आणीबाणीनंतर आलेल्या जनता पक्षाच्या राजवटीच्या काळात बाळासाहेबांनी रेखाटलेली ही जत्रा जिवंत व्यक्तिरेखाटनाचा नमुना म्हणून तर जबरदस्त आहेच, त्याचबरोबर त्यांनी या एका चित्रात इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यातला आणि त्यांच्या राजवटींमधला फरक स्पष्ट करून टाकला आहे. दिवंगत बाळासाहेबांच्या काळात कधी शिवसेना काँग्रेसबरोबर गेली असती का, अशी अडाणी बडबड करणार्यांना इथे सणसणीत चपराक बसेल, अशी इंदिरा गांधींची पाठराखण बाळासाहेबांनी केली आहे. दोन्हीकडे मतदान हा कॉमन विषय आहे आणि तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यांच्यातही मतदान समान आहेच… आता फक्त ईव्हीएम चर्चेत आहे. ईव्हीएमचे पुरस्कर्ते आपणच ईव्हीएम डिझाइन केलं असल्यासारखे त्या यंत्राचं कौतुक सांगत असतात. जे जे इलेक्ट्रॉनिक आहे, जिथे जिथे आपण केलेल्या मतदानाची नोंद नेमकी कुठे झाली आहे, ते कळण्याची सोय नाही, ते ते अविश्वसनीय आहे, असं तंत्रज्ञान लबाडांच्या हाती पडले तर लोकशाहीला धोका आहे, हे लक्षात घेऊन प्रगत देशांनी ईव्हीएमचा वापर बंद केला आहे. आपल्याकडे मात्र एरवी समाजाला मागास कल्पनांच्या साह्याने अश्मयुगात न्यायला उत्सुक असलेले सत्ताधारी या एका बाबतीत आधुनिक तंत्रज्ञानाची कोण भलामण करतात… आणीबाणीच्या काळापर्यंत राजकारणाच्या मुख्य प्रवाहात नगण्य असलेली ही विचारधारा मोरारजींच्या खांद्यावर बसूनच राष्ट्रीय राजकारणात आली आणि त्याचीच फळे आता आपण भोगतो आहोत, भोगणार आहोत, हा एक कटू योगायोग.