भारताच्या चित्रपट महोत्सवाची यंदा ५५वी आवृत्ती होती. सिनेरसिकांसाठी इफ्फी म्हणजे गोवा आणि गोवा म्हणजे इफ्फी या समीकरणावर आता शिक्कामोर्तब झालंय. या चित्रपट महोत्सवाचं नियोजन इफ्फीच्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गाने उत्कृष्टरित्या पार पाडलं, परंतु महोत्सवात दाखविल्या गेलेल्या चित्रपटांवर नजर मारली तर नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटांपेक्षा सामान्य चित्रपटांची संख्या अधिक होती अशी खंत अनेक चित्रपट समीक्षक आणि सिनेरसिकांनी बोलून दाखवली. कान, टोरँटो या जागतिक चित्रपट महोत्सवांप्रमाणे कलात्मक आणि प्रयोगशील चित्रपटांचे व्यासपीठ म्हणून इफ्फीची वाट धरणार्या रसिकांनी ‘प्रोत्साहनपर’ चित्रपट का पाहायचे असा परखड सवालही त्यांनी विचारला.
इफ्फीमध्ये पणजीसोबतच यावर्षी मडगाव, फोंडा येथे देखील सिनेमा दाखवण्यात आले. परंतु वाहतुकीची उत्तम व्यवस्था नसल्यामुळे अनेक रसिक पणजीपासून तिथे पोहोचण्यास असमर्थ ठरले. यामुळे तिथे दाखविल्या गेलेल्या चांगल्या चित्रपटांना अपेक्षित प्रेक्षकसंख्या लाभू शकली नाही. पणजीत दाखविण्यात आलेल्या बहुतांश सिनेमांना मात्र तुफान गर्दी झाली होती.
हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीमधील नामवंत कलाकारांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य. यंदाच्या गाला प्रीमियरमधे ग्लॅमरचा तडका देण्यासाठी रणबीर कपूर ते क्रिती सॅनॉन अशा अनेक स्टार मंडळींनी हजेरी लावली.
या वर्षी स्थलांतर या विषयावरील काही चित्रपट पाहण्यात आले. स्थलांतराबद्दल प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. कधी प्राणाच्या भीतीने तर कधी रोजगाराच्या शोधात देशाच्या सीमा ओलांडणारी माणसं हा विकसित देशांना भेडसावणारा विषय आहे. आप्रिâकेतील तरुणांचे जत्थे जिवावर उदार होऊन पोटापाण्यासाठी युरोपकडे पलायन करताना दिसतात. ‘टू अ लँड अननोन’ या सिनेमात पॅलेस्टाईन देशातील दोन भावांचा जर्मनीकडे स्थलांतर करण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. स्थलांतरित छावणीतील हलाखीची परिस्थिती, मानसिक कुचंबणा दर्शविताना या सिनेमाने मानवी भावभावनाचे पदर तरलतेने उलगडून दाखवले.
इफ्फीमध्ये मराठी सिनेमांनीही ठसा उमटवला. आत्मपॅम्फ्लेट, तेरव, विषय हार्ड आणि छबीला या चार चित्रपटांची निवड करण्यात आली होती. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’ ही सर्वोत्कृष्ट वेबसिरीज ठरली. नवज्योत बांदिवडेकर यांना ‘घरत गणपती’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय शशी खंदारे यांचा ‘जिप्सी’, निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’, पंकज सोनवणे यांचा ‘प्राणप्रतिष्ठा’ हे चित्रपट दाखविण्यात आले. ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ हा बहुचर्चित सिनेमा देखील या महोत्सवात दाखवला गेला. वेगळा विषय आणि सिद्धार्थ जाधवचा हृदयस्पर्शी अभिनय यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांनी स्टँडिंग ओएशन दिल. मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव असे व्यावसायिक मराठी चित्रपटांतले स्टार्स इफ्फीसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दिसतात आणि आपली दखल घ्यायला लावतात.
पीव्हीआर मल्टिप्लेक्समधे मराठीचा डंका वाजत असताना इथून काही अंतरावरील जेडब्ल्यू मॅरिएट रिसॉर्टमध्ये सिनेमा खरेदी-विक्रीचा फिल्म बाजार भरला होता. जगभरातील निर्माते, वितरक, फिल्म फेस्टिवल्स आणि त्यांचे एजंट चांगल्या सिनेमांच्या शोधात इथे येत असतात. या उपक्रमाचा फायदा भारतातील अनेक नवोदितांना आजवर झालेला आहे. यामुळेच याही वर्षी भारतातील अनेक नवे जुने निर्माते-दिग्दर्शक आपापल्या सिनेमाचं मार्केटिंग करताना दिसले. यासोबतच अनुपम खेर अमित साद असे अनेक नामवंत कलाकार आपण केलेलं चांगलं काम जगासमोर यावं आणि नवीन काम मिळावं यासाठी जगभरातून इथे आलेल्या निर्माता-दिग्दर्शकांशी भेटीगाठी घेताना दिसले. न्यूटन, चक्रव्यूह (हिंदी), काला, एंते, दाक्षिणात्य सिनेमे तसेच विथ यू विदाऊट यू अशा आंतरराष्ट्रीय चित्रपटात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पण मराठी सिनेमात फारशा न दिसणार्या अंजली पाटील म्हणाल्या, श्रीलंकेतल्या आणि दाक्षिणात्य सिनेरसिकांचे प्रेम जितकं मला मिळालं, तितक्या प्रमाणात माझ्या महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत मी पोहोचू शकले नाही, याची मला खंत वाटते. २०१२ साली इफ्फीमध्येच श्रीलंकन सिनेमासाठी मला बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला होता, तेव्हा मी हेच सांगितलं होतं की या नाशिकच्या मुलीला मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. आताही मी तेच मराठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगू इच्छिते. समांतर आणि आशयघन सिनेमाशी नाव जोडलेलं असताना तद्दन व्यावसायिक सिनेमा कराल का, या प्रश्नावर अंजली म्हणाल्या, आता समांतर सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यांच्यातील सीमारेषा धूसर झाल्या आहेत. माझ्या एका व्यावसायिक सिनेमाला चांगलं यश मिळालं तर त्याच्या जोरावर आम्ही चार आशयघन चित्रपटांची निर्मिती करू शकतो. गेल्या तीन वर्षांत मी अभिनयासोबतच दिग्दर्शन (निदर अ गर्ल नॉर अ वुमन) आणि चित्रपटनिर्मिती (मुगाई – ऑस्ट्रेलियन) या क्षेत्रात उतरले आहे. मला या क्षेत्रात येऊन १४ वर्षे झाली आहेत. विविध भाषांत केलेल्या कामातून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग मला माय मराठीसाठी करायचा आहे. मराठी भाषेत खूप पोटेन्शिअल आहे. परंतु मराठी सिनेमाने सर्वसामान्यांना आपलेसे वाटतील असे अस्सल, वास्तविक विषय मांडायला हवेत. मीही माझ्या अनाहत या प्रॉडक्शन कंपनीच्या माध्यमातून आपल्या मातीतील अस्सल गोष्ट सांगणार आहे. मराठीबरोबरच तमिळ, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील स्क्रिप्टस् आम्ही डेव्हलप करत आहोत.
या महोत्सवात उत्तमोत्तम सिनेमे पाहण्यासोबतच सिनेमातील दिग्गजांसोबत चर्चा करण्याचे आणि त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मास्टर क्लास या उपक्रमात मिळते. बाहुबली, आरआरआर या भव्यदिव्य सिनेमांचे छायालेखक सेंथिल कुमार यांनी येणार्या काळात सिनेमातील व्हीएफेक्स फॅक्टर किती मोठा होऊ शकतो यावर चर्चेत भाग घेतला. आपण येणार्या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेणे जास्त पसंत करतो असं सांगून ते म्हणाले की सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेला व्हीएफेक्स हे सिनेमा क्षेत्रातील भविष्य आहे.
दाक्षिणात्य सिनेमातही काही ठराविक निर्मात्यांच्या हातात सिनेमाची वितरण व्यवस्था आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या हनुमान या सिनेमाला थिएटर्स मिळू दिले नाहीत. आदिपुरुष सिनेमाच्या निराशाजनक टिझरचा फायदा हनुमान सिनेमाला मिळाला. सिनेमा प्रचंड चर्चेत आला. हनुमानला थिएटर्स मिळू नयेत अशी व्यवस्था करणार्या मोठ्या निर्मात्यांच्या सिनेमांना कुणी फिरकले नाही. मोठ्या चित्रपटगृहांना नाईलाजाने हनुमान सिनेमासाठी चित्रपटगृहे उपलब्ध करून द्यावी लागली. इतर दक्षिणात्य सिनेमांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर मोठी झेप घेऊन ३०० कोटींचा टप्पा गाठला. या सिनेमाचा हिरो तेजा सज्जा इफ्फीत आला असताना एका दाक्षिणात्य समीक्षकांने दक्षिणेतील निर्मात्यांच्या या मक्तेदारीवर प्रकाश टाकला.
सिनेमात काम करणार्यांचा, सिनेमावर लिहिणार्यांचा आणि सिनेमावर निस्सीम प्रेम करणार्यांचा मेळावा गोव्यात भरतो. सिनेमांच्या सोबतीला गोव्यातील समुद्रकिनारे, मासे, पेय आणि अपेयपान फेस्टिवलची रंगत आणखी वाढवतात. हा माहोल प्रत्येक सिनेरसिकांनी एकदा तरी अनुभवायला हवा.