ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रबोधनकार सातार्यात आले. निवडणुकीमुळे छापखान्याला कामही मिळालं. पण त्यांचा वेळ मुंबईतल्या प्लेग आणि गिरणी संपामुळे सातार्यात येणार्या मजुरांच्या जत्थ्यांच्या अडचणी निस्तरण्यातच जाऊ लागले.
– – –
`शनिमाहात्म्य अर्थात ग्रहदशेच्या फेर्याचा उलगडा’ हे प्रबोधनकारांचं एक जगावेगळं पुस्तक आहे. पुस्तक न वाचणार्यांना त्याच्या नावावरून असं वाटतं की ते तात्याजी महिपती याने लिहिलेल्या शनिमाहात्म्य या लोकप्रिय ओवीबद्ध पोथीवर केलेली टीका असेल. त्यात टीका आहेच. या पोथीमुळे माणूस निराशावादी आणि आत्मद्रोही बनतो, असं प्रबोधनकारांचं स्वच्छ प्रतिपादन आहे. प्रबोधनकारांनी ज्योतिषांची बाजू घेऊन केलेली पौराणिक मांडणी तर नाहीच, पण त्यांनी सुरूवातीला म्हटलंय तसं आगरकरांच्या धर्तीवर केलेली चिकित्साही यात नाही. तात्याजी महिपतीने शनिमाहात्म्यात जी विक्रम राजाची गोष्ट सांगितली आहे, त्याच्याशी जुळणार्या घटना आपल्याही आयुष्यात घडल्या आहेत, हे लक्षात आल्यावर प्रबोधनकारांनी या योगायोगाची अत्यंत रोचक शब्दांत सांगितलेली कहाणी आपल्याला प्रबोधनकरांच्या शनिमाहात्म्यात वाचता येते. अर्थात प्रबोधनकारांच्या शनिमहात्म्याचं तात्पर्य पौराणिक शनिमाहात्यापेक्षा १८० कोनात उलटं आहे. तात्याजी महिपतीचं शनिमाहात्म्य दैववादाकडे नेतं, तर प्रबोधनकारांचं शनिमाहात्म्य प्रयत्नवादाची दिशा दाखवतं.
विशेष म्हणजे शनिमाहात्म्याशी साधर्म्य दाखवण्याच्या निमित्ताने प्रबोधनकारांच्या आयुष्यातील साधारणपणे १९२२ ते १९२८ या महत्त्वाच्या कालखंडातल्या जीवनप्रवास या पुस्तकात आला आहे. हे आयुष्याच्या संध्याकाळी विचारपूर्वक केलेलं आत्मनिवेदन नाही, तर त्यांनी सार्या घटना अगदी ताज्या ताज्या असताना लिहिल्या आहेत. प्रबोधनकारांचा स्वभाव आधीच रोखठोक असल्यामुळे ते फारसं काही लपवून ठेवत नाहीतच. पण इथे ते जास्तच मोकळेपणाने आलं आहे.
धनजीशेठ कूपरने दाखवलेल्या छापखान्याच्या स्वप्नाची भुरळ पडून प्रबोधनकार पाडळीला आले खरे, पण तिथे पाय टाकताच त्यांच्या अपेक्षाभंगाला सुरवात झाली. शनिमाहात्म्यातल्या कथेशी साधर्म्य दाखवत प्रबोधनकारांनी हा अपेक्षाभंग नोंदवून ठेवला आहे. तो असा, `पाडळीच्या मैदानात घोडा उतरताच, विक्रमाला जसा घोडा, नदी, झाडेझुडपे गुप्त झाल्याचा देखावा दिसला, तसा मला भाऊरावने वर्णन करून सांगितल्यापैकी एकाही सवलतीचा तेथे थांग दिसेना. सगळेच कविवर्णन किंवा भुसावरच्या चिठ्ठ्यांचा अनुभव आला. पण करायचे काय? तुमच्याकरिता घर बांधून तयार आहे, असे स्पष्ट पत्र असताही तेथे मजुरांच्या झोपड्यांपैकी एकीत आमची व्यवस्था लागली. खाणावळीची सोय नाही, जेवण करायला बाई किंवा बुवा नाही, सगळाच ठणठणाट. आलिया भोगाशी दूरवर नजर देऊन सादर झालो. विक्रमाला तामलिंदा नगरी लाभली. मला तामसनिंदा पाडळी लाभली. विक्रमाला वैश्य सावकार भेटला, मलाही कूपरच्या रुपाने तोच भेटला.’
पाडळीत आलेल्या अनुभवांमुळे प्रबोधनकार या गावाला तामसनिंदा म्हणत असले, तरी तिथलं त्यांचं वास्तव्य वाया गेलं नाही. त्यांच्यामुळे हे गाव सत्यशोधकी विचारांचं केंद्र बनलं. प्रबोधनकारांचे अभ्यासक प्रा. महावीर मुळ्ये या गावाचं वर्णन सत्यशोधकांची पंढरी असं करताना लिहितात, `जरंडेश्वर आणि नांदगिरी या दोन प्रसिद्ध डोंगरांच्या मध्ये पाडळी हे गाव आहे. त्याकाळी सदर्न मराठा रेल्वे होती. तेव्हा सातारा रोड हे स्टेशन खूपच प्रसिद्ध होतं. कर्मवीर भाऊरावांनी धनजीशेठ कूपर यांच्याशी चर्चा करून नांगर निर्मितीचा कारखाना काढण्यास पाडळी सातारा रोडचीच निवड केली. व्यापार, वाहतूक, कामगार इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन आण्णांनी दूरदृष्टीने या गावाची निवड केली. पुढे हेच गाव सत्यशोधकांची पंढरी म्हणून ओळखले जाऊ लागले. कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव विचारे, ज्योत्याजीराव फाळके इत्यादींच्या तालमीत हजारो सत्यशोधक तयार होऊन समाज परिवर्तनाच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले.’ आजचं सातारा रेल्वे स्टेशन हेच जुनं सातारा रोड रेल्वे स्टेशन अशी माहिती महावीर मुळ्ये यांनी दिली. याच स्टेशनच्या जवळ पाडळी गाव आहे.
पाडळी गावात धनजीशेठ कूपरचा नांगराचा कारखाना उभा राहिला होता. तिथेच एका पत्र्याच्या शेडमध्ये प्रबोधनकारांच्या छापखान्याचं सामान मुंबईहून येऊन पडलं होतं. प्रबोधनकारांनी दादरमधले आपले दोन सहकारी सोबत आणले होते. त्यापैकी एक होते भा. र. कद्रेकर आणि दुसरे म्हणजे दत्ता देशमुख. कद्रेकर हे मुंबईतल्या ब्राह्मणेतर चळवळीतले महत्त्वाचे कार्यकर्ते होते. त्यांनी पुढे सी. के. बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर दीर्घकाळ काम केलं. बाबासाहेबांच्या `प्रबुद्ध भारत’च्या संपादक मंडळावरही ते होते. शिवाय प्रबोधनकारांच्या `शेतकर्याचे स्वराज्य’ या पुस्तकाचे प्रकाशक म्हणून त्यांचं नाव आहे. दत्ता देशमुख हे प्रबोधनकारांचे स्वाध्यायाश्रमाच्या उपक्रमांमधून पुढे आलेले एक धडपडे तरूण होते. त्यांनी `स्वाध्याय संदेश’ या प्रबोधनकारांच्या पुस्तकांसाठी चित्रं काढल्याचा उल्लेख सापडतो. छापखान्यातली सर्व कामं करण्यात वाकबगार असणार्या दत्तोबांनी प्रबोधनकारांना सातार्यानंतरही पुण्यातही साथ दिली. पुढे त्यांना वडिलांच्या आजारपणामुळे मुंबईल्ाा परतावं लागलं. आपल्या या दोन खमक्या सहकार्यांच्या मदतीने प्रबोधनकारांनी पत्र्याच्या शेडमध्येच छापखाना सुरू केला.
तेव्हा एकीकडे निवडणुकांची धामधूम सुरू होती, तर दुसरीकडे प्लेगने मुंबईत हैदोस घातला होता. १८९६पासून दरवर्षी प्लेगची साथ मुंबईला धडका देतच होती. पण १९२३ साली प्लेगची शेवटची सगळ्यात मोठी साथ आली. तेव्हाच मुंबईतल्या गिरणी कामगारांचा संप सुरू होता. त्यामुळे मुंबईतल्या गिरण्यांमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या सातार्यातल्या गिरणी कामगारांनी पुन्हा गावचा रस्ता धरला होता. गिरण्यांबरोबरच संबंधित कारखाने आणि गोद्यांमधून बेकारीची लाट पसरली होती. त्यामुळे सातार्यात मजुरांचे जत्थेच्या जत्थे मुंबईहून ट्रेनने पोचू लागले. त्यातून प्लेगचा फैलाव होऊ नये म्हणून सातार्यातल्या एका डॉक्टरच्या सल्ल्यानुसार प्रबोधनकारांनी मित्रांच्या मदतीने छापखान्यातच प्लेगच्या रोग्यांवर इलाज करण्यासाठी दवाखाना सुरू केला. धनजीशेठ कूपरने निवडणुकीत मतं मिळवण्याचा एक उपक्रम म्हणून त्याला मदतही केली. पाडळी आणि आजूबाजूच्या गावांमधून रोज कमीतकमी २० ते २५ रोग्यांचे नातेवाईक औषधं घ्यायला यायचे. दत्ता देशमुख हे उपचारांचं काम उत्साहाने करायचे. त्यामुळे त्यांना डॉक्टर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
लस टोचून घेणं, हा प्लेगवरचा महत्त्वाचा उपाय होता. पण खेड्यातले लोक त्याला तयार नसत. त्यावर सगळ्यांनी मिळून एक मार्ग काढला. दर गुरुवारी पंचक्रोशीतले शंभर सव्वाशे लोक आठवडी बाजारासाठी पाडळीला यायचे. एका बाजाराच्या दिवशी धनजीशेठ सातार्यातल्या एका डॉक्टरला सोबत घेऊन आले. प्रबोधनकार आणि त्यांच्या दोन्ही सहकार्यांनी ब्रिटिश पद्धतीच्या बुरहॅट घालून बाजारातल्या लोकांना चलो चलो म्हणत छापखान्यात गोळा केलं. त्यात दहा बारा तरी बायका होत्या. त्यापैकी एकीला तयार करून तिला डॉक्टरने इंजेक्शन टोचलं. त्यावर ती म्हणाली, काय बी व्हत नाय. मुंगी चावल्यागत जरासं व्हतं. हे बघितल्यावर जवळपास शंभर गावकर्यांनी लस टोचून घेतली.
प्लेग आणि गिरणी संपामुळे मुंबईहून सातार्यात पोचणार्या मजुरांच्या समस्या निवारण्याच्या कामात प्रबोधनकार गुंतले होते. पण त्याचबरोबर नव्याने सुरू झालेल्या छापखान्यात निवडणुकांचे जाहीरनामे आणि पत्रकांची कामं मोठ्या प्रमाणावर येत होती. पण पाडळीतल्या हवामानामुळे कामात व्यत्यय येत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे दिवसभर भयंकर उष्णता असायची. त्यामुळे छपाईसाठी तयार केले जाणारे अक्षरांचे रूळ वितळून जात असत. दिवसा छपाई शक्यच नसायची. आश्चर्य म्हणजे महाबळेश्वरच्या डोंगरावरून येणार्या गार वार्यामुळे संध्याकाळी वातावरण अगदी थंड होऊन जायचं. त्यामुळं संध्याकाळी ६ ते १० या वेळात छपाईचं काम जोरात सुरू असायचं. त्यानंतर प्रबोधनकार त्यांच्या मित्रांसह रेल्वे स्टेशनवर यायचे. रात्री १२ वाजता पुण्याहून येणारी बंगलोर मेल पोचायची. त्यातून `इंडियन डेली मेल’ आणि `टाइम्स ऑफ इंडिया’ यांचे प्रबोधनकारांच्या नावचे अंक यायचे. पोस्टमास्टर ते ट्रेनमधल्या पोस्टाच्या पिशवीतून काढून घ्यायचे. नंतर स्टेशनवरच बातम्यांचं वाचन, त्यावर चर्चा व्हायची. रात्री उशिरा मंडळी झोपायला जायची, असा क्रमच झाला होता. पण हा क्रम फार दिवस टिकला नाही. त्याला कारण होते पॅसेंजर गाडीने मुंबईहून मोठ्या संख्येने येणारे मजूर. प्लेगपेक्षाही हे मजूर बेकारीच्या उपासमारीने ग्रासलेले होते. रोज त्यांच्यातले एक दोघे जण तरी अस्थिपिंजर आणि बेशुद्ध अवस्थेत असायचे. सोबतचे प्रवासी स्टेशन येताच आरडाओरडा करत. स्टेशनमास्तर हमालांच्या मदतीने त्यांना खाली उतरवत. कँटीनवाला गरम दूध किंवा चहा पाजून त्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करे. शुद्धीवर आलाच तर नाव गावा विचारून त्याची पुढे रवानगी व्हायची. काही जण मरणाच्या दारातून परत यायचे. काहीजण उपचारांना प्रतिसाद न देता मृत्यूला कवटाळायचे.
कूपरचा मोठा कारखाना असूनही त्यात डॉक्टरांची सोय नव्हती. त्यामुळे एखादं मृत शरीर गाडीतून उतरवलं की त्याच्या पुढची कायदेशीर सोय करणं गरजेचं असायचं. अंत्यविधीचा खर्च धनजीशेठने मंजूर केला होता. पण त्याआधी त्या काळच्या नियमानुसार ज्युरीच्या रिपोर्टची किंवा स्थानिक तलाठ्याकडे नोंद करण्याची गरज होती. ही सगळी धावपळ प्रबोधनकार, स्टेशनमास्तर आणि पोस्टमास्तर करत. त्यांना स्टेशनजवळचा रॉकेलचा गुजराती व्यापारी मदत करायचा. या चौघांचं वर्णन प्रबोधनकारांनी पाडळीचे साडेतीन शहाणे असं केलंय.
एखादं मृत शरीर आलं की स्टेशन मास्तरचा निरोप यायचा. बहुतेक रात्रच असायची. त्यामुळे झोपेतून उठून यावं लागायचं. पाडळीत एक ख्रिश्चन तलाठी होता. त्याला बोलवून आणायचं. जाणारी येणारी एखादी गाडी थांबवून प्रवाशांकडून मृताची ओळख पटते का याचा शोध घ्यायचा. ओळख पटली आणि नातेवाईक जवळपास असले तर त्यांना बोलावून आणायचं. तोवर पोलिस पाटलाच्या पहार्यात मृत शरीर धर्मशाळेत ठेवायचं. यापैकी काहीच झालं नाही, तर कारखान्यातून दहा रुपये घेऊन तलाठ्याला अंत्यसंस्कारांसाठी द्यायचे. गावकर्यांना बोलावून तो पुढचे सोपस्कार करायचा. हे सगळं करण्यात प्रबोधनकारांची धावपळ होत होती.
एकीकडे प्लेगचा धुमाकूळ आणि दुसरीकडे मुंबईहून येणार्या आजारी किंवा मृत मजुरांची गर्दी, याची व्यवस्था करण्यात प्रबोधनकारांचे सातार्यातले सुरूवातीचे दिवस गेले. मुंबईत संप आणि प्लेग सुरू असेपर्यंत हे सुरूच राहिलं.