आंबा पिकतो, रस गळतो, इथपर्यंत ठीक आहे… पण कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो, हा काय प्रकार आहे?
– यामिनी माळवे, संगमनेर
गळतो आणि खेळतो हे यमक जुळलंय ना… हे महत्वाचं आहे
तो कोण मस्क की कोण तो, त्याने ट्विटर विकत घेतलं म्हणे, लगेहाथ तुम्हीही काहीतरी विकत घेऊन टाका!
– श्रीपाद पुराणिक, नारायण पेठ, पुणे
अहो इथे डझनभर आंबे घ्यायला जमत नाहीयेय… कसलं काय विकत घेतायत!
मला एका ज्योतिष्याने सांगितलंय की माझं आडनाव अंबानी किंवा अडाणी असं केलं, तर घबाडयोग आहे… तुम्हाला काय वाटतं? बदलू का आडनाव?
– रहमान अत्तार, काटेवाडी
अडाणीचा दुसरा अर्थ काय आहे, माहित आहे ना?
सारखं छातीत दुखतंय… अगदी व्हॅक्युम क्लीनर लावल्यासारखं… खरं खरं सांगा, हा कुणा भटाचा डाव िंकवा संज्या छाया दाटून आल्याचा तर परिणाम नाही ना?
– तुषार रेडकर, उस्मानाबाद
काय प्रश्न आहे हे तुम्हाला तरी कळलंय का?
दारातले भोंगे बंद होतील, पण घरातले भोंगे बंद करण्यासाठी कोणाकडे दाद मागायची मांगले साहेब?
– चारुहास पटवर्धन, हिंगोली
ती ताकद प्रत्यक्ष परमेश्वराकडेही नाहीयेय.
कोकणात भरपूर आंबे आले असून ते अतिशय किफायतशीर दराने सगळीकडे उपलब्ध आहेत. यंदा मोहर गळणे, अवकाळी पाऊस पडणे वगैरे कारणांनी आंबे बेचव झालेले नाहीत, अशी बातमी किती वर्षांनी वाचायला मिळेल पेपरात?
– लीला रानडे, मुलुंड
कधीच नाही… त्याशिवाय आंब्याचं महत्व कळणार नाही
पैशाने सुख विकत घेता येत नाही, असं म्हणतात. ही श्रीमंत माणसांनी रचलेली गरीबांना श्रीमंत बनण्यापासून रोखण्याची युक्ती नाही वाटत?
– पल्लवी पिंगळे, पारनेर
होय
नंगे से खुदा भी डरता है, असं म्हणतात… तुमचा काय अनुभव?
– बबन साळवी, वाकोला
मी खुदा नाही
गायकाला, वादकाला, चित्रकाराला, लेखकाला रियाझ करण्याची सोय आहे, अभिनेत्याचा रियाझ काय असतो?
– त्र्यंबक सोनावणे, अचलपूर
चांगला अभिनेता बनण्यासाठी खूप निरीक्षण आणि चिंतन खूप गरजेचं आहे
मधुबाला, नर्गिस, नूतन, वहिदा रहमान, मीना कुमारी या सुवर्णकाळातल्या अभिनेत्रींची तुमच्या आवडीनुसार क्रमवारी काय असेल? त्याचप्रमाणे राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद या नायकांची अशीच क्रमवारी काय असेल?
– सौरभ गोविलकर, रहिमतपूर
वहिदा, नूतन, मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी, दिलीप, देवानंद, राज कपूर
साखरेचे खाणार त्याला देव देणार, ही म्हण अर्धवट नाही? त्यात डायबिटीस हा शब्द असायला हवा ना?
– श्रीकांत सावंत, पवई
गैरसमज आहे तुमचा… साखर खाल्ल्याने डायबेटीस होत नाही… डायबेटीस झाल्यावर साखर खायची नसते
तुमच्या आजवरच्या कारकीर्दीतली तुमच्या मते सगळ्यात अवघड भूमिका कोणती होती? आणि का?
– अंकुर भोरे, निप्पाणी
‘वाडा चिरेबंदी’मधला भास्कर… भाषा आणि त्यातलं त्याचं गंभीर रूप
चांगला अभिनेता भूमिकेत पूर्णपणे विरघळून जातो की सजग राहून फक्त योग्य भावाभिव्यक्ती करून तसा परिणाम साधतो?
– रॉनी डिसिल्व्हा, अंधेरी
सजग राहून फक्त योग्य भावाभिव्यक्ती करतो.