ग्रहस्थिती : बुध, गुरू, हर्षल मेष राशीत, मंगळ, शनि कुंभ राशीमध्ये, रवि, शुक्र, राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, केतू कन्या राशीमध्ये, प्लूटो मकर राशीत. विशेष दिवस : १६ एप्रिल दुर्गाष्टमी, १७ एप्रिल श्रीराम नवमी, १९ एप्रिल कामदा एकादशी.
मेष : कोणताही आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्या. लहानशी चूकही नंतर त्रासदायक ठरेल. व्यावसायिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नोकरीत शब्दाने शब्द वाढवू नका, कामाशी काम ठेवा. मालमत्तेवरून घरात वाद घडू शकतात. शांत राहा. समाजकार्यात वेळ खर्च होईल. तरुणांचा मौजमजेकडे कल राहील. कुटुंबासाठी वेळ द्याल. नोकरीसाठी विदेशात जावे लागेल.
वृषभ : आर्थिक बाजू भक्कम होईल. अनेक दिवसांपासूनच्या प्रयत्नांना यश मिळेल. नवीन नोकरीची संधी चालून येईल. नव्या कल्पनांना आकार मिळेल. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळाल्याने कामाचा ओघ वाढेल. पत्रकार, लेखक, संपादक, प्रकाशकांना चांगला अनुभव येईल. व्यवसायात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. छांदिष्टांच्या नावलौकिकात भर पडेल. उच्चशिक्षणासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. सामाजिक कार्याला देणगी द्याल.
मिथुन : तरुणांना यशदायक काळ. नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक फायदा मिळेल. नवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा पूर्ण होईल. घरात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. घाई करू नका. मुलांना चांगले यश मिळेल. शिक्षण, संशोधन क्षेत्रात उत्तम काळ राहील. एखाद्या विषयावर संशोधन होईल. जुना आजार डोके वर काढताना दिसेल, त्यामुळे काळजी घ्या. मित्र-मंडळींपासून दोन हात दूर राहिलेले बरे.
कर्क : नोकरीत मनासारखी स्थिती राहणार नाही. कामाकडे लक्ष द्या, वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. काहीजणांची बदली होईल. सार्वजनिक काळजी घ्या. शब्दाने शब्द वाढवू नका. वाद विकोपाला जातील. कुटुंबात बोलताना काळजी घ्या, प्रतिक्रिया देणे टाळा. मनाची शांती आणि संयम ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. जुनी मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रे तपासा आणि मगच निर्णय घ्या. खेळाडूंना यशदायक काळ आहे. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल, त्यामुळे घरातील वातावरण आनंददायी राहणार आहे.
सिंह : घरात तुमच्या मताला मान न राहिल्याने चिडचिड होईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. नोकरी-व्यवसायात कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवनवीन क्षेत्रातील संधी चालून येतील. व्यवसायातला उल्लेख हा चढता राहणार आहे. आध्यात्मिक कार्यासाठी भरपूर वेळ खर्च होईल. त्यामधून मानसिक शांती लाभेल. दानधर्म होईल. नोकरीत कामाला चांगली गती मिळेल. वरिष्ठांकडून मान मिळेल. कामाचे कौतुक होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. प्रेमप्रकरणात वादाचे प्रसंग घडू शकतात. महिलांनी आरोग्याची काळजी घेणे बरे राहील.
कन्या : तरुणांना भाग्योदय करणारा काळ अनुभवता येईल. कवी, संगीतकार, कलाकार यांच्यासाठी भावी काळ उत्तम आहे. नातेवाईकांबरोबर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद उद्भवू शकतात. नोकरीच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. त्यामध्ये काळजी घ्यावी लागेल. एखादी चोरीची घटना होऊ शकते, त्यामुळे खिसापाकीट सांभाळा. व्यवसायात आवक चांगली राहणार आहे. पण पैसे आले म्हणजे ते कसेही खर्च करणे टाळा. नव्या वास्तूच्या खरेदीचे नियोजन कराल. शब्दावर नियंत्रण ठेवा. परिस्थिती पाहून निर्णय घेतला तर तो फायद्याचा राहील. उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
तूळ : नोकरीत त्रास होईल. व्यवसाय विदेशात विस्तारण्याच्या नियोजनाला गती मिळेल. सरकारी कामे पूर्ण होतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. नोकरीत पगारवाढ, प्रमोशनचे योग आहेत. पण कामाचा ओघही वाढेल. घरासाठी वेळ खर्च करावा लागेल. मुलांकडून शुभ बातमी कानी पडेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. संशोधकांना कामानिमित्ताने विदेशात जावे लागू शकते. समाजकार्यात प्रतिष्ठा वाढणार आहे.
वृश्चिक : एखाद्या घटनेमुळे मानसिक स्वास्थ खराब होईल. घरात वागताना-बोलताना काळजी घ्या. बंधूवर्गाकडून सहकार्य मिळणार नाही. नव्या नोकरीच्या प्रयत्नांना यश मिळेल. वादात मध्यस्थी करू नका. अचानक धनलाभ होईल. व्यवसायात नोकरवर्गाकडून त्रास होईल. कोणताही निर्णय विचार करून घ्या. लॉटरी, जुगार, सट्ट्यापासून लांब राहा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जुने येणे वसूल होईल. पैसे कसेही खर्च करू नका. प्रेमप्रकरणात कटू अनुभव येईल.
धनु : व्यावसायिकांना लॉटरी लागेल. नियोजन करूनच निर्णय घ्या. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट व्यवसायात चांगला लाभ मिळेल. कलाकारांसाठी उत्तम काळ. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. कामाचा ओघ वाढेल. व्यवसायात काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. आव्हानावर चाणाक्ष पद्धतीने मार्ग काढा. विदेशात नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. आंधळा विश्वास ठेवून कुणाशी व्यवहार करू नका. सरकारी कामे झटपट मार्गी लागतील. नव्या ओळखीतून फायदा होईल. समाजकार्यात वेळ खर्च होईल.
मकर : कामाच्या ठिकाणी मनासारखी साथसंगत न्ा मिळाल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. घरात ज्येष्ठांच्या प्रकृतीच्या समस्या निर्माण होतील. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. व्यावसायिकांना चांगले यश मिळेल. मित्रांबरोबर भटकंती होईल. सार्वजनिक जीवनात वादात पडू नका. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू शकतो. नव्या व्यवसायाची घडी चांगली बसेल. सामाजिक कार्यात मन रमवाल. मुलांकडे लक्ष द्या, त्याच्या एखाद्या कारनाम्याचा त्रास होऊ शकतो. दांपत्यजीवनात सुख मिळेल. कलाकार, संगीतकार, चित्रकारांना उत्तम काळ. नोकरीत नव्या कामाची जबाबदारी घ्यावी लागेल.
कुंभ : नियमात राहूनच काम पूर्ण करा, त्रास होणार नाही. मित्रमंडळींबरोबर अधिक जवळीक नको. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष नको. घरात आनंददायक घटना घडेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. काहीजणांना मनासारख्या नोकरीची संधी मिळू शकते. नवीन आर्थिक गुंतवणूक करणे तूर्त टाळा. सामाजिक जीवनात मानसन्मान मिळेल. उधार उसनवारी देणे टाळा. नातेवाईकांमध्ये कटुता निर्माण करणारे प्रसंग घडू शकतात. कलाकारांना यशदायक काळ अनुभवयास मिळेल.
मीन : कुणाच्या सांगण्यावरून लगेच निर्णय घेऊन मोकळे होऊ नका. नव्या लोकांच्या गाठीभेटी होतील. कोणत्या भानगडीत पडू नका, नाकासमोर चालत राहा. कोर्ट-कचेरीतील निर्णय येण्यास अजून काही काळ जाईल. नवे घर, जमीन घेण्याचा विचार आता मार्गी लागेल. मनासारखी वस्तू मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. खेळाडूंना चांगले यश मिळेल. मुलांकडून चांगली शैक्षणिक बातमी कानी पडेल, घरातील वातावरण आनंददायक राहील. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ओघ वाढेल, त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काळजी घ्या. धार्मिक कार्यामधून मानसिक समाधान मिळेल.