प्रबोधनमध्ये प्रकाशित झालेला हा लेख आपण मागील अंकापासून पाहतो आहोत. आपल्या इतिहासात फारशी जागा नसलेला हा विषय प्रबोधनकारांनी तत्कालीन संदर्भांत नव्याने मांडला. सातार्याचे दैव आणि दैवाचा सतारा! या प्रबोधनकारांच्या प्रसिद्ध लेखाचा मागील अंकावरून चालू पुढचा भाग.
– – –
स्वराज्याचा विध्वंस केल्या दिवसापासून सातारा जिल्ह्यांतला पवित्र ब्रह्मवृंद मारवाडी कसायाच्या धंद्यानें ब्राह्मणेतर मराठ्यांच्या अज्ञानावर पोळाप्रमाणें चरून, बराच धनकनकसंपन्न होऊन बसला आहे. इंग्रजी विद्येचा प्रसार व तदंगभूत विवेकवाद कितीहि पैâलावला असला आणि पदवीधरांचें प्रमाण कितीहि वाढले असले, तरी ब्राह्मणांची भोजनाची चटक कांहीं केल्या कमी होत नाहीं. खरकट्याच्या जन्मसिद्ध स्वराज्याच्या हक्कासाठीं लढायला दरसाल किती तरी पुणेरी भिक्षुक वीर बिनचुक सज्जनगडावर जात असतात. सारांश, सातार्याचे दैव सध्या अशा प्रकारचेंआहें. विशेष कांहीं असेल तर एवढेंच कीं पुणेरी देशभक्तांच्या तोंडाळ लेखाळपणाचा प्रतिध्वनि सातार्यांत बिनचुक उमटतो; इतका या दोन शहरांत भिक्षुकी एकजिनसीपणा आहे.
एखादा ऐतिहासिक पुनरावृत्तीचा दाखला कोणी मागितलाच तर पुण्याच्या बाळंभट नातूच्या `डिअर फ्रेंड खुरशेदजी मोदी’चा एक अवतार हल्लीं सातार्यात सार्वजनिक हितवादाच्या क्षेत्रांत लुडबूड करीत असतो. खालसांतल्या इतर सामान्य शहरापेक्षां सातार्याला अधिक वैशिष्ट्य कांहींच उरलेले नाहीं. तेथें स्वराज्य नाहीं, स्वराज्याची अभिमानास्पद स्फूर्ति नाहीं, छत्रपति नाहीं, कोणी नाहीं. हिंदु लोक जात्याच देवभोळे असल्यामुळें, ब्राह्मणांच्या चिथावणीनें ते वाटेल ते त्या दगडाधोंड्याचा देव बनवून त्याच्या भजनानंदांत पृथ्वीवर स्वर्ग उतरल्याच्या कल्पनेंत तल्लीन होतात. असल्या क्षणिक तल्लीनतेंत त्यांना असेंहि वाटतें कीं सातार्याचे दैव उदयाला आले!
तीन चार महिन्यापूर्वी सातारचे श्रीमंत भाऊसाहेब महाराज भोसले दिवंगत झाले. ते निपुत्रिक वारल्यामुळें त्यांच्या राणीनें एक अल्पवयी मुलगा दत्तक घेतला. या दत्तकविधानाचा इतका मोठ्या थाटाचा समारंभ सातारा शहरांत झाला की गेल्या १०० वर्षांत असोत थाट सातार्यांत कोणी पाहिला नाही असें विश्वसनीय लोकमत आहे. बहुजन समाजाचा आनंद तर वर्णनीय होता. ब्राह्मणांपेक्षां ब्राह्मणेतरांची दाटी अर्थात विलक्षण दांडगी होती. भोळी बिचारी रयत! त्यांना घटकाभर स्वराज्याचा व छत्रपतीच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचाच भास होऊन, सातार्याचें दैव पुन्हा उदयास आलें असें वाटू लागलें.
ब्राह्मणी कारवाईला छत्रपति प्रतापसिंहाचा बळी पडून त्याच्या गादीवर घरभेद्या आप्पासाहेब भोसला बसला. त्या वेळच्या राज्याभिषेकाच्या सुतकी थाटानंतर आज ८६ वर्षांनी सातार्यानें हा दत्तकविधानानिमित्त केलेला भव्य समारंभ पाहिला. मग आनंदाला काय पारावार? पण हा आनंद क्षणिक आहे. नुसत्या समारंभप्रियतेचा परिणाम आहे. एक शतकपर्यंत दडपून पडलेल्या स्वातंत्र्याच्या उत्कृष्ट भावनांची ही उसाळी आहे. छत्रपतीच्या तक्ताबद्दल महाराष्ट्रियांच्या नसानसांत फुरफुरणार्या निर्व्याज व निष्कलंक प्रेमाचा हा उमाळा आहे. आपलेपणाच्या तेखदार रक्ताचा हा सणसणाट आहे. पण त्या उसाळीचा आणि उमाळ्याचा आज काय उपयोग आहे? उत्पद्यंते विलीयन्तेच दरिद्राणां मनोरथाः पैकींच सारा प्रकार. मानवांची समारंभप्रियता असल्या एखाद्या विशिष्ठ प्रसंगी आपल्या भावनांना मनसोक्त विहारासाठीं मोकळे सोडते; पण तेवढा समारंभ झाल्यानंतर पुढें काय? तात्पुरता आनंद, त्याची तात्पुरतीच फलश्रुति.
आज सातारा हें स्वतंत्र संस्थान नाहीं. तेथें स्वराज्य नाहीं, आणि छत्रपतीहि नाहीं. अर्थात दत्तकविधानानिमित्त परवां तेथें झालेल्या भव्य समारंभांत, हत्तीवरल्या मिरवणुकींत आणि त्या नाटकी दरबारांत, भिक्षुकी कारस्थानामुळें पालथें पडलेलें सातार्याचें दैव यत्किंचितहि उलटेंसुलटें होण्याचा संभव नाहीं. दगडाधोंड्यांना शेंदूर फासून त्यांना देवकळा आणण्यांत पटाईत असलेल्या हिंदुजनांना, केवळ आपल्या भावनांच्या खुषीसाठीं, वाटेल त्या व्यक्तीपुढें छत्रपति महाराज-सरकार-मायबाप म्हणून लोटांगणें घालण्यास कांहींच अडचण पडत नसते. पण या नुसत्या लोटांगणांनीं स्वराज्य किंवा छत्रपति निर्माण होते तर पृथ्वीचा स्वर्ग व्हायला कांहींच अवधि लागता ना. सारांश, परवा सातार्यास झालेल्या दत्तविधान समारंभानें सातार्याच्या दैवात जरी कांहीं फेरबदल झाला नाहीं, तरी दत्तक बसलेल्या भाग्यवान मुलाच्या दैवाचा सतारा मात्र कुतूहल उत्पन्न करण्यासारखा आहे खास.
इतिहासाकडे पाहिलें तर असें दिसून येतें कीं शिव छत्रपतींचा वंश म्हणजे दत्तविधानाच्या बाबतींत अनेक व्यक्तींना दैवाचा सतारा ठरलेला आहे. या वंशांतील कांहीं दत्तविधानें राजकारणी बळजबरीचीं झालीं तर कांहीं वाडीबंदरच्या एखाद्या भिवबा पांडबाला घोड्याच्या शर्यतींत लाख रुपयांचें टिकीट लागण्यासारखी झालीं. नुसत्या अस्सल रक्ताच्या भांडवलाचाच विचार केला तर कित्येक भोसले जे एकदां परिस्थितीच्या प्रवाहांत वहात अज्ञात कोपर्यांत पडले ते पडले आणि भलतेच घराणेवाले भोसले बनले. सातार्याच्या शाहू छत्रपतीनंतर जेवढे दत्तविधानी छत्रपति गादीवर आले, त्यांच्या शेळपटपणाला हा दत्तविधानी दैवाचा सताराच मूळ कारण झालेला आहे. शाहू छत्रपति करवीरकरासारख्या अचाट बुद्धिमत्तेच्या एक दोन व्यक्ति बाद केल्या, तर बाकीचे सर्व छत्रपति म्हणजे दैवाच्या झोल्यांत हेलवâावे खाणारे व भोसल्यांचा वंश कसा तरी आडनांवी पुण्याईवर पुढें चालविणारे प्राणी होते, यापेक्षां अधिक कांहीं नाहीं.
वैâ. भाऊसाहेब महाराजसुद्धां याच पंक्तीतले. अलीकडे एक दोन ठळक प्रसंगी पुण्यांतल्या भिक्षुकी पत्रकारांनी त्यांना छत्रपति छत्रपति म्हणून जे विशेष उचलून धरले होते, ते सातार्याच्या किंवा छत्रपतीच्या घराण्याच्या अभिमानानें नसून केवळ ब्राह्मणेतर पक्षाच्या चुरशीनें होय. ब्राह्मणेतरांनी करवीरकर खर्याखुर्या स्वयंशासित छत्रपतीला आपला पुढारी मानला, तर भिक्षुकांनी तोडीस तोड म्हणून सातार्याच्या सांदीतला छत्रपति उजाळा देऊन पुढे मांडला. ब्राह्मणेतरांचें कोल्हापुर, तर भिक्षुकांचा सातारा, ही चुरस कांहीं आजकालची नाहीं. फरक एवढाच कीं सातारचा छत्रविरहित छत्रपति भटांचा गुलाम असतो आणि करवीरचा छत्रपति भटांनी गुलाम बनविलेल्या कोट्यवधि मूक रयतेच्या हृदयावर स्वयंनिर्णयी आत्मोद्धाराचें छत्र धरून त्यांना स्वावलंबनाच्या चैतन्यांत रंगवून सोडतो. सातारच्या भोसले घराण्याबद्दल भिक्षुकी प्रेमचा लोंढा केवढा गिरसप्पी आहे, हें कांहीं नव्यानें कोणाला सांगणे नको. पण वैâ. भाऊसाहेब व त्यांच्या आसपास असणारी कारस्थानी कुत्रींमाकडें जात्याच भटांची पायचाटी करणारी असल्यामुळें, भिक्षुकी छावण्यांत भाऊसाहेब महाराजांचा बोलबाला दक्षिणेच्या भरती ओहटीप्रमाणे कमी अधिक घुमत असे, त्यांत कांहीं नवल नाहीं.
वैâ. भाऊसाहेब भोसल्यांनी दत्तकाच्या पसंतीसाठी अनेक तरुणांना आपल्याजवळ ठेऊन घेतले, त्यांची तैनात चालविली, पण अखेर दत्तविधान न होतांच ते दिवंगत झाले. ह्या पांच सहा तरुणांनी वैâ. भाऊसाहेबांच्या हयातीत खाण्यापिण्याची खूप मजा मारली, पण बेट्यांचे दैव तितकेंच. समर्थ रामदासांच्या ब्रह्मचर्याचा चक्रवाढी सूड एकामागून एक अशा सात बायका करून घेणार्या चाफळ मठाधिशाच्या मांडीवर दरबारांत बसण्याचें त्यांचें भाग्य नव्हते. त्यांच्या उलट्या अंबारीच्या नशिबाच्या कवटींतअंबारीचा हत्ती नव्हता. हा दैवाचा सतारा सातार्यांतहि नव्हता. तो भाटघरच्या धरणावर भिरभिरत होता. तो जलमंदिरांत आपल्या आयुष्याचे दिवस मोजीत पडलेल्या भाऊसाहेब भोसल्यांच्या निर्णयांत नव्हता, तो भाटघर धरणावर पोटासाठीं राबणार्या मजुरांच्या झोपड्या झोपड्यांतून भटकत होता.
त्या दैवाच्या सातार्याची छाया सातारच्या राजवाड्यांतल्या मिष्ठान्नावर नव्हती, ती हातावर मिळवून तळहातावर खाल्ल्या जाणार्या कदन्नावर होती. ती दत्तविधानाच्या उमेदवारीवर नव्हती, ती कल्पनेलाहि चकविणार्या अकस्मातांत लपलेली होती. हा दैवाचा सतारा प्लकी नव्हता, लकी होता. तो तारुण्यावर भाळणारा नव्हता, तो एका बालमूर्तीवर मल्हारराव होळकराच्या मस्तकावरील नागाच्या फडेप्रमाणें डुलत होता, तो नुसता वंशाला आधार शोधीत नव्हता, तर भोसल्यांच्या औरस बीजाला व अस्सल रक्ताला धुंडीत होता. हें रक्त यज्ञात दशेच्या कवचाखालीं दडलें होतें. हें बीज दारिद्र्याच्या उकीरड्यांत गाडून पडलें होतें. राजवैभवी कल्पनेला तें पूर्ण पारखें झालें होतें. परिस्थितीच्या दणक्यांनी त्याचा भूतकाल अंधःकारमय बनला होता, आणि त्याला भविष्यकाळ तर मुळींच माहीत नव्हता. वर्तमानकाळांत ‘भोसले’ या आडनांवापलीकडे त्याला कशाचीही दाद नव्हती. मागेंपुढें अंधार व दृष्टीपुढें दारिद्र्य, यापलीकडे जगाची कसलीच कल्पना नव्हती.
कांहीं र-ट-फ शिकणें झाले तर शिकावें, नाही तर दणकट मनगटाची मजुरी करून पोट भरावें, यापेक्षां अधिक कसल्याहि महत्त्वाकांक्षेची पुसटसुद्धां ओळख त्याला नव्हती. सातार्याच्या दैवाच्या जरी ठिकर्या ठिकर्या उडालेल्या असल्या तरी ह्या बालमूर्तीच्या दैवाचा सतारा मात्र मोठा जबर. बापाची सारी हयात भाटघर धरणाच्या स्टोअर्स खात्यांत मजुरी करण्यांत गेली, तरी मुलाच्या दैवानें त्याच्या कोंड्याच्या भाकरीचा मांडा झाला. दुपारी बारा वाजलें म्हणजे आईनें बांधून दिलेली झुणका भाकरीची शिदोरी बापाला नेऊन पोहोंचविणारा गरीब चंदर्या सातारच्या भोसले घराण्याचा श्रीमंत सरदार होणार हें खुद्द आईबापालाच उमगलें नाही, तर इतरांची तरी काय कल्पना असणार? भाऊसाहेब भोसले जिवंत असतांना जरी हा मुलगा त्यांच्यापुढे उभा केला असता, तरी त्याच्या बाह्य वेषानें त्यांच्या मनांत निवडणुकीची प्रेरणा झालीच असती, असें सांगता येणार नाहीं.
दैवाचा सतारा आपल्या ठराविक घाटणीनेंच परिपक्व होत असतो. जेथें ज्योतिषी बुवांचीं अक्कलच लोळपाटणी खातें तेथें कुंडलींतल्या ग्रहांचीं गृहें परळ महालक्ष्मीच्या सिमेंट चाळीप्रमाणे बिनचुक ओसाड पडलेली दिसल्यास त्यात नवल नाहीं. ज्याच्या जन्मापासून आज सात वर्षे जगाने ज्या मुलाची कसलीच दाद घेतली नाहीं, तोच मुलगा एकदम श्रीमंत शाहू महाराज भोसले म्हणून सातारा शहरात हत्तीवर मिरविला जातो, हा चमत्कार भविष्य म्हणून वर्तविणारा एकहि ज्योतिषी महाराष्ट्रांत जिवंत आढळू नये, हे दैववाद्यांचे दैव का ज्योतिषशास्त्राचा फोलकटपणा?
आकाशस्थ रेवतीवर दृक्प्रत्ययी नरबाजीचे डोळे मारणार्या कुंडलीबहाद्दरांनी आतांतरी जागे होऊन ह्या दैवाच्या सतार्यानें सातार्याचें दैव उदयास येईल कीं नाहीं, याचे फलज्योतिष वर्तविण्याची लगबग करावी. नाही तर भविष्यानें भूताचीं पाटलुण चढविल्यावर वर्तमानकाळाच्या पेशवाई झग्यांत ठोकताळ्याचे ढेकूण शोधण्याचा तडफडाट जगाच्या उपहासाला मात्र पात्र होईल, हे या पंचांगपंडितांना सांगितलेंच पाहिजे काय?
सात वर्षाचा चंद्रसेन भोसला केवळ आपल्या नसांतल्या रक्ताच्या पुण्याईवर सातारच्या जहागिरीचा श्रीमंत जहागिरदार झाला. या अकल्प्य घटनेचा सातारच्या जनतेला कल्पनांतीत आनंद वाटला आणि तो तिने न भूतो न भविष्यति अशा थाटानें व्यक्तहि केला. दत्तविधान, दरबार, हत्तीवरील मिरवणूक वगैरे समारंभांनी सातारा राजधानीचा आनंद गगनात मावेना. त्यातच ब्रिटिश सरकारने या सर्व कृत्यांना आपली सार्वभौमी सहानुभूती दाखविल्यामुळें तर ह्या आनंदाला पारावरच उरला नाही. पण हा आनंद अपूर्ण आहे.
हा आनंद खेदमिश्रित आहे. या आनंदात निराशेच्या वेदना आहेत. हा आनंदी वर्तमानकाळ दुःखमय भूतकाळांतील अनेक दुर्दैवी घटनांनी व्यथित झालेला आहे. आनंदाच्या ह्या विरळ आवरणाखाली अनेक राष्ट्रद्रोही कारस्थानांची पिशाच्चे नंगानाच घालीत असलेली अजूनही आपल्याला दिसतात. या आनंदाच्या देखाव्याचा पार्श्वभाग काळाकुट्ट असल्यामुळें विरोधाभासानें त्याची रुची विद्यमान सातारकरांना अमृतापेक्षाही जरी गोड वाटत असली, तरी त्या रुचींत मिसळलेला आत्मद्रोहाच्या जहराचा फणफणाट अजूनही विचारवंतांच्या विचारांत विलक्षण खळबळाट उडवीत आहे.
(लेख क्रमशः पुढील आठवड्यात चालू)