सरकारने नुकतंच सर्वधर्मीय वृद्धांना तीर्थयात्रा घडवून आणण्याचं आश्वासन दिलं आहे. मी एक भाविक, सश्रद्ध वृद्ध माणूस आहे. पण, मलाही प्रश्न पडतो की सरकारचं हे काम आहे का? ज्यासाठी नेमलंय ती कामं हे कधी करणार?
– मनोहर शेंडे, बदलापूर
मग तुमचं काय म्हणणं आहे… देवाचे दर्शन घडवू म्हणून खुर्चीवर बसलेल्या सरकारने वृद्धांना आश्वासन देण्याऐवजी तरुणांच्या परीक्षा घ्याव्यात? तुम्हाला सरकारची परीक्षा घ्यायची असेल तर ‘नीट परीक्षा’ घ्या.. जे सरकारला जमतं तेच करणार ना सरकार?… तुमचं असं आहे की सरकार वृद्धांना भाव देतंय तर तुम्ही शेतमालाला भाव द्यायला सांगताय… तुम्हाला नसेल जायचं तीर्थयात्रेला तर नका जाऊ… जाणारे खूप भक्त आहेत… (अर्थात देवाचे भक्त आहेत… उगाच त्यातही इतर कोणाचे भक्त म्हणून भक्तांवर संशय घेऊ नका.)
तुमचे पाय कोणी धुवायला लागले तर तुम्ही काय कराल?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
आमचे पाय जो कोणी धुवेल त्यालाच ते पुसायला सांगेन (ओल्या पायाने चप्पल किंवा शूज घातल्यावर कसंसच वाटतं). शिवाय पाय धुणार्याला आमचे पाय धुऊ नको म्हणून कितीही सांगितलं, तरी तो दुसर्या कोणाचे तरी पाय धुणारच. असे पाय धुऊन घेणारे आपले हात धुऊन घेणार. मग आपणच आपले पाय का धुऊन घेऊ नये? पण आम्ही त्याचा व्हिडिओ बनवून, तो सोशल मीडियावर टाकून, दुसर्याचे गोडवे गात, स्वतःची टिमकी वाजवणार नाही. कारण आम्ही कलाकार असलो तरी सुगम की निगम म्हणतात तसले संगीत गायक नाही.
सामाजिक प्रतिष्ठा कशी वाढवावी?
– सतीश नेने, बदलापूर
दुसर्यांची सामाजिक प्रतिष्ठा खराब करावी की आपली सामाजिक प्रतिष्ठा आपोआप वाढते… सध्याचा ट्रेंड तोच आहे. पुरावे नसताना जे दुसर्यावर आरोप करतात अशा प्रतिष्ठितांचा अभ्यास करा. म्हणजे मी काय बोलतोय ते कळेल.
सून आणि मान्सून यांच्यात फरक आणि साम्य काय सांगाल?
– सुगंधा भोसले, महाड
सून आणि मान्सून या दोघांमध्ये फरक म्हणाल तर सून सायबा सून हे गाणं सून असेल तरच चालीमध्ये गाऊ शकतो. मान्सून मीटर मध्ये बसत नाही. आणि साम्य म्हणाल तर सून येवो की मान्सून, लेकाचा मूड बनतोच.. फक्त मूड मूडमध्ये फरक असतो.. आता तो फरक तरी विचारू नका (सुनेशी जुळवून घ्या म्हणजे असे प्रचंड प्रगल्भ प्रश्न पडणार नाहीत).
नशीब खराब असेल तर ते कुठे दुरुस्त करून मिळेल?
– विनायक महामुनी, नाशिक
मला जे ठिकाण माहिती आहे ते बंद झालंय. तुमच्या नशिबात नाही. पण बिघडलेलं नशीब कुठे दुरुस्त करून मिळतं, हे नाशिकच्या विद्यमान खासदारांना विचारा… आणि तो पत्ता माजी खासदारांना द्या. त्यांचंही नशीब बिघडलंय म्हणे; ते दुरुस्त करून मिळालं तर मिळालं!
बायको आणि सूर्य यांच्यात काय साम्य आहे?
– रमण गायतोंडे, दादर
सूर्यावर थुंकता येत नाही… तसं बायको वर… बोलता येत नाही… खोटं वाटतं तर थुंकून बघा… सूर्यावर ओ! आणि साम्य बघायचं असेल तर सूर्याप्रमाणे बायकोवर… बोलून बघा. (कुठेही थुंकू नका… वाईट सवय आहे ही बायकोशी कोणाचंही साम्य शोधायची… सोडा ही सवय, कधीतरी बायकोकडूनच तोंड फोडून घ्यावं लागेल गायतोंडे जी.
अविवाहित आणि विवाहित पुरुषांमध्ये फरक कसा ओळखावा?
– नझीर मुल्ला, गोवंडी
दोघांनाही हॉटेलमध्ये घेऊन जा… काय खाणार विचारा. काहीही चालेल असं म्हणेल तो अविवाहित आहे समजा… जो दुसर्यांच्या डिशकडे बघून हे खाऊ की ते खाऊ असा विचार करत असेल तो शंभर टक्के विवाहित आहे समजा, (पण विवाहित असो की अविवाहीत, पुरुषांमध्ये तुम्हाला का इंटरेस्ट नझीर मियां?)
एखाद्यावर अँजिओप्लास्टी झाली तर त्याचे हृदयपरिवर्तन होऊ शकते का?
– अरुणा ढमढेरे, सातारा
असं झालं तर नवरा बायको एकमेकांची जबरदस्ती अँजिओप्लास्टी करतील. (आज अँजिओप्लास्टीबद्दल बोललात, उद्या म्हणाल, मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तर दृष्टिकोन बदलेल का? परवा म्हणाल मूत्रपिंड बदललं तर… मेलचा फिमेल होईल का? (बदल स्वत: स्वत:त घडवायचा असतो… हृदयाचा… मेल-फिमेलचा नाही हां ताई!)