प्रबोधनकारांवर लाठ्याकाठ्या घेऊन हल्ले करण्यापासून बनावटगिरी करून पोलिसी कचाट्यात अडकवण्यापर्यंतचे कट्टर जातीवादी कंपूचे प्रयत्न अपयशी ठरल्यावर आता त्यांनी कायदेशीर लचांड प्रबोधनकारांच्या मागे लावण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्यांनी त्यालाही उत्तर दिलंच.
—
पुण्यात असताना बॅ. काकासाहेब गाडगीळ यांची प्रबोधनकारांना कायम मदत व्हायची. त्यांनी प्रबोधनकारांना पोलिसी जंजाळातून कसं वाचवलं, ते मागच्या भागात पाहिलंच. ते प्रबोधनकारांचे मित्र आणि हितचिंतक. पण हे माहीत नसणार्या ब्राह्मणी कंपूने त्यांना एका वकिलांच्या गटात घेतलं. प्रबोधनकारांच्या जवळच राहणार्या एका ज्येष्ठ बहुजनद्वेष्ट्या वकिलाच्या नेतृत्वात हा गट प्रबोधनकारांना एखाद्या खटल्यात अडकवण्याचा कट करत होता. त्या आधी या सगळ्यांनी मिळून महात्मा फुलेंचा पुतळा नगरपालिकेकडून पुण्यात उभारला जाऊ नये म्हणून कायदेशीर रसद पुरवली होती. वर महात्मा फुलेंची भयंकर बदनामी करण्यातही हेच आघाडीवर होते.
या ब्राह्मणी मंडळींनी आधी केशवराव जेधे–दिनकरराव जवळकरांवरील `देशाचे दुष्मन`च्या खटल्यात प्रबोधनकारांना गोवण्याचा प्रयत्न केला होताच. हे पुस्तक जवळकरांनी नाही तर प्रबोधनकारांनीच लिहिल्याचा जावईशोध लावला होता. तशा आशयाचं विधान भालाकार भोपटकरांनी कोर्टात केलंही होती. प्रबोधनकारांनी वर्तमानपत्रांत त्यावर खुलासा देऊन तो विषय मिटवला होता.तापलेल्या वातावरणात ब्राह्मणेतर पुढार्यांची बाजू घेऊन प्रबोधनकार लढत होते. त्यामुळे हा वकिलांचा गट त्यांच्यावर दात खाऊन होताच.
या वकिलांनी प्रबोधनकारांची प्रसिद्ध झालेली पुस्तकं, प्रबोधनच्या फायली गोळा करून संशोधन सुरू केलं होतं. जातीजातींत वैर फैलावण्याच्या गुन्ह्यासाठी असलेल्या १५३ अ या कलमाखाली प्रबोधनकारांना अडकवण्याची तयारी होती. त्यासाठी ४-५ ब्राह्मण वकील तर दिवसरात्र गुंतलेले होते. पण त्यांनी आपल्यात बॅ. गाडगीळांना घेऊन अजाणतेपणी स्वत:साठीच अडचण निर्माण केली होती. हा गट कार्यरत होताच गाडगीळांनी प्रबोधनकारांना सावध तर केलंच पण निश्चिंतही केलं, मी आहेच त्यात. तेव्हा काय चालले आहे, ते वरचेवर कळवून तुम्हाला इशारा देईनच म्हणा. ते प्रबोधनकारांना प्रत्येक घडामोडीची बित्तंबातमी देत. शत्रूपक्षात सध्या कोणतं कारस्थान सुरू आहे आणि कोणता डाव खेळला जात आहे, याची खबरबात सहजपणे प्रबोधनकारांपर्यंत पोचत असे. त्यामुळे प्रबोधनकार पूर्ण तयारीत होते.
प्रबोधनकारांच्या साहित्याचं संशोधन करणार्या वकिलांनी दहा पंधरा दिवस फारच चिकाटीने शोध घेतला. रोज बैठका होत होत्या. शब्दांचा आणि अर्थाचा कीस काढला जात होता. पण कायद्यावर बोट ठेवून खटला भरता येईल, असं काही सापडत नव्हतं. या सगळ्या घडामोडींचा अहवाल रोजच्या रोज प्रबोधनकारांना गाडगीळांमुळे मिळत होता. प्रबोधनमध्ये काही सापडत नाही म्हटल्यावर या वकीलवीरांचा पूर्ण भरवसा कोदंडाचा टणत्कार या ग्रंथावर होता. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या अहवालात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाची बदनामी केली होती. ते पुराव्यानिशी आणि तर्काने खोडून काढत प्रबोधनकारांनी या पुस्तकात त्यांच्या ब्राह्मणी इतिहासलेखनावर टीकेचे जबरदस्त प्रहार केले होते. त्यामुळे जातीविषयी असलेल्या कोदंडाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी या पुस्तकात नक्की आपल्याला हवा तो ऐवज सापडेल, याची त्यांना खात्री होती. त्या पुस्तकाचा अभ्यास करून खटल्याच्या दृष्टीने कागदावर नोट्सही काढून ठेवल्या होत्या.
सगळी तयारी झाल्यानंतर त्यांनी मार्गदर्शनासाठी मुंबईहून एका नामांकित कायदेतज्ञाला निमंत्रण दिलं. त्याच्याशी रात्रभर चर्चा वादविवाद झाले. पण त्याने स्पष्ट शब्दांत निर्वाळा दिला की या पुस्तकाच्या आधारे ठाकरेंना अडचणीत आणणं शक्य होणार नाही. `या प्रकरणात तुम्हाला ठाकरे यांच्याविरुद्ध काहीही करता येणार नाही. प्रथम ऑफेन्सिव कोणाची? तर भा.इ.सं. मंडळ आणि राजवाडे यांची. त्यातली भाषा नि मुद्देच इतके ऑफेन्सिव अँड डिफेमेटरी आहेत की त्यांना प्रत्युत्तर देताना ठाकरे यांनी वापरलेल्या भाषेपेक्षाही जहरी भाषा वापरली असती, तरी डिफेन्सिवच्या मुद्द्याखाली ती क्षम्य ठरणे प्राप्त आहे. `कायदेतज्ज्ञाचं हे मत ऐकताच वकील कंपू गपगार झाला.
काकासाहेब गाडगीळांनी याचं सविस्तर वर्णन झाल्या रात्रीच प्रबोधनकारांना ऐकवलं. ते ऐकून प्रबोधनकारांनीच नवा डाव रचला. त्यासाठी त्यांना त्यांच्या पुण्याला अपरिचित असण्याचा फायदा झाला. त्यांना पुण्यात फारसं कुणी ओळखत नव्हतं, म्हणजे नाव माहीत होतं, पण समोरासमोर ओळखदेख नव्हती. कारण ते पुण्यात फारसे कुणाकडे जात नसत. नेहमी येणारी मंडळी त्यांना भेटण्यासाठी छापखान्यात किंवा घरीही येत. कधी रिकामे असतील तर ते संध्याकाळी चालण्यासाठी बाहेर पडत. त्यांचा रोजचा रस्ताही ठरलेला होता. संध्याकाळी शंकरराव मुळे यांच्या बुधवार पेठेतल्या पुस्तकाच्या दुकानात थोडा वेळ बसायचं. तिथून कोतवाल चावडीवरून तुळशीबागेत वळायचं. तिथे आयुर्वेदिक वैद्य नाना सासवडकर दवाखान्यात दिसले तर तिथे थोड्या गप्पा मारायच्या. कधीतरी पंपूशेठच्या दुकानात शंकरराव मुजुमदार बसलेले असतील तर थोडी चक्कर तिथे मारायची. तिथून सदाशिव पेठेतल्या बिर्हाडी यायचं, असा त्यांचा क्रम होता. रोजचा रस्ता तोच, रोज भेटणारी माणसंही तीच. त्यात त्यांचा पोषाख हॅट, बूट, टाय असा मुंबईकराचा. त्यामुळे हेच प्रबोधनकार ठाकरे, असं ठामपणे सांगणारे पुण्यात फारच कमी जण होते.
या अनोळखीपणाचा फायदा घेऊन प्रबोधनकारांनी शत्रूच्या बालेकिल्ल्यातच घुसण्याचा धाडसी निर्णय घेतला. दुसर्या दिवशी सकाळीच ते एक मळकट पंचा, तसाच सदरा आणि प्रबोधनकारांच्या शब्दांत साडेतीन आण्यांची टोपी अशा थाटात स्वत:च लिहिलेले सगळे ग्रंथ आणि प्रबोधनच्या फायली एका रुमालात बांधून वकिलांच्या म्होरक्याच्या घरी पोचले. मुंबईच्या कायदेतज्ज्ञाने हात वर केल्याने वकील कंपू हताश झाला होता, हे त्यांना माहीत होतंच. त्याचा लाभ उठवत त्यांनी नवं नाटक रचलं. त्यांनी सांगितलं, खानदेशातील भडगाव येथून आलो आहे. माझे नाव औदुंबर त्र्यंबक वाळिंबे. त्या हरामखोर ठाकर्यांच्या पुस्तकातील नि त्याच्या त्या ब्रह्मद्वेष्ट्या प्रबोधनातील, फौजदारी खटला करता येईल असे निवडक उतारे पुराव्यासह घेऊन मुद्दाम भेटायला आलो आहे, असं प्रबोधनकारांनी सांगताच त्यांना म्होरक्या वकिलांच्या खास दालनात प्रवेश मिळाला. तिथे वकील अशिलांबरोबर बोलत बसले होते. त्यांनी लगेच आपल्या नोकरांना सायकल घेऊन संशोधक वकीलवीरांना बोलवायला पाठवलं. प्रबोधनकारांना वाट बघायला सांगून स्वत:ची काम लगबगीने आवरायला घेतली.
अर्ध्या तासाने सगळा वकील कंपू गोळा झाला. मुळातच उत्तम अभिनेते असणार्या आणि नाटक कंपनीत दीर्घकाळ घालवलेल्या प्रबोधनकारांनी सगळ्यांना आपल्या नाटकात गुंतवायला सुरवात केली. एकेक पुस्तक उघडून त्यातले पॅरेग्राफ वाचून दाखवत त्यावर आक्षेपांचं प्रवचन करू लागले. खोट्या त्वेषाने केलेली केलेली मांडणी सगळे अगदी तन्मयतेने ऐकत होते. सगळं बेमालूम सुरू असताना माशी शिंकली. अचानक तिथे बॅ. काकासाहेब गाडगीळ येऊन पोचले. त्यापुढे काय झालं, याचं वर्णन मात्र प्रबोधनकारांच्या शब्दांत वाचायला हवं. ते असं,
इतुक्यात काय वर्तली माव! बॅ. गाडगीळ तेथे आले नि `काय केशवराव, आज इकडे कसे? म्हणताच सारे चमकले. म्हणजे? हे कोण केशवराव? म्होरक्याने पृच्छा केली. गाडगीळ खदाखदा हसत म्हणाले, अहो, हेच ते प्रबोधनकार केशवराव ठाकरे. सारेजण
कॅपिटल ओ सारखे तोंड वासून माझ्याकडे बघतच राहिले. म्होरकेश्वर अखेर उद्गारले : मोठ्या छातीचा इसम दिसतो हा! मी : तसं काही नाही वकीलसाहेब. पाहिलं, सिंहाच्या गुहेत घुसून त्याची आयाळ निदान कुरवाळता तरी येते का नाही. बरं. घेतो आपली रजा. आता ओळखलंत ना मी कसा आहे ते!`
प्रबोधनकारांनी आचार्य अत्रेंच्या श्यामची आई सिनेमात एका इरसाल सनातनी पुराणिक बुवाची भूमिका केली आहे. तो अभिनय ज्यांनी बघितला असेल, त्यांना प्रबोधनकारांनी या ब्राह्मणी कारस्थानांच्या घरात घुसून काय गोंधळ घातला असेल, याची कल्पना करता येईल. या जगावेगळ्या गनिमी काव्याने त्यांनी सगळं कारस्थान मुळापासून उधळून लावलं. प्रबोधनकार किती उत्तम अभिनेते होते, हे तर यातून दिसतंच पण त्यांचं धाडस आणि संकटांना भिडण्याची वृत्तीही दिसून येते. चौकटीबाहेरचा विचार करून शत्रूलाच बेसावध पकडून त्याला धोबीपछाड देण्याची त्यांची ही पद्धत त्यांना कायदेशीर कारस्थानापासून बचाव करण्यात उपयोगी ठरली. पण एक भलतंच कायदेशीर लचांड याच काळात त्यांच्या अंगावर आलं. पण ते पुण्यातल्या कज्जेदलालांचं नव्हतं, तर मुंबईतल्या एका संपादकाने केलेल्या बदनामीच्या खटल्याचं होतं.
उद्गारवाचकाची कुंपणं
वकील म्होरक्याच्या घरात घुसण्यात धाडस होतंच, पण त्याचबरोबर गंमतही होती. याच दरम्यान सप्टेंबर १९२५च्या अंकात एक लेखकमंडळींची खिल्ली उडवणारी चौकट प्रसिद्ध झाली होती. आजही नव्या लेखकांसाठी ती महत्त्वाची आहे. उद्गारवाचक चिन्ह (!) आणि डॅश (-) यांचा अतिरेकी वापर करणार्या लेखकांसाठी त्यांनी लिहिलं आहे, अहो लेखकांनो, वरील मजकूर आपण वाचूं शकता काय? कसली ही काटेरी कुंपणं? काय त्याचा अर्थ? पण, आजकाल जो लेखक उठतो, तो स्वल्पविराम, पूर्णविराम वगैरे चिन्हांच्या ऐवजी या काटेरी कुंपणातली झुडपे मारे देतो पेरून सार्या लेखभर. विरामचिन्हांचा काही ठरावीक अर्थ असतो हे या `उद्गारचिन्ह्या लेखकांच्या गावीही नाही. वाक्य पुरे झाले की ठोक! कोठे! कोठे!! कोठे!!! तर कोठे!!!! दुसरे काही लेखक आहेत, त्यांचा धडाका ? – – वर. जिकडे पहावे तिकडे डॅशच डॅश. डॅश घातले म्हणजे लेख मोठा डॅशबाज होतो की काय? स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम. उद्गार! प्रश्न? चिन्हे कोठे घालावी हे ज्यांना कळत नाही, त्यांनी लिहिण्यापूर्वी चिन्हांचा उपयोग शिकावा.` – संपादक, प्रबोधन