नावात काय आहे? असा प्रश्न सर्रास विचारला जातो खरा, पण नावाची जादुगिरी अनेकांना सहज भुरळ पाडते किंवा काहीदा उलटाही प्रकार होतो. मराठी नाटकांच्या नावाबद्दल एखादी पुस्तिका नक्की होईल. एवढी त्यात कथा, दंतकथा, उपकथा, नामांतर कथानकेही आहेत. पंचाक्षरी नावे एकेकाळी ‘लकी’ समजली जायची. तर काही दिग्गज निर्माते नऊ अक्षरी नावांचाच आग्रह धरायचे. असो. एक नवीन नाटक यंदाच्या वर्षात रंगभूमीवर आलंय. त्याचं नाव पूर्ण इंग्रजीत पण लेखन दुहेरी. ते असे, ‘That’s The स्पिरिट!’ हे देखील नऊ अक्षरी म्हणजे नावापासूनच कुतूहल वाढविण्याची किमया किंवा संभ्रमात टाळण्याचा प्रकार असावा.
…नाटकाच्या नावाची गोष्ट अजून संपलेली नाही. कारण शुभारंभी प्रयोगानंतरही या नाटकाच्या नावाचे गुर्हाळ सुरू होते. रसिकांच्या मागणीमुळे आता ‘स्पिरिट’ऐवजी ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची!’ हे नवं बारसं झालेलं दिसतंय. पण पुढे नवं नाव खटकलं तर… (असो.)
‘स्पिरिट’ म्हणजे आत्मा, जीव, भूत, शरीर अस्तित्वात नसलेला भाग, असा अर्थ घ्यायचा की ‘स्पिरिट’ या प्रयोगशाळेतल्या द्रव प्रकाराचा, हा देखील प्रश्न आहेच. नावावरून आठवलं. २०१५ साली विजय निकम लिखित, दिग्दर्शित ‘स्पिरिट’ हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. त्यात राजेश देशपांडे, माधवी जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नवं ‘स्पिरिट’ हे नात्यांचा अर्थ अलगद उलगडून दाखविणारे कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक आहे. नामांतर झालं असलं तरी प्रयोगाला नावं ठेवायला तशी जागा नाही!
मनोहर देशपांडे यांच्या घरातलं हे नाट्य. त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं. प्रौढत्वातही त्यांनी सुशीला या घटस्फोटीत महिलेशी लग्न केलेलं. जोडीदार म्हणून हे दांपत्य एकमेकांना सांभाळून घेतंय. पहिल्या पत्नीपासून मनोहर उर्फ अण्णा यांना श्रीधर हा तरुण मुलगा आहे. त्याचे कॉलेज शिक्षण सुरू आहे. सुशीलाला कांचन नावाची मुलगी. ती या घरात तिच्यासोबत आहे. आज हे चौकोनी कुटुंब स्थिरावण्याचा प्रयत्न करतेय. दोन्ही पालक दोन्ही मुलांशी सुसंवाद साधून सांभाळ करण्यात ‘बिझी’ आहेत. सारं काही आनंदात सुरू असतानाच एके दिवशी एक आक्रमक तरुण घरात धडकतो. तो एक संकटच ठरतो. पहिल्या नवर्यापासून सुशीलाला झालेला हा विनय नावाचा मुलगा. जन्मदात्या आईचा शोध घेत देशपांडे यांच्या दारात आलेला. त्याला पाच मिनिटांसाठी आईची भेट हवीय. पण आईचा स्पष्ट नकार. त्यामुळे विनय दाराबाहेरच ठिय्या मारूनच बसतो. वॉचमनशी हुज्जत घालतो. शेजारी-पाजारी गोळा करण्याचाही प्रयत्न करतो. देशपांडे कुटुंबातील वातावरण पुरतं बिघडून जातं.
देशपांडे अण्णा यातून मार्ग काढण्यासाठी विनयला घरात घेतात. संवाद साधतात. पण एका क्षणी विनय त्याचा हक्क मागतो. आईला सोबत घेऊन जाण्याचा प्रस्ताव ठेवतो. त्यामुळे सारेजण हादरून जातात. घटस्फोटानंतर सुखाने सुरू झालेला सुशीलाचा दुसरा संसार नातेसंबंधाच्या विचित्र कोंडीत सापडतो. विनयला त्याची जन्मदाती आई जवळ हवीय. आई सुशीलाला नव्याने मांडलेला संसार सुखाचा हवाय. विनयची लुडबूड, अडगळ नकोय. अण्णांना घरपण शाबूत ठेवण्यासाठी पत्नी हक्काची हवीय. मुलगी कांचन व मुलगा श्रीधर यांना केअरटेकर पालक हवेत. विनयच्या आगमनामुळे कात्रीत अडकलेली ही नातीगोती… आता ही कोंडी सुटणार कशी?
कुटुंब व्यवस्था जिवंत ठेवण्याचे काम विवाहसंस्था करते. कुटुंबातील परस्परांचे प्रेम, आपुलकी, विश्वास यावर सारं काही अवलंबून असते. नव्या पिढीवरले संस्कार आणि भावनिक जपवणूक ही जबाबदारी पालकांची. इथे एका कुटुंबातली वैचारिक तसेच नात्यांच्या अस्तित्वाची उलथापालथ सुन्न करून सोडते. कथानकाचा शेवट धक्कातंत्र आणि कलाटणी देणारी आहे, जो नाट्याला एका उंचीवर घेऊन जातो.
नाटककार डॉ. नरेश नाईक यांनी कथेतील संघर्ष खुबीने खेळवला आहे. उत्कंठा वाढविणार्या प्रसंगांची चढत्या क्रमाने मांडणी केलीय. संवाद खटकेबाज आणि अर्थपूर्ण आहेत. आजवर कुटुंबप्रधान नाटकाने मराठी रंगभूमीला अनेक विषय दिलेत. प्रश्न आणि त्यांची उत्तरेही दिलीत. बदलत्या काळात या दोन कुटुंबांतील समस्या लक्षवेधी ठरतात. एकूणच, डॉ. नाईक यांची संहिता पकड घेणारी आणि शेवट गोड करणारी आहे.
बादल सरकार, विजया मेहता, सुलभा देशपांडे, रत्नाकर मतकरी, अमोल पालेकर अशा एकापेक्षा एक दिग्गज रंगधर्मींचे रंगसंस्कार लाभलेले दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केलेय. संहितेला शंभर टक्के न्याय आणि सादरीकरणातला हळुवारपणा त्यांनी पुरेपूर जपला आहे. नाटकाच्या नावाचा वाद सोडला तर दुसरा कुठलाही आक्षेप कुणाचाही असणार नाही एवढी पकड आविष्कारात दिसते. प्रायोगिक, व्यावसायिक आणि स्पर्धेची नाटके याचा प्रदीर्घ काळ अनुभव गाठीशी असल्याने एका कौटुंबिक विषयाच्या नाटकाला न्याय मिळाला आहे. सुशीलाचे हृदयस्पर्शी स्वगत, विनय या मुलाचा भावनिक आक्रोश हृदय हेलावून सोडणारा आहे. दिग्दर्शकाचे कौशल्य त्यामागे आहे. पात्रनिवड अचूक आहे. राजन ताम्हाणे यांनी दिग्दर्शन आणि प्रकाशयोजना या पडद्यामागील जबाबदार्या पार पाडून शिवाय मनोहर देशपांडे उर्फ अण्णा ही भूमिका समर्थपणे पेलली आहे. अण्णांची देहबोलीही शोभून दिसते. प्रसंगी संयमी आणि काहीदा आक्रमकता नजरेत भरते.
सतत कॅमेर्याला सामोरं जाणार्या रंगकर्मीला रंगमंचावर अभिनयातून भडकता दाखविणे भाग पडते हे कसब अभिनेत्री अदिती देशपांडे यांनी समर्थपणे पेललं आहे. ‘नॉट ओन्ली मिस्टर राऊत’, ‘मायबाप’ अशा किमान डझनभर मराठी चित्रपटांत गाजलेल्या आणि मालिकांमुळे घराघरात थेट पोहोचलेल्या या गुणी अभिनेत्रीने यातील सुशीलाची मध्यवर्ती भूमिका केलीय. भूमिकेला त्यामुळे न्याय मिळालाय. भूतकाळ विसरून नवा डाव मांडण्याचा प्रयत्न, तसेच नवरा आणि मुलं यातील भावनिक घुसमटही नजरेत भरते. दुसर्या अंकातील मुलाशी झालेला संवाद, स्वगत आणि त्यातून झालेला भावनिक स्फोट अप्रतिमच. विशेषत: आई म्हणून मनाची झालेली घालमेल हृदयस्पर्शी.
ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांचा नाट्यवसा लाभलेला आजच्या पिढीचा रसिकप्रिय ‘हिरो’ संग्राम समेळ हा एंट्रीपासूनच कथानकाचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरतो. ‘तो आता काय करणार?’ याकडे सार्यांचे लक्ष वेधून घेतो. आईची पाच मिनिटांची भेट मिळावी, यासाठीची त्याची तडफड नजरेत भरते. त्याचा युक्तिवाद पुरेपूर पटतो. त्याच्या संतापामागे असणारा भावनिक ओलावा विचार करायला भाग पडतो. शेवटचा डाव अखेर एक अभिनेता म्हणून तो भूमिकेतून जिंकतो. यात त्याच्या परिपक्व अभिनयाचे दर्शन घडते.
कथानकातील पेच सोडवण्यासाठी एका कौन्सिलरचाही समावेश केलाय. त्या शमा या समुपदेशिकेच्या भूमिकेत अपर्णा चोथे आहेत. सोबत मुलगी कांचन (वरदा देवधर) आणि मुलगा श्रीधर हा (प्रसाद बेर्डे) यांनी भूमिकेला न्याय दिलाय. टिपिकल वॉचमन अनिकेत गाडे बनले आहेत. अशी ही सातजणांची ‘टीम’ प्रत्येक प्रसंग रंगविण्याचा प्रयत्न करते.
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी उत्तम रंगसंगतीसह कल्पकतेने उभं केलेलं देशपांडे कुटुंबाचं सुखवस्तू घरकुल कुठेही खटकत नाही किंवा प्रसंगात अडथळाही बनत नाही. ब्लॉकमधली सामुग्री तसेच मुख्य दरवाजा त्यासमोरची लॉबी आणि लिफ्ट, हे सारं काही अस्सल वाटेल याची बेंद्रे यांनी पुरेपूर खबरदारी घेतलीय. लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि बंदही होतो. त्यातून ये-जा होते. लिफ्ट हे नेपथ्यरचनेतील एक प्रमुख आकर्षण ठरते. भविष्यात लिफ्ट हेच नाटकांचे ‘स्थळ’ बनले तर आश्चर्य वाटायला नको.
प्रकाशयोजनेची जबाबदारी दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी स्वतः हाती घेतलीय. काही प्रसंग ठळकपणे प्रकाशात यावेत, ते परिणामकारक ठरावेत, यासाठीचा प्रयत्न दिसतोय. मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि शरद सावंत यांची रंगभूषा चांगली आहे. परीक्षित भातखंडे याचे संगीत वातावरणनिर्मिती करते. एकूणच, तांत्रिक बाजूंनी सज्ज अशी ही निर्मिती.
मराठी नाटके प्रामुख्याने कौटुंबिक कथानकांशी जवळीक साधणारी आहेत. स्त्रियांच्या प्रश्नांना रसिकांचाही उदंड प्रतिसाद मिळतो, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. स्त्रियांच्या संवेदनशीलतेचा शोध घेणारी विविधरंगी कथानके आजवर अवतरली. विजय तेंडुलकर यांच्या ‘कन्यादान’मध्ये आंतरजातीय विवाहामुळे निर्माण झालेले प्रश्न होते, तर सासू-सुनेचा वादविवाद रत्नाकर मतकरींच्या ‘माझं काय चुकलं’ नाटकात दिसला. मूल न होणार्या स्त्रियांची समस्या ‘पुत्रकामेष्टी’ (अनिल बर्वे), ‘ध्यानी मनी’ (प्रशांत दळवी), ‘शनिवार-रविवार’ (सतीश आळेकर), या नाटकांत दिसली. उतारवयातल्या दांपत्याचा प्रश्न ‘नटसम्राट’ (वि. वा. शिरवाडकर), ‘कालचक्र’, ‘संध्याछाया’ (जयवंत दळवी), ‘वाडा चिरेबंदी’ (महेश एलकुंचवार) या नाटकांनी मांडला. ही यादी संपणारी नाही. अगदी यंदाच्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेतही स्त्रीप्रधान नाटकांनी बाजी मारली. त्यात ‘असेन मी, नसेन मी’, ‘उर्मिलायन’, ‘वरवरचे वधूवर’, ‘नकळत सारे घडले’ या नाटकांनी अस्वस्थ करून स्त्रीमनाच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडली.
आजच्या युगात स्त्रियांना नव्या रंगरूपात, विचारात सामावून घेण्याची खरी गरज आहे. तिला योग्य वाटणार्या पर्यायांचा सन्मानही करावयास हवा. तिला घरातील दुय्यम स्थान देण्याचे दिवस आज संपले आहेत. पारंपारिक, जुन्या बुरसटलेल्या विचारांची कात फेकलीच पाहिजे. लग्नाला पर्याय म्हणून हल्ली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा पर्याय आहे. त्याचप्रकारे लग्नानंतर जोडीदाराशी न जमल्यास दोघांनाही घटस्फोट आणि पुनर्विवाहाचाही पर्याय आहे.
घटस्फोटाचा निर्णय हा उठसूठ अन् सहजतेने घ्यायचा निर्णय नाही. चुकीचे पाऊल पडले तर कुटुंबाचा खेळखंडोबा होण्यास वेळ लागत नाही. या नाट्यात पुनर्विवाह आहे, पण त्यानंतर उद्भवणारी समस्याही अधोरेखित केलीय. जन्म दिलेल्या मुलांचा भावनिक आधार, हक्क हे घटस्फोटानंतर मिळतील काय? हा प्रश्न ठळकपणे मांडलाय.
‘शारदा’पासून ते ‘चारचौघी’पर्यंतच्या नाटकांत स्त्रियांचे विषय उलगडून मांडले आहेत. त्याच वाटेवरले हे आजच्या प्रेक्षकांसाठी अंतर्मुख करणारे हदयस्पर्शी कुटुंबनाट्य!
गोष्ट तिच्या घटस्फोटाची (That’s The स्पिरिट)
लेखन : डॉ. नरेश नाईक
दिग्दर्शन : राजन ताम्हाणे
नेपथ्य : संदेश बेंद्रे
संगीत : परिक्षित भातखंडे
प्रकाश : राजन ताम्हाणे
वेशभूषा : मंगल केंकरे
रंगभूषा : शरद सावंत
छायाचित्रे : संजय पेठे
सूत्रधार : गोट्या सावंत
निर्माते : कल्पना कोठारी, विलास कोठारी
निर्मिती संस्था : रंगनील क्रिएशन्स