ग्रहस्थिती : मंगळ कर्क राशीमध्ये, गुरू, हर्षल वृषभ राशीत, रवि, बुध वृश्चिक राशीत, शुक्र धनु राशीत, प्लूटो-मकर राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, शनि कुंभ राशीत, केतू कन्या राशीत. दिनविशेष : १४ डिसेंबर दत्तजयंती, १५ डिसेंबर मार्गशीष पौर्णिमा, १८ डिसेंबर संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ८.५९ वा.
– – –
मेष : मनासारखी कामे होतील. वाद संपुष्टात येतील. बिघडलेले वातावरण बदलेल. नोकरीत काळजी घ्या, नवीन बदल स्वीकारा. मन:स्वास्थ्य सांभाळा. व्यवसायात चांगला काळ, पण, काही कटकटी निर्माण होतील. तरुणांना नव्या संधी चालून येतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नवीन ओळखी कामे पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरतील. कामाच्या ठिकाणी मोजकेच बोला. रागावर आवर घाला. घरातील वातावरण आनंदी राहील. संततीकडून चांगली बातमी मिळेल. आरोग्याचा तक्रारी डोके वर काढतील. व्यायामाला वेळ द्या.
वृषभ : घरात आणि बाहेर नाराजी वाढवणार्या घटना घडतील. घरासाठी भरपूर वेळ खर्च होईल. नवीन जबाबदार्या चुकवू नका. व्यवसायात गणिते चुकू शकतात. घरात मंगलकार्यामुळे वातावरण आनंददायी राहील. नोकरीत वाढीव कष्ट करावे लागतील. व्यवसायात नव्या कल्पनांमुळे आर्थिक बाजू भक्क्म होईल. बंधूवर्गाबरोबर जमवून घ्या. कामात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. डोळे झाकून कोणत्याही कागदावर सही करू नका, पुढे त्रास वाढेल. सामाजिक कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळेल. मुलांकडे विशेष लक्ष द्या.
मिथुन : कामाचे आर्थिक गणित बिघडू शकते. नोकरीत कामाचा ताण आरोग्यावर परिणाम करील. वेळ व कामाचे गणित बसवताना कसरत होईल. घरात किरकोळ वाद घडतील. मित्रांशी चेष्टामस्करी नको. अनपेक्षित धनलाभ होईल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. जनसंपर्क, पत्रकारिता, साहित्य क्षेत्रात नव्या संधी मिळतील. विदेशात व्यवसायविस्ताराची चर्चा पुढे सरकेल. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला घ्याच. अतिफायद्याच्या प्रलोभनांपासून दूरच राहा. भागीदारीत किरकोळ वाद होतील. सरकारी काम पूर्ण होईल.
कर्क : मानापमानात अडकू नका. पत्नीशी वागताना काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. फक्त आर्थिक नियोजनात काळजी घ्या. बुद्धिचातुर्याच्या जोरावर कामे पुढे न्याल. खाताना नियम पाळा अन्यथा पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. कलाकार, संगीतकार, क्रीडापटूंना मानसन्मानाचे योग आहेत. मित्रांशी बोलताना काळजी घ्या, वाद टाळा. मन शांत ठेवा. ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. मध्यस्थी करणे टाळा. पैशाचे नियोजन करा. आश्वासने देऊ नका. निर्णयात घाई नको.
सिंह : नोकरीत कामाचे कौतुक, बढती, पगारवाढीचे योग आहेत. भागीदारीत व्यवहारात काळजी घ्या. योगा, ध्यानधारणेमुळे समाधान मिळेल. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लागेल. व्यावसायिकांची प्रवासात दगदग होईल. नवीन वस्तू घेण्याचा मोह होईल. सार्वजनिक जीवनात एखादा विचित्र प्रसंग मन:स्वास्थ्य बिघडवेल. सकारात्मक विचार करा. अति आत्मविश्वास नको. ज्येष्ठांशी वाद होतील. थकीत येणे वसूल होईल. प्रतिक्रिया देणे टाळा. घरात आनंद वाढवणारी बातमी कानी पडेल. तरुणांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल.
कन्या : मनासारख्या घटना घडून घरात वातावरण आनंदी राहील. जुने निर्णय मार्गी लागतील. सरकारी कामे सबुरीने करा. तरुणांना नोकरी मिळेल. आध्यात्मिक कामातून मन:शांती मिळेल. जनसंपर्क क्षेत्रात नव्या संधी चालून येतील. नवीन मित्रांमुळे काही नवी कामे मिळतील. नातेवाईक, मित्रमंडळींची गाठभेट होईल. उधार-उसनवारी टाळा. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत फक्त काम करा आणि कमी बोला. व्यावसायिकांना कामे पुढे नेताना बुद्धिकौशल्याचा वापर करावा लागेल. कसोटीच्या प्रसंगाला धीराने सामोरे जा, यश मिळेल.
तूळ : आपणच बरोबर, हे पटवून देण्याच्या भानगडीत पडू नका. नोकरीत काळजी घ्या. मनःस्वास्थ्य चांगले राखा. आध्यात्मिक कार्यातून समाधान मिळेल. व्यवसायात वाद टाळा. कोणत्याही कामाचे दडपण घेऊ नका. संयम ठेवा. कर्तृत्वामुळे लौकिकात भर पडेल. व्यवसायात धावपळ होईल. सामाजिक कार्याला वेळ द्याल. निर्णयक्षमता भक्कम करावी लागले. दानधर्मातून समाधान मिळेल. मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होतील. दांपत्यजीवनातील कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. प्रवासात काळजी घ्या. निर्णयात घाई नको.
वृश्चिक : होता है, चलता है, असे धोरण नको. धार्मिक कार्यांकडे अधिक ओढा राहील. शिक्षणक्षेत्रात चांगला काळ. नोकरीत कामाच्या ताणातून दगदग वाढेल. आर्थिक बाजू बळकट होतील. येणे वसूल होईल. सार्वजनिक ठिकाणी मर्यादेत राहा. अतिविचारचक्रात अडकू नका. तरुणांना नवीन नोकरीची संधी येईल. अचानक आर्थिक लाभ होतील. शेअर, सट्टा, लॉटरीमधून नशीब चमकेल. पण त्यात फार अडकू नका. व्यवसायात सरळमार्गी काम करा. व्यवहार चोख ठेवा. नातेवाईक मदतीसाठी हात पुढे करतील. निर्णय घेताना सर्व बाजू तपासा. ब्रोकरना लाभ मिळवून देणारा काळ आहे.
धनु : व्यावसायिकांना लाभदायक काळ. नोकरीत कामांचे कौतुक होईल. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. नवीन वास्तू घेण्याच्या विचारांना गती मिळू शकते. कामानिमित्ताने बाहेरगावी जाल. तरुणांनी मोहापासून दूर राहावे. मेडिकल, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम काळ. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. मामा मावशींची मदत होईल. नोकरीत चांगली स्थिती राहील. प्रमोशन होईल. तरुणांच्या नव्या संकल्पनांचे व्यवसायात रूपांतर होईल. समाजसेवेतून समाधान मिळेल. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. विदेशात जाण्याची संधी मिळेल.
मकर : जुने प्रश्न मार्गी लागतील. सरकारी कामे सुटतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कामात अहंकार सोडा. सामाजिक कार्यात चांगला अनुभव येईल. व्यावसायिकांची ऑर्डर वाढेल. उधार उसनवारी टाळा. महिलांना यश मिळेल. जुन्या ओळखींमधून अडलेले काम मार्गी लागेल. शुभवार्ता समजल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. निर्णय घेताना भावना गुंतवू नका. व्यवसायात पैशाचे योग्य नियोजन करा. आर्थिक बाजू बळकट राहील, पण, वायफळ खर्च नको. मालमत्तेचे व्यवहार करताना काळजी घ्या. बँकेचे कर्ज मंजूर होईल.
कुंभ : मनात राग ठेवू नका, त्यामुळे काम बिघडेल. व्यवसायात कामांना विलंब लागेल. कुणाशी बोलताना गैरसमज टाळा. आध्यत्मिक कार्यातून मानसिक समाधान मिळेल. मौजमजेवर पैसे खर्च होतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत टोकाची भूमिका नको. संमिश्र घटना अनुभवाल. प्रवास घडेल. संशोधक, प्रेमी युगुले व खेळाडूंना यशदायी काळ आहे. पती-पत्नीत वाद होतील. धारदार वस्तू वापरताना काळजी घ्या. मनाविरुद्ध घटना घडल्याने नाराज होऊ नका. सामाजिक कार्यात मोठ्या व्यक्तीचा सहवास लाभेल.
मीन : मानसिक संतुलन कायम राखा. नोकरीत अधिकचे काम कराल. संततीकडे लक्ष द्या. मित्र, नातेवाईकांशी बोलताना काळजी घ्या. अडकलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास अधिक बळकट करण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात अडचणी निर्माण होतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. टिंगलटवाळी करू नका, त्यामधून गैरसमज निर्माण होतील. शुभ घटना कानावर पडतील, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. अचानक धार्मिक ठिकाणाला भेट देणे होईल. त्यामुळे समाधान मिळेल.