केणींचा लेख वाचून वि.विं.ची आठवण आली
साप्ताहिक ‘मार्मिक’मधील ७०व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेबाबत प्रशांत केणी यांचा लेख वाचला. यात त्यांनी फार सुरेख शब्दांकन केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांच्या लेखात महाराष्ट्राच्या भविष्यातील कबड्डीच्या चिंतासुद्धा दिसून आली. हा लेख वाचून वि.विं.ची आठवण आली. थोडं भूतकाळात पाहिलं तर त्यावेळी वि. वि. करमरकर, चंद्रशेखर संत यांच्यासारख्या मंडळींकडून कबड्डीविषयी काही लिहिले गेले. त्यावेळी महाराष्ट्र कबड्डी संघटनेत बुवांच्या नेतृत्वाखाली त्या गोष्टीची शहानिशा होत असे. त्या गोष्टीवर योग्य ती कारवाईसुद्धा केली जात होती. आजच्या संघटनेत बुवा आहेतच कुठे? बुवांचा आत्मासुद्धा हरवलेला आहे.
महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्यांना व राष्ट्रीय खेळाडूंना सरकारचा नवीन क्रीडा धोरणानुसार स्पोर्ट्स कोड बिल वापरून संघटनेत यावयाचे आहे नवीन नियमाचा फायदा त्यांना जरूर मिळावा, या मतांचा मीसुद्धा आहे. सत्तेत सामील होत असताना त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या कबड्डी विकासाचा आराखडा आहे काय? प्रस्तावितांना विस्थापित करणे सोपे नाही. आता ७०व्या राष्ट्रीय स्पर्धेचा महाराष्ट्र पुरुष संघ गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. बर्याच वर्षांनंतर आपल्याला युवा खेळाडूंची फौज मिळाली आहे. दोन तीन खेळाडू सोडल्यास सर्व खेळाडू कुमार गटातून वरिष्ठ गटात पोहचले आहेत. त्यांना योग्य मार्गदशनाची खरी गरज आहे. अचूक मार्गदर्शन, शेवटच्या पाच मिनिटात डावपेच, व्यूहरचना यात आपण कमी पडलो. आपले योद्धे तयार होते, परंतु सरदारकडे आक्रमण कशा पद्धतीने करावयाचे याची व्यूहरचनाच तयार नव्हती.
– रमेश भेंडगिरी, मुंबई
—–
खानपान विषयावर आणखी लेख यावेत
साप्ताहिक ‘मार्मिक’चा प्रत्येक अंक खासच असतो. सगळ्या अंकात खानपानाविषयी काय लेख आहे याचा शोध मी घेत असते. मी एक गृहिणी असल्याने सोप्यात सोपा पदार्थ करण्यावर माझा भर असतो. म्हणूनच ‘मार्मिक’मध्ये वैभव भाल्डे यांचे ‘सुग्रास’ आणि अल्पना खंदारे यांचे ‘पंजाबी तडका’ ही सदरे मी आवर्जून वाचते. खानपान या विषयावर आणखी जास्त लेख ‘मार्मिक’मध्ये यावेत अशी माझी इच्छा आहे.
६ एप्रिलचा ‘मार्मिक’ अंक हाती पडला तेव्हा आधाशासारखा मी आधी अल्पना खंदारे यांनी यावेळी काय लिहिले आहे ते पाहिले. त्यांनी यावेळी दिलेले ‘व्रत के आलू’ आणि ‘मिठी सियोल’ हे पदार्थ छानच वाटले. लगेच मी ते करून पाहणार आहे. अल्पना या मराठमोळ्या असूनही पंजाबातील पदार्थ कसे फर्मास करतात त्याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या लेखांमधूनच त्या लग्न होऊन पंजाबात गेल्याचे कळले. उपवासाचे पंजाबी पदार्थ आपल्या मराठी उपासाच्या पदार्थांपेक्षा कसे वेगळे असतात त्याची खूप चांगली माहिती अल्पना यांच्या लेखांमधून मिळत असते. त्याबद्दल त्यांचे भरपूर आभार मानावेच लागतील.
मागच्या आठवड्यात ३० मार्चच्या अंकात ‘सुग्रास’ या सदरात वैभव भाल्डे यांनी रसरशीत श्रीखंडाबद्दल लिहिले होते. तेही खूप आवडले. ताज्या दह्याचे विरजण घालून बनवलेल्या दह्याचा चक्का बनतो. या चक्क्यापासून बनवलेले श्रीखंड चवीला किती छान लागेल याची कल्पना लेख वाचतानाच येत होती. आता गुढी पाडव्याला तस्सेच श्रीखंड घरच्या घरी बनवेन असा निश्चय मी केला आहे. भाल्डे यांच्या लेखात खाद्यपदार्थांसोबतच त्या पदार्थांचे आध्यात्मिक अर्थ अप्रतिम सांगितलेले असतात. ते म्हणतात, स्वत:ला थोडा क्लेश देऊन दही आपल्यातला आंबटपणा बाजूला सारते. त्यात साखर मिसळली की काय मस्त माधुर्य येतं सगळ्याच कणाकणांना… आपणही आपल्यातील कटुता, किल्मिषं बाजुला सारून त्यात सत्संगाचं माधुर्य मिसळायला हवं असं ते सांगतात.
– सावनी भटकळ, श्रीगोंदा
—–
मनोरंजनाची जमलेली मैफल!
कुठलाही चित्रपट पाहताना आम्ही प्रेक्षक हरवून जातो. सिनेमात गुन्हा घडला की पोलीस येणार हे प्रेक्षक म्हणून आपल्याला माहीत असतं. हे पोलीस इफ्तेकार असणार हेही जणू आपण गृहीतच धरलेलं असतं. पण हे इफ्तेकार किती महान अभिनेते आहेत याची आपल्याला कल्पनाही येत नाही. म्हणूनच दासू भगत यांचा इफ्तेकार यांच्यावरील ‘पडद्यावरील अस्सल पोलीस कमिशनर’ हा लेख ‘मार्मिक’च्या ६ एप्रिलच्या अंकात वाचून कमाल वाटली. भगत यांनी किती खोलवर अभ्यास करून हा लेख लिहिला आहे हे स्पष्ट जाणवते. यामुळे त्यांचे खरोखर अभिनंदनच करावे लागेल.
दासू भगत यांची लेखनशैलीही सहज सोपी आणि सर्वसामान्य वाचकाला कळेल इतकी सुटसुटीत आहे. सिनेमाचे त्यांचे ज्ञान अगाध आहे हे नक्की. त्यांचे लेख वरचेवर येत असतात. त्यातून आम्हा प्रेक्षकांना बरीच माहिती मिळते. बदललेल्या ‘मार्मिक’मध्ये मनोरंजनाचा फंडाही खणखणीत आहे. संजय डहाळे यांचे नाट्यपरीक्षण आणि संदेश कामेरकर यांचे सिनेपरीक्षण यांचाही मी नियमित वाचक आहे. एखादा चित्रपट पाहावा की नाही हे त्यावरून मी ठरवतो. पाहावा तर का पाहावा याचे साद्यंत वर्णन कामेरकरांच्या लेखातून मिळते. ६ एप्रिलच्याच अंकात त्यांनी दिलेले ‘किस किस की बात’ हे परीक्षण वाचून मजा आली. चाळीशी गाठलेल्या लोकांमध्येही जी ऊर्मी असते ती पाहायला सिनेमागृहात जावेच लागेल. संजय डहाळे यांच्याबद्दल म्हणायचं तर, केवळ विशिष्ट नाटकाचीच नव्हे तर त्या पठडीतल्या नाटकांच्या ट्रेण्डबद्दलही ते जे लिहितात ते भन्नाटच असते.
– श्रीराम पानसरे, शिगवण