‘व्यंगचित्र स्पर्धा आणि प्रदर्शना’च्या निमित्ताने पाच मे रोजी दुसर्या सत्रात ‘कट्ट्यावरच्या गप्पा’ हा कार्यक्रम झाला. यामध्ये चार तरुण व्यंगचित्रकारांची मुलाखत घेण्यात आली. यात ‘मार्मिक’चे मुखपृष्ठकार गौरव सर्जेराव, नीलेश जाधव (लोकसत्ता), विवेक प्रभूकेळुस्कर आणि सिद्धांत जुमडे (इंडिया टुडे) या चौघा तरुणांचा समावेश होते. ही मुलाखत संजय मिस्त्री आणि योगेंद्र भगत यांनी घेतली.
‘मार्मिक’चे मुखपृष्ठ कार्टून काढण्यापूर्वीची तुमची नेमकी प्रोसेस कशी असते?’ असा प्रश्न गौरव सर्जेराव याला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, वर्तमानपत्रांसोबतच मी बातम्यांसाठी बहुतांश यूट्यूबवरून अपडेट असतो. त्यातून मी बातम्या निवडतो. ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर हेही बातम्या निवडतात. त्यानंतर आम्हा दोघांच्या चर्चेतून मुखपृष्ठाचा विषय ठरतो. त्यावर आधारित जगभरातील व्यंगचित्रांचा विचार करून आपल्याला काय वेगळं करता येईल याचा मी प्रयत्न करत असतो.
विवेक प्रभूकेळुस्कर यांनी व्यंगचित्रांचा अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी कराव्यात हे तरुण व्यंगचित्रकारांना सांगितले. निरीक्षण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. कारण व्यंगचित्र काढताना तुम्हाला जास्तीतजास्त निरीक्षणाची आवश्यकता असते. तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं. त्यासाठी ते आपल्यासोबत एक वही बाळगतात. त्यात सगळ्या प्रकारच्या नोंदी ते करून ठेवतात. आपल्याला जे काही रेखाटायचे आहे त्यासाठी उपयोगी पडेल अशी माहिती ते त्या नोंदवहीत लिहून ठेवत, अशा शब्दात त्यांनी तरुणवर्गाला मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’चे व्यंगचित्रकार नीलेश जाधव यांनी वाचन गरजेचे असण्यावर भर दिला. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना एक सर होते. त्यांनी त्यांना ‘ज्ञानेश्वरी’ वाचायला सांगितली होती. त्याचबरोबर अशाच प्रकारची पुस्तके वाचायला दिली. जेणेकरून व्यंगचित्रांसाठी त्यांना सखोल अभ्यास करता येईल. व्यंगचित्रे म्हणजे पेपर घेतला, पेन घेतलं आणि रेघोट्या ओढल्या म्हणजे होत नाही. त्यासाठी सखोल अभ्यास करावाच लागतो. म्हणून वाचले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सिद्धांत जुमडे यांनी डिजिटल फॉर्मची मदत व्यंगचित्रकारांना कशी होऊ शकते ते सांगितले. पहिल्यांदा पेपरवर व्यंगचित्रे व्हायची. पण आता अशी चित्रे कुठेही काढता येणे शक्य झाले आहे. म्हणजे आयपॅड घेऊन कुठेही जाता येते. प्रगत तंत्रज्ञानामुळे आलेल्या या बदलामुळे आता खूप सोपे झाले आहे. पण त्याआधी तुम्हाला पेपर चांगले व्यंगचित्र काढता येणे आवश्यक आहे. डिजिटल हे फक्त माध्यम आहे. पण चित्रे काढता येणे कधीही गरजेचे आहेच. डिजिटल माध्यमाचा वापर करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे जुमडे म्हणाले.