धाकट्या मुलांची नेहमीच पंचाईत असते. मोठी भावंडं काय शिकली, काय करतात, याचे नकळत दडपण आलेले असते. त्यातही ती चांगलीच हुषार असली तर अधिकच पंचाईत. यात आईवडील काय करतात, काय शिकलेत, त्यांचे सामाजिक स्थान काय, या बाबींची भर नक्कीच पडते. प्राध्यापकाचा मुलगा उत्तम शिकायलाच पाहिजे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनला तर नवल ते काय? राजकारण्यांचा राजपुत्र दादागिरी करणार नाही तर कोण? अशा दुर्दैवी मानसिकतेतून अजूनही आपण बाहेर पडत नाही. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आसपास सुद्धा दिसतील. पण आज मात्र आपण याला अपवाद ठरणार्या एकाची यशोदायी करिअर कथा वाचणार आहोत. ‘मार्मिक’मध्येच ‘धंदा म्हणजे काय रे भाऊ’ या सदरात संदेश कामेरकर यांनी ओळख करून दिलेल्या यशस्वी व्यावसायिकांच्या छानशा कथा आपण वाचत आहातच. पण त्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे.
एका प्रख्यात कॉलेजातील विभागप्रमुख असलेले दिवाकर सर. त्यांचा मोठा मुलगा खूपच हुषार. पाहता पाहता विद्यापीठातून सायन्समध्ये मास्टर्स करून त्याने स्वतःचा उद्योग पण थाटला. दोन पार्टनर्स घेतले.धंदाही खूप वाढवला. जे जे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स भारतात तयार होत नव्हते, त्यावर संशोधन करून अल्प किमतीत निर्मिती सुरू केली. त्याच्या पाठची बहीण पर्यावरणामध्ये मास्टर्स करून विविध संस्थांना सल्ला देण्याचे काम करू लागली. या दोन भावंडांचे शिक्षण संपून ती स्थिरस्थावर होईपर्यंत धाकट्या विशालचे कॉमर्समधील पदवीचे शिक्षण पूर्ण होत आले होते. स्वाभाविकपणे आता त्याने एमबीए करावे व कुठेतरी मॅनेजरची नोकरी घ्यावी ही सगळ्यांची अपेक्षा. मुलांपैकी कॉमर्सला गेलेला तो एकटा असल्यामुळे ही अपेक्षाही फारशी वावगी नव्हती. कॉमर्सचा निकाल लागला. त्याला ७२ टक्के मार्क मिळून बीकॉमची पदवी हाती आली. सगळ्यांना पेढे देताना विशालने त्याच्या मनातील इरादा बोलून दाखवला.तो ऐकून अक्षरशः भूकंप झाल्यासारखी घराची अवस्था झाली होती. मला पुढे काहीच शिकायचे नाही. एमबीए तर मी नक्कीच करणार नाही. पण काही ना काही तरी व्यवसाय करण्याची माझी इच्छा आहे. अर्थातच व्यवसायात असलेला मोठा भाऊ वडील व आई यांनी एका सुरात त्याला विचारले, ‘भांडवल कुठले आणणार? काय करायचे ते स्वतःच्या बळावर करण्याची ताकद आहे का?’ बहिणीनेही त्यांच्यासोबत सूर मिळवला. त्याला विचारले, ‘निघाला मोठा व्यवसाय करायला, कसले दिवे लावणार आहेस? कशाशी खातात व्यवसाय? हे तरी कधी ऐकले आहेस का?’
विशालने शांतपणे, ‘मला नोकरी करायची नाही, कोणाचा ताबेदार व्हायची इच्छा नाही. पैसे नाहीत व ते तुम्ही देणार नाही हे तर उघडच आहे. त्याचाही मी विचार केला आहे. आजचा निकालाचा आनंद आपण सगळे साजरा करूया. यथावकाश तुम्हाला सगळी माहिती कळेलच’. वडील प्राध्यापक असल्यामुळे सुज्ञपणे त्यांनी विषय थांबवला. त्या दिवशीची रात्रीची जेवणे थोडीशी अबोल्यातच पार पडली. मात्र विशाल चवीने जेवत व सगळ्यांशी बोलत होता एवढे मात्र खरे. रात्री सगळे अस्वस्थपणे झोपले.
विशालच्या घराला एक मोठा माळा होता. एक छोटीशी शिडी सुद्धा घरात ठेवलेली होती. ती लावायची आणि माळ्यावर चढायचे. दुसर्या दिवशी वडील, भाऊ कामावर गेले, बहीण तिच्या नादात, कामात होती. त्यावेळी विशालने शिडी लावली व माळ्यावर चढला. बरेच सामान तिथे पडलेले असायचे कायमचे. घरात नको असलेली एखादी गोष्ट माळ्यावर पाच वर्षे पडली तरी टाकून देण्याची इच्छा आजही फारशी कोणाला होत नाही. एवढेच काय, कोणत्याही मोठ्या सोसायटीच्या आवारात वापरत नसलेल्या जुन्या सायकली, जुन्या स्कूटर्स, मुलांची लहानपणची खेळणी जिन्याखाली पार्किंगमध्ये सापडणारच. गेल्या सात-आठ वर्षांत माळा हा प्रकार बांधणे बंदच केले आहे अनेक बिल्डरांनी. पण विशालचे घर जुन्या पद्धतीचे असल्यामुळे प्रशस्त, चक्क बैठक मारुन बसता येईल एवढा मोठा माळा होता. थोड्याच वेळात आई व बहिणीच्या लक्षात आले की शिडी लावून विशाल माळ्यावर गेलेला आहे. कालचे भांडण आठवत असल्यामुळे त्या काळजीतच पडल्या. पण विशालनेच ताईला हाक मारली. जरा मदतीला ये. मी एक जड वस्तू तुझ्या हातात देणार आहे. हलकेच ती खाली उतरवून घे. आता हा काय देणार, असे दोघींना वाटत असतानाच त्याने लहान असताना वडिलांनी आणलेला एक जुना आईस्क्रीम पॉट बहिणीकडे सरकवला. मोठा भाऊ कॉलेजला गेल्यापासून त्या पॉटला कधीच उजेड मिळालेला नव्हता. कारण गल्लोगल्ली आईस्क्रीम पार्लर्स निघालेली. एकतर तिथे जाऊन आईसक्रीम खाऊन यायचे, नाहीतर फॅमिली पॅक घरी घेऊन यायचा व सर्वांनी ताव मारायचा, ही पद्धत आता रुळली होती.
खाली उतरवलेला तो पॉट पाहून आईने कपाळाला हात लावला, तर त्यावरची धूळ हाताला लागल्यामुळे बहीण वैतागली होती. सकाळच्या कामाच्या वेळेला नसते उद्योग काढले म्हणून करवादत ती पॉट खाली ठेवून निघून गेली. सुखावलेल्या हसर्या चेहर्याने विशाल माळ्यावरून खाली उतरला. शांतपणे शिडी जागेवर ठेवली. व्हरांड्यामध्ये जाऊन पॉटवरची धूळ झटकली व बाथरूममध्ये तो धुवायला घेऊन गेला.
आईस्क्रीम पॉट म्हणजे काय?
२०००नंतर जन्मलेल्या कोणालाच हे प्रकरण काय आहे ते कळण्याची शक्यत्ाा नाही. त्यांच्या माहितीकरता जरा सविस्तर येथे वर्णन करत आहे. आंबे आणि आईस्क्रीम या सार्या मध्यमवर्गीयांच्या दोन जिव्हाळ्याच्या गोष्टी. पण दोन्ही विकत घेऊन खायच्या तर बर्यापैकी महाग. त्यातल्या त्यात सीझन संपला की आंबे स्वस्त व्हायचे. घासाघीस करून चार पाच डझनाची करंडी किंवा पेटी घरी आणायची व चौकोनी कुटुंबाने पोटभर खायची, ही त्या काळातली पद्धत. महिन्यातून दोनदा आईस्क्रीम बनवण्याची घरातलीच पद्धत म्हणजे पॉट आईस्क्रीम. काही दुकानातून आईस्क्रीम पॉट भाड्यानेही मिळायचे. त्यातल्या त्यात बर्या घरची मंडळी पॉट विकत घेऊन टाकायची. दोन लिटर आईस्क्रीम त्यात एका वेळी तयार व्हायचे. सध्याच्या भाषेत अमूलचा एक लिटरचा पॅक एकावर एक फ्री मिळतो, तसे एकदम दोन लिटर त्यात तयार होत असे. हा सारा एक सोहळाच असे. आठ दहा किलो बर्फाची फोडलेली लादी घरी घेऊन यायची. त्याचा चुरा करुन पॉटच्या कडेने भरायचा. त्यात मधेमधे अर्धा किलो खडे मीठ टाकायचे. त्याने बर्फाचे थरातील तापमान अजून खाली उतरते, हे पण मुले शिकायची. मधोमध असलेले अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये पिस्ता केशरमिश्रित किंवा आंब्याच्या रसाने एकजीव केलेले आटीव दूध व साखर हे मिश्रण घालायचे.
पॉट अखंड फिरवला की साधारणपणे ३० ते ३५ मिनिटात आतील दुधाचे घट्ट रवाळ आईस्क्रीम तयार होत असे. पॉटमधले
अॅल्युमिनियमचे भांडे फिरवण्यासाठी एक हँडल असे. उत्साही मुलांना आलटून पालटून हँडल फिरवायची संधी मिळत असे. मध्ये मध्ये घरातील वडीलधारी मंडळी फिरवण्याचे हॅण्डल जड लागते का, हे पहात असत. सुरुवातीला नुसते दूध असताना ते मजेत फिरायचे. जसजसे आईस्क्रीम घट्ट व्हायला लागायचे, तसे त्याला ताकद जास्त लागायची. शेवटी एक वेळ अशी यायची की ताकद लावली तरी ते फिरत नाही. आहे की नाही गमतीची कथा?
यावेळी सारे घर, आसपासची दोन-चार ओळखीची, प्रेमाची माणसे सुद्धा हा प्रकार पाहायला जमलेली असायची. मांड्या घालून बसून आपापसात आईस्क्रीम कधी मिळते याची वाट पाहणे हा एक सहज सुंदर सोहळा असायचा. पहिल्यांदा केलेले दोन लिटरचे आईस्क्रीम फडशा पाडल्यासारखे संपायचे. पुन्हा पॉटमधे दुधाचे मिश्रण ओतून तोच प्रकार. पण यानंतर मात्र गंमत व्हायची. पहिल्या वेळचे दोन बाऊल संपवल्यावर तिसरा बाऊल खाताना जीभ बोबडी व्हायची. आईने बाबांनी अजून घालू का विचारले तर मानेनेच नको नको म्हणायची वेळ यायची.
विशालने हा सोहळा पाचवी संपेपर्यंत अनेकदा अनुभवलेला होता. तो त्याच्या घट्ट स्मरणात रुतला होता. कारणही तसेच होते. आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळणारे आईस्क्रीम त्याला कधीच आवडले नव्हते. घरी बनवलेल्या आईस्क्रीमचा रवाळ आणि विलक्षण थंडगार असा जिभेला होणारा स्पर्श तो कधीच विसरला नव्हता. पदवी घेत असताना या सार्यासाठीचा हिशोबही त्यांनी अनेकदा मनात मांडला होता. दीड लिटर दूध, पाऊण किलो साखर, तीन आंबे, दहा किलो बर्फ, अर्धा किलो खडेमीठ या सार्याची किंमत एकत्र केली तर ती आजही जेमतेम साडेतीनशे रुपयांच्या घरात जाते. विशालची कथा तर वीस वर्षांपूर्वी सुरू झाली होती. आईस्क्रीमसाठी केलेल्या खर्चाच्या बरोबर दुप्पट रक्कम ते विकून विशालला मिळणार होती. असे त्याचे गणित होते. प्रश्न होता गिर्हाईक शोधण्याचा. विशालच्या बोलक्या स्वभावामुळे त्याने अनेक घरे शिकत असतानाच जोडलेली होती. शिवाय तो राहात असलेला भाग तसा उच्च मध्यमवर्गीयांचा होता. पॉट खाली आणल्यानंतर स्वच्छ करून व्हरांड्यातील एक कोपरा त्याने निवडला. आणलेल्या बर्फाची साठवण करण्याची, उन्हापासून सुरक्षित व पाणी वाहून जाईल अशी ती जागा होती. आईस्क्रीम घरातच बनणार होते.
आता फक्त महत्त्वाची गोष्ट राहिली होती. तयार आईस्क्रीमच्या ऑर्डरी मिळवणे. आकर्षक स्वरूपाची हँडबिल्स त्याने तयार करून घेतली. ‘थेट तुमच्या घरात पॉट उघडून आईस्क्रीम सर्वांना दिले जाईल’, अशी ऑफर त्याच्यात होती. आईच्या हातचे खाल्लेले केशर पिस्ता व आंबा आईस्क्रीम बनवण्याची प्रक्रिया त्याला पाठच होती. सगळी तयारी झाल्यावर पहिल्याच आठवड्यात त्याच्या हाती सात ऑर्डर्स आल्या. तयार आईस्क्रीमचा भरलेला पॉट स्कूटरवर पायाशी ठेवून त्या त्या घरी जाणे व पाऊण तासात सगळ्यांना ते पोटभर खायला घालून रिकामा पॉट व भरलेला खिसा घेऊन विशाल घरी परतू लागला. सायंकाळी सहा ते रात्री अकरा या दरम्यान चार ते पाच ऑर्डर्स पुरवणे त्याला शक्य होते. विशालच्या स्वतःच्या धंद्याची मुहूर्तमेढ तर झाली होती, पण घसघशीत दोन हजार रुपयांचा फायदाही त्याने पहिल्याच महिन्यात मिळवला.
अर्थातच हा काही बारमाही धंदा नव्हता हे त्याला पक्के माहिती होते. जसा पाऊस सुरू झाला व आंबे संपले तसा आईस्क्रीमचा सीझन सुद्धा बाजूला पडला. पण वर्षभरासाठीचे छोटे छोटे गणित त्याने पहिल्यांदाच मनाशी आखले होते. आईस्क्रीमनंतर राख्या, नंतर फटाके व आकाश कंदील, मग नवीन वर्षाच्या डायर्या व शुभेच्छा पत्रे आणि या दरम्यान वह्या व शैक्षणिक गोष्टींचा पुरवठा अशा सार्या गोष्टी घरपोच मिळतील, त्याही बाजारभावानेच. अशी त्याची आखणी होती.
तोंडात खडीसाखर ठेवल्याप्रमाणे बोलणारा विशाल वागायलाही तेवढ्याच नम्र व प्रेमळ होता. अनेक घरातील काकू, मावशी, आत्या, आजी यांच्याशी जवळीक साधायची कशी, ते त्याला छान जमत होते. कोणाच्या घरी कधी जायचे? कोणाकडे फोन करायचा व फोनवरूनच ऑर्डर घ्यायची? तर कोणाकडे कसलेही काम नसताना सुद्धा दोन मिनिटे डोकावायचे, या सार्याचे आडाखे त्याला पक्के जमत गेले. स्वतःकडे विक्रीला नसलेल्या गोष्टीसुद्धा कोणी मागितल्या तर ते पुरवायला त्याने कधीच नकार दिला नाही.
इथे आवर्जून सांगायची गरज आहे की हा सारा काळ पुणे शहर विस्तारण्याचा होता. दमून भागून पाच-सहा किलोमीटरवर लांब गेल्यानंतर पुन्हा खरेदी करता बाहेर पडण्याचा उत्साह त्या काळात कोणाकडेही नव्हता. एवढेच काय, अनेक वस्तू त्या त्या लांबच्या भागात फारशा मिळतही नसत. पाहता पाहता एक वर्ष संपले. मोठ्या भावाचे लग्न ठरले होते. मोठी बहीण विद्यापीठांमध्ये चाललेल्या पर्यावरणाच्या एका प्रोजेक्ट करता परगावी तीन वर्षांकरिता रवाना झाली होती. थोडीफार मदत करू इच्छिणारी आई व नाराजी कमी झालेले वडील यांचे आता विशालला प्रोत्साहनही मिळायला लागले होते. एका दिवशी भावासमोर व वडिलांसमोर त्याने बँक बुक टाकले. ५५ हजार रुपये त्यात जमा झालेले होते. आता चकित होण्याची पाळी भावाची होती, तर वडिलांना नक्कीच आनंद झाला होता.
विशालचा पुढचा प्रवास वेगाने झाला. त्याबद्दल इथे फार लिहिणे महत्त्वाचे नाही. थोडक्यात सांगायचे, तर एका मोठ्या भेळेच्या दुकानाच्या बाहेर त्याचे आईस्क्रीम पार्लर सुरू झाले. एकमेकांना पूरक असा तो व्यवसाय होता. जेमतेम दोन वर्षात नवीन पसरलेल्या भागातील एका मोक्याच्या चौकात जागा भाड्याने घेऊन विशालचे स्वतःचे मोठे ‘विविध वस्तू भांडार’ सुरू झाले. आईस्क्रीम पार्लरसाठी कामाला माणसे ठेवून तेही चालू राहिले. पण मुख्य म्हणजे विशालची अनेक घरी जाण्याची, चक्कर मारून ऑर्डर आणण्याची पद्धत त्यानंतरही चालू राहिली. आपुलकीने, मायेने, प्रेमाने, हक्काने मिळवलेल्या ऑर्डर्समधून भरभराट होतच राहिली. दुकानच्या पलीकडच्याच गल्लीत राहणारी एक तरतरीत देखणी तरुणी नेहमी दुकानात येत असे. तिचे काही वर्षातच मालकिणीत रूपांतर झाले व विशालला कामाला मनाजोगते अजून दोन हात मिळाले.
तात्पर्य : कोरोना काळातील अनेक घरपोच वस्तू पोहोचवण्याबद्दल आपण खूप चर्चा केली. तात्कालीक यशाबद्दलच्या कथाही ऐकल्या. मात्र लोकांच्या गरजा ओळखून, त्यांच्याशी जवळीक साधून, स्वतःच्या व्यवसायाचे बस्तान बसवणे सोपे नसले तरी अशक्यही नसते. अडचणी व्यवसायातच काय पण नोकरीतही येतातच. शिकतानाच अशा अनेक गोष्टींची आखणी करणारा पुढील काळात आयुष्यात यश मिळवतो.