डायटच्या जगात नवनवीन फॅड येत आणि जात असतात. आपण नवीन काहीतरी ट्राय करुन पाहायला काहीच हरकत नसते. डायट मुळात कंटाळवाणं होऊ नये म्हणून मला वाटतं दुनियेभरातले लोक असे वेगवेगळे प्रकार शोधून काढत असतात.
बुद्धा बाऊल हा प्रकार डायट रेसिपीज शोधू लागले तेव्हा सापडला. हा एक बाऊल म्हणजे संपूर्ण जेवण असतं. थोडक्यात हे एक वन डिश मिल आहे. बुद्धा बाऊलमधे सगळे प्रकार एकत्र करून काला करणं आणि खाणं अपेक्षित नसतं. सगळेच प्रकार कलात्मकपणे एकाच मोठ्या वाडग्यात सजवून वेगवेगळे वाढणं आणि खाणं अपेक्षित आहे. ड्रेसिंग/सॉस/चटण्या/डिप्स तुम्ही लहानशा वेगळ्या छोट्या वाटीत ठेऊन बाऊलच्या मधोमध ठेऊन खाऊ शकता किंवा सगळ्या पदार्थांवर ओतू शकता.
बुद्धा बाऊल हा प्रकार नवीन वाटला तरी खरं तर नवीन नाही. गौतम बुद्ध जी भिक्षा मागत ती नेहमीच एक ओंजळभर/वाडगाभर असे. असं एक वाडगाभर अन्न भिक्षा मागून मिळवून खायचं अशी भिक्षूंची पद्धत होती. बुद्धा बाऊलचं मूळ तिथूनच आलेलं असणार असं वाटलं आणि ते तसंच निघालं. सध्याच्या काळात बुद्धा बाऊल फॅशनमधे आलेत ते मार्था स्टुअर्ट नावाच्या लेखिकेमुळे. ‘मीटलेस’ नावाचं पुस्तक तिनं २०१३मध्ये लिहिलं. तिथं बुध्दा बाऊल ही कन्सेप्ट पहिल्यांदा लिहिली गेली. २०१७पासून बुद्धा बाऊल भरपूर लोकप्रिय होऊ लागले. व्हेगन फूडची फॅशन आली तशी त्यातही बुध्दा बाऊल हिट झाले. बुद्धा बाऊलला हिप्पी बाऊल, पॉवर बाऊल, ग्रेन बाऊल, नॉरीश बाऊल असंही म्हणतात.
कमी भांडी घासण्याची इच्छा असेल तरी बुद्धा बाऊल करून बघावा असं वाटेल, कारण यात वाढपाला केवळ एक मोठा बाऊल इतकंच लागतं आणि बुद्धा बाऊल करणं म्हणजे जेवणासाठी शॉर्टकट मारला असं वाटत असलं तरी यात जेवणात आवश्यक ते सर्व पौष्टिक घटकही जातात.
बुद्धा बाऊल एका प्रकारे चित्रासारखा असतो. एका ठराविक कॅनव्हासच्या परीघात, ठराविक रंग वापरून तुम्ही मग वेगवेगळी चित्रकारी करू शकता. बुद्धा बाऊल हे संपूर्ण जेवण आहे. सगळेच घटक थोड्या थोड्या प्रमाणात घेणं अपेक्षित आहे. सहसा बुद्धा बाऊलमधे काही ठराविक अन्न पदार्थाचे प्रकार हे असलेच पाहिजेत.
१. कार्ब्ज – यात सहसा असतो पांढरा भात, ब्राऊन राईस, क्विनोआ, नूडल्स. आपण वरई, दलिया देखील वापरू शकतो. डायट करायचं म्हणून कार्ब्ज संपूर्णपणे टाळणेही चुकीचेच आहे. थोड्या प्रमाणात कार्ब्ज आहारात असायला हवेत. कार्ब्जसोबत प्रोटिन्स पचतात. कार्ब्जने पोट भरण्याची, समाधानाची भावना येते, जी जेवताना अत्यंत महत्वाची आहे.
२. प्रोटिन्स : शिजवलेले छोले/चणे/राजमा/कुठलेही उकडलेले कडधान्य, भाजलेले पनीर/टोफू, मांसाहारी असाल तर भाजलेले चिकन/मटन/फीश, मशरूम्स, उकडलेली अंडी, ऑम्लेट वगैरे.
३. भाज्या : परतलेल्या भाज्या- ब्रोकोली,
फ्लॉवर, गाजर, बटाटे, रताळं, लाल भोपळा, स्वीट कॉर्न. सॅलेड्स : काकडीचे काप, गाजराचे काप/कीस, हिरव्या/जांभळ्या कोबीचा कीस, लेट्यूसचे वेगवेगळे प्रकार वगैरे.
४. नट्स : वाढीव पौष्टिकतेसाठी आणि क्रंचीनेस येण्यासाठी हे नट्स आवर्जून आहारात असावेत. भाजके तीळ, भाजके शेंगदाणे, बदाम, अक्रोड, काजू, चिआ सीडस, भाजके खारवलेले जवस, फुटाणे. वगैरे.
५. ड्रेसिंग : चव वाढवण्यासाठी वेगवेगळी ड्रेसिंग्ज तुम्ही शोधून काढू शकता. पुदिना चटणी, खजूर चटणी, पातळसर हमस (छोले तिखट मीठ तेल घालून मिक्सरमधून वाटून घेणे), सोया सॉस, पातळ पीनट बटर, मध वगैरे.
बुद्धा बाऊल (प्रकार १)
यात एकाच मोठ्या बाऊलमधे थोडेसे हेल्दी कार्ब्ज आहेत; इथं ब्राऊन राइस, भरपूर प्रोटिन्स आहेत; इथे छोले आणि अंडं आहे आणि सॅलड आहे; इथं आईसबर्ग लेट्यूस घेतलं आहे.
वरून चटणी/ड्रेसिंग/डिप्स म्हणून इथं पुदिना चटणी घातली आहे.
आणि नट्स/सीडस : तीळ, बदाम भुरभुरले आहेत.
बुद्धा बाऊल (सजवणे)
१. एका मोठ्या बाऊलमधे ब्राऊन राइसचा भात घ्या
२. छोले ग्रेव्ही घ्या.
३. लेट्यूस कापून तिखट, मीठ, लिंबू पिळून एकीकडे पसरा.
४. एक अंडं उकडून कापून चार तुकडे करून वर सजवा.
५. पातळ पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरचीची चटणी पसरवा.
६. भाजके तीळ, दोन बदाम चिरून घाला.
उपासाचा बुद्धा बाऊल : (प्रकार २)
तुम्ही चक्क उपासाचे पदार्थ वापरुनही बुद्धा बाऊल तयार करू शकता.
कार्ब्ज : तूप, मीठ, मिरच्या आणि दाण्याचं कूट घालून शिजवलेली वरई एक वाटी.
प्रोटिन्स : तुपावर जिरेपूड तिखट मीठ घालून परतेलेले पनीरचे चार तुकडे.
सॅलड : काकडीचे उभे काप.
भाज्या : तुपावर परतलेले मीठ लावलेले रताळ्याचे गोल काप.
नट्स : भाजलेले शेंगदाणे आणि दोन खजूर.
ड्रेसिंग : कोथिंबीर, नारळ, हिरवी मिरची, जिरं, साखर, मीठ घालून केलेली पातळसर चटणी.
बुद्धा बाऊल (प्रकार तीन)
कार्ब्ज : शिजवलेला दलिया एक वाटी
प्रोटिन्स : उकडून तेलावर तिखट मीठ चाट मसाला घालून परतून घेतलेले सोया चंक्स अर्धी वाटीभर.
वाफवलेले आणि चाट मसाला घातलेले मूग अर्धी वाटीभर.
भाज्या : पाव चमचा बटरवर परतलेले ब्रोकोलीचे चार पाच तुरे.
सॅलड : गाजर,कोबी बारीक चिरून.
नट्स : अक्रोडचे चिरलेले तुकडे एक टेबलस्पून.
ड्रेसिंग : दह्यात मिरपूड, मीठ, किंचित साखर, तिखट घालून फेटून घेणे. पातळसर दह्याचं डिप सोबत देणे.
बुद्धा बाऊल (प्रकार चार)
कार्ब्ज : एक वाटी शिजवलेले गव्हाचे नूडल्स
प्रोटिन्स : अर्धी वाटी बटण मशरूम्स चिरून बटरवर परतून घेतलेले. पनीरचे चार काप, मीठ आणि पेरी पेरी मसाला/पिझ्झा हर्ब्ज घालून तेलावर परतून घेतलेले.
सॅलड : लेट्यूस वाटीभर आणि एक गाजर बारीक उभं चिरून घेतलेले.
डिप : दह्यात पुदिना चटणी घालून फेटून घेतलेलं.
नट्स : भाजलेले जवस आणि भाजके तीळ एक टीस्पून.
(टीप : लेखिका आहारतज्ज्ञ नाहीत. लेखातील मते आंतरजालावरील माहितीवर व वैयक्तिक अनुभवांवर आधारित असून बहुतांश पाककृती पारंपरिक आहेत.)