मंडळी आपल्या जीवनात अनेक अडचणी उभ्या ठाकत असतात. अनेक संकटं उभी राहत असतात. अशावेळी आपण ‘अरे बापरे,’ ‘वाट लागली,’ असं म्हणत राहिलो तर आपली लढण्याची ताकद आपणच काढून घेऊ. काहीतरी संकट उभं राहिलं असेल तेव्हा वाट लागली, सत्यानाश झाला असं म्हणत डोक्याला हात लावण्यात अर्थ नसतो. काही प्रॉब्लेम्स होतात तेव्हा सकारात्मक विचार करण्याचा एक दृष्टिकोन आहे… ‘तरी बरं’ हा तो विचार. म्हणजे काय? तर काहीही प्रश्न निर्माण झाला की विचार करायचा, तरी बरं, यापेक्षा मोठा प्रश्न उभा राहिला नाही, यापेक्षा मोठे संकट उभं राहिलं नाही. ते उभं राहिलं असतं तर आपल्याला त्यालाही समोर जावं लागलंच असतं आणि घडलंय त्यापेक्षा अधिक वाईट होऊ शकलं असतं, हेही खरंच ना?
समजा, आपण कुठेतरी प्रवासाला निघालो आहोत. दोन-तीन बॅगा सोबत आहेत आणि आपल्या लक्षात येतं की पैशाचं पाकीट असलेली बॅग चोरीला गेली आहे. आता चोरी झाली हे तर खरं आहे? आता डोकं धरून बसण्यात अर्थ नाही. आता आपण म्हणू शकतो ‘तरी बरं’.
कसं?
तरी बरं की माझा मोबाईल चोरी झाला नाही. माझा मोबाईल माझ्यासोबत आहे. मोबाईलवरून मदत मागता येईल. मोबाईलवरून पेमेंट करता येईल. आता समजा, मोबाईलच चोरीला गेला आहे. आपण म्हणू शकतो ‘तरी बरं.’
कसं?
तरी बरं अजून आपण आपल्या शहरात आहोत. आपल्याला इथले लोक ओळखतात. आपण त्यांची मदत घेऊ शकतो किंवा एखादं वाहन हायर करून घरी परतू शकतो. घरी पोहोचून वाहनाचे पैसे देऊ शकतो.
समजा आपल्याला अपघात झाला, तर आपण म्हणू शकतो, ‘तरी बरं’ खूप जास्त मार लागला नाही. गंभीर दुखापत झाली नाही. खूप जास्त जखमी झालो नाही. समजा जास्त जखमी झालो आहोत, तर मग आपण म्हणू शकतो, ‘तरी बरं’ जीव वाचला!
मला प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळी हे ‘तरी बरं’ म्हणणं मदत करत आलं आहे. घडलंय ते घडायला नको होतं असं म्हणून स्वतःला दुर्दैवी समजण्यात अर्थ नसतो. ‘तरी बरं’ म्हणून आलेल्या प्रसंगाला सामोर जायला हवं. ‘तरी बरं’ याचा एक अर्थ आहे ‘यापेक्षा वाईट होऊ शकलं असतं.’ ‘तरी बरं’ आणि ‘यापेक्षा वाईट होऊ शकलं असतं’ या ओळींनी आपल्याला परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती मिळते, धीर येतो.
मंडळी, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही त्रासदायक किंवा नकोशा परिस्थितीत देखील काही चांगल्या गोष्टी असतात. इतकंच की त्या आपल्याला नीट पाहाव्या लागतात, शोधाव्या लागतात. प्रत्येक परिस्थितीचे काही फायदे आणि काही तोटे असतात. कुठलीच स्थिती, परिस्थिती पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसते. तरी बरं आणि यापेक्षा वाईट होऊ शकलं असतं, याप्रमाणेच एक विचार आहे ‘जे होतं ते भल्यासाठीच. जे झालं ते चांगल्यासाठीच. काही त्रासदायक घडलं अन् जे घडलं ते चांगलं झालं, असं आपण म्हटलं तर? जे वाईट झालं असं आपण म्हणतो, त्यातूनही काही चांगलं होऊ शकतं.
आपण राजा-प्रधानाच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. एका राजाच्या दरबारातला प्रधानजी काहीही वाईट घडलं की म्हणायचा, जाऊ द्या हो. झालं ते चांगलंच झालं. होतं ते भल्यासाठीच होतं… झालं ते चांगलंच झालं हे वाक्य वापरणं ही त्याची सवय, खोडच म्हणा ना! राजाला प्रधानजीच्या या वाक्याचा खूप राग यायचा. पण करतो काय? एकदा एका युद्धात राजाच्या बोटाला शत्रूची तलवार लागली. राजाचं जवळजवळ अर्धं बोट छाटलं गेलं. युद्धानंतर महाराजांनी प्रधानजींना कापलेलं बोट दाखवलं. म्हणाले, बघा प्रधानजी! शत्रूची तलवार बोटावर लागली आणि अर्धं बोट कापलं गेलं. प्रधानजी म्हणाले, जाऊ द्या हो महाराज! झालं ते चांगलं झालं, जे होतं ते भल्यासाठीच होतं. राजाला प्रधानाचा राग आला. आपलं बोट कापलं गेलं आहे अन् हा म्हणतोय, जे झालं ते चांगलं झालं. होतं ते भल्यासाठीच होतं. राजाला खूप राग आला. त्याने चिडून आदेश दिला, प्रधानजीला तुरुंगात डांबा. प्रधानजींना तुरुंगात डांबण्यात आलं.
काही दिवसांनी महाराजांना शिकारीला जायची इच्छा झाली. शिपायांना घेऊन ते जंगलाकडे रवाना झाले. जंगलात खूप आत शिरण्यापूर्वी सावज पळून जाऊ नये म्हणून त्यांनी शिपायांना ‘सोबत येऊ नका, इथेच थांबा’ असं सांगितलं आणि स्वतः जंगलात एकटे आत शिरले. जंगलात रस्ता चुकले. सावध राहायच्या नादात भलतीकडे गेले. भरकटले. जंगलातल्या एका रानटी जमातीच्या हाती सापडले. ते लोक त्यांच्या देवीची पूजा करीत होते. त्यांना देवीला बळी द्यायचा होता. त्यांना वाटलं, देवीनेच तिला हवा तो बळी पाठवला आहे. त्यांनी राजाला ताब्यात घेतलं. त्याला ओवाळलं. त्याच्या गळ्यात हार घातला. त्याच्या कपाळाला टिळा लावला. त्याची पूजा केली आणि बळी देण्यासाठी ते राजाच्या मानेवर मोठा सुरा चालवणार इतक्यात त्यांचा पुजारी ओरडला, थांबो या माणसाला अर्धंच बोट आहे. देवीला अर्धवट बळी चालत नाही. याला सोडून द्या. ते लोक जी भाषा बोलत होते त्याचा अर्थ राजाला कळला. आपल्याला अर्ध बोट नाहीये म्हणून आपल्याला सोडण्यात आलं आहे, हे लक्षात घेऊन राजा जंगलातून पळत रस्ता शोधत राजवाड्यात दाखल झाला. प्रथम तुरुंगाकडे गेला आणि प्रधानजींना म्हणाला, प्रधानजी, तुम्ही नेहमी म्हणता’ जे होतं ते भल्यासाठी. जे झालं ते चांगलं झालं, खरंच चांगलं झालं हो…
महाराजांनी प्रधानजींना हकीकत सांगितली आणि तुरुंगात टाकलं त्याबद्दल माफी मागितली.
यावर प्रधानजी म्हणाले, जाऊद्या महाराज! मला टाकलंत तुरुंगात ते बरं झालं. जे होतं ते भल्यासाठी.
महाराजांनी वैतागून प्रधानाला विचारलं, यात काय चागलं झालं?
प्रधानजी म्हणाले, तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं तर मी तुमच्यासोबत असतो. आपण दोघे जंगलात खूप आत शिरून त्या वन्य जमातीच्या हाती सापडलो असतो. तुमचं बोट अर्धवट आहे, तुम्ही अर्धा बळी म्हणून त्यांनी तुम्हाला सोडलं असतं आणि पूर्ण बळी म्हणून माझा बळी दिला असता. बरं झालं तुम्ही मला तुरुंगात टाकलं. जे होतं ते भल्यासाठी. जे झालं ते चांगलं झालं….
माणसांच्या बाबतीत वाईट घटना घडतात. कुणीतरी जवळचा माणूस सोडून जातो, आधार जातो. मृत्यू अटळ आहे. आज ना उद्या तो येणार. आपल्याला येणार. आपल्या सोबतच्या माणसांना येणार. आपण एकटे पडणार. पण अशा परिस्थितीमध्ये जबाबदारी पडल्यावर आपल्या वापरात नसलेल्या क्षमता वापरल्या जातात. माणसं समर्थपणे उभी राहतात, दुःखातून सावरतात. नवं काही घडवू लागतात. अचानक पती गेल्यावर पत्नी नोकरी व्यवसाय करून अर्थार्जन करून कुटुंब चालवते.
एकूण जीवनात काही त्रासदायक, दुःखदायक घडतं. संकट येतं तेव्हा आपण तरी बरं, यापेक्षा वाईट होऊ शकलं असतं आणि जे होतं ते भल्यासाठी ही तीन वाक्यं लक्षात ठेवायला हवी..