पैसा श्रेष्ठ की प्रेम?
– नारायण शेट्टी, रहिमतपूर
पैशामुळे प्रेम मिळालं तर पैसा श्रेष्ठ.
प्रेमामुळे पैसा मिळाला तर प्रेम श्रेष्ठ.
उंच माणसाला सतत सगळ्यांपुढे मान झुकवावी लागते, उगाच त्याच्या उंचीची कौतुकं कशाला?
– संध्या साळवी, प्रभादेवी
जाऊदे ताई, स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही उंच टाचेच्या सँडल वापरा.
सुखी वैवाहिक जीवनाचा मूलमंत्र काय?
– रोहित आपटे, पुणे
विवाह झाला की ताबडतोब मूल होऊ द्यावं.. दोघेही झक मारत वैवाहिक जीवन सुखी करतात.. मूल होऊ देण्यासाठी एकच मूलमंत्र आहे.. माझं मूल माझी जबाबदारी.. आत्मनिर्भर व्हावं शक्यतो…
आपल्याकडे माणसांना अधिकार हवे असतात, पण अधिकारांबरोबर येणार्या जबाबदार्या नको असतात. अशाने देश कसा पुढे जाणार?
– रोहिणी पाटील, श्रीरामपूर
जय श्रीराम बोला, देश पुढेच गेलेला दिसेल.. श्रीरामपूरचे असूनबी कळंना व्हय…
त्याने मर्सिडिझला टेकून काढलेला फोटो पोस्ट केला. ती त्याच्यावर भाळली. प्रकरण खूप पुढे गेल्यावर तिला कळलं की तो मर्सिडीझच्या शोरूममध्ये मर्सिडीझ पुसायच्या कामाला आहे. आता काय करायचं?
– अशोक सापत्नेकर, चिंचवड
स्वतःच्या गोष्टी ‘तो’ आणि ‘ती’च्या नावाने खपवताय.. हे वागणं बरं न्हवं पावनं…
आपल्या देशात महापुरुषांवरून जे थुकरट वाद सुरू आहेत, ते पाहिल्यावर इथे जन्म घेतल्याचा त्या महापुरुषांना पश्चात्ताप होत असेल ना?
– आरिफ मोहम्मद, मनोर
आपण दुसरा महापुरुष नाही घडवू शकलो, याचा पश्चाताप नक्की होत असेल.
ज्या धर्मात चराचरात ब्रह्म भरलेलं आहे, असं सांगितलं जातं, तिथे एका माणसाच्या स्पर्शाने दुसर्याला विटाळ कसा होत असेल?
– सुलक्षणा कोंढाणे, जुन्नर
माणसाला विटाळ होत नाही… चराचरात ब्रम्ह भरलंय असं सांगणार्यांना माणसाचा विटाळ होतो.. माणूसघाणा आहे, पण हाच विनोद आहे.. उत्तरात वेगळा विनोद शोधू नका.
गुजरातचा केवढा विकास झालाय, उत्तर प्रदेश किती आघाडीवर गेलाय याच्या जाहिराती, बातम्या रोज पाहायला मिळतात. पण तरी इथले त्या राज्यांतले लोक परत आपल्या मातृभूमीला का जाताना दिसत नाहीत?
– पितांबर शेळके, आटपाडी
इथे राहून ‘त्या’ राज्याच्या जाहिराती करणार्यांच्या पोटावर पाय आणायचाय का तुम्हाला?… लब्बाड.
ज्याला पाहिल्यावर हा फक्त जगातला ऑक्सिजन वाया घालवण्यासाठीच जन्माला आला आहे असं वाटावं, असा एखादा माणूस भेटला आहे का हो तुम्हाला?
– विरुपाक्ष देशपांडे, बेळगाव
हो रोज सकाळी भेटतो.. आरशात बघताना.
नाटकाच्या प्रयोगात समोरच्या कलावंतांच्या विनोदांवर हसू येऊन बेअरिंग सुटलं, असं कधी होतं का हो तुमचं? मग काय करता?
– दीपक बोरगावकर, आष्टी
लगेच असे अवघड प्रश्न आठवतो.
योगीजींनी म्हणे मुंबईच्या सिनेमासृष्टीपाठोपाठ मराठी नाट्यसृष्टीही उत्तर प्रदेशात नेण्याचा घाट घातलाय… तुम्ही जाणार की नाही?
– शिवराम बोबडे, माढा
अहो ते अभिनेते दाखवून नेते पळवतात, असं विरोधक बोलतात. आणि मी नेता नाही, अभिनेता आहे, असं माझं मीच बोलतो. मला सोंग बदलता येतं, रंग नाही.. सो माझा तिथे काही उपयोग नाही.
‘आला थंडीचा महिना, मधाचं बोट कुणी चाटवा’ असं काहीतरी गाणं आहे म्हणे… मधाचा काय संबंध? रम किंवा ब्रँडीचा घोट चाखवा, असं पाहिजे ना त्या गाण्यात?
– विश्वास काळे, खिद्रापूर
रम किंवा ब्रँडी तुम्हाला झेपणार आहे का? तेवढा विश्वास आहे का काळे तुम्हाला तुमच्यावर.. नसेल तर स्वतःला हवं तसं गाणं लिहा आणि ऐका.. कोणी अडवलं तर घ्या खरा घोट नि करा अडवणार्याची…