटना फार गाजलेली आहे आणि अभिमानास्पद देखील आहे. त्यावेळी यशवंतराव मोहिते हे गृहनिर्माण मंत्री होते आणि त्यांनी गिरणगावातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी एक विधेयक सकाळी ११ वाजता पटलावर मांडले. तत्कालीन जनसंघाचे आणि त्यानंतरच्या भाजपाचे नेते रामभाऊ म्हाळगी यांनी या विधेयकात तब्बल १९५ उपसूचना केल्या आणि त्या प्रत्येक सूचनेवर मतदान घेण्याचा आग्रह धरला. या विधेयकावर मध्यरात्रीपर्यंत चर्चा चालली. रामभाऊ म्हाळगी यांचा एकूण रोख हा राष्ट्रीय संपत्तीत सामान्य माणसाचा वाटा समान असावा असा होता (आज भांडवलदारांच्या दावणीला राष्ट्रीय संपत्ती नेऊन बांधणारा त्यांचा पक्ष बघून रामभाऊंना काय वेदना झाल्या असत्या याची कल्पना करणे अशक्य आहे). अर्थात सरकारला मध्यरात्रीपर्यंत जागे ठेवून धारेवर ठेवणारे रामभाऊ म्हाळगी यांच्या पक्षाचे तेव्हा आतासारखे १०५ आमदार नव्हते, तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आमदार त्यांच्या पाठीशी होते. हल्ली मोदी सरकार करते तसे खासदार कमी असले की कमी वेळ बोलायचे असली दडपशाही तेव्हा नव्हती तर तेव्हा लोकशाही होती. एकदा तर रामभाऊ म्हाळगी यांचे सभागृहातील भाषण लांबले आणि त्यानंतर मृणाल गोरेंना बोलायचे होते, पण भाषणातील मुद्दे महत्वपूर्ण असल्यामुळेच मृणालताईंनी आपला वेळ त्यांना दिला. रामभाऊ म्हाळगी यांच्या काही सूचना मान्य करून जे विधेयक तयार झाले, त्यातून कालांतराने १९७७ साली मुंबईत हजारो गरजू लोकांना हक्काचे घर देणारी म्हाडा ही संस्था अस्तित्त्वात आली. रामभाऊ अहंकारी नव्हते, वैयक्तिक शेरेबाजी ते करत नव्हते; माझ्या १९५ उपसूचना बघून सरकारची ‘हातभर फाटली’ असे ते म्हणाले नाहीत. तसे म्हणणे त्यांच्या संस्कारात बसत नव्हते. पण त्यांच्याच नावाच्या प्रबोधिनीत संस्कार घेतलेले ‘मी पुन्हा येईन’फेम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सरकारची भोंग्याच्या मुद्द्यावरून ‘हातभर फाटली’ असे सुभाषित जाहीर भाषणातून आळवले आहे. सभेत लोकाना हनुमान चालिसा म्हणा असा उपदेश द्यायचा आणि स्वतः मात्र सडकछाप भाषा जाहीर सभेतून करायची हे कोणते संस्कार म्हणावे? जाहीर भाषणात आवेश चढून जीभ घसरते अनेकदा. मग माफी तरी मागावी. पण, त्या बेताल जिभेला जरादेखील आवर न घालता फडणवीस यांनी युवासेना प्रमुख व महाराष्ट्र सरकारमधील अत्यंत कार्यक्षम पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन घराणेशाहीची वैयक्तिक टीका केली. संघाच्या तथाकथित संस्कारांत वाढलेल्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला अशोभनीय अशी ही भाषा चुकून वापरली गेली नाही, ते जाणूनबुजून ती वापरत आहेत, हे दुर्भाग्य.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व आदित्य ठाकरे हे पितापुत्र संयमी आणि मितभाषी आहेत. त्यांच्या हातात सत्तेचे सुकाणू असल्याने राज्यासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी ते बांधील आहेत. त्यामुळेच फडणवीस यांच्या घसरलेल्या जिभेकडे आणि कोल्हेकुईकडे ते दुर्लक्षच करत आहेत. पण, शिवसैनिकांच्या संयमाला मर्यादा आहेत, हे नागपूरच्या गल्लीतील गुंडाप्रमाणे बेताल बरळणार्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. सत्तेबाहेर पडल्याने सत्तापिपासूंचा बरेचदा तोल सुटतो पण तो इतका पराकोटीचा सुटावा? फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत म्हणे. त्यांची इतकी अधोगती व्हावी? हल्ली स्वतःभोवती जे कोंडाळे त्यांनी जमवले आहे त्यांच्यासोबत राहून त्यांची बोलीभाषा अशी टपोरी झाली असेल का? काँग्रेस पक्ष सत्ता नसेल तर पाण्याबाहेर मासोळी फडफडते तसा तडफडतो असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. आज वाजपेयी हयात असते तर ही उपमा त्यांना फडणवीस यांच्या बाबतीत वापरावी लागली असती.
फडणवीस इतरांवर घराणेशाहीचा आरोप कसा करू शकतात? ते स्वतःच घराणेशाहीतून वर आले आहेत. घराण्याचा वारसा नसता तर ते निव्वळ स्वकर्तृत्वावर इतक्या लवकर मुख्यमंत्रीपदावर पोहोचले असते का? त्यांचे वडील गंगाधरराव हे जनसंघाचे नेते आणि एकेकाळचे भाजपाचे विधान परिषदेवरचे सुखवस्तू आमदार. देवेन्द्र यांच्या काकी शोभाताई या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या (डाळ घोटाळा प्रकरणात त्यांचे नाव नको त्या अर्थाने गाजले होते). थोडक्यात या घराण्यासमोर राजकीय पदे आणि सत्ता हात जोडून आधीपासूनच उभी होती. घराणेशाहीच्या जोरावरच देवेन्द्र फडणवीस एकविसाव्या वर्षीच नगरसेवक झाले. सत्ताविसाव्या वर्षी महापौर झाले, नंतर लगेच आमदार झाले, विरोधी पक्ष नेते बनले. पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले आणि चव्वेचाळिसाव्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले. हे फास्ट ट्रॅक ग्रीन चॅनेल फक्त स्वकर्तृत्वावर मिळवले असे ते स्वतः बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असले तरी ते सत्याला धरून नाही. घराणेशाहीचे भक्कम पाठबळ असल्यानेच ते विनासायास पक्षाचे पोस्टर बॉय झाले, त्यांना पक्षाची पोस्टरे डकवत, तळातून संघर्ष करत वर यावे लागले नाही, हे ते नाकारू शकत नाहीत. उठता बसता इतर पक्षातील घराणेशाहीवर टीका करण्याआधी त्यांनी आरसा पाहायला हवा. ते सत्ता मिळवायलाच राजकारणात आलेले आहेत आणि त्यांच्या महत्वाकांक्षी असण्यात काहीच गैर नाही. गैर जर काही असेल तर साम, दाम, दंड, भेद वापरून येनकेन प्रकारे पदे आणि सत्ता मिळवणे हे आहे. सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद वापरण्यात गैर काही नाहीच आणि गरज पडली तर ते अगदी स्वतःसोबत सावलीसारखी साथ देणार्या शिवसेनेसोबत देखील करावे, असे ते पालघरच्या पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांना सांगतात, तिथेच त्यांचा खरा चेहरा उघडा पडतो. स्वकियांसोबत दगाफटक्याचे राजकारण करायचे. सत्तेत असताना जमेल त्या मार्गाने दबाव टाकून विरोधी पक्षाचे मातब्बर आमदार आपल्या पक्षात घेऊन विरोधी पक्ष नावाची राजकीय यंत्रणा खिळखिळी करून नावापुरती राहील हे बघायचे आणि त्याचवेळी स्वपक्षातले विरोधक देखील साम, दाम, दंड, भेद वापरून नेस्तनाबूत करायचे, निवडणूक आल्यावर धर्मांधतेचे, फुटीचे डाव खेळायचे हे फडणवीस यांचे दगाफटक्याचे राजकारण बघितले तर स्वकीयांच्या रक्ताने माखलेल्या हाताने राजदंड हातात धरणारा औरंगजेब डोळ्यासमोर उभा रहातो. पहाटेचा चोरटा शपथविधी उरकून फडणवीस सत्तेत येतात, तेव्हाच ते सत्तेसाठी कोणताच विधिनिषेध बाळगत नाहीत, अगदी संवैधानिक परंपरांचा देखील नाही हे समजते. गरज पडली तर ते सत्तेसाठी असदुद्दीन ओवैसी यांचे देखील पाय धरणार नाहीत, याची आता खात्री देता येत नाही. भाजपाला बिहारमध्ये सेक्युलर नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी चालतात, कारण तिथले भाजपाचे नेतृत्व समंजस आहे. पण महाराष्ट्रात हिंदुत्ववादी असून देखील शिवसेनेचा मुख्यमंत्री त्याना चालत नाही कारण इथे फडणवीस यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा युतीधर्मापेक्षा आणि हिंदुत्वापेक्षा मोठी ठरते. फडणवीस यांच्यासाठी हिंदुत्व ही सत्तेची पायरी आहे, तो त्यांचा श्वास नाही तर सत्ता हाच त्यांचा श्वास आहे. हाच भाजपचा खरा डीएनए आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की फडणवीस हिंदुत्वाच्या उचक्या देऊ लागतात. आपण राम मंदिर आंदोलनातील कारसेवक होतो ते अचानकच आठवते. बाबरी मशिदीचा ढाचा पाडणारे शिवसैनिक नव्हते तर तिथे आम्हीच होतो असे ते म्हणू लागतात. अजून तरी ते याच जन्मातील कपोलकल्पित गोष्टी सांगून महाराष्ट्राचे मनोरंजन करत आहेत, पण निवडणूक जवळ येईल, तसे ते मागच्या जन्मात मी वासुदेव बळवंत फडके होतो असे सांगू लागले, तरी फार आश्चर्य वाटू नये. त्यांनी एकदा दिल्लीत जाऊन राम मंदिर आंदोलनाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना याबाबत विचारून मग मतप्रदर्शन केले असते तर बरे झाले असते? महाराष्ट्रातील बरेच प्रकल्प परस्पर गुजरातला वळवले तसे इतिहासातील शिवसेनेचे, महाराष्ट्राचे योगदान देखील इतर राज्यांच्या नावावर जर जमा केले जात असेल तर या लाचारांना शिवरायांचे नांव घ्यायचा अधिकार आहे का? दिल्लीपतीचा खजिना असलेल्या सूरत शहराची लूट स्वराज्यासाठी ज्यांनी केली त्या महाराजांचे नांव देखील घेण्याचा अधिकार स्वतःचे राज्य लुटून सुरतेची तिजोरी भरणार्यांना नाही. मुंबईचे आर्धिक राजधानीचे अबाधित असलेले महत्व कमी करून गुजरातचे महत्व वाढवायचा केंद्राचा प्रयत्न हाणून पाडण्याएवजी त्याकाळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस मूग गिळून गप्प होते, कारण त्यांचे अस्तित्वच दिल्लीपतींच्या म्हणजेच गुजरातचा उदो उदो करणार्यांच्या मर्जीवर अवलंबून होते. भाजपाचे सर्वेसर्वा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाची महाराष्ट्रातील धुरा फडणवीस यांच्याकडे दिली ती त्यांचे नेमके कोणते गुण पाहून हे सांगायची त्यामुळेच गरज नाही. अंतर्गत विरोध मोडीत काढण्यासाठी आणि दिल्लीपतींच्या मर्जीत सतत टिकून रहाण्यासाठी जे जे करावे लागते ते ते सर्व फडणवीस आजवर करत आलेले आहेत. बोलणारी बाहुली जशी बॅटरीच्या सेलवर चालते तसेच दिल्लीच्या मर्जीने चालणार्या राज्यातील भाजपाच्या पक्षनेतृत्वाचे काम फक्त हो ला हो म्हणायचे असते का? भाजपाच्या महाराष्ट्र राज्यातील नेत्यांनी दिल्लीच्या ओंजळीनेच पाणी पिणे ठरवले असेल तर ते महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवणार तरी कसा?
उद्धवजीनी दाखवलेल्या समजूतदारपणामुळे २०१४ साली भाजपाच्या वाट्याला प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आले. या पदाचा मान एकनाथ खडसे अथवा नितीन गडकरी यांच्यासारख्या स्वाभिमानी ज्येष्ठ नेत्याला मिळण्याएवजी तो फडणवीस यानाच का मिळाला? ज्येष्ठता डावलून दिले गेलेले ते पद क्षणाचादेखील विलंब न लावता त्यांनी स्वीकारले. इतक्या तरूण वयात घराणेशाहीने मिळालेले मुख्यमंत्रीपद स्वकर्तृत्वाने टिकवायचे असते आणि लोकोपयोगी कामे करून ते परत परत मिळवायचे असते. निव्वळ मी परत येईन असे बेंबीच्या देठापासून ओरडून दुसर्यांदा मुख्यमंत्री होता येत नाही. याला पाड, त्याची जिरव असे राजकीय बुद्धिबळाचे डाव खेळून एक दोन चढाया जिंकता येतात, पण त्या तितक्याच. लोकांसमोर फक्त काम बोलते आणि त्यासाठी भाडोत्री भोंग्यांची गरज पडत नसते.
कोणत्या घराण्यात जन्म घ्यायचा हे त्या व्यक्तीच्या हातात नसते तर ते एक विधिलिखित असते. आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यात जन्मले हे त्यांचे भाग्य होते. गंगाधरपंतांचा राजकीय वाटचालीत मोठा उपयोग होईल म्हणून ठरवून बालक देवेंद्रजींनी त्यांना वडील म्हणून निवडले असे कोणी म्हणाला तर तो मूर्खच. त्यामुळेच कोण कोणत्या घराण्यात जन्मले यापेक्षा घराणेशाहीतून राजकारणात आलेली व्यक्ती मंत्रीपदाची जबाबदारी चोख पार पाडते की नाही यावर टिकाटीप्पणीचा रोख असला पाहिजे. फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ‘मर्सिडीज बेबी’ अशी टिप्पणी केली तरी आदित्य त्याकडे दुर्लक्ष करतील कारण फडणवीस यांनी कर्जाच्या बोझ्याखाली केलेल्या खटार्यासारख्या अर्थव्यवस्थेचे मर्सिडीजमधे परिवर्तन करण्याचे अवघड काम त्यांच्यासमोर आहे.
श्रेष्ठत्व जन्मावर आधारित ठरवणे हेच चातुर्वर्ण्य मानणार्या प्रतिगामी जात्यांध मनुवाद्यांचे प्रथम अवलक्षण आहे. प्रबोधनकार ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराजांनी यांनी मनुवादी विचारांना उध्वस्त करत हा पुरोगामी महाराष्ट्र घडवला. तब्बल पाच वर्षे या महाराष्ट्राचे नेतृत्व करून देखील फडणवीस यांच्यात तो पुरोगामीपणाचा कणदेखील उतरला नाही. खोलवर भिनलेला, जन्मावर आधारित श्रेष्ठता ठरवणारा मनुवाद त्यांच्यातून गेलेला नाही म्हणूनच ते स्वतःला ब्राम्हण मुख्यमंत्री म्हणवून घेतात. महाराष्ट्रात ठाकरे घराण्याचे महत्व अबाधित आहे आणि या घराण्याकडे आलेले विशेषाधिकार लोकहितासाठी आणि पक्षहितासाठीच वापरले जातात. ठाकरे घराण्यात जातपात मानली जात नाही. मुरारबाजी, बाजीप्रभू, मल्हार रामराव चिटणीस हे कायस्थ होते. त्यांच्या जातीचे आहोत म्हणून मला मते द्या असला महापुरूषाना जातीत बांधण्याचा प्रकार बाळासाहेबांनी केला नाही. ठाकरे घराण्याने मंत्रीपदे आणि सत्तेची पदे कायम कार्यकर्त्यांना दिलेली आहेत, याउलट सत्ता सतत आपल्याच ताब्यात कशी राहील हेच फडणवीस पाहात आले आहेत. ते स्वतः तोंडात घराणेशाहीचा अंगठा चोखत संघाच्या मांडीवर पहुडलेले, राजकारणातील लाडावलेले आणि त्यामुळेच बिघडलेले बालक आहेत. देशात सर्वोच्च स्थानी असणारा महाराष्ट्र या बालकाला खेळायला देण्यात त्यांच्या पालकांची घोडचूक झाली आणि त्या चुकीनेच मुंबईचे पंख छाटण्याचा प्रयत्न झाला. गहाण ठेवलेल्या संस्था महाविकास आघाडी सोडवून घेईल, मुंबई केंद्रशासित करायचा डाव शिवसेना हाणून पाडेल. पण महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपतींची मर्जी सांभाळायला गहाण ठेवणारे, पदासाठी कोणत्याही थराला जाणारे, महाराष्ट्राचे तुकडे कसे पडतील याची भयंकर स्वप्ने बघणारे गद्दार कोण आहेत हे ओळखून जनतेनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे.