(दोन मैत्रिणी बसची वाट बघत चहाच्या टपरीवर बसलेल्या, मागल्या बाकड्यावर हिरवं उपरणं गळ्यात टाकून विमनस्क स्थितीत बसलेला एक टी-शर्ट, लुंगीधारी इसम. डोक्यावर दुपारचं भकभकित ऊन.)
चंपा : मग चांदवड फिरून आलात का दोघं? हं?
चमेली : त्यात फिरण्यासारखं आहेच काय? आम्ही आठवड्यात दोनदा जातो तिथे! देवीचं दर्शन घ्यायचं आणि…
चंपा : हो, ‘आणि’नंतर महत्त्वाचं!
चमेली : चूप तू! काही अर्थ काढतेस! माझा बॉयफ्रेंड माझ्यासाठी किमान सुट्टी काढतो. तुझा बॉयफ्रेंड तर तेही करत नाही…
चंपा : मला ब्रेकअप करायचाय!
चमेली : तुला तो चांदवडला नाही नेत का?
चंपा : वाह्यात बोलू नकोस. चावट कुठली. मी आता त्याला नाही म्हणणार आहे!
चमेली : तुझं हे दरवेळीचं आहे, एवढ्या-तेवढ्यावरून तू ब्रेकअप करत असतेस!
चंपा : असंच काही नाहीय!
चमेली : मग मागचा तुझा बॉयफ्रेंड होता, त्याच्याशी ब्रेकअप करताना आठवतंय तू का नाही म्हणाली होतीस त्याला ते?’
चंपा : मला तोच आवडू लागलाय आता! त्याच्याशी पॅचअप करायचंय पुन्हा!
इसम : मलाही!
(कुणीच त्याच्या पुटपुटण्याकडे लक्ष देत नाही.)
चमेली : मग तेव्हा का नकार दिलेलास?
चंपा : तेव्हा तो मौनी, फ्रॉड, निष्ठुर वाटायचा गं!
इसम : हो!
(एकटाच नि स्वतःशीच.)
चमेली : पण त्याच्यावर भुलली कशी होतीस?
चंपा : तो फार अभ्यासू होता गं! म्हणजे इन फॅक्ट आहेच तो!
चमेली : तर आता तो तुला अभ्यासू वाटायला लागलाय…
चंपा : नाही गं, तो तेव्हाही तसाच होता, मीच त्या मूर्ख म्हातारीच्या नि तिच्या कळलाव्या सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि फसले, त्याला गमावुन बसले…
चमेली : हो, तेव्हा तुला तिच्यात तुझी पणजी दिसायची!
इसम : अगदी तंतोतंत!
(तो मागे एकटाच मान डोलावतो.)
चंपा : चूक होतेच ना, कुणाकडूनही? त्यात काय?
चमेली : पण आता जो तुझा बॉयफ्रेंड आहे, त्याला तू का सोडते आहेस?
चंपा : तो फार उधळ्या आहे गं!
चमेली : तो स्वत: कमावतो ना? मग करू दे की खर्च? उलट अशी खर्च करणारी `कूल’ मुलंच मिळणं लकी…
चंपा : छे गं, कसलं लक नि कसलं काय! काही कमावायची अक्कल असेल तर ना! तो माझाच पैसा उडवतो! पक्का आयतोबा आहे तो! माझ्याच रूमवर रहातो, माझ्याच पैशातून एक भारी बाईक घेतलीय. तिचे ईएमआय मीच भरते…
चमेली : थोडं समजावून सांगायचं की!
चंपा : तो कुणाचंही तीळमात्र ऐकून घेत नाही गं! कळत तर कशातलं काही नाही, पण तरीही स्वत:ला जगाचा गुरू, महान विद्वान समजतो फार! दरवेळी त्याचीच कंटाळवाणी ‘मन की बात’ बोलत बसतो! कुणी ऐको न ऐको!
इसम : सेम!!!
चमेली : काल तो कुणा रिक्षावाल्याला काही सल्ले देत असताना बघितलेलं गं मी! बोलण्यातून तर सर्वविद्यापारंगत वाटतो!
चंपा : अव्वल थापाड्या आहे तो! येत काहीच नाही, फक्त ‘ट’वरून टरबूज गाठून आभाळ हाणतो.
इसम : हे आता कळतंय मलाही!
(आता मात्र तिरक्या नजरेनं दोघीही त्याच्याकडे बघतात.)
चमेली : पण ड्रेसिंग सेन्स भारी आहे गं त्याचा! काय एकसौ एक फॅशन…
चंपा : माय फूट! परवा हॅट समजून वेताची टोपली डोक्यावर पालथी घालून शहरभर फिरून आला! मला बाई लाजून मेल्यासारखं झालं…
चमेली : कुणी हसलं नसेल का त्यावर? किंवा प्रश्नही केले नसतील?
चंपा : तो कधी कुणाला सिरियसली घेतो का? आणि कुणी प्रश्न करायला हा थांबतोय कुठं? कुणी काही विचारू लागलं की लगेच पळतो!
चमेली : एक गोष्ट मात्र प्लसमध्ये आहे तो!
चंपा : कुठली?
चमेली : प्रचंड धार्मिक आहे की तो!
चंपा : दिखाव्याला भुलू नको गं! तो नैवेद्याइतकीच धार्मिकता राखून आहे! हां, पण त्याची माझ्यावर मात्र कायम करडी नजर! कुंकू वा टिकली लाव! अमुक वेळी, तमुक ठिकाणी, चमूक व्यक्ती वा गटांसमोर अंगभर कपडे घाल. मोजकं हसावं, टोचून खावं, परपुरुषासोबत बोलणं टाळावं, सातच्या आत घरात यावं, अशी एक ना अनेक बंधनं! आणि तो बोलेल तोच धर्म!
चमेली : लिव्ह इन मध्ये इतक्या रेस्ट्रिक्शन?
चंपा : म्हणून तर मी आता ब्रेकअप करणार आहे!
इसम : मीही!
(मोठा आवाज ऐकून दोघी मागे बघतात. लुंगीधारी टीशर्ट घातलेला, व हिरवं उपरणं घेतलेला तो इसम आता उठतो नि निर्धाराने झपझप चालू लागतो. त्याच्या पाठीमागे टीशर्टवर जिलब्या काढलेल्या… कानडी असेल का तो?)
चंपा : मी माझ्या ब्रेकअपविषयी बोलत होते, हे लुंगीवाले गृहस्थ नेमकं काय समजलेत?
चमेली : मला वाटतं, तुझं ऐकून तेही बहुतेक स्वतःला ब्रेकअपचं कर‘नाटक’ म्हणाले असावेत!