हे व्यंगचित्र आहे १९७१च्या निवडणूक प्रचारातले. या काळात काँग्रेसची घोषणा होती ‘गरिबी हटाव’. त्या काळात देश गरीब होता, अविकसित देशांच्या पंक्तीत होता. शेतीप्रधान देशात शेती मागासलेली होती, औद्योगीकरणाचा वेग कमी होता. देशाचं राष्ट्रीय उत्पन्नही कमी होतं आणि त्यामुळे दरडोई उत्पन्नही कमी होतं. स्वस्ताई होती, पण गरिबीही होतीच. त्यामुळे साहजिकच पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ही घोषणा लोकप्रिय झाली. पण, इंदिराजींचे निवडणूक प्रचाराचे सगळे दौरे शाही थाटाचे होते. यातली विसंगती अचूक टिपून बाळासाहेबांनी राजे महाराजांसाठी वापरल्या जाणार्या शाही हत्तीची योजना इंदिराजींचं वाहन म्हणून केली आहे. त्यातून जनता रस्त्यावर आणि राज्यकर्ते किती उंचावर आहेत, त्यांच्यात किती अंतर आहे, ते समजतं. इथून त्यांनी गरिबी हटाव ही घोषणा करणंही किती विसंगत होतं, तेही दिसतं… अर्थात, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत इंदिराजी फारच साध्या म्हणायच्या. मोदी यांचे सगळे राहणीमान सप्ततारांकित आहेच शिवाय निवडणूक प्रचारात ते पक्षाचा पैसा न वापरता सरकारी यंत्रणाच दामटतात. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे आणि लोकांशी थेट संवाद न साधता एकतर्फी आक्रस्ताळी भाषणे ठोकण्याच्या सवयीमुळे त्यांच्यात आणि सामान्यजनांत इतके अंतर आहे की त्यांचं वाहन म्हणून हत्तीही पुरणार नाही, आकाशातून उडणारे पुराणकाळातील विमानच योजावे लागेल.