‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या टप्प्यात मैदानाबाहेरील आरोपांमुळे रंगत आली आहे. काही क्रिकेटपटूंनी कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शन शैलीबाबत टीका-टिपण्णी केलीय, तर काही जण त्यांची पाठराखणही करीत आहेत. पंडित यांच्या शिस्तीवरच त्यांच्या यशाची भिस्त आहे. प्रशिक्षणाचा हा ‘आचरेकर पॅटर्न’ सध्याच्या काळात राबवता येईल का? एकंदर या प्रकरणाचा घेतलेला वेध.
– – –
ही एक वास्तवकथा आहे, दस्तुरखुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अनेकदा सांगितलेली. त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिरच्या शालेय दिवसांतली. रमाकांत आचरेकर सरांनी सचिनला एक सामना खेळण्याचे निर्देश दिले होते. त्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कर, असंही बजावलं होतं. परंतु त्या दिवशी सामना खेळण्याऐवजी सचिन वानखेडे स्टेडियमवर शारदाश्रम इंग्रजी माध्यम विरुद्ध शारदाश्रम मराठी माध्यम यांच्यातील हॅरिस शील्ड क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पाहायला गेला. हा सामना अर्थात शारदाश्रम इंग्रजी शाळेनं जिंकला. सामना संपल्यानंतर सचिन आचरेकर सरांचं अभिनंदन करायला सरसावला. शाळा सुटल्यावर सचिन थेट वानखेडेवर गेल्यानं त्याच्या एका हातात जेवणाचा डबा होता. सचिननं त्याला खेळायला सांगितलेला सामना टाळला, हे एव्हाना आचरेकर सरांच्या लक्षात आलेलं. त्यांनी चाणाक्षपणे सचिनला ‘‘तू आज किती धावा केल्यास?’’ असं विचारलं. यावर सचिननं उत्तर दिलं की, ‘‘आपल्या शाळेच्या संघाला पाठबळ देण्याच्या हेतूनं मी सामना खेळलो नाही…’’ सचिनचा अखेरचा शब्द मुखातून बाहेर पडण्याच्याआतच एखादा यॉर्कर झपकन् आत वळावा आणि यष्ट्या भेदाव्यात, तितक्याच त्वरेनं आचरेकर सरांनी सचिनच्या कानशिलात लगावली आणि त्याचा डबा हातातून निसटून त्यातील अन्न जमिनीवर पसरलं. त्यावेळी आचरेकर सरांनी सचिनला म्हटलं, ‘‘इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी तू इथे येण्याची आवश्यकता नव्हती. पण अशा रीतीनं खेळ की इतरांनी तुझ्यासाठी टाळ्या वाजवायला हव्यात.’’ त्या दिवसापासून सचिनचं आयुष्य पालटलं.
या कथेला एक उपकथानकही आहे. या घटनेचे साक्षीदार असलेल्या काही खेळाडूंनी त्याला प्रशिक्षक बदल, हे सर तुझ्याशी योग्य वागले नाहीत, असा सल्लाही सचिनला दिला. पण सचिननं त्याकडे दुर्लक्ष करीत इमानेइतबारे आचरेकर सरांकडे सराव सुरू ठेवला आणि त्यानंतर जो घडला तो इतिहास सर्वज्ञात आहेच…
– – –
अशीच एक कथा आहे बेभरवशाच्या विनोद कांबळीची. सचिन आणि विनोद एका सामन्यात मैदानावर क्षेत्ररक्षण करीत असताना एक पतंग येऊन मैदानावर पडली. नटखट विनोदला ती पतंग उडवण्याचा मोह अनावर झाला आणि तो ती उचलून उडवू लागला. सर कुठून तरी पाहात असतील, असा सावधतेचा इशारा सचिनने विनोदला दिला. पण मी पूर्ण खात्री केली आहे, सर याक्षणी इथं नाहीत, असं सांगत विनोदने पतंगबाजी सुरू ठेवली. दिवसाअखेरीस खेळाडूंचा लेखाजोखा सर तयार करीत. तो वाचण्याची जबाबदारी सचिनवर होती. सचिनने यादी वाचताना ‘विनोद-पतंग’ असं उच्चारताच आचरेकर सरांनी विनोदच्या गालांवर पाच बोटं उमटवली होती…
– – –
आचरेकर सरांच्या संदर्भातील हे दोन्ही प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित सध्या त्यांच्या लष्करी शिस्तीमुळे चर्चेत आले आहेत. पंडित हेसुद्धा आचरेकर सरांचेच शिष्य. त्यामुळे त्यांच्या शिस्तीचा हा ‘आचरेकर पॅटर्न’ एकच. सध्या काही जण पंडित यांच्या प्रशिक्षण शैलीवर आक्षेप घेण्यासाठी काही उदाहरणं देतायत, तर काही जण त्यांच्या शैलीची पाठराखण करतायत.
यंदाच्या ‘आयपीएल’चा भाग नसलेल्या डेव्हिड विजच्या सनसनाटी विधानामुळे पंडित यांची चर्चा सुरू झाली. ‘‘पंडित लष्करी पद्धतीनं मार्गदर्शन करतात. ते कडव्या शिस्तीचे आहेत,’’ असं डेव्हिड बरळला. एन. जगदीशनसुद्धा यंदा खेळत नसल्यानं तमिळ भाषेत समालोचन करीत आहे. त्यानंही एक किस्सा सांगत पंडित यांच्यावर तोंडसुख घेतलंय. कोलकाताचं सराव शिबीर चालू असताना एके दिवशी बिनबाह्याचा (स्लीव्हलेस) पोशाख घालण्याचे निर्देश पंडित यांनी सर्व खेळाडूंना दिले होते. पण वरुण चक्रवर्तीला ते लक्षात न राहिल्यानं तो पूर्ण बाह्यांची जर्सी घालून मैदानावर आला. पंडित यांनी वरुणला बोलावून त्याच्या जर्सीच्या बाह्याच वैâचीनं कापून काढल्या. मगच वरुण सरावात सहभागी होऊ शकला. पण डेव्हिड आणि जगदीशन यांच्या विरुद्ध मत मांडलंय अष्टपैलू आंद्रे रसेलनं. ‘‘प्रशिक्षकासोबतच्या पहिल्या वर्षात त्याचं मार्गदर्शनाचं शास्त्र समजून घेऊन त्यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं. मागील वर्षी माझी कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. पण पंडित माझ्या नेहमी पाठीशी राहिले. बर्याचदा चर्चा करून त्यांनी मला बळ दिलं,’’ असं रसेल म्हणाला.
गतवर्षी (२०२३) पंडित यांच्याकडे कोलकाता नाइट रायडर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली. ब्रेंडन मॅककलम यांच्यानंतर हे पद पंडित यांच्याकडे गेले. शाहरूख खान, जुही चावला, जय मेहता यांच्यासारख्या तार्यांची मालकी आणि गौतम गंभीर हा मेंटॉर असल्यानं हा तसा लक्षवेधी संघ. इतकंच कशाला २०१२ आणि २०१४ अशी दोन विजेतेपदंही त्यांच्यावर खात्यावर आहेत. पण गेली १० वर्षे त्यांना अंतिम फेरीही गाठता आलेली नाही. त्यामुळेच हा ‘पंडितप्र्ायोग’. या किमयागार प्रशिक्षकाची गेल्या सात वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिमाखदार छाप पडली आहे. रणजी करंडक स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत नसलेल्या संघांना विजेतेपद मिळवून देणारा प्रशिक्षक असा त्यांचा नावलौकिक आहे. त्यामुळेच पंडित यांना ‘देशांतर्गत क्रिकेटमधील द्रोणाचार्य’ म्हटले जातं. पंडित यांनी २००२-०३ आणि २००३-०४ अशी सलग दोन वर्षे मुंबईला रणजी करंडक जिंकून दिला होता. पण त्यानंतर २०१८मध्ये ते प्रकाशझोतात आले. त्यांनी लागोपाठ दोन वर्षं विदर्भाला रणजी विजेतेपद जिंकून दिलं. मग २०२२मध्ये हीच किमया त्यांनी मध्य प्रदेशला रणजी जेतेपद जिंकून देत दाखवून दिली. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ होता, मुंबईचा. जो अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला होता.
पंडित यांनी गतवर्षी प्रथमच ‘आयपीएल’ संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं. पण संघ म्हणून ते फारसं प्रभावी ठरलं नव्हतं. १४ सामन्यांपैकी फक्त सहा विजय मिळवणार्या कोलकाताला सातव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. पण रिंकू सिंह नामक एक धडाकेबाज ‘फिनिशर’ देशाला त्यांनी मिळवून दिला. शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलूत्वाला पैलू पाडण्यासाठीही त्यांनी काही प्रयोग केले. याशिवाय नितीश राणा, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर यांची कामगिरी उंचावली. पण नियमित कर्णधार आणि विश्वासार्ह फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू न शकल्याचा फटका त्यांना बसला. पण पंडित यांचं ते पहिलंच वर्ष असल्यानं त्यांच्या ‘आयपीएल’मध्ये अपयशी असा शिक्का त्वरित बसला नाही. पण यंदा श्रेयस परतल्यानं कोलकातानं लक्षवेधी सुरुवात केली आहे.
पंडित यांचं याआधीचं यश हे स्थानिक क्रिकेटमधलं आहे. म्हणजेच अनेक क्रिकेटपटू हे ‘संस्कारक्षम’ वयातले असतात. त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीनं मार्गदर्शनाचं तिथं चपखलपणे बसतं. पण ‘आयपीएल’सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रâँचायझी लीगमध्ये हेच सूत्र राबवता येईल का, याची खात्री देता येत नाही. कारण इथले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वर्षे खेळलेले असतात. त्यांनी अनेक प्रशिक्षकांकडेही मार्गदर्शन घेतलेलं असतं. त्यामुळे लीगच्या कराराचा व्यावसायिक पद्धतीनं आदर राखत आपली मैदानी भूमिका चोख बजावावी, हेच त्यांचं साधसरळ समीकरण. परदेशातील लीगमध्ये त्यांना शिस्तीचं दडपण नकोसं असतं. नेमकी इथेच समस्या होतेय.
थोडंसं मागे जाऊन भारतीय क्रिकेटकडे पाहिल्यास २०१७मध्ये अनिल कुंबळे यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कर्णधार विराट कोहलीशी मतभेद चव्हाट्यावर आल्याचं कारण दिलं गेलं, तरी खेळाडूंच्या जीवनशैलीला कुंबळे यांचा जाच नको होता. म्हणूनच ते षडयंत्र रचण्यात आले, जे यशस्वी ठरलं. कुंबळे यांना दूर केल्यानंतर कोहलीनं मुक्त शैलीच्या रवी शास्त्री यांच्या गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ घातली आणि काही वर्षं आनंदात घालवली.
फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो खेळाडू म्हणून कामगिरीच्या स्तरावर आणि ब्रँड म्हणून मोठा झाला, तसतसा त्याचा अहंकारही मोठा होत गेला. त्यामुळे स्वार्थी आणि घमेंडी खेळाडू असे आरोप त्याच्यावर होऊ लागले. त्यात तथ्यही होतं. कतारला २०२२मध्ये झालेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डोला मर्यादित काळ मैदानावर ठेवण्याची रणनीती पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी आखली. कारण रोनाल्डो नसताना सांघिक खेळ बहरताना आढळायचा. अगदी गोन्सालो रामोसनेही स्वित्झर्लंडविरुद्ध गोलची हॅट्रिक लगावली होती. या संपूर्ण स्पर्धेत रोनाल्डोने एकमेव गोल नोंदवला आणि पाच विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा खेळाडू हा विक्रम नावावर केला. पण तो एक गोलसुद्धा पेनल्टीद्वारे होता, मैदानी नव्हता.
‘छडी लागे छमछम, विद्या येई घम घम…’ म्हणजेच विद्यार्थ्यांना छडी, पट्टी, हातानं मारून सुतासारखं सरळ करण्याचा काळ लोटून आता अनेक वर्षं झालीत. त्या काळात पालकच विद्यार्थ्याला मारा असं शिक्षकांना सांगायचे. आता शाळेत विद्यार्थ्यांना मारल्यास शिक्षकच अडचणीत येतो. म्हणजेच काळ बदलला आहे, तशीच शिक्षण आणि प्रशिक्षण संस्कृतीही. पंडित यांची शिस्तप्रियता खेळाडू म्हणून घडण्याच्या वयातले रणजी क्रिकेटपटू चालवून देतील. पण ती आताच्या युगातले क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय किंवा लीग स्तरावर कितपत चालवून दितील, याबाबत शंका आहे. त्यामुळे पंडित यांनी आपल्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करावा, असे क्रिकेटमधील नामांकित मंडळी त्यांना सल्ला देतात. पण याच सूत्राच्या बळावर पंडित यांनी कोलकाताला गेले एक दशक दुर्मीळ झालेलं यश मिळवून दिल्यास पंडित यांना क्रिकेटजगतात डोक्यावर घेतलं जाईल आणि त्यांच्या लष्करी शिस्तीचे पोवाडे रचले जातील.
तूर्तास, तीन चतुर्थांश ‘आयपीएल’ अद्याप बाकी आहे. पाहूया कोलकाताची कामगिरी कशी होतेय. तोवर पंडित यांच्या मार्गदर्शनाचे किस्से नक्कीच वाचायला आणि ऐकायला मिळतील. कारण आजच्या काळात एखादा हॅशटॅग सुरू झाला की तो काही काळ नक्कीच चालतो.